घर! दोन अक्षरी शब्द! पण आभाळभर पसरलेली माया जणू, कधी पहाटे हलकेच जाग आणणारा प्राजक्ताचा सडा, कधी अंगाई गीत गाण्यासाठी फुललेली रातराणी, कधी ओंजळभर मोगऱ्याच्या फुलांचं सुख ओंजळ रीती केली तरी सुगंध न हटणारं, पण कधीकधी गुलाबाचं फूल तोडायला जावं आणि काटेच बोचावेत असा अपेक्षाभंगही.

घर! दोन अक्षरांत विश्व सामावलेलं, खरेतर दोन अक्षरांनीच विश्व घडवलेलं.

मंगला गोडबोलेंनी म्हटलंय- ‘माणसं घरात आल्यावर गोंधळ होतोच, पण जेव्हा घरेच माणसात येतात तेव्हा खरी धांदल उडते.’ घर लहान की मोठं? आलिशान की पडकं? दोन खोल्या की चार? याला काहीच महत्त्व नसतं. घरातली माणसं मनाने जवळ आणि मनाने मोठी असली की छोटय़ा घरातही बरीच जागा उरते. पण दोन ध्रुवावर दोघे आपण अशी अवस्था असली की एकमेकांपासून चेहरे लपविण्यासाठी घरचे हजार कोपरेही कमी पडतात.

खरंतर घराचं घरपण चार भिंतीत नसतंच मुळी, ते असतं त्या चार भिंतींना सावरून धरणाऱ्या हातांमध्ये, चाराच्या आठ भिंती होऊ नयेत म्हणून काळजी घेणाऱ्या, थरथरणाऱ्या मायेच्या उबेमध्ये अन् त्या भिंतींना मायेचा ओलावा देणाऱ्या माणसांमध्ये.

घराच्या कोसळण्यापासून ते सावरण्यापर्यंत, हुंदक्यापासून ते गडगडाटी हास्यापर्यंत, प्रत्येक छोटय़ामोठय़ा गोष्टींचा केंद्रबिंदू असतो घरातलं बाईमाणूस. घराच्या शोभेचं, आकर्षणाचं, रागवण्याचं आणि मानाचं असं अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं ते! आईला गमावून बसलेली घरं विस्कटलेलीच राहातात. बायको आल्यानंतर ती नव्यानं सावरतातही पण पुन्हा नव्या नवरीसारखी सजत नाहीत बापडी!

घरातली पुरुषमंडळी घर बदलायला तयार होतीलही, पण बाईमाणूस कधीच नाही. कारण घरातल्या अंगणात, चुलीजवळ, परसातल्या तुळशीजवळ तिचे श्वास गुंतलेले असतात. कितीतरी आभास गुंतलेले असतात. आईला आपलं मूल जेवढं माहीत असतं, तेवढेच घराचे कोपरे न् कोपरे ओळखीचे असतात. चुलीतल्या पेटत्या निखाऱ्याची तिला धग लागत नाही. तर थंडीच्या गारठय़ात तिला ऊबच मिळते. सर्दी होईल अशी थंडगार फरशी, पण तिला उन्हाळ्यात गारवाच मिळतो. घर तिचा जीव की प्राण.

तिच्याइतकाच घर हा आपलाही जिव्हाळ्याचा विषय. पण घरापासून लांब गेल्याशिवाय हे सारं नाही उमगत. घराचं महत्त्व घरात असेपर्यंत लक्षातच येत नाही. जगातली सगळ्यात मोठी ताकद आपल्या हातात आहे. हे लक्षातच येत नाही. घरं दुरावली, खरंतर आपण घरापासून दुरावलो की मग मात्र लक्षात येतं, आपण खूपच गमावलं.

‘घर म्हणजे चार भिंतीची इमारत’  असं कसं म्हणू मी? दिवसभर सगळ्या आघाडय़ा लढून आल्यावर, काही हरल्यावर, काही जिंकल्यावर घर हक्काचं ठिकाण असते. रुसण्याचं, हसण्याचं, रडण्याचं आणि विश्रांतीचंही! कुणाच्यातरी कुशीत शिरून स्वत:ला मोकळं करून घेऊन पुन्हा हलकेच फुलून येता येतं. श्वासात नवा उत्साह भरता येतो.

म्हणून तर ‘जगभर फिरून दमलेले पाय पुन्हा घराकडंच वळतात, चार भिंतीतल्या’ मायेच्या ओलाव्यातच पायांसाठी गारवा शोधतात!’

घरात असताना घरातली भांडणं, वर्दळ, कुजबुज, गोंधळ आणि अतिरिक्त काळजी यांचा वैताग येतो. बाहेर पडल्यावर कळतं खरी लज्जत त्यातच आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा काही वेळा घरावर, माणसांवर रागावून बाहेर पडलेल्या प्रत्येकाला हुरहूर असते, ओढ असते घरकडे जाणाऱ्या वाटेची.

आपल्या दु:खानं आतल्या आत त्रास करून घेणारं, आपल्या यशानं, डोळ्यात कौतुकाच्या आसवांची गर्दी करणारं. चुकांवर कधी पांघरूण घालणारं तर कधी कान धरणारं, मायेन कुशीत घेणारं, आपलं फक्त आपल्यासाठी आपलेपणाचं कुणीतरी फक्त घराच्या कोपऱ्यातच भेटतं, रस्त्यावरच्या गर्दीत नाही.

मग वाटतं..

घर, दोन अक्षरी शब्द!

घर, दोन अक्षरांनी विश्व घडवलेलं?

मुळीच नाही.

घर, दोन अक्षरात विश्व सामावलेलं?

कधीच नाही.

…कारण घर म्हणजेच संपूर्ण विश्व!
कल्पना लाळे-येळगावकर – response.lokprabha@expressindia.com