अंजन
‘‘तुमी तर शिकलेल्या दिसता. तुमाला काय कमी असणार? आमच्यासारखं हातावर पोट थोडंच आहे तुमचं. कष्टांमध्ये नवऱ्याची आठवण काढायला वेळ बी नसतो. तवा टिपं गाळू नका, चांगलं मजेत जगा!’’, म्हणत ती बाई निघूनही गेली.. विश्रामच्या जाण्याने दु:खात बुडालेल्या माझ्या डोळ्यात त्या बाईनं जणू अंजन घातलं. जीवनाचा रस्ता स्वच्छ दिसायला लागला..
बरोबर १६ वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात विश्राम, माझा नवरा आम्हाला सोडून गेला. आदल्या दिवशी अस्वस्थ वाटतं काय, त्याचं परिवर्तन हार्ट अ‍ॅटॅकमध्ये होतं काय, आणि दुसऱ्याच दिवशी खेळ खलास होतो काय! सर्वच अचानक आणि अकल्पित! मला व माझ्या मुलीसमोर दु:खाचा डोंगर उभा करून निघून गेला तो. कसं सावरायचं यातनं? माणूस गेला तरी त्याच्याशी निगडित असलेल्या व्यावहारिक गोष्टी काही जात नाहीत. त्या मागे असलेल्या माणसांना निस्तराव्याच लागतात. समोर असंख्य कामं होती. त्याचा बिझनेस बंद करणं, ऑफिस आवरणं, त्याच्या व्यवसायातले आर्थिक व्यवहार पूर्ण करणं, वेगवेगळ्या कामांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी वकिलांकडे चकरा मारणं, सहा महिन्यांनी होणाऱ्या माझ्या मुलीच्या लग्नाची तयारी करणं, शिवाय माझं गाणं सांभाळणं! शेवटी काळ हाच सर्वावर उपाय असतो. हळूहळू गुंते सुटायला लागले. पण आठवणींचं काय? राहून राहून डोळ्यात पाणी येत होतं!
दिवाळी सव्वा महिन्यांवर आली होती. पण मन मात्र अंधारलेलंच होतं. यावेळी आईने दिवाळीत आम्हा दोघींना चार दिवस लोणावळ्याला तिच्या घरी बोलावलं होतं. तेवढाच बदल! तिथलं सुंदर वातावरण, छान हवा, हिरवा निसर्ग मनाला सुखावत होता. पण तेवढय़ापुरताच! परत वास्तवाची जाणीव झाली की पोटात धस्स व्हायचं. दोन दिवस राहून मुलगी नोकरीमुळे मुंबईला परत गेली. मी मात्र दोन तीन दिवस राहणार होते. आईला म्हटलं, ‘‘दिवाळी आहे. आज दुपारीच मी पुण्याला जाते आणि तिथे नवीन घेतलेल्या फ्लॅटमध्ये दिवा लावून येते. रात्रीच्या आत परत येते’’ आईलाही पटलं.
जेवून दुपारीच निघाले. ड्रायव्हरला दिवाळीची सुट्टी दिली होती. म्हणून एकटीच लोकलने निघाले. लोकलच्या डब्यात मोजून सात-आठ बायका होत्या. खिडकीशेजारील सीटवर बसून, खिडकीच्या बाहेर शून्यात बघत विचार करत होते. किती हौसेने पुण्याचा फ्लॅट चार महिन्यांपूर्वी घेतला, सर्वासाठी छान पार्टीही केली. जेमतेम एकदा जाऊन दोघं राहून आलो. आणि काय झालं हे अचानक! शेवटचे दोन दिवस तर तो फक्त डोळ्यांनीच बोलत होता. काय विचार असतील त्याच्या मनात? काय इच्छा, आकांक्षा त्याला व्यक्त करायच्या होत्या. छे! सर्व राहूनच गेलं. विचारांनी डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या. इतक्यात एक आवाज कानावर आला, ‘‘बाई, का रडता हो?’’ एक गरीब अशिक्षित वाटावी अशी बाई मला विचारत होती. म्हणाली, ‘‘चांगल्या घरातल्या, शिकल्या, सवरलेल्या दिसता तुम्ही अन् मग कशापायी भर दिवाळीत टिपं गाळताय?’’ जरा भानावर येत मी डोळे पुसले. मग थोडक्यात तिला माझी कहाणी सांगावीच लागली.
