तारा अतिशय नीटनेटकी आणि निगुतीने संसार करणारी! मिळवलेल्या चार पैशांतून दोन पैसे बाजूला टाकणारी. प्राण पणाला लावून नवरा, मुलं, सासू-सासरे, नातेवाईकांचं करणारी. बारीकशी, लहानखुरी! सगळी कामं कशी चपळाईने करायची. दिसायला सामान्य, पण बुद्धीचा आवाका दांडगा. जोडीला कामाचा उरक.

सकाळी चारलाच तिचा दिवस सुरू व्हायचा. कारण आठला ऑफिसात पोहोचायचे असायचे. आधी आजारी सासऱ्यांना चहा, मग त्यांचं स्पंजिंग. स्वत:ची आंघोळ, चहा. चहा पिताना भाज्या फोडणीला (रात्रीच योजनाबद्ध चिरलेल्या). प्रेशर कुकरच्या दोन ‘शिट्टय़ां’मध्ये तिचा स्वयंपाक व्हायचा. पोळ्या करायला बाई यायची नऊ वाजता. त्यामुळे स्वत:च्या आणि नवऱ्याच्या डब्याच्या सहा पोळ्या केल्या, डबे भरले की ती साडी नेसून, अंबाडा वळून ऑफिसात जायला तयार. मुलांच्या डब्याचा आता प्रश्न नव्हता. दोघंही मुलं इंजिनीअरिंगला होती. दुपारी धुणं-भांडय़ाला बाई यायची, पण सासूबाईंचं आणि तिचं काही पटायचं नाही. त्यामुळे बहुतेक वेळेला ऑफिसातून आल्यावर पहिल्यांदा पदर बांधून आणि साडी वर खोचून भांडी घासायला घ्यायची आणि संध्याकाळी विविध भारतीच्या तालावर तिचा स्वयंपाक व्हायचा. रात्रीची जेवणं-आवरणं झालं की उद्याची तयारी आणि अकरा-बारा वाजता अंथरुणाला पाठ टेकायची. सगळ्यांचं दुखलंखुपलं, आवडनिवड ती जातीनं बघायची. आलं-गेलं, देणी-घेणी यांचा सराईतपणे समाचार घ्यायची. एकूण एखाद्या कसलेल्या योद्धय़ाप्रमाणे आल्या दिवसाला तोंड द्यायची.

ताराचा नवरा सज्जन माणूस. शांत, तत्त्वज्ञानाची भरभक्कम बैठक असलेला. त्यानं सर्व संसार तारावर सोपवलेला. आपण बरे आपली सरकारी नोकरी बरी. घरातल्यांचे, बायकोचे प्रॉब्लेम्स त्याच्या मनाला स्पर्शही करायचे नाहीत. ‘संथ’ तुकारामाचा अवतार!

ताराने नवरा-मुलांच्या तब्येती धडधाकट राहाव्यात म्हणून काहीही झालं तरी घरचं सात्त्विक, व्हिटॅमिन्स जोपासलेलं, गरम जेवण नित्यनेमाने गेली पंचवीस-तीस र्वष अखंडपणे वाढलं होतं. आजारपणातही या यज्ञकर्मात तिचीच आहुती पडत होती.

प्रत्येकाला आपलं दु:ख सांगायला ताराच मिळत होती. कारण ती त्यांच्या दु:खात समरस होत होती. त्यांना अडचणीत मदत करत होती. लौकिक अर्थाने तिला काहीच दु:ख असल्याचं दिसत नव्हतं. तिचा संसार कसा गुळगुळीत, चमकदार, फिक्या रंगाच्या, सुवासिक साबणासारखा होता. तिचे सासू-सासरे अगदी आदर्श. नवरा-मुलं आज्ञेत. आणखी काय पाहिजे बाईला? तिला होतं सुखच सुख. नवऱ्याचे ऑफिसातले प्रॉब्लेम्स, मुलांचे करिअरचे प्रॉब्लेम्स, घरादारातील राजकारण, हेवेदावे, दुखणीबाणी. ताराला यातलं काहीच नव्हतं. तारा कुरकुरत नसल्यामुळे एक सुखी स्त्री, सर्व दु:खांपासून दूर समजली जायची. सर्वाची ती एक सोयीस्कर ‘पंचिंग बॅग’ होती. प्रत्येकजण स्वत:च्या डोक्यातील मळ, ताणतणाव तिच्या परोपकारी डोक्यात भरून स्वत:च्या दु:खाचा निचरा करत होता. त्यांच्या अडचणीत ती कुठलीही पळवाट न शोधता, इमानदारीत हजर असे, पण तिने मदतीची हाक दिली तर त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगरच उभे असायचे. मदत घ्यायचा हक्क मात्र त्यांचा! तिला कसलाही हक्क नाही. ना मनमोकळं रडण्याचा, ना आराम करण्याचा, ना मजा मारण्याचा. सर्व हक्क लोकाधीन!

ताराला हे सर्व अपेक्षित होतं. अंगवळणीही पडलं होतं. तिनेही आपले मन दुखू नये म्हणून त्याला बधिर व्हायला शिकवले होते. तिला हसतखेळत संसार करायचा होता नां? त्यासाठी बधिरपणाच्या दिव्य अस्त्राची नितांत गरज होती. ताराने काळ-काम-वेगाच्या गणितात १००  टक्के नैपुण्य मिळवलं होतं. तिच्यासारखं वीस कामं-एक माणूस असलं ‘अस्ताव्यस्त’ प्रमाण, अठराशे सालातल्या निग्रो गुलामांच्या व्यापाऱ्यांनाही जमलं नसेल!

तिच्या संसाराची घडी कशी फर्स्टक्लास जमली होती. तिच्या घरातलं प्रत्येक माणूस कसं तिच्या शोकेसमधल्या वास्तूंसारखं सुबक, गोंडस, आदर्श होतं. निगुतीनं ठेवायची सर्वाना स्वत:कडे दुर्लक्ष करून. तिच्या लेखी ती अस्तित्वातच नसल्यासारखी होती. त्यांच्या जीवनाच्या फूत्कारांसमोर तिचा श्वास नगण्य होता.

सर्वाच्या काळज्यांचा डोंगर डोक्यावर घेऊन नेहमीप्रमाणे तारा हसतमुखाने घरी येण्यासाठी ६:१७ ची लेडीज स्पेशल लोकल पकडायला धावली. ब्रिज चढून प्लॅटफॉर्म नं. ३ वर जायला वेळ नव्हता म्हणून स्वत:च्या नादात रेल्वे क्रॉसिंग करायला गेली. समोरून येणाऱ्या लोकलचे भानच नाही राहिले. घरी जाऊन आधी वॉशिंग मशीन लावून मटार निवडायला घ्यायचेच डोक्यात होते. काळ-काम-वेगाचे गणित आज चुकले होते.

आरडाओरडा झाला. किंकाळ्या फुटल्या. आणि धाडधाड लोकल अंगावरून पुढच्या स्टेशनवर गेली. ताराच्या घरातल्या त्या शोकेसमधल्या, सुबक वस्तूंना तडासुद्धा गेला नाही.
तेजस्विनी दिनेश – response.lokprabha@expressindia.com