प्रभाकर बोकील यांचा ८ जुलैला ‘मनातलं कागदावर’ या सदरात प्रसिद्ध झालेला, ‘आज्जी, आमी इथेच लाहू?’ हा वर्तमान समस्येला हात घालणारा आणि मार्गदर्शन करणारा भावनात्मक लेख फारच आवडला. आमच्या सोसायटीतदेखील हुबेहूब हीच घटना ताजी असताना हा लेख वाचून मन खिन्न झाले. आजकाल लहान मुलांचे संगोपन करताना आजी-आजोबा लागतात आणि मुलं २-३ वर्षांची चालतीबोलती झाली की त्यांची अडचण होते. म्हणजेच ‘युज अँड थ्रो’. आमच्या लहानपणी असल्या घटना फार विरळ ऐकण्यात/पाहण्यात येत होत्या, त्यास कारण म्हणजे बहुतांश कुटुंबं ही एकत्रित कुटुंबात मोडत होती. आता अतिमर्यादित कुटुंबामुळे मामा-मामी, काका-काकू, आत्या-मावशी ही नाती मुलांना माहीतच नसतात. १९६०-७० च्या दशकात ‘वेगळं व्हायचंय मला’ हे नाटक फार गाजलं होतं, आजच्या समस्येवरील जणू ती नांदीच होती. ‘मी’ ‘माझे’पणाचा अहंकार असतो, स्वतंत्र राहण्याची लालसा असते. वरिष्ठांचे विचार एकदम जुनेपुराणे वाटतात. या लेखातील आई-वडिलांच्या भूमिकेतून सासू-सासऱ्यांच्या भूमिकेत शिरताना-रूळ बदलताना-होणारं घर्षण.. ही उपमा फारच छान वाटली. अपेक्षा, मर्यादा, जबाबदाऱ्या इत्यादी सांभाळले (सर्वानीच) नसल्यामुळे तुटलेली नाती, दुभंगलेली घरं वेळीच टाके न घातल्यामुळे मन उसवलेली माणसं आपल्या अवतीभोवती दिसून येतात. एकमेकाशी संवाद साधत आणि आपला अहं आड येऊ न देता जसे तीन वर्षांच्या ईशानच्या आई-वडील, आजी-आजोबांनी एकत्रित पण स्वतंत्र राहण्याचा जो निर्णय घेतला आणि शेवट गोड केला ते एक प्रकारचे कालच्या आणि आजच्या पिढीला आदर्श उदाहरण आहे.

प्रभाकर शेकदार, ठाणे

 

तक्रारीतून मार्ग काढायला हवा

‘मन आनंद स्वानंद’ या सदरात १ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘तक्रार’ या विषयावर धनश्री लेले यांचा लेख फारच आवडला. काही व्यक्ती खरोखर सतत तक्रार करत असतात. तक्रार करावी अशी गोष्ट असली तरी सतत तीच तीच तक्रार किती वेळा करणार आणि कुणाकडे करणार? तरीही व्यक्ती तक्रार करत राहते. तक्रार केल्यावर बहुधा तिला बरं वाटत असावं. काही व्यक्ती सतत तब्येतीची तक्रार करत असतात. काही व्यक्तींना तक्रार करायची सवय लागते. तक्रार केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही त्यातच त्यांचा आनंद असतो. खरंतर प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नसतं तेव्हा समोर आहे तेच विनातक्रार स्वीकारावं, त्याने सहनशक्ती वाढते. आपण विचारांची दिशा बदलली की दशाही बदलते. आपण अवतीभवती बघायला लागलो तर आपल्यापेक्षा इतरांची दु:खं कितीतरी मोठी आहेत हे लक्षात येतं. खरंतर तक्रार नकोच आणि केलीच तरी तक्रारीमध्येही एक सकरात्मकता हवी. तक्रार दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तक्रारीतून मार्ग काढून बाहेर पडले पाहिजे. हे लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत. सर्वानी वाचावा असा हा चांगला लेख आहे.

सुधा गोखले, मुंबई.

