वाचन संस्कृतीचे मोजमाप करण्यासाठी नक्की कोणती परिमाणं लावावीत? लेखन, विषय, की भाषा? लेखन ही कष्टसाध्य कला आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. उत्तुंग प्रतिभा, तरल कल्पनाशक्ती, उदंड अनुभव, सूक्ष्म निरीक्षण, भाषेवरील प्रभुत्व, अन्वयार्थ लावण्याची शक्ती, चिकाटी, स्वाध्याय अशा अनेक गोष्टींच्या एकत्रीकरणातून लेखनकला साध्य होते.

अशी लेखनकलेची व्याख्या केली जाते, पण इतक्या कसोटय़ांवर सिद्ध झालेलं साहित्य वाचनीय होईलच याची शाश्वती काय? प्रांजळपणे विचार केला तर नाहीच! सौमरसेट मॉमसारखा जगद्विख्यात साहित्यिक स्वत:ची लेखक म्हणून जडणघडण कशी झाली हे सांगताना म्हणतो, ‘‘सुरुवातीच्या काळात भाषासौंदर्य, व्याकरण, अपुरा शब्दसंग्रह या अडचणी लिखाणाच्या वेळीस सतावीत होत्याच. तेच ते वापरून गुळगुळीत झालेले वाक्प्रचार वापरणे आवडत नव्हते. संवाद लिहिणे जमत असे, पण वर्णन करायचे म्हटल्यावर अलंकारिक भाषा आणि वर वर्णन केलेले प्रॉब्लेम्स सतावीत असत. चार-पाच वर्षे काढल्यावर मी आपली लेखनशैलीच बदलली. शैलीदार लेखक न बनता फक्त लेखक व्हायचे ठरविले.’’

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

वाचन संस्कृतीसंबंधीची समस्या ही लेखन, वाचक त्यातही तरुण, ज्येष्ठ, भाषा, प्रदेश अशा काही ठरावीक मुद्दय़ांपुरती सीमित नाही आणि केवळ मराठी भाषेपुरती मर्यादित तर नाहीच नाही. दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रचंड अतिक्रमणामुळे तर या समस्येने वैश्विक रूप धारण केले आहे. अर्थात मराठी वाचकांची संख्याही काळजी करण्याइतकी रोडावत चालली आहेच.

दृक्श्राव्य माध्यमांचा विचार करता फेसबुक, ब्लॉग्स, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांतून प्रसारित होणारे; केव्हाही, कोठेही, कोणालाही सहजतेने उपलब्ध होऊ  शकणारे ‘इ-साहित्य’ हेही आता ‘वाचनीय’ सदरात समाविष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या घडीला युवकच नाही तर ज्येष्ठदेखील तेवढय़ाच तन्मयतेने यात रस घेताना दिसतात.

‘युवा पिढीचे वाचन’ हा फारसा गांभीर्याने घेण्याचा विषयच नाही. कारण तरुणांचे वाचनप्रेम हे प्रामुख्याने गरज या विषयाभोवती केंद्रित झालेले असते. करिअर, व्यावसायिक स्पर्धा, कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचे ‘प्रेम’ या विषयांच्या जंजाळात सदैव त्रस्त आणि व्यस्त असणारी ही पिढी. म्हणजे तो वाचन करीत नाही असे नाहीच, त्याचे वाचनविश्व मर्यादित आहे इतकेच!

सर्वसाधारण वाचकाची वाचनप्रेरणा असते, विरंगुळा, ज्ञानप्राप्ती, संशोधन आणि अर्थातच भाषा म्हणजे लेखनशैली! पण मराठी माणसाला काय आवडेल? सांगता येणे कठीण. अजूनही पु.ल., व.पु. डोक्यावर घेतले जात आहेत. नव्या दमाचा संदीप खरेही लोकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. अगदी थोडय़ा कालावधीत! कारण मराठी माणसाला जशी वपुंची मैत्रीपूर्ण, पुलंची वजनदार पण हळुवार, चिमटे काढणारी भाषा आवडते तशीच संदीपची मनाला चटकन भिडणारी, आपली रोजच्या वापरातले शब्द असलेली सहजसोपी भाषाही चटकन अपील होते.

भारतात स्थायिक झालेल्या अमेरिकन भाषातज्ज्ञ डॉ. मॅक्झिन बर्न्‍सन म्हणतात मराठी भाषा तशी अवघडच. अमराठी माणसाला तर घाबरवून सोडणारी.

आपले हे मत जरा गमतीने मांडताना त्या म्हणतात, ‘मराठी माणसं काय काय खातात? बोलणी खातात, डोकं खातात, वेळ खातात, मार खातात, अक्षरं खातात, पैसे खातात..  कधी कधी शेणही खातात.’ प्रयोग म्हणून ; जुन्या तसेच नवीन साहित्यिक आणि साहित्य प्रकाराची थोडी का होईना ओळख असलेल्या आणि एकंदरच वाचनाशी घनिष्ठ संबंध असलेल्या काही ओळखीच्या मध्यमवयीन, पण रसिक मित्रांना; मुद्दाम तयार केलेला एक परिच्छेद वाचायला दिला.

नमुनेदाखल काही ओळी..

वाचक पर्युत्सुक होण्यासाठी,

‘सृजनशील साहित्यिक काही अनुभूतींचा आविष्कार, विचार विलसित करताना, व्यक्तींकडून समष्टीकडे प्रवास करतात.

आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर झाल्यावर वेगवेगळ्या शब्दकोशांचे अवगाहन करून, सृजनशील साहित्यनिर्मितीचं मूलगामी कार्य करतानाच, अन्वर्थक मुखपृष्ठेही महत्त्वाची मानतात.’

असलं काहीतरी वाचताना जवळजवळ सगळ्यांचेच चेहरे अपचन झाल्यासारखे झाले.

उतारा म्हणून अशाच जड जड शब्दांनी नटवलेली पण ऐकायला सुंदर अशी एक कविता ऐकविली –

‘ओथंबलुप्त झाला गगनात पावसाळा

घेउन ये प्रिया तू समवेत पावसाळा

तो लाघवी ऋतू अन ते स्पर्श रेशमाचे

त्या स्निग्धल्या ऋतूंच्या नजरेत पावसाळा

ती चिंब निमिशगाथा, ती आद्र्रता सुरांची

तुझियात गुंतलेल्या श्वासात पावसाळा..।’

एका सुरात सगळ्यांनी दाद दिली ‘वाऽऽ क्या बात है!’ ओथंबलुप्त स्निग्धल्या, निमिशगाथा या शब्दांपाशी ते थबकलेदेखील नाहीत. पुन:प्रश्न तोच- भाषा कशी असावी?

भाषा कोणतीही असो- साधी, सोपी, ओघवती भाषा असावी. मनाला भिडणारी!
अनिल ओढेकर – response.lokprabha@expressindia.com