07 March 2021

News Flash

मोहिनीचा भस्मासुर

पुराणात भस्मासुर- मोहिनीची एक कथा आहे.

पुराणात भस्मासुर- मोहिनीची एक कथा आहे. भस्मासुर राक्षसाला असं वरदान मिळालेलं होतं की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो क्षणार्धात भस्म होईल.

पुराणातील वांगी पुराणात म्हटलं तरी आता ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे वेगवेगळी प्रसारमाध्यमं, इंटरनेट, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इ.ची आपल्याला पडलेली जबरदस्त मोहिनी.

माणसाला सतत नवं ते हवं. आधीच्या पिढीकडून, आजी-आजोबांकडून, रेडिओ नवीन आला तेव्हाच्या गोष्टी आपण ऐकतो. रेडिओसाठी माणसं कशी वेडी व्हायची, कामधंदा बंद करून त्याभोवती गर्दी कराची असं सर्व काही आपण ऐकलेलं आहे. त्यानंतर आला टी.व्ही. त्याने तर मनोरंजन क्षेत्रात क्रांतीच घडवली. आवडत्या मालिकेसाठी/ चित्रपटासाठी कामं वगैरे थांबवून टी.व्ही. पाहणं असे सगळे प्रकार आपण पाहिले आहेत, केलेही आहेत. इतकी र्वष झाली तरी टीव्हीचा विळखा अजून सैल होत नाहीये.

त्याच्या जोडीला लवकरच अवतरलं संगणक युग. इंटरनेटच्या मायाजालाने बघता बघता जग खुजं करून टाकलं. जगभरातील नवीन, जुन्या सगळ्या माहितीचा खजिना खुला झाला. एका बोटाच्या क्लिकवर सगळ्या गोष्टी हजर होऊ लागल्या. संपूर्ण दुनिया जवळ आली. इंटरनेटचा सुयोग्य सुजाण वापर केला तर त्याचे अतिशय फायदे आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींशी संपर्क साधला जातो. माहिती आणि ज्ञानाचा कधीही रिता न होणारा जादूई पेटारा आहे हा. इंटरनेट आणि इतर माध्यमांद्वारे दूरस्थ नातेवाईकांशी संवाद सोपा झाला. हरवलेले मित्र पुन्हा सापडले. नवनवीन मैत्री झाल्या. इ.

पण ही नाण्याची एक बाजू झाली. नीट वापर केला नाही तर ही माध्यमं मायाजाल नाही मोहजाल ठरतात. आजूबाजूला पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आसपासचे सर्व, आपणसुद्धा त्यात गुरफटले जात आहोत. सकाळी उठल्यावर दातही घासायच्या आधी आपण उशाजवळचा मोबाइल ‘चेक’ करतो. दिवसाची सुरुवातच मुळी- नवीन मेल, एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप नाही ना, अशी होते. दिवसातून शंभरदा मोबाइल ‘तपासल्याशिवाय’ चैन पडत नाही. नेट मिळालं नाही की अस्वस्थ होतो आपण. समोरची व्यक्ती बोलत असली तरी त्याच्यासमोर आपण आपले मोबाइलमध्ये दंग. बोलणाऱ्या व्यक्तीकडे लक्षच नाही.

मीही नवीन अ‍ॅण्ड्रॉईड फोन घेतला- इंटरनेट, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसाठी. शाळेचा ग्रुप होताच, इतरही अनेक ग्रुप होतेच, मी ‘अ‍ॅड’ झालेच. परत जुने मित्र-मैत्रिणी भेटले, खूप गप्पा झाल्या. अनेक दिवसांनी भेटल्याचा आनंद झाला. मग सुरू झाला एक सिलसिला..मेसेज पाठवणे, जोक्स फॉरवर्ड करणं, कोडी- उखाणे घालणं, वेगवेगळे फोटो पाठवून- वाहवा मिळवणं. मी अ‍ॅडिक्ट कधी झाले, माझं मलाच कळलं नाही. दिवसातला बराच वेळ त्यापायी खर्च व्हायला लागला, सगळ्या कामांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ठरलेल्या गोष्टींना वेळ पुरेनासा झाला. लक्षात यायला लागलं की, अरेच्चा, आपण या गोष्टींच्या कह्य़ात जायला लागलोय. आपण ही माध्यमं वापरण्यापेक्षा तीच आपल्याला वापरताहेत. आपला वेळ वाया जातोय. आपण खूप दिवसांत मनाजोगं वाचन नाही केलं, जुनी गाणी नाही ऐकली, गप्पा नाही मारल्या. मी वेळेला जागी झाले. आता मात्र मी ठरावीक वेळानंतरच मोबाइल बघते. महत्त्वाचं असेल तर उत्तर पाठवते, वाढदिवसाला व इतर चांगल्या गोष्टींसाठी लोकांना शुभेच्छा देते. मी स्वत:ला या (५ी१-ी७स्र्२४१ी)पासून थांबवलंय. मी या गोष्टी वापरणे पूर्णपणे बंद नाही केलं. कारण त्यांचं महत्त्व मलाही माहीत आहे. संपर्कात राहणं, परस्पर संवाद असणं अशा गोष्टी असायलाच हव्यात, पण त्यांच्या अधीन व्हायचं नाही हे मी ठरवलं आहे. ही मोहिनी आपल्याला किती पडू द्यायची हे तर आपल्याच हातात आहे ना? या माध्यमांनी आपल्यावर किती कब्जा करू द्यायचा हे आपणच ठरवायचं. त्याच्या पायी आपण आयुष्यातल्या किती तरी चांगल्या गोष्टी, किती तरी छोटे छोटे निर्भेळ आनंद आपण मुकतोय हे भान आपणच ठेवायला हवं ना! नाही तर हा सिंदबादचा म्हातारा केव्हा मानगुटीवर बसेल कळणार नाही.

भस्मासुर-मोहिनीची कथा म्हणूनच आठवली. भस्मासुर हे आत्मभानाचं प्रतीक आहे. पुराणातील भस्मासुराला मोहिनीरूपी विष्णूची भुरळ पडली. तो तिच्यासाठी इतका खुळावला की तो तिच्या तालावर नाचायला लागला. ती जे करेल तसंच करू लागला. नाचता नाचता मोहिनीने स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला. मागचा-पुढचा विचार न करता सारासारबुद्धी गमावलेल्या भस्मासुराने स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वत:चंच भस्म करून घेतलं.

पुराणकाळात विष्णूचा मोहिनी अवतार हा जगाच्या कल्याणासाठीच झाला. पण आधुनिक काळातील या मोहिनीचा हात डोक्यावर येण्याआधीच आपण जागे होऊ या आणि स्वत:चा भस्मासुर होणं टाळू या!
सोनाली गोखले – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:08 am

Web Title: social media addiction
Next Stories
1 कुठून येतो हा स्वाभिमान?
2 अतिपाणी आणि पाणीच नाही
3 फुलांचा आनंद
Just Now!
X