माझं बोलणं संपल्यावर ती बाई म्हणाली ‘‘अहो बाई, माझा नवरा गेल्या वर्षी ऐन दिवाळीतच गेला बगा! माझ्या थोरलीचं लग्न अठराव्या वर्षीच केलं मी. तिला अन् तिच्या नवऱ्याला दिवाळीला घरी जेवायला बोलावलं होतं. मी घरात चकल्या तळत होते. नवरा घरातच होता. अचानक तो उभाच्या उभा कोसळला, त्याच्या जवळ पोहोचेपर्यंत तो गेलेलाच होता. जेवायला आलेल्या मुलीला त्याचं प्रेतच बघावं लागलं. घरात म्हातारी सासू आहे, शाळेत जाणारी दोन मुलं आहेत. नवऱ्यानं दोन मुलांच्या रूपानं जी निशाणी ठेवलेय ना, ती बगायची, त्यांना वाढवायचं आणि दिवस काढायचे. दिवसभर कष्ट करत राहते. दिवसा नोकरी, घरी गेल्यावर दोन-तीन घरची कामं करायची नि आलेला दिवस गोड मानायचा. कामं, म्हाताऱ्या सासूचं, मुलांचं करता करता दम निघतो नुसता. कसली दिवाळी अन् कसलं काय! आजसुद्धा कामावरूनच घरी जात्येय! तुमी तर शिकलेल्या दिसता, मुलगीही शिकलेली, नोकरी करणारी, मग तुमाला काय कमी असणार? आमच्यासारखं हातावर पोट थोडंच आहे तुमचं. या कष्टांमध्ये नवऱ्याची आठवण काढायला वेळ बी नसतो. तवा टिपं गाळू नका, चांगलं मजेत जगा! जाते मी.’’, असं म्हणत ती बाई खडकी स्टेशनला उतरून निघूनही गेली.
विचार केला, एक अशिक्षित, गरीब, तरुण बाई नवरा गेल्यावर, एवढी हिंमत धरते आणि शिकलीसवरलेली असताना, कसलीही जबाबदारी नसताना, आर्थिक स्थिती चांगली असताना आणि संगीताची साथ असताना, मी का रडत बसलेय? बरं रडून, गेलेला नवरा थोडाच परत येणार आहे? खरंच कार्यामध्ये एवढं बुडून जावं की आठवणींना थाराच मिळू नये. शिवाजीनगर स्टेशन आलं. दुपारचा लख्ख प्रकाश होता. मनातला अंधार हळूहळू मावळायला लागला होता. स्टेशनवर उतरले. रिक्षा पकडून कोथरूडचा रस्ता पकडला. जीवनाचा रस्तासुद्धा हळूहळू दिसायला लागला होता..
त्या अशिक्षित गरीब बाईने माझ्या डोळ्यात अंजन घातलं होतं.

काळवेळ
हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर विश्रामला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ती तारीख होती १५ सप्टेंबर. सोळाचा दिवस खूप तणावाखाली गेला. त्या रात्रीनंतर सतराची पहाट होताना बरोबर १.१० ला विश्रामने अखेरचा श्वास घेतला. माझ्या मनातील धाकधूक खरी ठरली होती. बहिणाबाईने मरणावर सुंदर भाष्य केलंय ‘‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर! अरे जगन मरन एका श्वासाचं अंतर,’’ त्यावेळी या दोन ओळी मी प्रत्यक्ष अनुभवल्या..
