18 September 2019

News Flash

वेसवार

तांदूळ पॅनमध्ये मंद आचेवर तांबूस होईपर्यंत भाजावे. उडीद डाळ धने इ. साहित्य क्रमाक्रमाने स्वतंत्र भाजावेत.

49-lp-foodसाहित्य : ३ माप तांदूळ, १ माप उडीद डाळ, धने १ माप, मोहरी, मेथी, हिंग, हळद पावडर प्रत्येकी १ चमचा; सुक्या लाल मिरच्या ८/१०. मीठ.

कृती : तांदूळ पॅनमध्ये मंद आचेवर तांबूस होईपर्यंत भाजावे. उडीद डाळ धने इ. साहित्य क्रमाक्रमाने स्वतंत्र भाजावेत. तयार जिन्नस मिक्सरवर भरडसर दळावे. मग त्यात हिंग  व हळद पावडर घालावी व कालवावे. खडा हिंग कुटून घातल्यास जास्त छान चव येते. हा वेसवार तेलात अगर दह्यात कालवून खावा व प्रत्येक वेळी जरुरीप्रमाणे मीठ घालावे. मऊ भाताबरोबर व भाकरीबरोबर खावयास छान लागतो.

टीप : तळकोकणातला सिंधुदुर्ग-मालवणचा हा खास पदार्थ.

हा पदार्थ पारंपरिक आहे, तो हल्ली बाजारात मिळत नाही. घरी अवश्य करून पाहावा व आगळ्यावेगळ्या चटणीचा स्वाद घ्यावा. कुठलीही पातळ भाजी करताना याचा उपयोग करावा. भाजीला दाटपणा येतो. दह्यात अथवा तेलात घालून ही चटणी खावी.

मोजिटो ड्रिंक

एका ग्लासमध्ये लिंबूरस घालावा, गार पाणी घालावे, आवडीनुसार सैंधव मीठ, साखर घालावी. पितेवेळी एखादे सॉफ्ट ड्रिंक आपल्या आवडीनुसार घालावे. ड्रिंक फसफसून येते, लगेच प्यावे. वाटल्यास पुदिना पाने कुस्करून घालावीत. हे वेगळे ड्रिंक जड जेवण झाल्यानंतर अवश्य प्यावे. खूप पाचक व चविष्टही आहे.

51-lp-foodतीन तडकेवाली दलिया खिचडी

साहित्य : दलिया २ वाटय़ा, तूप ६ चमचे, टोमॅटो प्युरी, ४ चमचे साखर. मीठ, कोथिंबीर, नारळचव सजावटीसाठी.

१ ला तडका- २ चमचे तूप, सुक्या लाल मिरच्या ५/६, कढीपत्ता, जिरे, राई, उडीद डाळ व चणा डाळ १/१ चमचा, हिंग.

२ रा तडका- २ चमचे तूप, हिरव्या मिरच्या ५/६, आले-लसूण पेस्ट २ चमचे. पुदिना कोथिंबीर पेस्ट २ चमचे.

३ रा. तडका- २ चमचे तूप. धनाजिरा पावडर व गरम मसाला, सब्जी मसाला किंवा रसम मसाला १ चमचा, हिंग.

नारळाचे दूध अथवा सायीसकटचे (दही फेटलेले.)

कृती : प्रथम दालिया १/२ तास पाण्यात भिजवावा. तो फुलून येतो व शिजण्यास वेळ लागत नाही. नंतर एका हंडीमध्ये पाणी घालून शिजवावा. आच मंद ठेवावी. नंतर १ ला तडका घालावा व ढवळावे. दुसरा व तिसरा तडका घालून छान एकजीव करावे. मीठ, साखर व टोमॅटो प्युरी घालावी. पुन्हा ढवळावे. पाच मिनिटे वाफ आणावी व गॅस बंद करावा. नंतर नारळाचे दूध अथवा सायीसकटचे दही फेटावे व घालावे. सर्व व्यवस्थित कालवावे. दलिया खिचडी तयार. सव्‍‌र्ह करताना कोथिंबीर व नारळचव पेरावा.

– ही खिचडी पौष्टिक तर आहेच, पण मधुमेही अथवा कोलेस्टॅरोल असलेल्या सर्व रुग्णांसाठी ज्यांना तांदळाचा भात वज्र्य आहे त्यांच्यासाठी छान पर्याय आहे.

या खिचडीत मिश्र कडधान्ये घातली तर हे एक पूर्णान्न होईल. ही खिचडी हल्ली गॅसवर ठेवता येणारी मातीची भांडी मिळतात त्यात केल्यास फारच रुचकर लागेल.

50-lp-foodटॅमरिन्ड – कॉर्न सूप

साहित्य : चिंचेचा कोळ २ चमचे, किसलेला गूळ ३/४ चमचे. वाफवलेल्या कॉर्नची पेस्ट १ चमचा, गावरान लोणी, जिरा पावडर, हिंग पावडर, चिली फ्लेक्स, रसम मसाला २ चमचे, मीठ. सजावटीसाठी कोथिंबीर, वाफवलेल्या मक्याचे दाणे.

कृती : एका छोटय़ा बाऊलमध्ये किसलेला गूळ गरम पाणी घालून विरघळण्यासाठी ठेवावा. नंतर एका पॅनमध्ये गावरान लोणी घालावे. त्यात जिरा व हिंग पावडर. रसम मसाला, फ्लेक्स घालावेत व जरासे परतावे.

बाऊलमध्ये वरील गूळपाणी, चिंचेचा कोळ व पॅनमधील मसाला घालावा. मीठ घालावे व ग्लासभर गरम पाणी घालावे. छान ढवळावे. सव्‍‌र्ह करताना कोथिंबीर व मक्याचे दाणे घालावेत. फार चविष्ट सूप तयार होते.

टीप : चिंच बहुगुणी आहे. यात ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे असून कॉपर, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियमही आहे. पाचक आहे. त्यामुळे हे सूप अवश्य प्यावे. मिक्सरमध्ये भिजवलेली चिंच वाटून त्याचा पल्प तयार करावा. काचेच्या बरणीत भरावा व फ्रिजमध्ये ठेवावा. खूप दिवस टिकतो, आंबट चवीसाठी याचा जरूर वापर करावा.
वैशाली खाडिलकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 19, 2016 1:17 am

Web Title: food recipes 27