आपल्या देशात हिंदी भाषेचे बरेच स्वरूप आहेत. हिंदी केंद्र शासनाची राजभाषा, हिंदी ही राष्ट्रीय किंवा प्रांतीय भाषा, शालेय किंवा महाविद्यालयात अनिवार्य भाषा आणि हिंदी ही राष्ट्रभाषा. केंद्र शासनाने बहुतेक काम हिंदीत करण्याचे काही दिवसांपूर्वीच घोषित केले; परंतु हा लेख राजभाषा हिंदीबद्दल नाही. राष्ट्रभाषा हिंदीच्या विरोधात अधूनमधून विरोधाचे स्वर उठत असतात. महाराष्ट्रातील काही स्वघोषित विद्वान हिंदीला राष्ट्रभाषा मानायला तयार नाहीत. ते भारतीय घटनेचा आधार घेतात. घटनेत हिंदी, मराठी, बंगाली अशा अनेक नॅशनल लँग्वेजेज आहेत. हिंदी ही त्यांच्यापैकी एक आहे. मग तिलाच राष्ट्रभाषा का मानायचे? घटनेचा नीट अभ्यास केला, तर नॅशनल लँग्वेजेज हा अनेकवचनी शब्द आहे. याचा अर्थ राष्ट्रीय भाषा असा आहे, राष्ट्रभाषा नाही. आपण हेही मान्य करावे की, घटनेत मान्य केलेल्या राष्ट्रीय भाषा प्रांतीय भाषा आहेत. बंगालमध्ये बंगाली, तामिळनाडूमध्ये तामिळ, महाराष्ट्रात मराठी या प्रांतीय भाषाच राष्ट्रीय भाषा आहेत. हिंदी हीदेखील प्रांतीय भाषा आहे, परंतु ती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या अनेक प्रांतांची भाषा आहे. याशिवाय हिंदीच भारत देशात बहुतेक लोकांना अवगत असलेली बहुप्रसारित भाषा आहे. महाविद्यालयात ४५ वर्षे एम.ए.पर्यंत इंग्लिशचे अध्यापन करूनही मी इंग्लिशचा अंधभक्त झालो नाही. तटस्थ आणि पूर्वग्रहमुक्त होऊन मी या निष्कर्षांवर पोहोचलो आहे की बहुभाषिक भारतात दोन प्रांत, दोन संस्कृती आणि दोन भाषांमध्ये सेतूचे काम हिंदीनेच केले आहे. कूपमंडूक आणि दुराग्रही विद्वानांना हे तथ्य कळत आणि पटत नाही. कोलकात्यात बरेच महाराष्ट्रीय लोक नोकरी आणि व्यवसायानिमित्त गेले. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी बंगाली भाषेचा अभ्यास केला नाही. ऑफिसमध्ये लिहिणे-बोलणे इंग्लिशमध्ये होते; परंतु कुली, रिक्षा, हॉटेल, धोबी, किराणावाला यांच्याशी ते हिंदीतच व्यवहार करतात. बंगाली लोकही त्यांच्याशी मराठीत बोलत नाही. हिंदीतच बोलतात. मी काही महिने बंगळुरूला होतो. युनिव्हर्सिटी, कॉलेज किंवा लायब्ररीत इंग्लिशमध्ये बोलायचो, पण इतर लोकांशी बोलणं हिंदीतच व्हायचं. त्या लोकांनाही कर्नाटकबाहेरील लोकांशी संवाद हिंदीतच सोयीस्कर वाटायचा. या शहरात सात-आठ लाख मारवाडी लोक राहतात. प्रत्येकाला कन्नड भाषेचे ज्ञान नाही. हिंदी हीच दोन भाषांमधील सेतू आहे.

महाराष्ट्रीय लोक पर्यटन करतानाही केरळ, बंगाल, आसाम यांसारख्या दूरस्थ प्रांतांत जातात. तिथे जाण्यापूर्वी ते त्या भाषेचा अभ्यास करत नाहीत. हिंदीतून स्थानिक लोक त्यांच्याशी आणि ते स्थानिक लोकांशी संपर्क करतात.

