‘घरं : अस्वस्थ, खदखदणारी!’ आणि ‘कुटुंबाचा बदलता चेहरा’ या लेखांतील एका मुद्दय़ावर थोडेसे मला सविस्तर सांगायचे आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचे किती गोडवे आपण किती दिवस गाणार आहोत? काय दिलं मागच्या पिढय़ांनी? कोणते संस्कार केले आणि कोणते नाही केले? यातल्या अंधारातल्या जागा आपण पाहायच्या नाहीत असंच ठरवलंय का?

गावागावांतल्या भावकीच्या भांडणाचा प्रश्न असो की पुरुषप्रधान संस्कृतीने पोटातच कुस्करलेल्या कळ्या असोत या गोष्टींचा कुटुंबव्यवस्थेशी काहीच संबंध लावायचा नाही असंच आपण ठरवलं आहे का? आपण विश्लेषण करायचं असं ठरवलं तर मग सगळ्या बाजूंनी तपासणी करावी लागेल. आजी, आजोबा, काका, काकू, मावशी, भावंडं सगळे सगळे लाड करतात ‘सुरक्षित’ कुटुंब देतात हे शंभर टक्के बरोबरच आहे असं कसं म्हणणार?

दिवस दिवस पारावर बिडय़ा ओढत बसणारा आजोबा लहानग्या नातवावर काय संस्कार करणार आहे? दिवसभर स्वयंपाकघरात मान मोडून कष्ट करणाऱ्या आईला माघारी टोमणे मारणारी, स्वत:ला पैशाच्या व्यवहारातलं शून्य कळणारी, आजोबांच्या धाकाखाली सर्व कुटुंबाला राहण्याची सक्ती करणारी तसेच जुनाट अंधश्रद्धा पोसून पाळीच्या काळात दूर ठेवणारी आजी आपल्या नवीनच फुलणाऱ्या नातीला कोणते संस्कार देते? वासनेच्या भावनेने ओतप्रोत भरलेली बुद्धी घेऊन कुटुंबातले किती प्रौढ पुरुष तरुण होणाऱ्या नात्यातल्याच पोरींकडे ‘चांगल्या’ नजरेने बघतात? आपण घरेलू अंधश्रद्धांमध्ये न्हाऊन निघतो, न घेतलेल्या अपुऱ्या लैंगिक शिक्षणाच्या जाणिवांमध्ये अडकून पडतो, एकमेकांचे उणेदुणे काढून भांडत बसतो आणि आपली कुटुंबव्यवस्था महान म्हणतो!

सगळं सगळं एवढंच चांगलं होतं तर मग तंत्रज्ञानानं, शिकलेल्या आईनं, तिच्या नोकरी करण्यानं, तिनं कमीच मुलं जन्माला घातल्यानं सगळं बिघडलं? कामवाल्या बाईलाही बऱ्याचदा विधवा झाल्यामुळे किंवा दारूडय़ा नवऱ्यामुळे नोकरी करावी लागते. त्यांना घर चालवायचं नसतं? मुलींसाठी तर एकत्र कुटुंबपद्धतीचं काहीच अस्तित्व नाही. ती एकटी जन्माला आली असो की नातलगांच्या गोतावळ्यात.. तिचं असं कुटुंब नसतंच. जन्माला आलेल्या घरात ती ‘परकी’ असते किंवा ‘पाहुणी’ तरी असते. लग्न झालेल्या मुलींसाठी ते घर स्वत:चं व्हायला जवळपास आठ-दहा र्वष जावी लागतात. त्यातही ती कमी शिकलेली असेल तर मग तिला येता- जाता खोचक बोल ऐकावे लागतात. त्यामुळे जर ती कमी शिकलेली असूनही व्यावहारिक असेल तर मग तिची घुसमट व्हायला लागते व ती स्वत:चं आणि मुलांचं स्वतंत्र अस्तित्व मागायला लागते. यात तिची किती चूक आहे याची ‘खबर’ घ्यायला समाज एका पायावर तयार असतो. तर, असा हा समाज ‘प्रगल्भ पालक’ निर्माण करणार का? अशी शंका घ्यायला खूप वाव आहे.

