News Flash

ऋणानुबंध

आम्हीही आमच्या जुन्या वाडय़ात पिढय़ान्पिढय़ा राहात होतो.

संस्थाने खालसा झाल्याला आता अनेक वर्षे लोटली आहेत, असे असले तरी संस्थानिकांचा कारभार, संस्थानिकांचे भरणारे दरबार, संस्थानांमधील चालीरीती, आपला राजा म्हणजे कोणीतरी देवमाणूस अशी असलेली प्रजेची भावना, राजघराण्याविषयी संस्थानांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांना असलेला आदर यासारख्या गोष्टी कायम कुतूहलाच्या होऊन बसलेल्या असतात. असाच एक अनुभव, एका संस्थानामधून निवृत्त झालेल्या  गृहस्थासंबंधी. काही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. चाळ आणि वाडे संस्कृती अजूनही लोप पावलेली नव्हती. वाडय़ांमधून राहाणारे शेजारी गुण्यागोविंदाने राहून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत असत. आम्हीही आमच्या जुन्या वाडय़ात पिढय़ान्पिढय़ा राहात होतो. वाडय़ात राहाणाऱ्या एका बिऱ्हाडकरूच्या कुटुंबात अप्पाजी नावाचे वयोवृद्ध गृहस्थ काही वर्षांपूर्वी येऊन राहिले होते. अप्पाजींचा स्वभाव बोलका व परोपकारी होता. शेजाऱ्यापाजाऱ्यांना आणि आपण राहात असलेल्या कुटुंबातल्या व्यक्तींना मदत करणे हे ते त्यांचे कर्तव्य समजत असत.

एके दिवशी सकाळी वाडय़ाच्या दरवाज्यासमोर एक फियाट गाडी येऊन उभी राहिली. गाडीच्या पुढील भागातून एक पन्नाशीचे गृहस्थ लगबगीने उतरले आणि त्यांनी वाडय़ात शिरताना अप्पाजी कुठे राहातात याची माहिती करून घेऊन अप्पाजींना फियाट गाडीपाशी आणले आणि गाडीच्या मागल्या बाजूचा दरवाजा उघडला. मागल्या बाजूस वाध्र्यक्याकडे पूर्णपणे झुकलेल्या पण, तरीही तेज:पुंज दिसणाऱ्या डोक्यावरून पदर घेतलेल्या एक आजी बसलेल्या होत्या. अप्पाजींनी त्यांच्या पायावर डोके ठेऊन नमस्कार केला. आत घरी चलण्याची विनंती केली. आत असलेल्या आजीबाईंनी गुडघेदुखीच्या कारणास्तव गाडीमधून उतरण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. अप्पाजी वाडय़ात परतले आणि दहा मिनिटांतच घरातल्या कुटुंबीय मंडळींना घेऊन परत गाडीजवळ आले. येताना थर्मासमधून चहा, बिस्किटे असा सर्व सरंजाम घेऊन गाडीतल्या व्यक्तींना चहा, बिस्किटे दिली. अप्पाजींच्या कुटुंबातल्या मंडळींनादेखील फियाट गाडीमध्ये गृहिणींच्या पायावर डोके ठेवण्यास सांगितले. अप्पाजींकडून असा छोटासा पाहुणचार घेऊन फियाट गाडी थोडय़ा वेळाने परत जाण्यास निघाली. गाडी निघून गेली तरी त्या दिशेकडे हात जोडून कितीतरी वेळ अप्पाजी उभेच राहिले. या वेळेपर्यंत वाडय़ात राहाणारे शेजारील रहिवासी कुतूहलाने गाडीभोवती जमा झाले होते. अप्पाजींकडून वाडय़ातल्या रहिवाशांना माहिती झाले ते असे की, गाडीमध्ये मागच्या बाजूस बसलेल्या वृद्धा म्हणजे एका संस्थानाच्या राणीसाहेब होत्या. अप्पाजींनी त्या संस्थानात काही काळ खाजगी कारभारी म्हणून नोकरी केलेली होती. वृद्धापकाळात अप्पाजी आपल्या नातेवाईकांच्या कुटुंबात राहात आहेत. याची माहिती असल्याने मुंबईकडे जात असताना राणीसाहेब आवर्जून अप्पाजींची भेट घेण्याकरिता व विचारपूस करण्याकरिता आल्या होत्या. राजघराण्यामधल्या व्यक्तींचे आपल्याकडे सेवाचाकरी केलेल्यांशी असलेल्या ऋणानुबंधाचे प्रत्यंत या प्रसंगाने आले.
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 1:13 am

Web Title: indian royal family staff
टॅग : Vachak Lekhak
Next Stories
1 एकत्र कुटुंब पद्धती
2 हरवलेलं पाकीट
3 गाईला चारा
Just Now!
X