कोलंबसला जशी अमेरिका शोधण्यासाठी धाडस-यात्रा करावी लागली व अतोनात कष्ट उपसावे लागले; त्याच प्रकारची पुनरावृत्ती सासरे होऊ इच्छिणाऱ्यांना जावई-शोधासाठी करावी लागते. गावोगावी, प्रांतोप्रांतीच काय; पण थेट अमेरिकेपर्यंतही धडक मारावी लागते. कारण त्याशिवाय मनपसंत व कन्यापसंत जावईच सापडत नाही.
‘आली जरी कष्ट दशा अपार/ न टाकीती धैर्य तथापि थोर,’ असा धीरोदात्तपणा जावईशोधकांना दाखवावा लागतो. जाऊ, पाहूची दिरंगाई टाळून जाण्याची व पाहून येण्याची घाई करावी लागते. त्यासाठी मंगलयाद्यांची मदत घ्यावी लागते. वधू-वर परिचय मेळाव्यांचाही उपयोग होतो. दहा दगड मारले; तर एखादा लागतो, अशी म्हण आहे. परंतु या बाबतीत मात्र काहींना शंभर दगडही अपुरे पडतात. शेवटी ‘प्रयत्नांती परमेश्वर!’ यावर भरवसा ठेवूनच भ्रमंतीग्रस्त राहावे लागते.
शोध-पर्वानंतर विवाह-पर्व सुरू होते. देवपूजेत फक्त देवाचीच पूजा करावी लागते, पण नवरदेवपूजेत मात्र त्याच्या अवघ्या गणगोताची पूजा करावी लागते; व त्यांना खूश ठेवावे लागते. संस्कृत सुभाषितकारांनी जावयाला ‘जामात: दशमो ग्रह:!’ असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या तुष्टीसाठी प्रयत्नांचा होम व द्रव्याचे हवन करावे लागते. त्याच्या मागणी पर्वाला देणगी दुर्वा वाहाव्या लागतात. त्यांचे हुंडा-गीतही गंडा-गीत ठरते ते असे.-
हुंडा आम्हाला देऊच नका।
हुंडय़ाचे गालबोट लावूच नका,
वर-दक्षिणा फक्त
लाख- दोन लाख।
नका बाळगू कुणाचा धाक,
रुखवत द्या
फक्त एक मनपसंत।
दागदागिने फक्त
नखशिखान्त,
शाली-पैठण्यांचा वऱ्हाडाचा मान।
वाढू द्या तुमच्या औदार्याची शान,
भोजनालाही माणसे
फक्त मोजून हजार।
त्याहून अधिक
नाही पडणार भार,
हुंडा आम्हाला देऊच नका।
हुंडय़ाचे गालबोट लावूच नका.
विवाहोत्तर पर्वही असेच पार पाडावे लागते. पहिले मूळ, पहिला दिवाळ-सण, पहिला अधिक- मास, सर्व काही यथास्थित करावे लागते. काही कमी पडले नाही, तरच नामी झाल्याचे शिक्कामोर्तब होते.
पहिलं मूळ धाडू।
सोबत पायलीचे लाडू
नको ग मुली रडू।
माया नको तोडू
असे म्हणतच जावयाघरी मुलीला रवाना करावे लागते. मूळ घ्यायला आलेल्यांची चांगली बडदास्त ठेवावी लागते व उंची वस्त्रालंकित करूनच त्यांना रवाना करावे लागते.
पहिला दिवाळसण म्हणजेही आनंद-पर्वच. तो जेवढा जावयाला धनदायी, तेवढाच मुलीला सुखदायी. पहिला अधिक मासही त्याच पठडीतला. ‘अधिकस्य अधिकं फलं!’ जेवढे अधिक द्याल, तेवढे अधिक मासाचे अधिक पुण्य. धन लावूनच जावयाचे मन जिंकावे लागते व नाराजीचे तण उपटून काढावे लागते. जावयाला वाण भासणार नाही, असे भरगच्च वाण लावून ताण कमी करावा लागतो.