 

समाजजागृती करणारा लेख

२४ जून रोजी प्रसिद्ध झालेला चित्रा पालेकर यांचा ‘वेगळी’ हा लेख वाचला. स्वत:च्या लेकीच्या जीवनाचा एक खासगी कप्पा सार्वजनिक करायचा याला खरेतर खूप धाडस लागते. ते आपण दाखवलेत, त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्या देशात या विषयावर आजही लोक कुजबुजीच्या स्वरूपातच चर्चा करतात. इतक्या उघडपणे व तेही स्वत:च्याच जीवनाशी निगडित गोष्टीवर लेख लिहून समाजजागृती करणे यासाठी आपले करावे तेवढे कौतुक थोडेच. आपली लेखणी प्रगल्भ आहेच. पण अशा विषयावर लिहिताना अत्यंत हळुवारपणे विषयाची मांडणी करून कुठेही भडकपणा येऊ  न देण्याची खबरदारी आपण घेतलीत. आपली कन्या ‘लेस्बियन’ आहे हे समजल्यावर निष्कारण अकांडतांडव न करता तिला आपण उभयतांनी साथ दिलीत, हे आपण समाजासाठी घालून दिलेले एक आदर्श उदाहरण.

जानेवारी २०१७ पासून ‘चतुरंग’मधील आपण लिहिलेले सर्वच लेख मी वाचत आहे. आपल्या लेखातून मला बऱ्याच जुन्या दिवसांची आठवण आली. मीदेखील दक्षिण मुंबईतलाच. रिझव्‍‌र्ह बँकेत १९७५ पासून नोकरी. आमच्या बँकेतर्फे दर वर्षी नाटय़स्पर्धा घेतली जात असे. त्या काळी त्या स्पर्धेत बक्षीस मिळणे खूप मानाचे समजले जात असे. अनेक चांगले चांगले कलाकार रिझव्‍‌र्ह बँकेत होते.

निशिकांत मुपीड 

 

एक विलक्षण अनुभव

चित्रा पालेकर यांचा ‘वेगळी’ हा लेख वाचला. वाचताना अंगावर काटाच आला. इतका विलक्षण, तोही स्वानुभव. आपल्या देशात मुळात एलजीबीटीविषयी एवढं बोललं जात नाही. बोलणं, वाचन सोडाच साधी याविषयी अनेक लोकांना माहितीसुद्धा नाही. म्हणूनच १७ वर्षांपूर्वीचा काळ बघता त्या काळात याविषयी कोणाला माहीत असेल याचा विचार न केलेलाच बरा. पण त्या काळातसुद्धा त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचं एवढ मोठं सत्य अगदी सहज पचवलं. तिला आपल्यापासून दूर न करता तिचा आधार बनल्या. ती आहे तशीच तिचा स्वीकार केला. त्याबद्दल त्या आई आणि वडिलांना सलाम.

तेजश्री गायकवाड, वडाळा.

 

ज्येष्ठांनीही बदलायला हवे

२४ जूनच्या अंकामधील ‘मालिकांचं वेळापत्रक’ हा लेख आजच्या काळाला अनुसरुन योग्यच होता. काही ज्येष्ठ पुरुष निवृत्त झाले हे स्वत:ला मान्यच करत नाही म्हणजे पेपर वाचणं हा कार्यक्रम उरकतात. का तर आयुष्यभर चहा प्यायल्यावर पेपर वाचायलाच हवा,  यात बदल करावा अशी त्यांची इच्छाही नसते. सकाळची वेळ ही चालायला जायचे असते हे त्यांना पटत नाही. त्यांच्या स्वत:च्या सवयी बदलत नाही  मग मुलांकडून काय अपेक्षा कराव्या त्यांनी?

शेफ विवेक ताम्हाणे यांचा ‘स्वादांच्या विविधतेचा आस्वाद’ हा लेख बोधप्रद वाटला. त्यांनी लिहिल्याप्रमाणे ज्याला किचन सांभाळता आलं त्याला जगात काहीही उत्तमरित्या सांभाळता येते हे पटलं.

भारती धुरी, मुंबई