News Flash

मुलांचे भावविश्व!

लहान मुलांचा मनोविकास वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत होतो म्हणतात

अलीकडेच बालदिन झाला.. आजच्या २१ व्या शतकात, टेक्नोसॅव्ही जगात मुलांचे भावविश्व कसे असेल असा सहजच प्रश्न मनात आला. त्यांचे भावविश्व आणि त्यात येणाऱ्या समस्या यांचे सद्य युगात आपल्याला भान आहे का?

कलर्स मराठीवर ‘तू माझा सांगाती’ मालिका चालू होती. घराबाहेर काढल्या गेलेल्या आईवडिलांनी (आजी-आजोबा) विठ्ठल मंदिरात आश्रय घेतलेला असतो. घरात असलेली सोन्याची बाळकृष्णाची मूर्ती त्यांनी बरोबर आणलेली असते कारण त्याची ते नित्य पूजा करीत असतात. मुलगा-सून देवळात येतात. त्यांच्या बरोबर नातू असतो. खूप काही बाही बोलून ते सोन्याची बाळकृष्णाची मूर्ती आपल्या ताब्यात घेतात जबरदस्तीने. विषण्ण  मनाने ते देऊन टाकतात. नातू हा सर्व प्रसंग बघत असतो. त्यावेळेला तो बाबांना म्हणतो, ‘‘मोठा झाल्यावर मी माझ्या बायकोचे ऐकीन तुम्हाला घराबाहेर काढीन.’’

ही गोष्ट एवढय़ासाठी सांगितली की मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते, ते अनुकरणप्रिय असतात. त्या काळात या गोष्टी घडत होत्या तर आजकाल मुलांवर सर्व ठिकाणाहून आदळणारी परिस्थिती, जगण्याचा वेग, पैशाला आलेले अवास्तव महत्त्व, चंगळवाद याचा परिणाम किती होत असेल? त्यांचे बालपण, बाल्य आपण कितपत जपतो? कारण आपल्याला वेळ नाही. या रॅट रेसमध्ये धावताना, मुलांचे भावविश्व आपण जमेल तेवढंच जपतो!

पूर्वीच्या काळी मोठी माणसे ‘देवाचिये द्वारी’ हे म्हणत, आणि मुले शुभंकरोति म्हणत, हे बघत आपण मोठे झालो. आता मुलांना सांगितले की, म्हणा रे शुभंकरोति, मनाचे श्लोक तर नातवांचे त्यावर उत्तर असते, आम्हांला आवडत नाही ते म्हणायला. तुम्ही आमच्यावर ते म्हणायची जबरदस्ती करू नका. आपण निरुत्तर. मोठेपणी हीच मुले मग मन:शांतीसाठी योगा करतात- देवळात जातात.

लहान मुलांचा मनोविकास वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत होतो म्हणतात; पण आपल्याला वेळ नाही त्यांच्यासाठी आणि काय चांगले, काय वाईट आहे हे समजण्याची त्यांची क्षमता नाही. कुठल्याही सिनेमाच्या गाण्यावर ते बेधुंद नाचतात आणि आपण त्याचे व्हीडिओ बनवितो. डान्स, गाणे हे वाईट नसते; पण बाकी चांगल्या गोष्टीला (आपल्या दृष्टीने) नाही म्हणणाऱ्या या मुलांचा आकर्षण बिंदू वेगळा झालाय का? खरं आहे. मुलांची आकर्षणकेंद्रे बदलत चालली आहेत. परिस्थितीच बदलत चालली आहे.

आपले उंचावलेले राहणीमान, त्याचा स्तर कायम ठेवण्यासाठी आईवडिलांना धडपडावे लागते. दोघे नोकरी करणारे त्यामुळे मुले पाळणाघरात. शाळा मग पाळणाघर मग क्लासेस या शृंखलेमध्ये बद्ध असणारी मुले मग, कार्टून, मोबाइल, टी. व्ही. इंटरनेटचा सर्रास वापर यात गुंग. दोष कोणाचा? त्यातच स्वत:ची स्पेस जपण्यासाठी विभक्त होणारे कुटुंब. आजी-आजोबा एकीकडे, नातवंडे एकीकडे. आजकालच्या आधुनिक युगात आजी-आजोबापण स्वत:ची स्पेस बघतात तो विषय आणखीच वेगळा.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. मोठय़ांचा आदर करणे, त्यांचे ऐकणे, ही खरी तर पाठशाळाच होती. आता आपल्या गरजा बदलल्या. मी काम करते, करतो तू डिस्टर्ब करू नको, तू तुझे कार्टून बघ असे म्हणत आपणच मुलांना टीव्हीचा नाद लागण्यासाठी प्रोत्साहन देतो. मध्यंतरी बालमानसशास्रातले एक तज्ज्ञ म्हणाले, ‘आजकाल तरुण वर्गात नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. कारण मुलांना नकार पचविता येत नाही. एकुलती एक मुले.. मागणी तसा पुरवठा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग त्यामुळे जराही मनाविरुद्ध झाले की ते आक्रमक होतात.’ खरंच आहे त्यांचं. आज मुलांमध्ये आक्रमकता वाढलेली आहे. त्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी आजी-आजोबा असणारी, आपल्या लहानपणी चांगले संस्कार करणारी, विचारांना दिशा देणारी घरसंस्कार केंद्रे बंद झाली आहेत, हेही एक कारण आहे.

