साहित्य : एक किसलेली मोठी काकडी, भाजलेला रवा, पालक पाने, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट, कोथिंबीर, ताक, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे (ऐच्छिक) तूप, इनो फ्रुट सॉल्ट मीठ. चिली फ्लेक्स.

कृती :  एका पॅनमध्ये तूप घालावे व किसलेली काकडी मंद आचेवर वापवून घ्यावी. त्यात भिजेल एवढा भाजलेला रवा घालावा. मीठ घालावे व शिजवावे. नंतर त्यात पाणी घालून जाडसर मिश्रण बनवावे. त्यात आंबट ताक घालावे. पालक मिरची पेस्ट घालावी व अर्धा तास भिजू द्यावे. नंतर एका थाळीला तेल लावावे व मिश्रण ओतावे, तत्पूर्वी इनो फ्रुट सॉल्ट घालावे म्हणजे केक हलका होतो. ही थाळी इडली कुकरमध्ये ठेवावी व १५ मिनिटे वाफवावे. थंड झाल्यावर त्यावर फोडणी द्यावी व चिली फ्लेक्स पसरावे. आपल्याला हव्या असतील त्या आकाशाचे तुकडे कापावेत.

टीप : हा वेगळा केक सर्वाना निश्चितच आवडले. शक्यतो उन्हाळय़ात हा केक अवश्य करावा, काकडीमुळे थंडावा येतो. पित्तशामक असल्यामुळे काकडीचा समावेश आपल्या आहारात जरूर करावा. हा केक आणखी हिरवा होण्यासाठी आपण हिरव्या रंगाचे खायचे पदार्थ (उदा. हिरवे मूग, सिमला मिरची इत्यादी) याची पेस्टही करून वापरू शकता.

सोना मसुरी चावल खीर

साहित्य : ऑरगॉनिक सोना मसुरी चावल (१ वाटी), दूध २ वाटी, खवा १/४ वाटी, साखर १ वाटी. साय १/४ वाटी, काजू तुकडे १०/१२, वेलची पावडर, गुलाबपाणी, ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे.

कृती :  प्रथम चावल दोन तास भिजवावेत. मग मिक्सरवर जाडसर वाटून घ्यावे. सायीमध्ये काजू घालून त्याची पेस्ट करावी. पॅनमध्ये दूध घालावे व त्यात वाटलेले चावल घालावेत व छान शिजवावेत. नंतर साखर व खवा घालावा. काजू पेस्ट घालावी. वेलची पावडर घालावी. गुलाबपाणी शिंपडावे व ड्रायफ्रुट सजावटीसाठी वापरावे. खूपच चविष्ट खीर तयार होते.

टीप : ऑरगॅनिक सोना मसुरी चावल चवीला छान असतात. आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त आहेत. (सेंद्रिय) ऑरगॉनिक जिन्नस आपल्या आहारात समाविष्ट केल्यास आरोग्य चांगले राहते. व्याधींवर नियंत्रण होते व केमिकलयुक्त औषधांचा वापर कमी होण्यास मदत होते. खिरीतील इतर जिनसांमुळे ती पौष्टिकही आहे.

बरेच वेळा सुगंधासाठी बासमती तांदूळ वापरला जातो. पण गॅसेसच्या व पोटाच्या तक्रारी होऊ शकतात.

ड्रायफ्रुट चटणी (ओली)

साहित्य : सर्व मऊ आवरण असलेले ड्रायफ्रुट- अंजीर, खजूर, जर्दाळू, मनुका, बेदाणे, समप्रमाणात. आल्याचे तुकडे, मीरपूड, जिरेपूड, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस, चिली फ्लेक्स (ऐच्छिक).

कृती :  प्रथम खजूर व जर्दाळूच्या बिया काढून बारीक कापावे. सर्व ड्रायफ्रुट पाण्यात १/२ तास भिजत ठेवावेत. मऊ झाल्यावर मिक्सरमध्ये घालावे. त्यांत आल्याची साले काढून तुकडे घालावेत. मीरपुड, जिरापूड, चिंचेचा कोळ व गूळ, किसलेले सुके खोबरे भाजून घालावे. मीठ घालावे व जास्त तिखट हवे असल्यास चिली फ्लेक्स घालावेत व बारीक वाटावे. चविष्ट चटणी तयार.

टीप : ही चटणी उपासालाही चालेल. मात्र ही ताजीच खावी. उरली तर फ्रीजमध्ये ठेवावी व शक्यतो लवकरच संपवावी. सर्व ड्रायफ्रुट महाग आहेत पण जीवनसत्त्वांनी युक्त पौष्टिक घटक त्यात आहेत त्यामुळे चटणी इ. प्रकारात त्यांचा जरूर थोडय़ा प्रमाणात तरी वापर करावा.

ड्रायफ्रुट चटणी (सुकी)

साहित्य : सर्व कडक आवरणाचे ड्रायफ्रुट. खारीक, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते सुंठ पावडर, आमचूर पावडर, पिठीसाखर, वेलची पावडर, मीठ, अळशी पावडर, बार्ली बियांची पावडर.

कृती : खारीक बिया काढून बारीक तुकडे करावेत. अक्रोडची व पिस्त्यांची टरफले काढून गराचे बारीक तुकडे करावेत. बदाम, काजूही बारीक कापून घ्यावेत म्हणजे पावडर लवकर होते. वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावे.

टीप : अळशी व बार्ली यांना चव नाही म्हणून यांचा उपयोग सहसा आपल्या आहारात होत नाही. पण त्यांचा अशा रीतीने वापर केल्यास शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फारच हितकारक आहे. ही टिकाऊ चटणी आहे. फार चविष्ट लागते. सारण म्हणून करंजीत अथवा कचोरीत उपयोग होईल.

स्पेशल काकडी डीप

दही मलमल कपडय़ांमध्ये टांगून पाणी निथळल्यावर जो चक्का बनेल तो एका बाऊलमध्ये घ्यावा. त्यात आले, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस, मीठ, काकडीचे बारीक तुकडे, मध थोडासा व सर्वात शेवटी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल घालावे; जे खूप हेल्दी आहे.

हे डीप कोणत्याही स्नॅकबरोबर चविष्ट लागते.
वैशाली खाडिलकर –