औरंगाबादच्या त्या स्टुडिओतलं रेकॉर्डिग संपलं. सकाळपासून दुपापर्यंत गातच होते मी. त्यामुळे घाईघाईत काहीतरी पोटात ढकललं आणि दुपारची ट्रेन पकडली. एसी चेअर कारचं बुकिंग केलेलंच होतं. त्यामुळे माझ्या सीटवर जाऊन बसले. दादर स्टेशन यायला सात-साडेसात तास तरी होते. साधारण साडे दहाच्या सुमारास ट्रेन दादरला पोहोचणार होती. छान झोप काढावी या हेतूने मी डोळे मिटले; पण झोप काही लागेना. शेजारीच एक तरुण जोडपं बसलं होतं. त्यांचं एक-दीड वर्षांचं मूल सारखं रडत होतं. त्याच्या आईने त्याला खायला दिलं, पाणी दिलं, खेळवलं, पण ते मूल थोडा वेळ शांत बसे. परत रडायला लागे. असं जवळजवळ दोन तास चाललं होतं. मधूनमधून वैतागून ती बाई मुलाला आपल्या नवऱ्याकडे सोपवी. मग तो कंटाळला की परत ते मूल आपल्या आईकडे जाई. हे सर्व बघत मी बसले होते. बराच वेळ त्याचं रडणं झाल्यावर मी त्या माणसाला म्हटलं की, एकाच जागी बसून तुमच्या मुलाला कदाचित कंटाळा आला असेल. एखादं स्टेशन आलं की त्याला घेऊन खाली उतरा २/३ मिनिटं! बरं वाटेल त्याला!

यावर तो माणूस मला म्हणाला, ‘‘दीदी! एक पायरीसुद्धा मी चढू किंवा उतरू शकत नाही. ट्रेनमध्ये शिरताना कशीबशी एक पायरी चढलो. हे ऐकून मी अवाक् झाले. शेवटी धीर करून विचारलंच, ‘‘ बरं नाहीए का तुम्हाला?’’ यावर तो म्हणाला, ‘‘हो, गेले ५/६ महिने मी आजारी आहे. नोकरीवरसुद्धा जात नाही मी. मला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि किडनीचासुद्धा. किडनीचे ऑपरेशन करायचं डॉक्टर म्हणताहेत. त्यामुळे सर्व टेस्ट करून घेण्यासाठी मी उद्याच जे. जे. हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होणार आहे.’’ मनात विचार करीत होते, किडनी ऑपरेशन म्हणजे काही कल्पना आहे का याला आणि त्यात किडनी ट्रॉन्सप्लांट असेल तर नक्कीच काही लाखांना फोडणी! म्हणतात ना, अज्ञानात सुख असतं ते खरं आहे. देवा केवढं मोठं संकट तू वाढून ठेवलं आहेस यांच्यापुढे.

मी म्हटलं, ‘‘हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होणार तर या छोटय़ाला कशाला बरोबर घेतलंत? तेव्हा तो म्हणाला, ‘‘याच्यापेक्षा २ मोठी मुलं (७ वर्षांच्या आतली) आहेत. ती आई-वडिलांकडे औरंगाबादला ठेवून आलो. कुल्र्याला माझी मावशी असते तिच्याकडे माझी बायको राहील. तिला मुंबईची काहीच माहिती नाही. त्यामुळे मी एकटाच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होईन.’’ मी म्हटलं, ‘‘तुम्हाला कोणी भावंडं नाहीत का? की जे कोणीतरी तुमच्याबरोबर येथे येतील.’’ त्यावर तो उत्तरला ‘‘भावंडं आहेत, पण प्रत्येकाला आपली नोकरी-धंदा असतोच ना, ते टाकून कसे येतील ते आणि आई-वडील म्हातारे आहेत. नशीब की आता जरी मी नोकरी करीत नसलो तरी आमच्या मुस्लीम समाजातर्फे आम्हा गरीब लोकांसाठी छोटय़ा जागेची का होईना सोय आहे. त्यांच्याकडूनच दर महिन्याला किराणा सामान पण मिळतं आणि २ मुलांच्या शिक्षणाची सोयही त्यांच्यामुळेच होते.’’ ‘‘अहो, पण याव्यतिरिक्त आणखी खूप खर्च असतातच ना?’’ मी म्हटलं. तो म्हणाला, ‘‘असतात ना! आता हे एसी चेअर कारचं तिकीट मला थोडंच परवडणार आहे? पण आमच्या इथल्या आमदाराने माझी दोन तिकिटांची सोय केली! म्हणून मुंबईला तरी जाऊ शकतोय.’’

गाडीने कल्याण सोडलं. आता ठाण्याकडे गाडी येत होती. मी विचारलं, ‘‘कुठे उतरणार तुम्ही?’’ त्यांनी म्हटलं, ‘‘सीएसटीला.’’ मी म्हटलं, ‘‘अहो, तुम्हाला कुल्र्याला जायचंय ना? तुमच्या नातेवाईकांकडे? मग उतरायला दादर जवळ पडेल. सीएसटी एक टोक तर बरोबर विरुद्ध दिशेला कुर्ला! मध्ये दादर तेव्हा दादरलाच उतरा तुम्ही!’’
त्यावर त्याने म्हटलं ‘‘अहो दादरहून कुल्र्याला जायचे म्हणजे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पूल चढावा लागेल आणि मी एक पायरीही चढू शकत नाही. सीएसटीला गेलं तर कुठल्याही प्लॅटफॉमवर जाण्यासाठी एकही पूल चढावा लागत नाही.’’ त्याचं म्हणणं खरं होतं! पण त्यासाठी विरुद्ध दिशेला जाऊन परत कुल्र्याला यायचे म्हणजे केवढा द्राविडी प्राणायाम! यात दगदग तर होणारच, शिवाय वेळ किती वाया जाणार! त्यात बरोबर हे रडकं मूल! पण मला त्यांची पैशांची अडचण समजत होती. टॅक्सीसुद्धा करू शकत नव्हते ते!

दादर जवळ आल्यावर मी त्या माणसाच्या हातात ५००रुपये द्यायला लागले. म्हटले, ‘‘दादा! इतक्या रात्रीचे कुठे पुढे जाताय उतरा दादरलाच. इथे बाहेर पडल्याबरोबर लगेच टॅक्सी मिळेल तुम्हाला. एकही पायरी न चढता! आणि लवकर पोहोचाल कुल्र्याला! शिवाय सकाळी कुल्र्याहून जे जे हॉस्पिटलला जायचे आहे ना? तेव्हा दोन्ही वेळा टॅक्सीने जायला हे पैसे पुरतील तुम्हाला! तेव्हा कृपया ही मदत समजू नका थोडी फार सोय होईल तुमची!’’
पण त्या स्वाभिमानी माणसाने माझे पैसे नम्रपणे नाकारले! मी चाट पडले. वाटलं, या दुनियेत भल्याभल्या श्रीमंत माणसांना पैशाचा मोह आवरत नाही आणि एवढी गरज असताना, गरिबी असताना, आजारी असताना, उशीर झालेला असताना या माणसाने माझे पैसे नाकारले? अशा परिस्थितीतसुद्धा त्याला पैसे घ्यायचा मोह होऊ नये? कौतुक वाटलं मला त्याचं. त्याला मनोमन सलाम करीत मी दादरला घरी जाण्यासाठी उतरले.