‘माझे जग’ सदरामधील विमला पाटील यांचा १५ व २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेले लेख खूप छान व माहितीपूर्ण आहेत. हा टॉवर बांधण्यासाठी त्या काळचे उद्योगपती सर प्रेमचंद रायचंद यांनी चार लाख रुपयांची देणगी दिली व या टॉवरला राजाबाई हे आपल्या आईचे नाव दिले. टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी १३ वर्षे लागली. प्रख्यात ब्रिटिश वास्तुविज्ञानतज्ज्ञ सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांनी या टॉवरची रचना केली. हा टॉवर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. यामध्ये केलेले बांधकाम तर विलोभनीय आहेच पण यावर लावलेले घडय़ाळ सर्वाचे लक्ष वेधून घेते.

यामधील ग्लासाचे काम विकास दिलावरी अणि आभा लांबा या स्थापत्य विशारदांनी जगभरातून कानाकोपऱ्यामधून स्टेण्ड ग्लास आणून व लावून याची शोभा वाढविली आहे. गाथिक वास्तूमधला मुकुटमणी म्हणून राजाबाई टॉवरला मानांकन दिले गेले आहे. ही वास्तू १४० वर्षांहून जुनी आहे. युनेस्कोने तयार केलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ३५ स्थळांमध्ये हिचा समावेश आहे. मुंबईतल्या ब्रिटिश कौन्सिल डिव्हिजन आणि ब्रिटिश व्यापार व उद्योग खात्याने पुनरुज्जीवनासाठी ८० लाख रुपयांचे योगदान दिले आहे, ही यातील माहिती महत्त्वपूर्ण आहे.

लेखाचा पूर्वार्ध व उत्तरार्ध अत्यंत सुंदर सुटसुटीत मुद्देसूद व प्रत्येक गोष्टीचे केलेले विश्लेषण खूप आवडले. या लेखामुळे राजाबाई टॉवरची अत्यंत उद्बोधक माहिती वाचकांपर्यंत पोहोचली.

– किशोर श्रीवर्धनकर, सानपाडा

 

आपणच पुढाकार घेऊ या

‘अन्नधान्य – काही चुकतंय का?’ हा लेख वाचला. जे काही त्यात वाचलं ते अगदी तंतोतंत माझ्याशी मिळतंजुळतं होतं. मी प्रत्येक गोष्ट खाताना नेहमी विचार करते की, जे खाते आहे ते चांगलं आहे की वाईट. माझ्या चिमुकल्याला भरवताना नेहमी विचार येतो की या चिऊ-काऊच्या घासामध्ये मी जे भरवते आहे ते जीवनसत्त्व आहेत की रसायने?

दर दिवशी हा झगडा चालू असतो या विचारांचा की, यापासून मी माझ्या कुटुंबाला कसं दूर ठेवू? जे कर्करोग आणि त्यासारख्या इतर रोगांना कारणीभूत आहेत. दूध व मासे या दोन्ही घटकांबाबत मी अगदी निश्चिंत होते पण या लेखाने त्यातही मला चुकीचं ठरवलं. आता ग्लास भरून दूध संपवताना पूर्वीचं समाधान एक आई म्हणून माझ्या चेहऱ्यावर येत नाही. हे सगळं का? उत्पादन वाढवण्यासाठी? पण जर माणसंच जगली नाही तर तुमचं उत्पादन विकत घेणार कोण? शिवाय तुमच्या घरातही येईलच हे एक दिवस. हल्ली लहान मुलं वा तरुण गेल्याच्या बातम्या येतात आणि ही हळहळ वाढतच जाते. अजून किती दिवस याकडे आपण दुर्लक्ष करणार? की वाट बघायची आपल्यापर्यंत हे सगळं येण्याची. चला आपणच पुढाकार घेऊ या.

