19 September 2019

News Flash

मसाला डोसा

साहित्य : एक वाटी उडीद डाळ, तीन वाटी तांदूळ, दोन लहान चमचे मीठ, १/२ किलो बटाटा

साहित्य :  एक वाटी उडीद डाळ, तीन वाटी तांदूळ, दोन लहान चमचे मीठ, १/२ किलो बटाटा, १/२ लहान चमचा मोहरी, १/२ लहान चमच हळद पावडर, १/२ लहान चमचा लाल मिर्च पावडर, थोडीसी हिंग पावडर, तेल भाजण्यासाठी.

कृती : तांदूळ व डाळ वेगवेगळे आठ-दहा तास भिजवून ठेवा. नंतर दोन्ही एकत्र करून चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या. हे मिश्रण बारा तास झाकून ठेवून द्या. उन्हाळ्यात मिश्रण लवकर आंबट होते तरी सहा तासानंतर तपासून पाहा. बटाटा उकडून चिरून घ्या. तेलात मिरची फोडणी देऊन बटाटा व सर्व मसाले टाकून एकत्र करा. डोशाची भाजी तयार झाली. आता  एका मोठय़ा डोसा तव्यावर डोसा भाजा. डोशाच्या भाजी- चटणीबरोबर गरम गरम वाढा.

स्वादिष्ट जेवणाने आपले स्वयंपाकघर सुगंधित करून आपल्या पाहुण्यांचे स्वागत करा.

स्वयंपाक घरातील सावधानता

सिलिंडर रोज जरूर तपासून पाहा. सिलिंडर गळत नाही ना, गॅसचा पाइप व्यवस्थित आहे का? पाइप दर सहा महिन्यांत बदलला पाहिजे, कारण त्याच पाइपमुळे स्वयंपाकघरात अनेक अपघात होतात. पाइप तपासून पाहण्यासाठी साबणाचे थोडेसे पाणी पाइपवर टाकून पाहा. पाइप गळत असेल तर पाण्याचे बुडबुडे येतील.

गॅस गळत असेल तर लगेच सर्व खिडकी – दरवाजे उघडा व सिलिंडरचा खटका बंद करा. स्वयंपाकघरात कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नका. त्यामुळे आग लागू शकते.

जळत असलेले गॅसचे बर्नर कधीही झाकू नये.

स्वयंपाक करताना कुकरवर लक्ष ठेवा. कुकरमध्ये पदार्थ पाण्याशिवाय शिजवू नका.

तुम्ही स्टोव्ह वापरत असाल तर त्याला जास्त पंप देऊ नका नाही तर तो खराब होईल.

शिट्टी लावल्याशिवाय कुकरमध्ये जास्त वेळ जेवण तयार करू नका. नाही तर कुकर फुटेल.

साडी नेसून काम करतांना पदर व्यवस्थित खोचून घ्या. ओढणी असेल तर सांभाळा.

गॅसवरून जड सामान उचलतांना जाड कापडाचा वापर करा. सांडशी घसरू शकते.

चाकू, लाईटर, काडेपेटी वगैरे लहान मुलांपासून लांब ठेवा.

टापटीप व स्वच्छता

कोणतेही काम प्रसन्न वातावरणात केले तर करणाऱ्याचा उत्साह द्विगुणित होतो एवढेच नव्हे, तर कामही अधिक सफाईदार होते. स्वयंपाकघराच्या बाबतीत हे अधिक खरे आहे. म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ व मोकळे व भरपूर उजेड येत असलेले असावे. पाश्चात्त्य देशातील स्वयंपाकघराची मांडणी किती सुरेख असते. रंगीत पडदे, एकसारख्या बाटल्या, रॅक्स, एखादे मनीप्लँट किंवा सजवून ठेवलेले पुष्पपात्र! या गोष्टींना फार खर्च येत नाही, पण थोडी कल्पनाशक्ती वापरून उपलब्ध साधनांची मांडणी करता आली पाहिजे. मैत्रिणींनो, आपणही आपले स्वयंपाकघर असे ठेवू शकतो. त्याकरता सर्व वस्तू आकर्षक पद्धतीने व चटकन सापडतील अशा ठेवा. पुसण्यासाठी लागणारे स्वच्छ टॉवेल्स, एखादा अ‍ॅप्रन अशा वस्तू नेहमी हाताशी असाव्यात. नेहमी कराव्या लागणाऱ्या कामाची वर्गवारी आठवणीसाठी लिहून ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ व सोईचे असेल तर स्वयंपाक करण्यासाठी तुमची कार्यशक्ती व उत्साह वाढतोच.

आपण थोडे कष्ट घ्यायला हवेत दर पंधरा दिवसांनी स्वयंपाकघर लख्ख झाडून बारीक कोळिष्टके काढून टाकावीत. अनेक कामांना हातपुसणी वेगवेगळी असावीत. प्लेट्स पुसण्यासाठी पांढरे फडके, हात पुसायला रंगीत टॉवेल ठेवावेत. जेवण झाल्यावर डायनिंग टेबल नीट पुसून त्यावर स्वच्छ टेबल क्लॉथ घालावा. कपबशांवरील डाग काढण्यासाठी त्या सर्फच्या गरम पाण्यात बुडवून जुन्या टुथब्रशने डाग घासावेत. लिंबाच्या पाण्यात काचेची भांडी, ग्लासेस बुडवून ठेवल्यास अंडय़ाचा वास जातो. याशिवाय गृहिणीने स्वत:ही स्वच्छता पाळावी.

स्वयंपाकघराच्या बेसिनखाली जाळीवर नेहमी दोन-तीन डांबरगोळ्या टाकून ठेवाव्यात. ओटय़ाजवळच्या खणातील सामान दर आठ-दहा दिवसांनी काढून त्यावर फ्लिट मारावे. मुंग्या येत असतील तर खणात कागद घालण्यापूर्वी मुंग्याची पावडर घालावी. देव्हारा किंवा फळी ओटय़ाच्या फार जवळ असू नये. त्यामुळे फोटोवर एक चिकट मळ जमतो. ओटय़ाच्या विरुद्ध दिशेला देवांची जागा असावी. थोडक्यात स्वयंपाक ही घरातील एक ‘प्रसन्न जागा’ असावी.

तयारी – नियोजन

पाहुणचारासाठी असो वा आपल्या घरातल्या मंडळीसाठी, साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरविला की त्यासाठी योग्य प्रकारे तयारी व नियोजन करणे केव्हाही चांगले. पूर्वतयारी नीट असल्यास मनावरचा ताण, घाई-गडबड, थकवा हे सर्व टाळता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन करणे. कोणत्या कामाला केव्हा सुरुवात करावी, कोणते काम आधी करावे, कोणते काम नंतर केल्यास चालते तसेच प्रत्येक कामास वेळेची मर्यादा, हे सर्व मनात ठरवून ठेवल्यास सर्व कामे सुकर होऊ शकतात. मेजवाणीच्या तयारीस आदल्या दिवसापासूनच सुरुवात करावी.
अशोक महाजन – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 15, 2016 1:06 am

Web Title: masala dosa