कार्यक्रमाची तारीख आली. निघाले. आदल्या दिवशी फोनवर ठरल्याप्रमाणे त्रिलोक मुंबई विमानतळावर भेटणार होता. पहाटेच निघाले. विमानतळावर पोहोचले. त्रिलोक दिसेना. त्याचा मोबाइल लावला, तो बंद. त्याच्या घरचा फोनही काढून ठेवलेला. आता मात्र मी घाबरले. सिक्युरिटी चेक-इनच्या दिशेने वळले, पण आतही तो नव्हता. शेवटी विमानात बसण्यासाठी घोषणा झाली. अस्वस्थ मनाने मी विमानात चढले. पण..

हिंदी चित्रपट ‘टारझन’ आणि ‘डान्स डान्स’मधील माझी गाणी १९८६-८७च्या सुमारास गाजू लागली होती. त्यामुळे माझं आसाम-प.बंगालमध्ये थोडं फार नाव झालं होतं. त्यानंतर बरीच वर्षे मला तिथून कार्यक्रमाची आमंत्रणे येत होती. साधारण १९९८ मध्ये आसाममधल्या एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध तबलावादक दादा कुळकर्णी यांच्या मुलाचा म्हणजे त्रिलोकचा मला फोन आला. तो एक वादक होता. त्याचे आसाममध्ये मित्र होते. त्यांनी गुवाहाटीत एक कार्यक्रम ठरवला होता व पाहुणा कलाकार म्हणून मला गायला बोलावलं होतं. साधारणपणे इतक्या लांब जाताना मी माझ्या घरच्या कुणाला तरी घेऊन जाते, पण या वेळी त्रिलोक बरोबर होता. त्याला मी लहानपणापासून ओळखत होते. अलीकडेच काही वर्षे भेट नव्हती. तो असल्यामुळे मला काळजी नव्हती खरं तर. मी त्याच्याबरोबर कार्यक्रमाला यायचं मान्य केलं. सर्व वादक तिथले होते. त्यांनी माझी गाणी बसविली होती. त्रिलोकनं मला कार्यक्रमाचा अ‍ॅडव्हान्स आणून दिला व उरलेली रक्कम कार्यक्रमाच्या वेळी द्यायचं कबूल केलं. इथून सकाळच्या लवकरच्या विमानानं कोलकात्याला व तिथून थोडय़ाच वेळात कोलकाता-गुवाहाटी विमान होतं. दुपापर्यंत गुवाहाटीला पोहोचायचं, तालीम करून सात-आठ वाजता कार्यक्रम! परत दुसऱ्या दिवशी दोन्ही फ्लाईट्स पकडून परत यायचं. त्रिलोकनं माझ्याकडे माझं मुंबई-कोलकाता तिकीट देऊन ठेवलं. माझं पुढचं तिकीट त्याने त्याच्याकडेच ठेवलं होतं. हा कार्यक्रम जवळजवळ एक महिना आधी ठरला होता. दुर्दैवानं कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी माझ्या नवऱ्याची तब्येत अचानक बिघडली. त्याच्या पायाची तातडीने शस्त्रक्रिया करायची ठरली तिही नेमकी कार्यक्रमाच्या दिवशीच. कारण डॉक्टरांना तेव्हाच वेळ होता, पण कार्यक्रमाला जाणंही भागच होतं. मी कात्रीत सापडले होते. माझ्या मुलीने (मानसीने) मला धीर दिला, ‘‘आई! तू हा कार्यक्रम करण्याचा शब्द दिला आहेस त्यांना, तेव्हा तू कार्यक्रमाला जा. मी रजा घेऊन बाबांबरोबर हॉस्पिटलला जाईन.’’
कार्यक्रमाची तारीख आली. मन बेचैन होतं. आदल्या दिवशी फोनवर ठरल्याप्रमाणे त्रिलोक मुंबई विमानतळावर भेटणार होता. पहाटे सर्व तयारी करून मी जड अंत:करणाने निघाले. मी गेल्यावर थोडय़ाच वेळात माझा नवरा व मुलगी हॉस्पिटलला जायला निघणार होते. अचानक मानसी जपाची माळ हातात देत मला म्हणाली, ‘‘आई! आज प्रवासात काही तरी अडचण येणार, असं माझं मन सांगतय. तेव्हा विमानात बसल्यावर जप कर.’’ मी माळ घेतली. विमानतळावर पोहोचले. बाहेर ठरल्या जागी त्रिलोक दिसेना. खरं तर माझ्यापेक्षा तोच विमानतळाजवळ राहत होता. म्हटलं येईल एवढय़ात. मी बोर्डिग पास घेतला. त्याचा मोबाइल लावला, पण तो बंद! मग त्याच्या घरचा फोन लावला. तोही काढून ठेवलेला. आता मात्र मी घाबरले. सिक्युरिटी चेक-इनच्या दिशेने वळले, वाटलं, माझ्या आधी कदाचित बोर्डिग पास घेऊन तो आत गेला असेल. पण आतही तो नव्हता. परत परत मी फोन लावीत होते, पण व्यर्थ! पदरी निराशाच पडत होती. शेवटी विमानात बसण्यासाठी घोषणा झाली. मी मनात म्हटलं, कदाचित गर्दीमुळे मला तो दिसत नसेल. आपण विमानात चढावं का? आत गेल्यावर एअर होस्टेसला त्याचं नाव जाहीर करायला सांगू, असा विचार करून अस्वस्थ मनाने मी विमानात चढले. एअर होस्टेसनं अनाऊन्समेन्ट केली, पण तो विमानातही नव्हता! आता कोलकात्याला एकटी जाऊन मी काय करणार होते? पुढचं कोलकता – गुवाहाटीचं तिकीट तर त्रिलोककडे होतं! अगतिक होऊन मी विमानाच्या स्टाफला थोडक्यात माझं म्हणणं सांगून खाली उतरते, असं सांगितलं. पण तोपर्यंत विमानाची शिडी काढलेली होती. त्यांचा रोष पत्करून मी शिडी परत लावण्याची विनंती केली. माझ्यामुळे सर्व प्रवाशांचा १० मिनिटे खोळंबा झाला, पण काय करू? माझा नाइलाज होता. त्यांची फुकटची बोलणी खात, शरमिंदा होत मी विमानातून खाली उतरले आणि विमानतळाच्या बाहेर आले. टॅक्सी पकडणार तोच त्रिलोक महाशय सावकाश सावकाश विमानतळाकडे येत होते. लाल झालेले डोळे, अस्थिर चाल हे पाहून मी काय ते समजले. जवळ आल्यावर तो मला म्हणाला, ‘‘हे काय उत्तराताई, परत काय चाललात? मी येतच होतो ना?’’ हे ऐकल्यावर मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. वाटलं, काय बेफिकीर माणूस आहे हा! मी चिडून म्हटलं, ‘‘त्रिलोक विमान आकाशात उडालंसुद्धा! आणि तू आत्ता येतो आहेस? मी माझ्या नवऱ्याची शस्त्रक्रिया सोडून दिलेला शब्द पाळण्यासाठी धडपडत आले. लोकांच्या शिव्या खाल्ल्या आणि तू मात्र आरामात येतो आहेस? आता फ्लाईटही नाही आणि असली तरी पुढच्या गोवाहाटी फ्लाईटचं काय?’’ तर उलट तो माझ्यावरच खूप भडकला. आता मी कार्यक्रमाच्या आयोजकांना काय सांगू? असं मलाच विचारायला लागला. मी म्हटलं, ‘‘आता तो तुझा प्रश्न आहे. आयोजकांना खरं काय ते सांग.’’ पण असल्या दारू प्यायलेल्या माणसाजवळ अधिक बोलण्यात अर्थ नाही, हे समजून मी घरचा रस्ता धरला.
दुसऱ्याच दिवशी त्रिलोकचा अ‍ॅडव्हान्स परत मागण्यासाठी फोन आला. मी म्हटलं, ‘‘त्रिलोक, अ‍ॅडव्हान्स कशासाठी घेतात हे तुला माहीत आहे का? कलावंत आपली तारीख दुसऱ्यासाठी राखून ठेवतात. मग त्याच दिवशी दुसरा कितीही मोठा कार्यक्रम आला तरी तो ते घेत नाहीत. अ‍ॅडव्हान्सपोटी दुसऱ्याला शब्द देतात आणि तो पाळतातसुद्धा. कार्यक्रमाच्या ठिकाणी तू वेळेवर न आल्याने मी पोहोचू शकले नाही. त्यामुळे अ‍ॅडव्हान्स मी परत देण्याचा प्रश्नच नाही. मी जर विमानतळावर वेळेत येऊ शकले नसते तर तुला मी परत केलाच असता. उलट कार्यक्रम न झाल्याने तूच माझं आर्थिक नुकसान केलं आहेस. तेव्हा आता पैसे विसर आणि कृपया परत फोन करू नकोस.’’ तरीही दर दोन-तीन दिवसांनी तो अ‍ॅडव्हान्ससाठी फोन करीतच राहिला. एकदा तर तो अचानक मित्राला घेऊन माझ्या घरी आला. एक तर घरात माझा नवरा आजारी, त्यात ही डोकेदुखी! शेवटी कंटाळून ही सगळी कहाणी मी माझे गुरू श्रीकांतजी ठाकरे यांना सांगितली. ताबडतोब त्यांनी त्रिलोकला फोन करून त्यांच्या घरी येण्यास सांगितले. तो आला नाही. उलट त्याच्या आईनेच श्रीकांतजींना फोन करून सांगितले, ‘‘अहो, त्रिलोक खूप घाबरलाय. तो तुमची माफी मागेल आणि आता नाही देणार त्रास तो उत्तराताईंना!’’ त्यानंतर श्रीकांतजींनी त्याला परत फोन करून सांगितलं, ‘‘हे बघ! उत्तराने मला सर्व काही सांगितले आहे. तिला त्रास देत राहिलास तर मुंबईच्या एकाही स्टुडिओत तुला पाऊल ठेवू देणार नाही.’’ ही मात्रा बरोबर लागू पडली. त्यानंतर आजतागायत त्रिलोकचा मला फोन आलेला नाही. त्याचा भाऊही संगीत क्षेत्रात एक उत्तम वादक आहे. तो भेटल्यावर मला म्हणाला, ‘‘उत्तराताई! कशाला त्रिलोकबरोबर जायला निघाला होतात? आमचा त्याच्याशी आता काहीही संबंध नाही. नशीब वाचलात तुम्ही. तिथे जाऊन मित्रांबरोबर त्याने तुम्हाला काहीही केलं असतं.’’
हे ऐकल्यावर मात्र मी नि:श्वास टाकला! मोठय़ाच संकटातून वाचले होते मी! जणू जीवदानच मिळालं होतं मला!
(लेखातील काही नावे बदललेली आहेत.)
uttarakelkar63@gmail.com