२७ फेब्रुवारीच्या अंकात महिलांसाठी स्वच्छतागृहे व जेंडर बजेट या विषयाला वाहिलेले सारे लेख वाचनीय आहेत. महानगरपालिकेची वॉर्ड ऑफिसेस, शासकीय कार्यालये, शाळा, शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालये, पॉलिक्लिनिक, पॅथॉलॉजी लॅब, चित्रपटगृहे, नाटय़गृहे येथेही स्वच्छतागृहे असतात, पण याचा वापर मर्यादित काळातच करता येतो. जसे सिनेमागृहात ‘शो’च्या वेळा सोडल्यास, रुग्णालयात तुमच्या ओळखीची व्यक्ती अॅडमिट नसल्यास व भेटण्याच्या वेळा वगळता प्रवेश नाही. वेळेच्या बाबतीत स्वच्छतागृहांची वापराची शक्यता फक्त वीस ते पंचवीस टक्के एवढीच भरते.
‘स्वच्छ भारत अभियान’ ही फक्त सरकारी जबाबदारी आहे, असे न मानता चित्रपटगृहे, रुग्णालये, वॉर्ड ऑफिसेस यांनी त्यांच्या कामकाजाच्या वेळेत, कडीकुलुपात बंदिस्त असलेली प्रसाधनगृहे सामान्य महिलांनी विनंती केल्यास, तीन ते पाच रुपये शुल्क आकारून उपलब्ध करून द्यावीत, असे करण्यात
कोणताही आर्थिक भार नाही, उलट स्त्रियांची सोय मात्र नक्की होईल, असे वाटते.
– प्रदीप परांजपे, ठाणे

वर्णेकर दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद
२७ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेला ‘होगा निश्चित नया सवेरा’ हा लेख वाचला. अशोक व अलका वर्णेकर या जोडप्याने जे कार्य केले त्याला तोड नाही. नागपूरहून एकदम आसामला जाणे सोपे नाही. मुंबईतील सुखाची नोकरी सोडून सेवा करावयास जाण्याचा त्यांचा निर्णय धाडसाचा म्हणावा लागेल. उभयतांनी तेथे जे काम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्या उभयतांचे अभिनंदन आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा.
– प्र. वि. केसकर, फलटण

‘प्रियंवदा’ विचार करायला लावणारी
उत्तररंग (लेखिका-उत्तरा केळकर) मधील ‘प्रियंवदा’ लेखिकेने इतक्या उत्तमरीत्या आपल्या समोर उभी केली की वाचताना मन भरून येते. मनाला विचार करायला लावते. एखाद्याच्या जीवनात अशी काय वाताहत होते की त्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होते आणि असे कसे व का घडले याचा विचार करायला लावते.
‘उद्योगभरारी’ तील (लेखिका -स्वप्नाली मठकर) ‘बॅगेत न मावणारी स्वप्न’, या लेखात सासवडच्या प्रणया पाटीलने आपल्या गत आयुष्याबाबत आणि चुकांबातही अगदी मोकळेपणे आपले विचार मांडले आहेत. परिसरातील लोकांचा विकास, स्त्रियांना स्वयंपूर्ण करण्याची धडपड मुलांसाठी आश्रमशाळा वृद्धासाठी वृद्धाश्रम करायचे तिच्या मनात आहे. अशा उद्योजिकेला सर्वानी आधार व मदत केली पाहिजे.
– रमेश मोरे, ठाणे</strong>

पारंपरिक विचार पद्धती वन बदलणारे शिक्षण
शिक्षण माणसाला सुसंस्कृत करील, सुविचारी बनवील हे अर्धसत्य ठरवणारा ‘आजचं मरण उद्यावर’ हा रेश्मा भुजबळ यांचा लेख वाचला. शिक्षणाने माणूस लिहा-वाचायला शिकला तरी स्वतंत्ररीत्या परिस्थिती पाहून साधकबाधक विचार करीत नाही, हे दुर्दैव आहे. एक वर्ष लग्न स्थगित करणाऱ्या मुली अंगावर पडलेल्या जबाबदारीने प्रगल्भ झाल्या व त्यांनी बुद्धीला पटला तो विचार अमलात आणला. हे धारिष्टय़ मुलात, तेही अधिक शिकलेल्या, चारचौघांत वावरलेल्या मुलात का येऊ नये, हा विचार करण्यासारखा सवाल आहे. स्वार्थ सुटत नाही. पारंपरिक विचारपद्धती न बदलणारे शिक्षण, शिक्षण म्हणता येईल का?
– रामचंद्र महाडिक, सातारा</strong>

विवाहाबाबतचा व्यवहार भावला नाही
१२ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला रेश्मा भुजबळ यांचा ‘आजचं मरण उद्यावर’ हा लेख तरुणाई, एकंदर समाज आणि शासनाच्याही डोळ्यांत अंजन घालणारा आहे. लग्न ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी निश्चितच नाही. या मुलींना, समाजाला देणाऱ्याचे हात हजारो याचा प्रत्यय येऊन त्यांचे वाईट दिवस म्हणता म्हणता निघून जाईलही. याच प्रश्नातील तरुणाईचा व्यवहार मात्र भावला नाही. तिथल्या तरुणाईने निराश झालेल्या समाजमनाला उभारी देऊन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, ते झाले नसल्याची खंत वाटते.
– दिलीप गिरी, पुणे</strong>

