ईश्वराच्या एक सहस्रनामाच्या जपाची परंपरा महाभारतापासून सुरू झाली आहे. विष्णू सहस्रनाम ही यातील एक महत्त्वाची स्तोत्रपरंपरा. यात विष्णूची एक हजार नावे दिलेली आहेत. त्यातील एक आहे ‘वृक्ष.’

श्रीकृष्णाचे निसर्गप्रेम तर प्रसिद्धच आहे. त्याला शोधायचा असेल तर यमुना तटावरील घनदाट वृक्षराजीत प्रवेश करावा लागतो. जयदेवाने त्याचा पत्ताच मुळी- ‘धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली’ असा देऊन ठेवला आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

भागवत महापुराणाच्या दशम स्कंधात त्याने मन भरून वृक्षस्तुती केली आहे. गोचारण करीत असताना तो आपल्या गोप मित्रांना म्हणाला-

‘माझ्या मते तर वृक्षांचे जीवन सर्वश्रेष्ठ जीवन आहे. ते सर्व प्राण्यांचा सहारा आहे. लोकांचा जीवननिर्वाह केवळ त्यांच्यावर अवलंबून आहे. जसे कोण्या सज्जन पुरुषाच्या घरातून याचक रिक्तहस्ते नाही परतत, तसेच वृक्षांपासून सगळ्यांना सगळे काही प्राप्त होते. ते आपली पाने, फुले, फळे, छाया, मुळे, साली, लाकूड, गोंद, गंध, राख, कोळसा, अंकुर आणि कोमल पानांनी लोकांची कामना पूर्ण करतात. जीवनाची सफलता असे कर्म करण्यातच आहे. ज्यामुळे दुसऱ्यांचे भले व्हावे. हीच वृक्षांची शिकवणूक आहे. तुम्हाला जगात काही व्हायचे असेल तर परोपकारी वृक्ष व्हा.’

कृष्णाने स्वत:ला अश्वस्थ वृक्ष मानले आहे, ज्याचे फळ आहे भगवद्गीता.

वृक्षपूजनाची भारतीय परंपरा फार प्राचीन आहे. गुफांमध्ये राहणारे प्राचीन वनवासी निसर्गपूजक होते. त्यांनी आपल्या शैलाश्रयांच्या भिंतीवर काढलेल्या चित्रात वृक्षपूजनाचा आभास मिळतो. सैंधवी संस्कृतीच्या शिक्क्यांवर (२ीं’) वृक्षांचे खूप अंकन झाले आहे. त्यातील काही वृक्षांच्या बुंध्यांपाशी पूजा करण्यासाठी चौथरेही बनवलेले दिसतात.

वैदिक आर्य तर जाणूनबुजून निसर्गपूजक. त्यांच्या देवता या निसर्गशक्ती होत्या. यापैकी अनेक वृक्षांच्या आधाराने राहणाऱ्या होत्या. वनस्पतींना ते दैवी मानत. ऋ ग्वेदात दशम मंडलात त्यांच्या स्तुतीपर सत्त्याण्णव क्रमांकाचे पूर्ण सूक्त आहे. त्यांना मातृदेवता मानीत व प्रसंगोपरात त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचा बळीही दिला जाई. त्यांची अरण्यानी नावाची वनदेवताही होती. शाकांबरी हे तिचे पौराणिक रूप.

प्राचीन बौद्ध कलेत वृक्षांचे अंकन वैपुल्याने झाले आहे. सुरुवातीच्या बौद्ध कलेत बुद्धाचे मनुष्यरूप दाखवीत नसत. त्याचे अस्तित्व बोधी वृक्षाच्या अंकनाने सूचित करीत. या कलाकारांनी भरहूत व सांची येथे सर्वप्रथम वृक्षिका शिल्पांची रचना केली. यात एक देवता वृक्षाच्या निकट संपर्कात उभी असल्याचे दाखविले जाते. तिला काही कलामर्म ज्ञानींनी वृक्षाची वधू असेही म्हटले आहे. मिथुन कलेच्या आरंभीची ही युग्मे भारतीय कला इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. रामायणात सीतेने यमुनेचे व यमुना तटवर्ती श्याम वटाचे पूजन केल्याचा उल्लेख आहे.

महाभारतकाळी वृक्षपूजनाचे महत्त्व खूपच वाढले होते. गावामध्ये एखादा पर्णपुष्पांनी डंवरलेला वृक्ष असला तर चैत्यवृक्ष म्हणून त्याची पूजा केली जाई. शुक्ल यजुर्वेदात रुद्रस्तुती आहे. तेथे त्याला ‘नमो पर्णा च’ म्हणजे वृक्षाच्या पर्णाच्या रूपाने प्रगट होणारी देवता असे म्हटले आहे. पुराणांमध्ये तर अनेक वृक्षांना दैवी मानून त्यांचे गुणगान केलेले आहे.

