News Flash

कात टाकलीय…

अनेक शक्तिशाली, कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातही ‘पडता काळ’ येतो

‘कात टाकलीय आता’ ही कविता, मी १९९९ च्या सुमारास लिहिली होती. १९७५ च्या महिला वर्षांनंतर महिलांचे समाजातील स्थान; कुटुंबातील स्थान हळूहळू बदलत गेले. या तेजस्विनीकडे पाहताना माझ्या मनात कल्पना आली की ‘कात टाकलीय आता!’

ही कविता लिहिली तेव्हा मी; साप कसा कात टाकतो हे पाहिले नव्हते. बालपणात पाहिलेले व सुट्टीत जाऊन राहिलेले मातीचे घर, मातीच्या भिंती असलेले प्रशस्त आवार; आवाराच्या आत असलेले गोठे; आवारा पलीकडे शेणखतासाठी साठवलेले उकीरडे; बाजूंनी रचलेले दगड; (पौळ) शेतातील झाडाझुडपांच्या गर्दीत अनेक वेळा कात पडलेली पाहिली होती. दगड धोंडय़ाच्या आडोशाला; पडक्या वाडय़ांच्या आसऱ्याला विसावलेला सुस्त कात अंगावर आलेला; खेडवळ भाषेत ‘काती आलेला’ साप पाहिला होता. पण अंगावरची कात टाकून तो बाहेर कसा येतो हे मी पाहिले नव्हते. प्रत्यक्ष हे पाहण्यासाठी २००९ उजाडले. श्रीलंकेत; कोलंबो येथे; गेले असताना हे दुर्मीळ दृश्य पाहता आले. तिथे प्राणिसंग्रहालयात आम्ही वेगवेगळे प्राणी पाहत पाहत, पुढे पुढे जात असताना; काचेच्या मोठय़ा बंदिस्त बॉक्ससमोर आलो आणि नजर आतल्या दृश्यावर खिळून राहिली. मंत्रमुग्ध होऊन मी पाहत राहिले.. ग्रुपमधले सर्व जण पुढचे प्राणी पाहत पाहत पुढे निघून गेले, पण मला लक्षात आले नाही मी एकटीच तिथे उभी होते, याचे भान नव्हते. पाय जमिनीला व नजर काचेतून दिसणाऱ्या दृश्यावर खिळून राहिली. श्वास काही क्षण रोखलेला! कात टाकताना; अंगावरील आवरणातून बाहेर पडताना होणारी शरीराची हालचाल; समोरच्या बाजूला बाहेर पडत असलेले चमकदार, लखलखणारे अंग! त्याचे भीतिदायक लावण्य अवर्णनीय होते. काळ्या ढगात विजेची रेषा चमकावी तसे तजेलदार लावण्य! तर शेपटीकडील पोकळ होत जाणारा निर्जीव, निस्तेज भाग हळू हळू मागे पडत होता. जणू म्यानातून बाहेर उपसलेले तलवारीचे तेजस्वी, लखलखीत पाते! योद्धय़ाने म्यानातून उपसलेली तलवार तेज! ‘बाजूला व्हा’ असे सांगायची गरजच नाही. शब्दाविना दिलेला इशाराच तो. साप आवरणात असतो, धारदार तलवार म्यानात असते तोपर्यंत भ्याडसुद्धा बहादूर बनतात.

अनेक शक्तिशाली, कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातही ‘पडता काळ’ येतो, सत्तेवर, वैभवात असताना सलाम करणारे लोकही; या काळात उपेक्षा करतात; दुर्लक्ष करतात परिस्थिती बदलली की मूर्खसुद्धा ‘ज्ञानी’ असल्याच्या थाटात उपदेश करू पाहतात. शहाणपणा शिकवू पाहतात, पण जिद्दी माणसे फार काळ या निर्जीव आवरणात राहत नाहीत. कात टाकून स्वत:चे तेज पुन्हा दाखवतात. कारण त्यांनी स्वत:ला ओळखलेले असते. ते जाणतात की आपली बुद्धिमत्ता फार काळ दडून राहणार नाही. त्यांचा विश्वास असतो की आपण एखादी लढाई हरू कदाचित, पण युद्ध आपणच जिंकणार आहोत.  वाईट काळ; आवरण मागे टाकता येते ज्यानी स्वत:चं सामथ्र्य ओळखलेलं असतं. जिद्दी असतात ते पुन्हा तळपतात. फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटेल याची भीती नसते तर स्वत:च्या उडण्याच्या सामर्थ्यांवर त्याचा विश्वास असतो. ज्यांनी या विश्वासाचं बुलेटप्रुफ जॅकेट मनावर, हृदयावर घातलेलं असतं, ते कात टाकून बाहेर येणारच असतात.
अ‍ॅड. गीतांजली सुकळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:09 am

Web Title: story 21
टॅग : Story,Vachak Lekhak
Next Stories
1 इकडून तिकडे आणि तिकडून इकडे…
2 सायकल ते सायकल
3 दगडूबाई
Just Now!
X