‘‘ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी, कडाडे चपला होतसे वृष्टी, घालाया सृष्टीला मंगल स्नान, ओघ अमृताचा बरसे वरतून.’’ असा हा पाऊस बरसू लागतो आणि सारी सृष्टी आनंदात न्हाऊ लागते. हिरव्या रंगात नटू लागते. शहरापासून दूर माळरानावर फिरायला गेल्यावर धरतीने पांघरलेला हिरवा शालू दिसतो. पावसाच्या आगमनाने साऱ्यांच्या चित्तवृत्ती आनंदित होतात. हा पाऊस प्रत्येकाच्या मनात कवित्व जागृत करतो. पावसाचे कवीशी व कवितेशी अतूट नाते असते. पावसाच्या आगमनाने कवीच्या प्रतिभेला उधाण येते. अशाच काही बहरलेल्या हिरव्या कवितांचा या पावसाच्या स्वागतासाठी घेतलेला धांडोळा.

चत्र वैशाखाचा भाजून काढणारा तडाखा यंदा नेहमीपेक्षा जरा अधिकच होता. म्हणूनच ज्याची सारेजण आतुरतेने वाट पहात होते त्या हिरव्या बरव्या ऋतूचे आता आगमन होत आहे. गावागावांत पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट हा दरवर्षी अधिकाधिक भीषण होणारा प्रश्न आहे. वेळी-अवेळी पडणारा पाऊस पिकांचे आतोनात नुकसान करतो. बळीराजापुढे हा मोठा चिंतेचा विषय ठरतो व तो म्हणतो,

मेघ उतावळा अवेळी सांडला

कसा देवाजीने खेळ हा मांडला

धूळधाण सारी करून पिकांची

देव जणू आज माझ्याशी भांडला..!

कधी अवेळी पाऊस पडतो तर कधी दुष्काळ सोसावा लागतो. दुष्काळाने नष्ट होत चाललेल्या हिरवाईबद्दल अतिशय समर्पक भावना एक कवयित्री  पुढीलप्रमाणे व्यक्त करतात,

झाडांची मुळे जमिनीत

पाणी शोधत चाचपडत होती,

वर पानांचा हात सुटला आणि

एक एक फांदी ओसाड होती.

पण या निसर्गाच्या दुष्टचक्रामागे मानवाचे निसर्गावर होत असलेले अतिक्रमण हेच प्रमुख कारण आहे. तर असा हा पाऊस उशिरा का होईना दाखल झाला तर त्याचे स्वागत करायला सारी सृष्टीच आतुर असते. गावच्या तळ्यात, विहिरीत पाणी भरतं. कोरडय़ा आयुष्याला ओलावा मिळतो. एक कवयित्री म्हणते,

वाऱ्यावरती सळसळणारी हिरवी गवताची पाती,

चाहूल लागताच पावसाची आनंदाने गाणे गाती.

फुले सुगंध पसरवूनी फुलपाखारा बोलवती

पावशा शीळ घालूनी सुरात त्यांच्या सूर मिसळती.

बा. भ. बोरकर  हे जातिवंत निसर्ग कवी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. आपल्या अनेक कवितांमध्ये पावसाचे सुंदर चित्रण त्यांनी केले आहे. पावसाचे स्वागत करताना कवी बोरकर म्हणतात,

गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले,

शीतलतनु चपल चरण अनिलगण निघाले.

नाद व लय यातून आकार धारण करणाऱ्या अनेक प्रतिमा बोरकरांच्या कवितेत दाखवता येतात. खालील कवितेतील प्रतिमा पहा,

‘घना मनातून टाळ मृदंग

तनूत वाजवी चाळ अनंग’

‘मल्हाराची जळात धून

वीज नाचते अधून मधून’.