वृक्ष कसे लावावेत, त्यांची निगा कशी ठेवावी, त्यांच्या उपासनेची फले कोणती, याविषयी विस्ताराने लिहिलेले आहे. वृक्ष हा तो लावणाऱ्यांचा पुत्रच होय, अशी भावना व्यक्त केलेली आढळते. पद्मपुराण म्हणते, वृक्ष तो लावणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो व वृक्ष लावणारी व्यक्ती त्या वृक्षांच्या फांद्यावर जितकी पर्णे आहेत तितकी वर्षे स्वर्गात राहते. पद्मपुराणाने तर वृक्षांची एक लांब यादी देऊन ती लावणाऱ्यांना काय काय पुण्यफळे देतात हे सांगितले आहे. जसे, िपपळाचा वृक्ष लावणारा धनवान होतो व एक हजार पुत्रप्राप्ती एवढे पुण्यफळ त्याला मिळते. पिंपळ रोगांचा नाश करतो. पाकड नावाचे झाड लावल्यास यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. कडुलिंबाचे झाड लावणाऱ्यास दीर्घायुष्य व भगवान सूर्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. जांभळाचे झाड लावणाऱ्यास कन्यारत्नाची प्राप्ती होते आणि अनार वृक्ष लावणाऱ्यास सुंदर पत्नी मिळते. अंकोल वृक्ष लावल्याने कुटुंबाचा विस्तार होतो. फणस व चंदन लावल्याने लक्ष्मीप्राप्ती होते. नारळाचे झाड लावल्याने पुरुषाला अनेक स्त्रियांची प्राप्ती होते.

पुराण पुढे म्हणते, बेलाच्या झाडात शिवाचा वास असतो आणि गुलाबात पार्वती. अशोक आणि कुंदाच्या झाडामध्ये अप्सरा आणि गंधर्वाचा निवास असतो. काही झाडे पुराणांनी अतिपवित्र मानली आहेत, त्यात तुळशी प्रमुख आहे. पद्मपुराण म्हणते, पुष्कर धरून सर्व तीर्थे, गंगा धरून सर्व नद्या, वासुदेव धरून सर्व देवता तुळशीत राहतात.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी, जिला वैकुंठी चतुर्दशी असेही म्हणतात, लोकांनी आवळ्याच्या झाडाच्या छायेत बसून राधाकृष्णाची पूजा करावी. वृक्षाला १०८ प्रदक्षिणा घालाव्यात, भगवंताची प्रार्थना करावी.

असे म्हणतात की, आवळा हा ब्रह्मदेवाच्या अश्रूपासून निर्माण झाला आहे. स्कंद पुराणाच्या मते ते पृथ्वीवर वाढणारे पहिले झाड होते. असे म्हणतात की, ब्रह्मदेवाने प्रथम आवळ्याचे झाड निर्मिले आणि नंतर जगाची रचना केली. पिंपळाच्या झाडाविषयी बोलायचे झाले तर भगवान विष्णू त्याच्या मुळाशी, भगवान शिव त्याच्या शरीरात व भगवान ब्रह्मा, त्याच्या टोकाशी स्थित असतात, असे मानले जाते.

कदंब वृक्ष कृष्णाचे प्रतीक मानला जातो. आजही ज्याने कदंब वृक्षावर आरोहण करून कात्यायनी व्रत करणाऱ्या यमुनास्नान करीत असलेल्या गोपींचे वस्त्रहरण केले तो वृंदावन येथे यमुनेवरील चिरहरण घाटावर उभा आहे असे मानतात. भाविक या वृक्षाची पूजा करतात व त्याच्या फांदीला नवी वस्त्रे बांधतात. कुरुक्षेत्रानजीक ज्योतीसर येथे भगवान कृष्णाने ज्या वटवृक्षाखाली गीता सांगितली तो अजूनही तेथे उभा आहे असे मानले जाते. ज्या बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो वृक्ष बौद्ध गयेत उपस्थित आहे, असे आजही मानतात. वेद धरून बहुतेक सर्व धर्मग्रंथांनी जगाच्या कल्याणासाठी शांतिपाठ दिलेले आहेत. त्यापैकी एक शांतिपाठ यजुर्वेदात दिलेला आहे. त्यात निसर्गाला वृक्षाचे प्रगट रूप मानून दिलेल्या शांतिपाठाचा अंश असा –

ओम् द्यौ: शान्ति

अन्तरिक्ष शान्ति

पृथ्वी शान्ति

आप: शान्ति

ओषधय: शान्ति

वनस्पतय: शान्ति

विश्वे देवा शान्ति

सर्व शान्ति ओम्॥ (यजुर्वेद ३६:१७)
म. ल. वराडपांडे – response.lokprabha@expressindia.com