‘शेवटाची परिपक्व सुरुवात’ हा आरती कदम यांचा लेख वाचला. लेखात म्हटल्याप्रमाणे २०५० पर्यंत देशातील वृद्धांची संख्या तिप्पटीने वाढून ३२ कोटी होणार आहे. या परिस्थितीचा विचार लेखात मुख्यत्वे कौटुंबिक, सामाजिक आणि कायद्याच्या अंगाने केलेला आहे. परंतु त्यातील व्यावसायिक बाबींचा/संधींचा उल्लेख फारसा झालेला नाही.

आज जे नागरिक वयाच्या चाळिशीत आहेत ते स्वत:च्या आरोग्याप्रमाणेच वार्धक्याबाबतही किती तरी जास्त सजग आहेत. छोटय़ा कुटुंबामुळे आणि वाढत्या स्पर्धेच्या धकाधकीमुळे मुलांनी आपला सांभाळ करावा अशी भाबडी अपेक्षा ते बाळगतच नाहीत. त्यातील अनेकांनी जागतिकीकरणाचा लाभ उचललेला आहे आणि लोकसंख्येच्या लाभांशाचाही फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीशी बऱ्यापैकी पैसा आहे, असणार आहे आणि तो योग्य प्रकारे गुंतवून भावी आयुष्याची तजवीज आपली आपण करण्याचे भानही असणार आहे. यातून व्यवसायाच्या किती तरी आकर्षक संधी निर्माण होऊ  शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या निवास/शुश्रूषा अशा गरजांकडे केवळ सेवा म्हणून न पाहता आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. किती तरी अर्धशिक्षित लोकांच्या रोजगाराची सोय त्यामध्ये होऊ  शकते. सध्या तसे काही प्रयोग होताना दिसतात तरी त्यांची संख्या आणि त्यातील व्यावसायिकता किती तरी वाढण्यास वाव आहे. सेवाभावी संस्थांनीसुद्धा केवळ समाजाच्या दानशूरतेवर अवलंबून न राहता सेवेला व्यवसायाची जोड दिली पाहिजे. ज्यांची खर्च करण्याची तयारी आहे त्यांना वाजवी नफा घेऊन दर्जेदार सेवा पुरवणे आणि त्या नफ्यातून गरजूंना मोफत सेवा पुरवणे अशी ‘क्रॉस-सबसिडी’ अमलात आणणे कठीण नाही. यातील उद्योगाच्या संधी पाहून त्याला आवश्यक ते कायद्याचे अधिष्ठान शासनाने मिळवून दिले पाहिजे.

योग्य नियोजन आणि कल्पकता दाखवल्यास वाढती लोकसंख्या हा प्रश्न न राहता देशाची ताकद होऊ  शकते. त्याचप्रमाणे वृद्धांची वाढती संख्या हा सुद्धा केवळ प्रश्न राहणार नाही. परदेशांचे याबाबतीतील अनुभव लक्षात घेऊन योग्य धोरणे राबवल्यास ‘दिव्यांग जनांसाठी सुगम्य भारत’ आणि ‘वृद्धजनांसाठी सुसह्य़ आयुष्य’ प्रत्यक्षात साकारू शकेल असे वाटते.

विनिता दीक्षित, ठाणे

 

सहनही होत नाही आणि..

आरती कदम यांचा ‘शेवटाची परिपक्व सुरुवात’ हा विस्तृत जबरदस्त लेख वाचून सुन्न झालो. हे कडवट नागडं सत्य वाचताना पेलवलं नाही. यावर नुसत्या दोन्ही बाजूंच्या तक्रारी नाहीत तर व्यवहार्य आणि स्वीकारार्ह तोडगे निघायला हवेत. अनेक परिसंवाद व्हायला हवेत. एरवी हे अधिकच बिघडत जाणार आहे, चिघळत जाणार आहे आणि हळूहळू वृद्धांच्या आत्महत्या किंवा त्यांना येनकेन मार्गाने संपवणे या घटना वाढीस लागतील. हे फार विदारक आहे. आणि या समस्या ज्याच्या त्यालाच सोडवायच्या आहेत हे आणखी वेदनादायी आहे. They have no recourse but to carry their cross to their own grave on their own (tired)  shoulders.

माझं वय ६९ आहे. माझं स्वतचं सर्वसाधारणपणे तसं बरं चाललं असलं तरी बाहेरच्या आजी-आजोबांच्या गुंतागुंतीच्या आणि नाजूक समस्या ऐकवत नाहीत आणि पाहवत नाहीत. सारांश एकच : सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्यातही ज्यांचे जोडीदार निघून गेलेत, जे मुलांवर अवलंबून आहेत आणि विशेषत  ज्यांच्याकडे मुलांना देण्यासारखं (पसा किंवा इस्टेट वगरे) काहीही नाही त्यांचे केविलवाणेपण ज्यांचे त्यांनाच माहीत.. ‘कभी तनहाईयोंमें यूं हमारी याद आयेगी . न तू फिर जी सकेगा और न तुझको मौत आयेगी ..’

