12 July 2020

News Flash

भुलनवेल

भुलनवेलचा कळत नकळत स्पर्श झाला, तर बुद्धीला भ्रांत पडून माणूस दिशाभान हरवून बसतो

पशू- पक्षी आणि जलचर प्राणी यांच्याप्रमाणेच वनस्पतींचंही एक स्वतंत्र जग असतं. या जगात वनस्पतींचे विविध प्रकार आढळतात. वनस्पतींच्या सर्व जाती- प्रजाती आपणास ठाऊक असतात असे नाही. भुलनवेल ही अशीच एक अनोळखी वेल.

ही अशी एक विचित्र वेल आहे की तिचा कळत नकळत स्पर्श झाला, तर बुद्धीला भ्रांत पडून माणूस दिशाभान हरवून बसतो व नुसता रान तुडवीत भटकतो. खेडय़ापाडय़ातले लोक म्हणतात- ‘चकवा पडला हो; बिचारा रानभरी भटकलाय्.’ चकव्याचा संबंध ग्रामीण माणसं भुताटकीशी जोडतात. खरं म्हणजे माणूस रानभर भटकतो तो कुठेतरी रान तुडविताना त्याच्या पायतळी ‘भुलनवेल’ आलेली असते. तिच्या स्पर्शामुळे तो एक प्रकारच्या नशेत, भ्रांत अवस्थेत भटकत असतो.

कारली, काकडी, कोहळ्यांचे किंवा द्राक्षांचे वेल त्यांच्यासाठी मुद्दाम केलेले मांडव चढताना आपण पाहतो. या वेलींचा मार्ग आकाशगामी असतो. परंतु काही वनस्पती भूमीवरच आपले बस्तान बसवितात. भूशायी बनतात. भुलनवेल ही त्या वर्गातील एक भूशायी वनस्पती. या वेलीचे शास्त्रीय नाव ‘टायराक्लोरा रोटँडोफोलियो’ आहे. नागरी जीवनात एक वाचक म्हणून आपण केवळ छापील अक्षरांशी परिचित असतो. भुलनवेलची तर कल्पनाही नागर जीवनापासून कोसो दूर असते. अशा चमत्कारिक वेलींचा परिचय करून घ्यायचा तर अरण्यगुरु मारुती चितमपल्लीसारख्या तज्ज्ञाकडूनच तो समाधानकारक होऊ शकेल. या तज्ज्ञांकडे आपण वाचक मनाशी जिज्ञासा बाळगून गेलो तर अरण्यभाषेचा प्रकाश डोक्यात पडतो. तिचे व्याकरण आपल्यास अवगत होते आणि वाचकाचे बोट धरून लेखक त्याला ‘भुलनवेलींचे दर्शन घडवितो. इतकेच नव्हे तर राक्षसवेलींचे प्रताप सांगतो- कसे? तर लतावल्लरींचे भ्रमण मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणदिशेच्या अनुरोधानेच असते, असे सारे आरण्यिकच आपल्यास कळू शकेल.
राम देशमुख –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 1:13 am

Web Title: bhulanvel
टॅग Nature,Vachak Lekhak
Next Stories
1 नावात काय आहे?
2 जामात: दशमो ग्रह:!
3 सकारात्मक विचार
Just Now!
X