– डॉ. सविता पंडित

 

कौटुंबिक विसंवाद

१० जूनला प्रसिद्ध झालेल्या ‘घरं : अस्वस्थ, खदखदणारी’ आणि ‘कुटुंबाचा बदलता चेहरा’ हे लेख वाचले. त्यात कौटुंबिक विसंवादाची बदलती समाजव्यवस्था, शहरीकरण, वाढती स्पर्धा, इत्यादी अनेक कारणं देऊन त्यांचा ऊहापोह केला आहे. पण एका कारणाचा मात्र ‘भावंड नसणं’ असा ओझरता उल्लेख आहे. ते म्हणजे घरातल्या मुलाचं एकुलतं एक असणं. आजकाल एकच मूल असण्याची जणूकाही फॅशनच झाली आहे. अगदी भरपूर पैसा कमावणारी व दोन मुलं सहज परवडणारी जोडपीही एकापेक्षा अधिक मुलांच्या कल्पनेला नाकं मुरडतात. वास्तविक मुलाला भावंड असलं तर घरातल्या घरात त्याला खेळायला, मिसळायला, भांडायला, सवंगडी मिळतो व लहानसहान नैसर्गिक आक्रमकतेला वाट मिळते. नाही तर तीच आक्रमकता साचून आई-वडिलांवर किंवा स्वत:वर निघण्याची शक्यता निर्माण होते. योग्य ते संस्कार केले तर मुलं कुठलीही आनंददायी गोष्ट वाटून घ्यायला शिकतात. दुसऱ्यासाठी (इथे प्रथम भावंडासाठी) नकार घ्यायला शिकतात. आई-वडिलांचंही लक्ष विभागलं जात असल्याने एकाच मुलाच्या आरोग्याची व प्रगतीची त्यांना अवाजवी चिंता वाटत नाही व मुलांचीही त्यांच्या सततच्या नियंत्रणापासून सुटका होते, जे निकोप वाढीसाठी व संबंधांसाठी आवश्यक असतं.

– शरद कोर्डे, ठाणे

 

ही विकासाची विषारी फळं

‘घरं : अस्वस्थ, खदखदणारी!’ आणि ‘कुटुंबाचा बदलता चेहरा’ हे दोन्ही लेख वाचले. दोन्ही लेखकांनी बदलत्या वातावरणातल्या कुटुंबातल्या एका महत्त्वाच्या आणि गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. मध्यमवर्गीय पालकांनी वाचायलाच हवेत असे हे लेख आहेत. एका आईने कौटुंबिक त्रासाला कंटाळून स्वत:च्या दोन लहान मुलांना इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकले व नंतर स्वत: उडी टाकली. ही आई एक सुशिक्षित स्त्री होती. इंद्राणी मुखर्जी, सिद्धांत गणोरे अशी याच प्रकारात मोडणारी अनेक उदाहरणे आता मोठय़ा प्रमाणात दिसू लागली आहेत. या प्रकरणातला एक समान धागा म्हणजे या कुटुंबांचा आर्थिक स्तर हा उच्च मध्यमवर्ग किंवा उच्चवर्ग आहे. जिवंत राहण्यासाठी अनिवार्य असलेल्या अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा भागल्यानंतरची जीवनशैली जगणारी ही माणसे आहेत. आजच्या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाचे हे घटक आहेत. पालकांचा पाल्याशी सुसंवाद आणि सुसंस्कार यामध्ये काही तरी त्रुटी राहतेय. नव्या अर्थव्यवस्थेत जीवतोड धावण्याच्या या सामुदायिक शर्यतीत आपले स्वत:चे बाजारमूल्य (किमतीचा टॅग) वाढवणे हेच एकमेव अंतिम साध्य झाले आहे आणि हाच सुखाचा मार्ग आहे असा आजच्या पालकांचा ठाम ग्रह झाला आहे. बाकीच्या सगळ्या बाबी गौण ठरत आहेत. आजवर व्यक्तीला समाजाकडून मिळणारी संस्कार, सद्विचार, नैतिकता, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी, विवेक यांसारखी मूल्ये आता कालबा झाली आहेत. आपल्या देशाने भांडवलशाही, बाजारप्रणीत अर्थव्यवस्था अंगीकारल्यानंतर छत्तीस वर्षे उलटली आहेत. या तथाकथित (विषम) स्पर्धात्मकतेच्या चक्रव्यूहातून निपजलेल्या पहिल्या पिढीतल्या लोकांची मुले-बाळे आता ऐन भरात आहेत. जागतिकीकरणामुळे उदयाला आलेला हा नवश्रीमंत मध्यमवर्ग. आता त्या पुढच्या पिढीचा देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग आहे. प्रत्यक्ष चाचणीतून दिसणाऱ्या व्यक्तीच्या आय. क्यू. (बुद्धय़ांक)पेक्षा बायोडेटा वरून सूचित होणारा (भ्रामक) आय. क्यू. वाढवण्याच्या जिवापाड खटाटोपात ई. क्यू. (भावनांक) उपेक्षित ठरत आहे. वाढणाऱ्या मुलांचा हा ‘इमोशनल कोशंट’ वाढवण्याचे प्रयास करण्याची गरज यापूर्वीच्या समाजव्यवस्थेत फारशी जाणवत नव्हती. हे काम आपोआप, नैसर्गिकपणे, सहजगत्या होत असे. पण आज आई आणि वडील असे दोघेही नोकरी करीत असल्यामुळे बालवयात पालकांकडून सगळे हट्ट पुरवले जाण्याची सवय असलेल्या या मुलांमध्ये पुढील आयुष्यात कोणताही नकार पचवण्याची क्षमता निर्माणच झालेली नाही. आर्थिक समृद्धीला पर्याय नाही असे त्यांच्या मनावर पालकांनी आणि समाजाने पक्के कोरले आहे. वाचन, मनोरंजन, सांस्कृतिक वातावरण याला पुरती पारखी झालेली ही पिढी फक्त जीव तोडून धावत तयार होते आहे.

