News Flash

अंधारातील कवडसे

आजकाल बहुतांशी बातम्या या निराशाजनक, तापदायक, उद्वेगजनक अशाच असतात.

आजकाल बहुतांशी बातम्या या निराशाजनक, तापदायक, उद्वेगजनक अशाच असतात. तरीही अधूनमधून अंधारातून कवडसे दिसावेत तशा काही बातम्या आल्हाददायक, प्रेरणादायीदेखील असतात. देहदान, अवयवदान या संदर्भातल्या बातम्या निश्चितच दिलासा देणाऱ्या, मनाला उभारी देणाऱ्या असतात.

अमुक एका तरुणाचे चार-पाच जणांचे अवयवदानाने प्राण वाचविले. ब्रेनड्रेन झालेल्या, अपघातात दगावलेल्या तरुणीच्या आईवडिलांनी मुलीचे अवयव दान करण्याचा घेतलेला निर्णय, जातीधर्माच्या कक्षा ओलांडून दोन विभिन्न धर्माच्या व्यक्तींचे किडनी ट्रान्सप्लान्ट, अगदी छोटय़ा मुलानेदेखील अपघातानंतर केलेले अवयवदान हे सारे निश्चितच विचारांची एक नवी दिशा दिग्दर्शित करते. अनेकदा हे अवयव एकाच वेळी एका शहरातून दोन-तीन वेगवेगळ्या शहरांतील व्यक्तींना पाठविले जातात- विमानाने, कारने.. रुग्णवाहिकेतून.. अशा वेळी विमानतळाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, रस्ते वाहतूक, संबंधित कार्यालये या साऱ्यांचेच जे एकत्रित शिस्तबद्ध, समयबद्ध, योजनाबद्ध वर्तन दिसते तेदेखील प्रशंसनीय असते. अनेक उपचार काही मिनिटांत पार पाडले जातात. रस्ते मोकळे होतात. खास विमानांची सोय होते. उद्देश एकच.. कुणाचा तरी जीव वाचविणे.. कुणाला जीवदान देणे, जीवन फुलविणे, आनंद देणे.

शरीर हे नाशवंत आहे, हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. या शरीराचा कुणाला काही उपयोग होणार नसेल, तर ते अग्नीत नष्ट करणे, जमिनीत पुरणे केव्हाही योग्य; पण मृत्यूनंतर आपल्या शरीराचा किंवा काही अवयवांचा एखाद्या दिव्यांग, अपंग व्यक्तीला लाभ होणार असेल, तर तो का देऊ नये? नेत्र, किडनी, हृदय अशा अनेक अवयवांची अनेकांना गरज असते. देणारे कमी.. गरजूंची संख्या किती तरी पटीने अधिक अशी परिस्थिती आहे वैद्यकीय क्षेत्रात. मृत्यूनंतर तसाही कशाचा काही उपयोग नसतोच. मग आत्मा, मोक्ष, स्वर्ग, पिंडदान, श्राद्ध या कर्मकांडांत अडकून बसण्यापेक्षा कुणाच्या उपयोगी का पडू नये? कुणाला आनंद का देऊ नये? त्यामुळे त्या व्यक्तीचे, त्यांच्या नातेवाईकांचे जे आशीर्वाद लाभतील, सदिच्छा लाभतील, त्याचा उपयोग निश्चितच आपल्या मनाला, आत्म्याला शांती लाभण्यास होईल.

अनेक मेडिकलच्या प्राध्यापकांनी मला सांगितले आहे, मुलांना शिकविण्यासाठी त्यांना मृतदेहाची, सांगाडय़ाची गरज असते. तसे आजकाल संगणकामुळे, माहितीजालामुळे शिक्षणात नवनवे प्रयोग होताहेत. पूर्वीच्या आकृत्या फळ्यावर काढणे कष्टप्रद व्हायचे, त्या गुंतागुंतीच्या आकृत्या त्रिमितीद्वारे, सिम्युलेशनद्वारे अगदी ‘जिवंत’ स्वरूपात दाखविण्याचीदेखील सोय असते, पण डॉक्टरांचे म्हणणे असे की, प्रत्येक शरीर ही वेगळी, स्वतंत्र, युनिक अशी ‘केस’ असते. या वेगवेगळ्या केसेसच्या ‘उदाहरणांसाठी’ डॉक्टरांना मृतदेहांचीच गरज असते. तेव्हा अवयवदानाव्यतिरिक्त देहदानाचा उपयोग हा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी, संशोधनासाठीदेखील होऊ शकतो. वैद्यकीय ज्ञान पुढे नेण्यासाठी, प्रगतीसाठी ही निकड अत्यंत महत्त्वाची आहे.

मृत्यू झाला की, नातेवाईकांना स्नेहीजनांना बोलवावे लागते. अगदी जवळचे नातेवाईक, परगावी, परदेशात असले तर भावनेपोटी त्यांची वाट बघावी लागते. मुलगा, मुलगी परदेशी असेल, तर मृतदेह एक-दोन दिवस ठेवावा लागतो. अल्पावधीत रेल्वे, विमान यांचे आरक्षण मिळणे कठीण असते.