पावसाळ्यात निसर्गाचे विहंगम दृश्य न्याहाळण्याचा सुंदर योग जुळून येतो. वर्षां सहल ही यातूनच निघालेली संकल्पना आहे. पावसाळ्यापूर्वीच लाल गुलमोहर बहरलेला असतो. त्याचा लाल फुलांचा सडा जणू लाल गालिचा आपल्यासाठी अंथरला आहे असे वाटते. पाखरांचे पंख भिजून ओले होतात. अंगणात पाणी साचून तळे होते. चातक पक्षी मात्र पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या ‘पावसाचा मोर नाचे’ या कवितेत म्हणतात,

पाखरांचे पंख झाले चिंब ओलेचिंब

चाफ्याच्या झाडाचे झुले तळ्यामध्ये िबब

अंतरीच्या ओलाव्याची सुगंधाला साथ

पावसाचा मोर नाचे माझ्या अंगणात

किंवा

अंगणच आज माझे पावसाचे गाणे

थेंब थेंब गुणगुणे तृप्तीचे तराणे

घर माझे भारावले मेघ मल्हारात..

मातीचा गंध, भारलेला आसमंत, मेघमल्हारात भारावलेले घर अशा अनेक प्रतिमा कवीची सौंदर्य दृष्टी व्यक्त करतात आणि चित्रमय शैली अधोरेखित करतात. आपले सारे देहभान विसरून निसर्गाशी एकरूप व्हावे, तादात्म्य पावावे हाच कवीचा भाव आहे. पाडगावकरांमधील कवी ‘तिच्यामध्ये’ तादात्म्य पावलाय

घन भरून आले होते

मन भरून आले होते

मज तिच्या वाचुनी दुसरे

सुचतच काही नव्हते

त्या सगळ्या आठवणींचा

पाऊस फुलांचा होता..

पावसाळा आला की शहरातल्या लोकांना निसर्गाची आठवण होते. पाऊस जून महिन्यात सुरू होतो, आणि शाळासुद्धा जून महिन्यातच सुरू होतात. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या मनात नवी शाळा आणि नवा पाऊस याचे एक अनोखे नाते निर्माण झालेले असते. मुलांच्या मनातील या भावना एका कवींनी पुढील शब्दांत अचूक टिपल्या आहेत.

दरवर्षीचा पावसाळा वाटे मजला नवा नवा,

दरवर्षीच्या पावसातला वर्ग माझा नवा नवा.

नवीन शाळा सुरू होताना पाऊस ही लावे हजेरी,

सावरताना पुस्तक दप्तर आमची उडे पुरी भंबेरी

नवीन वर्ग नवेच शिक्षक, नवीन स्नेही नवेच पुस्तक

नव्या नव्या पुस्तकांचा कोरा कोरा वास नवा.

अशा रितीने एखादी कविता निसर्गाला खुलवते आणि निसर्ग कवितेला खुलवतो. निसर्गाचे सूक्ष्म, तरल निरीक्षण हा कवितेचा आत्मा असतो.आहे. एखाद्या कवीचे शब्दच चित्रकाराचा कुंचला कसे होतात पहा,

आला पाऊस मातीत श्वास धरेचा गंधीत

आला पाऊस रानात वृक्षवेली नाचतात

आला पाऊस शेतात मोती हासे शिवारात

आला पाऊस अंगणात नाव कागदी पाण्यात..

पावसाळा हा ऋतू माणसाला निसर्गाशी जोडणारा असतो. निसर्गाची ओढ लावणारा असतो. पावसाळ्यात सगळ्यांच्याच संवेदना अधिक तरल होतात. आपल्या दैनंदिन चक्रात अडकलेल्या माणसांना हा पाऊस तजेलदार बनवतो, टवटवीत बनवतो. निसर्गाची आठवण करून देतो. हिरवागार डोंगर, बेफाम भणभणणारा वारा, शुभ्र फेसाळते धबधबे, खळाळणारे झरे, सळसळणारी हिरवी शेते, गवतातून उसळणाऱ्या वाऱ्याच्या लहरी, बरसणारा पाऊस, पाखरांची लगबग, पक्ष्यांची सुरेल तान! अन आकाशात दिसणारी सप्तरंगी कमान! खरंच, हा पाऊस सारी चराचर सृष्टीच फुलवतो, पावसाचा एक एक थेंब झेलण्यासाठी आसुसलेली धरती पाणी पिऊन तृप्त होते. तिच्या पोटातून अंकुर जन्म घेतो सृष्टीचा सृजन सोहळा जणू सुरू असतो. काळ्या मातीतून जे उगवतं तीच खरी गीता! तेच खरे भागवत! तेच सृजनशील तत्त्व आहे. तीच विश्वाची चतन्य शक्ती आहे.
भाग्यश्री फडके – response.lokprabha@expressindia.com