29 February 2020

News Flash

सायकल ते सायकल

रविवार उजाडला आणि चिरंजीवांनी नवीन सायकलची मागणी केली. कारण जुन्या सायकलला गिअर नाहीत. दोन दिवसांत नवी सायकल हजर झाली आणि जुनी कोपऱ्यात गेली. पार्किंगमध्ये सायकल

रविवार उजाडला आणि चिरंजीवांनी नवीन सायकलची मागणी केली. कारण जुन्या सायकलला गिअर नाहीत. दोन दिवसांत नवी सायकल हजर झाली आणि जुनी कोपऱ्यात गेली. पार्किंगमध्ये सायकल चालवून तो कंटाळला आणि म्हणाला, ‘‘आई, चल आपण बाहेर जाऊ . इथे मजा नाही येत.’’

आम्ही बाहेर पडलो, तो सायकलवर आणि मी चालत किंवा पळत. दोन दिवस असे गेल्यावर मी दमले आणि बाहेर जायचे बंद केले. मुलाने मग मला एक आयडिया सांगितली, तो नवीन सायकल आणि मी जुनी सायकल चालवत बाहेर जायचे. सुरुवातीला मी सरळ नाही म्हणून सांगितले. पण तो हट्ट धरून बसला आणि मला सायकलवर बसणे भाग पाडले. लहानपणी सायकल चालवत होते. पण आता चाळिशीत सायकल चालवता येईल का? पडले तर हाड मोडेल का असे पारंपरिक विचार डोक्यात येऊ  लागले. पण मुलाने मला परत सायकल चालवण्याचा विश्वास दिला आणि माझ्या सायकलमागे तो एका मित्रासारखा धावू लागला. मला तोल कसा सांभाळायचा, ब्रेक कधी लावायचा अशा प्राथमिक गोष्टी परत सांगू लागला.

आणि माझे मन बालपण शोधू लागले. आयुष्यातले पहिले वाहन सायकल.. शाळेत असताना वडिलांची भली मोठी सायकल चालवायला शिकले होते. खूप वेळा पडून, मार खाऊन का होईना पण शिकले. आणि गावभर सायकल चालवण्याचा आनंद लुटला. शाळा संपल्यावर परत कधी सायकल चालवली नाही. कॉलेजला गेल्यावर मोपेड चालवायला शिकले आणि ते सहज जमले, कारण सायकल चालवता येत होती म्हणूनच. नंतर नोकरी लागली आणि स्कूटी घेतली, मस्तीत चालवली. मग चारचाकी गाडी आली आणि स्वर्ग दोन बोटे आहे असे वाटू लागले. चैनीच्या गोष्टी गरजेच्या बनल्या. व्यायाम होत नाही म्हणून जिम जॉइन केले. पैसे देऊन आरोग्य मिळते का ते शोधले, पण नाही. नंतर चालण्याचा व्यायाम सुरू केला पण कंटाळा येऊ  लागला, कारण मन शरीराबरोबर चालत नाही. ते दुसरीकडे पळत असते आणि आता २५-३० वर्षांनंतर परत सायकल माझ्या हातात होती. आता मात्र माझे मन आणि शरीर यांचा चांगला मेळ बसला. मन म्हणेल तसे शरीर चालायला लागले आणि शरीराच्या वेगाप्रमाणे मनाला थांबवता येऊ  लागले. मी आता लेकाबरोबर रस्त्यावर, डोंगरावर, रानावनात सायकल घेऊन फिरू लागले आणि जुनाच आनंद नव्याने सापडला. मुलाला मोकळे आकाश आणि क्षितिज बघायला मिळाले. जगण्यात एक वेगळाच उत्साह आला.

मला बालपण पुन्हा एकदा अनुभवायला देणारी सायकल.. गोष्टी छोटय़ाच, पण आनंद किती मोठा!
प्रज्ञा रामतीर्थकर –

First Published on April 29, 2016 1:09 am

Web Title: bicycle 2
टॅग Vachak Lekhak
Next Stories
1 दगडूबाई
2 वडय़ाचं तेल वांग्यावर!
3 भांडणारे पक्षकार
X
Just Now!
X