माणसे जमली की सांत्वनाच्या देवघेवीत शोकाची भावना अधिक तीव्र होते, दु:ख गडद होते. जवळच्या माणसांना तर तेरा दिवसांपर्यंत राहावे लागते. हे व्यावहारिकदृष्टय़ा दोन्ही पक्षी प्रामाणिकपणे सांगायचे तर गैरसोयीचे असते. तरुण पिढी नोकरी करणारी.. इतक्या रजा मिळणे असंभव. एरवी दोन चकरा मारायच्या चौदा दिवसांत, शिवाय घरे लहान.. माणसे जमली की चहापाणी, जेवणखाण, धुणीभांडी सारे आले. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत दहा हात असायचे कामाला, मदतीला. आता तसे राहिले नाही. सुटसुटीत कुटुंबे, स्वतंत्र कारभार, प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या समस्या.. अडीअडचणी. अशा वेळी गैरसोय होत असली तर प्रत्यक्ष बोलता येत नाही. बोलले तर वाईट दिसते. लोक नावे ठेवण्यास तत्पर असतात. लोक म्हणजे बाहेरचे कुणी नाही, आपलेच.. टीका करायला कुणाचे काय जाते?

आपण म्हणतो सांत्वनाने दु:ख हलके होते. काही प्रमाणात हे खरे असेलही, पण आपण फोनवरदेखील बोलू शकतो. आजकाल तर एकमेकांना प्रत्यक्ष बघण्याचीदेखील सोय आहे. हवे तर सवडीने नंतर भेटता येऊ शकते, परस्परांच्या सोयीने. वेळेवर गेले नाही तर बरे दिसत नाही हे ‘परंपरे’च्या दृष्टीतून खरे असले तरी ते अनेकदा अडचणींचे, गैरसोयीचे असते हे कटू सत्य आहे. माणूस कितीही जवळचे असले तरी ज्येष्ठ नागरिकांना, विशिष्ट वय झाल्यावर प्रवास करणे, मृत्यूचे प्रत्यक्ष गांभीर्य पचविणे कठीण असते.

मृत्यूनंतरचे श्राद्ध, पिंडकर्म हे विधीदेखील आजच्या काळात कितपत योग्य/ अयोग्य याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्या सर्व विधी कर्मात सर्वात जास्त ‘सोय’ ब्राह्मणांची होते. ज्या बहुतेक व्यक्तींचा उभा जन्म उन्हात जातो, कष्टात जातो त्या व्यक्तीला शांती ही तशीही मृत्यूने लाभलेलीच असते. या विधीमुळे त्या शांतीचे आणखीन् कसे काय वर्धन होणार?

शिवाय आपल्या पूजनीय ग्रंथातच सांगितले आहे- मृत्यू म्हणजे वस्त्र बदलणे.. शरीर नाशवंत.. हा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याचा प्रवास. मग त्याचा शोक कशाला? त्याचे उत्सव कशाला? दु:ख प्रदर्शन कशासाठी? या जगात जसे येणे ठरलेले तेव्हाच जाणेही ठरलेले. ते कुठे, कसे, कधी हे अज्ञात. अज्ञानातदेखील वेगळे सुख असते, असे म्हणतात.

बदलत्या परिस्थितीनुसार विचार बदलणे, आचारांना नवी दिशा देणे, भावनांना आवर घालणे गरजेचे झाले आहे. खरी श्रद्धांजली ही दिवाणखान्यात फोटो लावून, हार घालून देण्यापेक्षा त्या व्यक्तीला सदैव आपल्या हृदयात जपून, त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेऊन आपला जीवनक्रम सुखानंदात व्यतीत केला, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गरीब विद्यार्थी यांना आर्थिक मदत करून मनाचा मोठेपणा दाखविला तर जाणाऱ्या व्यक्तीला खरी आत्मशांती मिळेल. काकस्पर्शाचीदेखील गरज नाही.

कुणी म्हणेल, मी हे सारे ज्ञान पाजळतो. माझे स्वत:चे काय? मी, माझ्या पत्नीने देहदानाचा- अवयवदानाचा निर्णय घेतलेला आहे. मृत्यूनंतर जे काही अवयव कुणा गरीब गरजूंच्या कामी येतील त्यांना द्यावेत.. नंतर मृतदेहाचा उपयोग मेडिकल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, संशोधनासाठी व्हावा अशी आमची इच्छा आहे. तसे मुलांना सांगितले आहे. तुमचे काय? तुम्हीच ठरवा…
विजय पांढरीपांडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:24 am

Web Title: positive news india
Next Stories
1 विलोभनीय हिवाळा
2 सी.एल.
3 ‘ससा-कासव’ शर्यत
Just Now!
X