What Jayant Patil Said?
भाजपासह सत्तेत जायचं हा निर्णय शरद पवारांचा की अजित पवारांचा ? जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकार निघाले ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
सिंगापूरनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकार निघाले ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; फोटो शेअर करत प्रसाद खांडेकर म्हणाला…
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

सर्व भाषा नॅशनल लँग्वेज आहेत म्हणून प्रत्येक प्रांतात सर्व भाषा वापरता येतील असा तर्क व्यर्थ आहे. तामिळनाडूमध्ये शालेय शिक्षकांची भरती करताना तामिळ या भाषेला प्राधान्य मिळेल, मराठी किंवा गुजरातीला नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी. तिथे बंगालीत शिक्षण घेण्याचा दुराग्रह कोणी केला तर आपण सहन करणार नाही. प्रत्येक भाषेचा विस्तार सीमित आहे.

हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे हे मान्य न करणारे विद्वान हिंदीचा विस्तार, लोकप्रियता आणि उपयोगितेची कल्पना करू शकत नाही. याचे कारण मातृभाषेबद्दल दुरभिमान, अहंकार आणि अज्ञान आहे. हिंदी राष्ट्रभाषा झाली, तर आपल्या मराठीची गळचेपी होईल, असा एक प्रकारचा फोबिया किंवा भयातुरता त्यांच्या मनात झाला आहे.

या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हिंदीला राष्ट्रभाषा कोणी बनवले? अहिन्दी भाषिकांनी हिंदीचे महत्त्व कित्येक वर्षांपूर्वी ओळखले. आज किती महाराष्ट्रीय लोकांना माहीत आहे की, मराठीचे आद्यकवी स्वामी चक्रधर यांनी देशाटन करून हिंदीचा विस्तार बघितला आणि हिंदीत कविताही लिहिल्या. संत कवी नामदेव यांची बरीच भक्तिगीते हिंदीत आहेत. दीडशे वर्षांपूर्वी आर्य समाजाचे संस्थापक गुजराती भाषिक स्वामी दयानंद यांनी आपला प्रमुख ग्रंथ ‘सत्यार्थप्रकाश’ गुजरातीत न लिहिता हिंदीत लिहिला. हिंदी माध्यमाने ते देशाच्या मोठय़ा क्षेत्रात आपली मते आणि सिद्धांत पोहोचवू शकले. शंभर वर्षांपूर्वी ‘दासबोध’ आणि ‘गीतारहस्य’ या पुस्तकांचे हिंदी अनुवाद करणारे पं. माधवराव सप्रे हे हिंदीचे पत्रकार, संपादक आणि प्रतिष्ठित लेखक होते. पन्नास वर्षांपूर्वी माझे ज्येष्ठ बंधू डॉक्टर विलास गुप्ते यांनी पीएच.डी.करिता प्रबंध लिहिला- ‘आधुनिक हिंदी साहित्य को अहिन्दी लेखकों का योगदान’. पंजाब ते बंगाल आणि आसाम ते केरळपर्यंत फिरून अनेक लेखक, पुस्तके आणि गं्रथालय यांची माहिती त्यांनी दिली. मराठी भाषिक गजानन माधव मुक्तिबोध, डॉक्टर प्रभाकर माचवे, विलास गुप्ते आणि मालती जोशी यांनी आपली मातृभाषा सोडली नाही; परंतु हिंदीत उत्तम लेखन करून मान मिळवला.

महाराष्ट्र सिनेमाचे माहेरघर. पहिला बोलपट ‘आलम आरा’ हिंदी/ उर्दूमध्ये निघाला. निर्माते एक पारशी- अर्देशर इरानी. लवकरच हिमांशू राय अणि देविका रानी या अहिंदी भाषिक जोडप्याने हिंदीत लोकप्रिय चित्रपटांची परंपरा सुरू केली. कोल्हापूरला मराठी चित्रपटांची सुरुवात झाली. प्रभात कंपनीने लवकरच दूरदृष्टी ठेवून हिंदी चित्रपट काढले. आपल्या महाराष्ट्रीय कलाकारांची प्रतिभा महाराष्ट्रात कोंडून न ठेवता पूर्ण देशात दाखवावी याकरिता हिंदीतही चित्रपट बनवले. दुर्गा खोटे, शांता आपटे, स्नेहलता प्रधान, नलिनी जयवंत, शाहू मोडक, शांताराम या कलाकारांस राष्ट्रीय ख्याती मिळाली ती हिंदी सिनेमामुळे. वसंत देसाई आणि सी. रामचंद्र हे हिंदीचे प्रतिष्ठित संगीत दिग्दर्शक. एक महाराष्ट्रीय गायिकेने मराठीत अवीट गोडीची गाणी म्हटली. महाराष्ट्रात तिला प्रसिद्धी मिळाली; परंतु तिची हिंदी गाणी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. परदेशातदेखील शेकडो भारतीयांनी (त्यांची मातृभाषा हिंदी नाही तरी) तिची गाणी उचलली, आवडीने ऐकली आणि म्हटली. ही अमाप लोकप्रियता आणि आदर मिळवणारी गायिका म्हणजे लता मंगेशकर.