सरोज चेअरमन होवोत!
२० फेब्रुवारीरोजी ‘तिच्या केबीनमधून’ मधील वीरेंद्र तळेगांवकर यांचा ‘लक्ष्याकडे यशस्वी झेप’ हा सरोज डिखळे यांवरील लेख वाचून आनंद झाला. कारण भारतात मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रांतील कंपनीच्या नेतृत्वस्थानी प्रथमच महिला अधिकारी विराजमान झाल्या असून त्या अत्यंत कर्तृत्ववान अधिकारी म्हणून नावाजलेल्या आहेत. एलआयसीच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलण्याचे आपले उदात्त स्वप्न साकारण्यासाठी जो ज्ञानयज्ञ त्यांनी मांडला आहे त्याला तोड नाही. पुढील अनेक पिढय़ांना त्यांची स्फूर्तिदायक कामगिरी व त्यांचे उच्चतम कोटीतील तत्त्वज्ञान मार्गदर्शक राहील याबाबत शंका नाही. भविष्यात एलआयसीच्या विक्रमी प्रगतीसाठी या कर्तृत्ववान महिलेस एलआयसीच्या चेअरमनपदी बसवावे हीच इच्छा.
– प्रदीप करमरकर, ठाणे

समानता हे मूल्य अंगी रुजवण्याचे
‘समानतेच्या नावाने चांगभलं..’ या ८ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात मलाही माझे दोन अनुभव सांगावेसे वाटतात.
सुवर्णा गोखलेंना त्यांच्या कामाच्या दरम्यान ग्रामीण भागातील स्त्रियांची अस्तित्वाची लढाई अस्वस्थ करून जाते. परंतु वस्तीपातळीवर काम करताना माझे निरीक्षण आहे की मुंबईसारख्या स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या शहरातील स्त्रियासुद्धा स्वत:च्या अस्तित्वाची लढाई नित्यनेमाने लढतच असतात. संसाराचा गाडा रेटण्यासाठी, दिवसभर मोलमजुरी करून अर्थार्जन करणाऱ्या अशा वस्तीवरील अनेक स्त्रियांना व्यसनी, दारूडय़ा नवऱ्याकडून होणारी मारझोड, नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर घेतलेला संशय, बिनदिक्कतपणे त्याने केलेला दुसरा घरोबा, सासरच्यांकडूनही मानसिक आणि शारीरिक छळ हे सर्व प्रकार तिला इतके नित्याचे असतात की जणू त्यांना ते लग्नानंतर संसारात नवऱ्याबरोबर मिळालेले फ्री पॅकेजच असावे, असे त्यांच्या बोलण्यातून काहीवेळा जाणवते. (उदाहरणार्थ नवऱ्याचे हात उचलणे किंवा दारू पिणे मुकाट स्वीकारणे)अशा नवऱ्याबरोबर संसार रेटायचाच या अगतिकतेपोटी कधी तरी पाणी अगदी डोक्यावरून जातेयसे वाटले की या स्त्रिया त्याची दारू सुटण्यासाठी, सवतीपासून सोडवण्यासाठी किंवा मूल त्यातही मुलगा होण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतानाच अशा नवऱ्यासाठी वटसावित्रीची पूजाही मनोभावे करताना दिसतात. स्वत:तील स्वत्व न जाणवल्याने नवऱ्याला वजा करून आपल्या आयुष्याचे समीकरण मांडण्याचा विचार ग्रामीण स्त्रियांप्रमाणेच या शहरी स्त्रियांच्या स्वप्नातदेखील येत नाही.
दुसरा खटकणारा अनुभव..स्त्रियांच्या बँकेतील खात्यासंबंधी..त्या अशिक्षित स्त्रियांच्या एकटीचे स्वतंत्र खाते किंवा नवऱ्याचे नाव बँकेत कळणार वगैरे भाबडय़ा कल्पना एक वेळ समजून घेऊ. पण मी पूर्वी एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या नोकरीत असताना उत्तर भारतातील (मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे) आमच्या शाखातील एक पद्धत मला कायम खटकायची. तिथे कुठल्याही स्त्रीच्या खात्याचे डिटेल्स बघितले तर प्रथम खातेदाराचे म्हणजे तिचे रीतसर पूर्ण नाव (मधल्या नावासह) असते. पण त्याखाली मात्र ह/ड (वाइफ ऑफ) किवा ऊ/ड(डॉटर ऑफ) अमुक..तमुक..असे लिहिलेले असायचे कशासाठी? तिचे अस्तित्व तिची ओळख फक्त कुणाची तरी मुलगी किवा कुणाची तरी पत्नी इतकीच असावी का? यापलीकडे तिची स्वतंत्र ओळख नाहीच का? खरं तर पूर्ण नाव लिहिल्यावर असे उल्लेख करायची गरजच नाही. (अलीकडे बदल झाला असल्यास माहीत नाही) उपरोक्त लेख वाचताना वाटले की जिथे बँकेसारख्या व्यवस्थापनालासुद्धा स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहणे जमले नाही तिथे त्या अशिक्षित ग्रामीण स्त्रियांना कुठले जमायला?
तेव्हा लेखात म्हटल्याप्रमाणे समानता हे मूल्य फक्त शिकता-शिकवण्याचे नाही तर प्रत्येकाने अंगी रुजवण्याचे आहे.
– अलकनंदा पाध्ये, चेंबूर