माणूस जातो, पण आठवणींचं रीळ मनात सारखंच रोल होत असतं! उण्यापुऱ्या ५० वर्षांत काय काय केलं होतं विश्रामनं! आर्किटेक्ट तर तो होताच. पण इंटिरियर डेकोरेशनचाही पुरा कोर्स त्याने आर्किटेक्चरला असतानाच पूर्ण केला होता. दोन्हीची प्रॅक्टिस सुरू होती. किती मोठी मोठी कामं केली त्यानं! ‘कॅम्लिन’, ‘युनियन कार्बाईड’, ‘बोरोसिल’, ‘धन्वंतरी’, राकेश रोशनचा स्टुडिओ,एन.टी.सी. शिवाय अनेक खासगी कामं! दरवेळी नवीन नवीन कल्पनांनी झपाटला जायचा तो! घरात त्याचे प्लॅन, डिझाइन करण्यात त्याची समाधी लागायची. आर्किटेक्चर व इंटिरियरची अनेक मासिकं आमच्याकडे यायची. ही मासिकं वाचायचा आणि आपलं ज्ञान ‘अप टू डेट’ ठेवायचा. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात, तर इंटिरियरमधल्या उरलेल्या टाकावू वस्तू म्हणजे जाळ्यांचे तुकडे, पडद्याच्या कापडांचे तुकडे, काडय़ांइतके छोटे लाकडी तुकडे वापरून तो वेगवेगळी डिझाइन्स करून अनेक कल्पना लढवून दिवाळीतली ग्रीटिंग कार्डस् बनवायचा. एकदा तर हॉलमधलं, जे लाकडी मोठं कपाट होतं, त्यातलं एक चौकोनी शटर हेरून, त्याला मधोमध बटण लावून, त्या बटणाला तास, मिनिट व सेकंद काटे जोडून आणि आतून बॅटरी लावून आकडय़ांशिवाय एक सुंदर घडय़ाळ बनवलं त्यानं. आकडे नसूनसुद्धा अगदी व्यवस्थित वेळ कळायची आम्हाला. ज्या ज्या नवीन गोष्टीत टेक्निक किंवा मेकॅनिझम असे, त्या त्या सर्व गोष्टी पटकन कळायच्या त्याला! घरात असताना सतत वाचन आणि गाणं ऐकणं हे त्यांचे दोन मोठे छंद होते. बहिणाबाईच्या कॅसेटवरचे इनलेकार्ड असू दे किंवा ‘सलाम आशा’साठीच्या जाहिरातीसाठी बनवलेलं आर्टवर्क असू दे. अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तो अगदी सहजतेने करायचा.
त्याच्या असंख्य आठवणींमध्ये वर्ष संपलं. पहिल्या स्मृतिदिनाच्या वेळी सप्टेंबर १६ व १७ तारखेला मी बाहेरगावी एक बंगला बुक केला आणि माझ्या बहिणींना, मैत्रिणींना घेऊन मी तिथे गेले. नकोतच त्या दु:खदायक आठवणी! १६ तारखेला सकाळी आम्ही निघालो. निघायच्या आधी मी व मानसीने विश्रामच्या फोटोला हार घातला. उदबत्ती लावली आणि खिन्न मनाने निघालो. सतराला संध्याकाळी आम्ही परतणार होतो. बाहेरची हिरवाई, सुंदर वातावरण आणि जवळच्यांचा सहवास, यात दोन दिवस छान गेले. सतराला संध्याकाळी मी आणि मानसी घरी आलो. पंखा लावला आणि सोफ्यावर बसलो. बसताक्षणीच मानसी घडय़ाळाकडे बघत ओरडली, ‘‘हे बघ काय आई!’’ मी चमकून विश्रामने केलेल्या त्या चौकोनी घडय़ाळात पाहिलं..
घडय़ाळ बरोबर १.१० ला बंद पडलं होतं!
(संपर्क : ९८२१०७४१७३)
uttarakelkar63@gmail.com