News Flash

गणानं घुंगरू हरिवलं

आज वर्तमानपत्र उघडले की बलात्कार, भ्रष्टाचार, खून, दरोडे याच गोष्टी प्रामुख्याने नजरेत भरतात.

आज वर्तमानपत्र उघडले की बलात्कार, भ्रष्टाचार, खून, दरोडे याच गोष्टी प्रामुख्याने नजरेत भरतात. टी.व्ही.वरही कोणाचा तरी अत्यंत छळ होत असलेल्या मालिका असतात. अन्याय सहन करणारी एखादी बिचारी व्यक्ती असते. एकूण सगळीकडे मनाला वेदना देणारे वातावरण आहे. मुले परदेशी गेलेली आहेत. वृद्ध पती-पत्नी दिवस काढत आहेत. त्यातल्या त्यात जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्याऐवजी समाजविघातक शक्ती त्यांना विविध मार्गानी लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, हे रोजच वाचायला मिळते, प्रत्यक्षही दिसते.
समाजात एवढय़ा त्रासदायक गोष्टी घडत असल्या तरी समाज आनंदाने जगत आहे. सण-समारंभ साजरे करत आहेत. हे जे काही मंगल, पवित्र, आनंददायक दिसते, त्याचे प्रामुख्याने एक कारण आहे- समाजाची, विशेषत: आई-वडिलांची क्षमा करण्याची प्रवृत्ती. मी आठ-दहा वर्षांची असताना खेडेगावातील तंबूत एक सिनेमा पाहिला होता. त्याचे नाव हाते ‘गणानं घुंगरू हरिवलं’. चित्रपटाच्या सुरुवातीसच नायकाची आई वडाला प्रदक्षिणा घालीत असते आणि गाणे म्हणते,
‘गणानं घुंगरू हरिवलं,
हरिवलं तर हरवू दे.
गणाला माझ्या घेऊन ये’
गणानं कितीही अपराध केले तरी आई त्याला माफ करते. त्याच्या दोषांसह तिला तो हवा असतो.
नव्याने लग्न झालेला मुलगा बायकोच्या मागणीनुसार आईचे हृदय घेऊन जात असतो. अचानक त्याला ठेच लागते. आईचे हृदय म्हणते, ‘बाळ तुला जास्त नाही ना रे लागले?’ पिढय़ान्पिढय़ा आईच्या महतीची ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत. याचा अर्थ पिढय़ान्पिढय़ा भारतीय संस्कृतीतील आई मुलाला गुण-दोषांसह स्वीकारत आली आहे. तिच्या या भावनेमुळे आजही समाज टिकून आहे. त्यात मंगल, पवित्र घडत आहे.

चारुलता कुलकर्णी response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:01 am

Web Title: mother and child relationship
Next Stories
1 मातृत्वाला सलाम
2 असा मित्र, अशी ही मैत्री
3 स्मरण महाराणी ताराबाईंचे
Just Now!
X