ग्रामीण भागात तर गावातील कुणाचाही जावई गावजावई मानूनच घरोघरी सरबराई करावी लागते व त्याचा मानमरातब राखावा लागतो. घरजावई हाही एक वेगळाच प्रकार असतो. इतरांच्या बाबतीत नैमित्तिक असणारी सरबराईची आवश्यकता याच्या बाबतीत मात्र दैनंदिन बाब होऊन जाते. मात्र तिची खुमारी दिवसेंदिवस कमी-कमीच होत जाते.
प्रेमविवाहातून लाभलेला जावई मात्र या सर्वाहून वेगळा असतो. त्याच्यासाठी शोधमोहिमेची भ्रमंती-भटकंती करावी लागत नाही. हुंडा, मानपान आपोआपच टळतात. इतर सोपस्कारही कमी खर्चीक असतात. दिले तेवढेच खुशीने स्वीकारले जाते व हावरटपणाची बाधा जडत नाही. मात्र त्यात घरच्यांची नाराजी असली, तर उभय पती-पत्नींना स्वत:च विवाह उरकून घ्यावा लागतो व जावईपणाची शान मिरवायला मिळत नाही.
आपली संस्कृती ही जावयापेक्षा मुलीलाच हितोपदेश करून तिला सामोपचाराने वागण्याची शिकवण देणारी आहे. या संस्कृतीत वाढलेली माता मुलीला उपदेश करते:-
पतिसेवा हे ब्रीद आपुले।
देवाहुन ती थोर पाऊले
रागावून ते जरी बोलले।
बोलू नको त्यावरी
जा मुली शकुंतले सासरी॥
अशा प्रकारच्या शिकवणुकीमुळे जावईबापूच्या सेवेची सोय आपोआपच होऊन जाते.
आता पंच-कन्या व पंच-जावयाची हौस बाळगण्याचे दिवस राहिले नाहीत. एकच कन्या व एकच जावईचा काळ आला आहे. काहींनी तर ‘नो कन्या’चे व्रत स्वीकारून जावयाला आपल्या जीवनातून हुसकावूनच लावले आहे. आम्हाला काही कुणाचे पाय धरावे लागत नाहीत, असे ते मानभावीपणे म्हणतात खरे, पण मनातून त्यांना बरे वाटत नाही हेही तेवढेच खरे. मुलांचा व सुनांचा वाईट अनुभव आलेल्यांना ‘असावी कन्या एक तरी। मुलापेक्षा मुलगी बरी’ असे वाटू लागते.
काहींना तर मुलीसाठी जावयाची व तिच्या सासरच्यांची सरबराई करून त्यांचे मन धरण्यातही आनंद वाटतो. सर्वच जावई सारखे नसतात. काही तर स्वत:च पत्नीची आनंदकळी खुलविण्यासाठी तिला व तिच्या माहेरच्यांनाही सतत खूश ठेवण्याच्या प्रयत्नात असतात.
काही असो. आपण सतत जावईच राहणार नसून एक दिवस आपणावरही सासरा होण्याची पाळी येणारच याची जाण प्रत्येकाने बाळगायला हवी. ही जाण भान जागेवर ठेवून अति-लोभाला व हावरटपणाला आळा घातल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आपला जावई येईल, तेव्हा आपण कसे आदर्श जावई होतो, हेच त्याला इतरांकडून ऐकायला मिळेल, असेच आपले स्वत: जावई असतानाचे वर्तन असले पाहिजे. यातून जे चांगले संस्कार होती, तेच आपली भविष्यातली काळजी मिटवतील व सासरे-जावई दोघांनाही खूश राहण्याची संधी प्राप्त करून देतील. थोडक्यात –
सासरे सुखिन: सन्तु।
जावयोऽपि सन्तु निरामया:
सर्व भद्राणि पश्यन्तु।
माऽकश्चित् दु:खमाप्नुयात्
इति जावई पुराणम्
सफल संपूर्णम्।
विश्वानंद धुळेकर
response.lokprabha@expressindia.com