सुभाष जोशी, ठाणे

 

विषय मांडला गेला हे महत्त्वाचं

१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला ज्येष्ठांच्या अवस्थेबद्दलचा लेख ‘शेवटची परिपक्व  सुरुवात’ अगदी समतोल झालाय. कोणताही अभिनिवेश नाही, एकाच पिढीवर आरोप नाहीत. अलीकडे तरुण पिढीच्या बाजूने, त्यांना आवडेल असंच लिहायचा परिपाठ सगळीकडेच आढळतो. त्यामुळे हा लेख वाचून ‘आपल्या समस्यांकडेपण कुणाचं तरी लक्ष आहे’ याचं बरं वाटलं. पोटगी, देखभाल यापेक्षा इतर कितीतरी गंभीर प्रश्न ज्येष्ठांना सतावत असतात. प्रत्येक प्रश्नाचा ऊहापोह करणे शक्य नाहीच, पण विषय मांडला गेला हे महत्त्वाचं.

राधा मराठे 

 

वास्तव दिले आहे

आरती कदम यांनी लिहिलेला आणि १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्तम अनालिसिस असलेला आहे. समस्येची आणि या विशिष्ट विषयाच्या सर्व निरनिराळ्या घटकांची बाजू आपण सूक्ष्म तपशिलासहित आणि थोडेफार उपायांसाहित मांडली आहे. वास्तव दिले आहे हे स्तुत्य आहे.

तृप्ती नाईक

(किसन जाधव, अशोक वार्देकर, चंद्रकांत पाटील, विलास जाडय़े आदींनीही याच आशयाची पत्रे पाठवली आहेत.)

 

नवीन कलाकारांना प्रेरणादायी

‘जिंदगी का सफर’ हा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेला ‘दृष्टीआडची सृष्टी’ या सदरातील नितीन आरेकर यांचा संगीतकार आनंदजीभाई यांच्यावरील लेख आवडला. कल्याणजी-आनंदजी या बंधूंनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्या वेळच्या अनेक तगडय़ा संगीतकारांबरोबर स्पर्धा होती. नामवंत संगीतकारांचे अनेक सुरेल चित्रपट प्रदर्शित होत होते. या स्पर्धात्मक युगातदेखील कल्याणजी-आनंदजी यांनी निश्चितपणे आपले एक वेगळे स्थान निर्माण केले, कारण या दोन्ही भावांनी कोणतीही ईर्षां केली नाही. व्यापारी समाजातले असूनही संगीतसृष्टीत या जोडगोळीने घेतलेली मेहनत आणि केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. दोन्ही भाऊ  परस्परांना समजून घेत काम करीत राहिले, निव्र्यसनी राहिले, साधे जीवन जगले हे आनंदजीभाई यांचे उद्गार अतिशय मोलाचे आहेत. कारण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर वाताहत करून घेणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही.

सुरेश पटवर्धन, कल्याण

 

मानसिक खच्चीकरण वाईटच

‘कोर्टाची पायरी’ हा मृणालिनी चितळे यांचा ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख अतिशय उद्बोधक आहे. कुटुंबात जर नवऱ्याला कसलाही उद्योग, छंद नसेल तर तो बायकोच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून तिला ‘सळो की पळो’ करू शकतो. घटस्फोट घेणे हे काम अतिशय अवघड होते. मुलगे, मुलगी वगैरे कोणी मदतीला येत नाहीत. तुमचे तुम्ही निस्तरा अशी भूमिका असते. सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच एक निर्णय दिला आहे. पालकांपासून तोडू पाहणाऱ्या पत्नीला घटस्फोट देण्याचा पतीला हक्क आहे अशी एका वृत्तपत्रातील बातमी आहे. बातमीत प्रथमच उल्लेख आहे की ‘विवाहानंतर पतीचे कुटुंब त्याच्या अर्धागिनीचे कुटुंब असते.. त्याचे संपूर्ण उत्पन्न तिला हवे या एकाच कारणासाठी ती पतीला त्याच्या पालकांपासून वेगळे करण्याची मागणी करू शकत नाही.’ म्हणजे हा खटला काही विशिष्ट मुद्दय़ावर आधारित आहे. तो निर्णय योग्य आहे. आईवडिलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलाला शिकविले आणि लग्नानंतर तो एकदम पत्नीचं ऐकू लागणे हे चूकच आहे. बायकोला आणि पालकांना समतोल ठेवून वागवणे ही नवऱ्याची तारेवरची कसरत असते. पण कित्येक नवरे ती न जमल्यामुळे बायकोच्या तंत्राने चालतात. पूर्णपणे बायकोच्या अधीनही व्हायचे नसते किंवा आईबाबांचा सतत जप करत त्यांच्या अधीन होऊन बायकोकडे पूर्ण दुर्लक्षही करायचे नसते. आईबापांना विसरणारे करंटे या जगात जसे भरपूर आहेत, तसेच माझ्या जीवनात ‘आईवडील प्रथम मग तू’ असे म्हणून बायकोला वीस-बावीस वर्षे मोलकरीण म्हणून वागवणारेही या देशात आहेत. भारतीय संस्कृतीचे गोडवे जरूर गावेत, पण एखादीला गुलाम म्हणून वागवून तिचे मानसिक खच्चीकरण करणेही वाईटच.

यशवंत भागवत, पुणे