कोलकात्याला न्यू थिएटर्सचे मालक बी. एन. सरकार बंगाली चित्रपट काढायचे. या चित्रपटांचे क्षेत्र सीमित, मार्केटही सीमित. मातृभाषेचे प्रेम न विसरता त्यांनी हिंदी सिनेमा बनवले. क्षेत्र वाढले. व्यापार ही पसरला. बंगाली कलाकारांची ख्यातीही व्यापक झाली. देवकी बोस, नितीन बोस, आर. सी. बोराल, पंकज मलिक, के.सी. डे, सहगल, काननबाला, उमाशशी अशा अनेक कलाकारांना पूर्ण देशात प्रसिद्धी मिळाली ती हिंदीचे महत्त्व स्वीकार केल्यामुळे. कालांतराने बिमल राय, सलील चौधरी, एस.डी. बर्मन, मन्ना डे, हेमंतकुमार, गीता राय हे हिंदी सिनेमांत आले. कोणीही हिंदीचा असा विरोध केला नाही. हे हिंदी राष्ट्रभाषा बनवणारे लोक. दक्षिणमध्ये हिंदीला विरोध झाला ते हिंदीमुळे तामिळवर अत्याचार होईल या भीतीने; परंतु हिंदीचे राष्ट्रभाषा स्वरूप त्यांना स्वीकार होते. एस. एस. वासन यांनी हिंदीतही लोकप्रिय चित्रपट काढले. रजनीकांत आणि कमल हसन यांचे नाव आपण कधी ऐकले नसते. त्यांची प्रतिभा देशभर दिसली ते हिंदीत आले म्हणून. भारतीय सिनेमांची पहिली महिला संगीत दिग्दर्शक सरस्वती देवी ही तर पारशी होती. बॉम्बे टॉकीजकरिता गोड गाणी देणाऱ्या या महिलेच्या मनात हिंदीबद्दल द्वेष नव्हता. अशा अनेक कलाकारांनी हिंदीला राष्ट्रभाषा बनवले. हिंदी सिनेमामुळे व्यापार वाढला फक्त हे म्हणणे अर्धसत्य आहे. हिंदी सिनेमाने हिंदीचा प्रचार, प्रसार आणि लोकप्रियता वाढवली हेही स्वीकार करायला पाहिजे.

महाराष्ट्रात काही लोकांना हिंदीच्या प्रभुत्वाची भीती वाटते. भाषावार प्रांतरचनेमुळे प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे. त्या प्रांतात त्या भाषेलाच प्रभुत्व असायला पाहिजे आणि आहे. महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. हिंदी किंवा इंग्लिश पहिली भाषा नाही. शासकीय कार्य, व्यापार, शिक्षण आणि सामाजिक जीवनात मराठीला मुख्य भाषा म्हणून मान्य केली आहे. हिंदी महाराष्ट्राची कार्यालयीन भाषा (ऑफिशियल लँग्वेज) नाही; परंतु परप्रांतीयांशी शासकीय काम हिंदी किंवा इंग्लिशमध्येच करता येईल. इंग्लिश उच्चशिक्षित वर्गात लोकप्रिय आहे; परंतु हिंदी हीच लोकमानसात वसली आहे. सर्वसाधारण लोकांना ती सोपी वाटते. लोकप्रियता, देवनागरी लिपी, बहुप्रचारित या गुणांमुळे बहुजन समाजाने ती स्वीकार केली आहे. विनाकारण द्वेष, ईर्षां, अहंकार आणि दुराग्रह सोडून हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करायला पाहिजे. गंभीरपणे विचार केला तर पटेल की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे.
प्रा. प्रकाश गुप्ते –