‘‘माझं आयुष्य’ या नाटकाचा निर्माता; लेखक, दिग्दर्शक, पटकथा-संवादलेखक आणि नायक मीच आहे. मीच ठरवणार की यातल्या व्यक्तिरेखांचे काय संवाद असतील, त्यांनी कुठल्या भावना व्यक्त करायच्या आणि त्यांनी माझ्याशी नेमकं कसं वागायचं. मी कुठल्याच प्रकारचा त्रास, गैरसोय, दबाव सहनच करू शकत नाही आणि त्या त्रासाच्या कारणाला, म्हणजेच स्वत:ला किंवा दुसऱ्याला संपवणे, हा त्या त्रासातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे. बाकी सब झूठ है!’’ असा उन्मत्तपणा त्यांच्या नसानसांत भिनला आहे हे प्रतिपादन नेमके आहे.

पालकांनी जागे होण्याची गरज आहे. त्रिकोणी, चौकोनी छोटय़ा कुटुंबात कौटुंबिक नातेसंबंधांचा ऱ्हास होत आहे. पैसे खर्च करून सर्व ऐहिक सुखे मिळवता येतात, पण मानसिक समाधान आणि आनंद विकत मिळत नाही हे वास्तव पालकांनी मुलापर्यंत आपल्या कृतीतून आपल्या मुलांपर्यंत पोचवले पाहिजे. पालक-पाल्य यांच्यातील हळुवार नात्याचा हळवा बंध जपण्याची गरज आहे. नीलिमा किराणे यांनी म्हटल्याप्रमाणे भावनिक प्रगल्भतेपर्यंत पालक जाणीवपूर्वक पोहोचतील आणि मुलांना ते बाळकडू घरातून मिळेल.

   – प्रमोद तावडे, डोंबिवली

 

पथ्याला पर्याय

‘लंच बॉक्स’ हा प्रदीर्घ लेख सर्व महिलांच्या व कुटुंबीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. मी जरी बालरोगतज्ज्ञ, लेप्रसी वर्कर असले तरी प्रथम एक आई व आता आजी आहे. आपण जे अन्न सेवन करतो ते या लेखाप्रमाणेच असावे ही माझी आग्रही भूमिका आहे. कारण ती माझी आई-माझे बाबा (आमटे) व योग गुरुवर्य विश्वासराव मंडलिक यांनी ठसवलेली आहे.  पण माझी दुखणी तशीच आहेत. ४० वर्षे कोलायटीसमुळे तिखट वज्र्य – २०१० पासून मधुमेहामुळे गोड वज्र्य व २०१६ च्या दम्यामुळे आंबट वज्र्य म्हणून दोन वेळा भाकरी कधी भात, भगर, सोजी, कोशिंबीर, खूप व खूप भाजी, वाटीभर मुगाचे वरण एवढय़ावर समाधानी आहे. तुमच्या माहितीपूर्ण लेखामुळे नवनवीन पर्याय मिळाले. ‘फूडीज’, ‘सोबीन’, ‘सुपर फूडज किचन’, ‘व्हेगन बाइट्स, द डायट’, ‘हेल्दी फूड टिफिन’, व सर्वात महत्त्वाचे अन्नपूर्णा यांना अभिनंदन कळवावे.

– डॉ. भारती आमटे, आनंदवन