आपण सर्वजण माझे आईवडील, माझे घर, माझी शाळा असे म्हणून पुढे त्याविषयी बोलू लागतो. हा असा सर्व गोष्टींवर आपण आपला हक्क का सांगतो? पण खरे तर मालकी हक्क वगैरे असे त्यात काही नसते. या माझेपणातून आपण भावना व्यक्त करत असतो. त्या व्यक्तींविषयी, स्थळाविषयी मनात जो जिव्हाळा, आपलेपणा असतो तो नकळत माझे, माझा, माझ्या या शब्दांमधून उतरत असतो. किन्नौर जिल्ह्यविषयी माझ्या भावना थेट अशाच आहेत. आणि म्हणूनच गेल्या वर्षी, आठवणी जागत्या ठेवण्यासाठी आम्ही दोघे किनौरला जाऊन आलो.

हिमाचल प्रदेशमधला हा जिल्हा. शिमल्याच्या उत्तरपूर्वेला. किन्नौरच्या पूर्वेला तिबेट, उत्तरेला लाहोल स्पिती, पश्चिमेला कुलू व दक्षिणेला उत्तराखंड आहे. शिमला, नारकंडा असा प्रवास करत चार चाकीने, रमतगमत साधारण आठ-दहा   तासांत तिबेटच्या सरहद्दीवर पोहोचता येते. सांगला व्हॅली, शिमल्यापुढे चार-पाच तासांच्या प्रवासानंतर सुरू होते. रस्ताभर हिरवे पिवळसर डोंगर, काळसर निळसर दऱ्या, पांढरे स्वच्छ पाण्याचे ओहोळ, ओढे, धबधबे, गगनस्पर्शी वृक्ष, काळ्या कातळांना चिकटलेल्या लतावेली, पक्ष्यांचे थवे, मेंढय़ांचे कळप, गाईवासरे. गुराखी, मेंढपाळांनी तोंडाने काढलेले वेगवेगळे आवाज, नागमोडी वळणे, देवीच्या पालख्या. त्यामागून सजलेले धजलेले स्त्री-पुरुष आणि सफरचंदी गालाची मुले. नटलेला निसर्ग, त्याचा हरखवून टाकणारा निसर्गगंध. मन प्रसन्न आणि शरीर उत्साही.

दिवेलागणी होता होता सांगला आले. एका हॉटेलमध्ये पाठ टेकली. आठ तासांच्या स्वप्नविरहित झोपेनंतर उठलो. खिडकी उघडून समोरचे दृश्य पाहिले आणि डोळे मिटून प्रथम ते अंत:चक्षूत बंद केले. सावकाश डोळे उघडले. समोर हिमालयाचे बर्फाच्छादित शिखर सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घेत उभे होते.

चार दिवस त्या देवभूमीत आम्ही हिंडत होतो. होय, ही देवभूमीच आहे. काही लहान-मोठी प्रेक्षणीय स्थळे पाहिली. किन्नौरी स्त्री-पुरुष, त्यांचे पोशाख, राहण्या वागण्याची, ओझे वाहून नेण्याची पद्धत बघत होतो, फोटो काढत होतो. आणि ताजी ताजी, देशात सहजपणे उपलब्ध न होणारी फळे खात होतो. असे तीनचार दिवस गेले. नंतर एकदम बाजारात चैतन्य दिसू लागले. कोरी वस्त्रे, नव्या टोप्या घातलेले पुरुष उत्साहाने हिंडताना दिसू लागले. त्याचेच अनुकरण करत स्त्रियाही तसेच ठेवणीतले किंवा नवे कपडे घालून मिरवू लागल्या. चौकशी करता कळले की गावाची वार्षिक जत्रा भरणार आहे. अहेतुक आम्ही योग्य वेळेला येऊन पोहोचलो होतो. किन्नौरी स्त्रियांकडे बघताना प्रथम डोळ्यात भरते ते त्यांच्या अंगावरचे सोने. या टापूत श्रीमंती आहे. बागशेतीतील मुख्य लागवड सफरचंदाची. सफरचंदाची लागवड करण्यास जमीन कशी हवी, तिचा पोत कसा वाढवायचा, खते कोणती, कधी आणि काय प्रमाणात घालायची अशा सर्व विषयांवर सातत्याने वेगवेगळ्या संस्थांतून संशोधन चालू असते. निष्कर्ष बागवानांना तत्परतेने कळवले जातात. यातूनच डोळ्यात भरणारी समृद्धी निर्माण होते.

दुसऱ्या दिवशी स्थानिक देवीच्या देवळात गेलो. देशातील अनेक भव्य मंदिरे पाहिली आहेत. या मंदिराचा डौल वेगळाच होता. विस्तीर्ण फरसबंद आवारात मध्ये देऊळ आणि भोवती स्टेडियमसारखी बसण्याची व्यवस्था. दोन-तीनशे किन्नौरी स्त्रिया त्यांच्या पारंपरिक पेहरावात एकमेकींचे हात धरून नृत्य करत होत्या. एका ठरावीक पद्धतीने पदन्यास करत होत्या. सगळ्यांच्या ओठावर एकच गाणे. मध्यभागी वादक आणि गायक बसले होते. त्या गाण्यावर आणि ठेक्यावर नृत्य चालले होते. डोळे, कान आणि मन तृप्त होत होते. तास-दीड तास आम्ही या सोहळ्यात मग्न झालो होतो. उल्हसित होऊन परतलो.

आता चितकुलला जायचे होते. चितकुल हे तिबेट सीमेवरील शेवटचे गाव. हजाराच्या आसपास लोकवस्ती. लहान-मोठी उतरत्या छपरांची घरे. स्थानिकांच्या चेहऱ्यावर सदैव खुललेले हास्य. इथून पुढे शंभरेक किलोमीटर पुढपर्यंत निर्जन प्रदेश आणि त्यापुढे तिबेट. उत्तराखंडाची हद्द वीस किमी पुढे. हिवाळ्यात प्रचंड बर्फ पडते. इथल्या पर्यटकांचा सिझन संपला की स्थानिक खालच्या गावात स्थलांतर करतात. परत एकदा बर्फ वितळले की चैतन्याचा उदय होतो. आम्ही तिथे दिवस घालवला. पर्यटकांसाठी खाद्यपेयाचे स्टॉल लागलेले होते. दोन-चार हॉटेलंही होती. असंख्य पर्यटक सुहास्य मुद्रेने हिंडत होते. हिमालयातून सतलज येथे येते. पर्यटक सतजलच्या किनाऱ्यावरच खूश होऊन उथळ पाण्यात पाय टाकून बसण्यात, खेळण्यात सकाळ घालवतात. आम्हीही तेच केले. संध्याकाळची चाहूल लागण्याआधीच परत निघालो. काहीतरी तिथेच सांडून. निनावी. परत परत जाऊन तिथला निसर्ग डोळाभरून पाहावासा वाटणारा माझा किन्नौर जिल्हा. होय, माझा. कारण सेनादलाच्या कृपेने १९८८ ते ९० ही दोन वर्षे मी तिथे कार्यरत होतो.
कर्नल प्रफुल्ल जोशी – response.lokprabha@expressindia.com