तुम्ही पाळणाघरात ठेवा, मुलांची खाण्यापिण्याची, सांभाळण्याची काळजी ते घेतील, पण संस्कार ते कसे करणार? आपल्याला मुलांसाठी वेळ नसतो तर त्यांना कसा असणार? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निर्जीव वस्तू देऊन आपण तात्पुरते समाधान करतो. पण मानसिक सबलीकरण, ताकद आणि संस्कार कसे देणार- त्यांचे भावविश्व कसे निरोगी बनणार? आज लहानसहान गोष्टींवर मुले चिडतात, रागावतात, मनाविरुद्ध गोष्ट झाली की तोडमोड-फोड आहेच. एकत्र येऊन काही गोष्टी करतात, पण मनाविरुद्ध झाले की किल्ला तोडून टाक, वस्तू तोडून टाक असं चाललेलं असतं. घरोघरी लिट्ल  अँग्री मॅन आहेत. एकत्र राहताना मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात, पण त्या सामावून घेऊन सोशल होणे त्यांच्या पचनी पडत नाही.

हा वाईट, तो वाईट सगळे जगच वाईट ही त्यांची मनोधारणा असते. ‘‘आई, तू बाहेर गेली की आजी तुला नावं ठेवते.’’ असे आईला सांगणे किंवा ‘‘आजी तू बेकार आहेस तुझ्याशी मी बोलणार नाही,’’  हे दुसरे उदाहरण. रागाच्या भरात आपण काही बोललो तरी मुलांची निरीक्षणशक्ती अफाट असते. टीपकागदासारखे ते टिपत असतात. आपण सावध नसतो मग हे बालमानस आरोग्य कसे जपणार? निरोगी, सामाजिक व्यक्तिमत्त्व कसे घडणार हा मोठा गहन प्रश्न आहे. आणि हीच पिढी उद्या समाजहित कसे जपणार?

योग्य वयात- योग्य संस्कार ही आपली जबाबदारी आहे. आणि ती आपल्याला टाळता येणार नाही. त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होण्यापूर्वी त्याची जपणूक आपण केली पाहिजे. मध्यंतरी आम्ही दोघे अमेरिकेला गेलो होतो. तिथले वातावरण, तिथली मुले वेगळाच विषय. एकदा सहजपणे आमचा नातू आम्हांला म्हणाला, ‘‘आजी, मला दिवाळीपेक्षा हॅलोविन सेलेब्रेट करायला जास्त आवडेल.’’ मग मी, त्याची आई त्याला दिवाळी म्हणजे काय असे समजावून सांगू लागलो. मी म्हटले अरे दिवाळी आणि हॅलोविन दोन्ही साजरे कर. दोन्हीची गंमत वेगळी.

दिवाळीला आम्ही इकडे आलो. एके दिवशी मुलांचा व्हीडिओ कॉल आला. ‘‘आजी-आजोबा हॅपी दिवाळी, आज आईने मला तेल उटणे लावले, आंघोळ छान झाली. आम्ही सर्वानी नवीन कपडे घातले. आता आम्ही फराळ करणार.’’ मन सुखावून गेले. मग वाटले आपण आपले सण, उत्सव त्यांना सांगितले पाहिजेत. त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. आपण खारीचा वाटा उचलला तर उद्याची ही पिढी संस्कारक्षम आणि सशक्त मनोबल असणारी असेल. आपल्याला देश सुधारायचा नाही. कारण ती जबाबदारी समाजपयोगी संस्था आणि नेतेमंडळींकडे देऊया. पण प्रत्येक घर संस्कारक्षम असेल तर देश संस्कारक्षम बनेलच. आपण आपला खारीचा वाटा उचलू या आपल्या निरागस मुलांसाठी, कुटुंबासाठी.
मीनल श्रीखंडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 1:10 am

Web Title: kids future
Next Stories
1 हमसे जो टकरायेगा…
2 मोडता!
3 अमृततुल्य चहा
Just Now!
X