– ममता तरे, ठाणे</strong>

 

अज्ञानात सुख हेच खरे

‘अन्नधान्य – चुकतंय का काही तरी?’ हा २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला प्रा. मंजिरी घरत यांचा लेख वाचला. सुशिक्षित आणि आरोग्यविषयक बाबतीत जागृत अशा ‘ती’ची व्यथा त्यात नेमकी मांडली आहे. भाज्या, फळे, दूध, अशा अनेक गोष्टी ज्या आरोग्याला चांगल्या समजल्या जात होत्या. त्याच भेसळीमुळे आणि रसायनांच्या अतिवापरामुळे धोकादायक आहेत हे समजल्यावर खायचे तरी काय हा प्रश्नच आहे. ऑरगॅनिक भाजीपाल्याची मध्यंतरी लाट आली आणि गेली. सीलबंद दूध, खाद्यतेले, यामध्ये धोकादायक रंग वा ‘प्रिझव्‍‌र्हेटिव्हज’ असतात म्हणून ‘तथाकथित’ गोठय़ातले सुटे दूध वा घाण्यातील तेल वापरावे तर त्यावर कोणाचाच कसलाच वचक नावालादेखील नसतो. एरवीही शासकीय यंत्रणांवर विश्वास बसण्याकरिता कुठलेच शासकीय नियम सहसा कोणी मोडताना दिसत नाही, आणि तसे कुणी करू लागलेच तर संबंधित यंत्रणा आपण होऊनच त्याविरोधात लगेच कृती करताना दिसतात, अशी परिस्थिती सभोवती नेहमी दिसावी लागते. त्याचीच वानवा असताना विश्वास कसा बसावा? अजाण ग्राहकांच्या आरोग्याची जराही तमा न बाळगता घातक रसायने, युरिया, इत्यादींचा उपयोग करणारे ‘निर्लज्जम् सदा सुखी’ या सदरात मोडतात’; आणि त्याच वेळी वरील सर्व कारणांमुळे सुजाण ग्राहक नाइलाजाने ‘अज्ञानातले सुखच बरे’ या निष्कर्षांवर येतात अशी परिस्थिती आहे.

– विनिता दीक्षित, ठाणे

 

विचार करायला लावणारा लेख

‘अन्नधान्य – चुकतंय का काही तरी?’ हा प्रा. मंजिरी घरत यांचा लेख नुसताच वाचनीय नाही तर अभ्यासपूर्वक, सगळ्यांनाच गंभीरपणे विचार करायला लावणारा, जागृत करणारा आहे. आपल्या देशात भ्रष्टाचार हा सर्वात मोठा भयानक रोग खेकडय़ासारखा पाय रोवून बसला आहे. म्हणूनच अन्नधान्याच्या शुद्धतेची खात्री आपण देऊ शकत नाही. परदेशांत जी जागरूकता सरकार आणि जनतेत आहे, ती आपल्याकडे नाही. सगळा ढिला कारभार आहे. ८ दिवसांपूर्वी वृत्त वाहिन्यांनी रेल्वेतील खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, स्टेशनवर विकले जाणारे पाणी, चहा कसा तयार केला जातो ते दाखवले. ते सगळं बघून किळस तर आलीच शिवाय आपलं सरकार किती जागृत आहे, हेही समजले. एकेका औषधाची किंमत ठरवायला आपले सरकार महिने महिने घेताहेत. म्हणून देशात चोरांचे फावते आणि रोगराई पसरते. केंद्र, राज्य सरकारे, सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. पण ती प्रामाणिकपणे पार रडली जात नाही.

– अनिल जांभेकर, मुंबई,

 

हाडाचाच शिक्षक!

‘आता तरी बोलायला हवंच’ या डॉ. शशांक सामक यांच्या १५ जुलैच्या अंकातील लेखावरील योगेशकुमार भांगे यांची २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. प्रतिक्रिया वाचताना आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचे दृश्य चित्रण पाहतोय असाच अनुभव आला.  या शिक्षकाने लिहिलेल्या पत्रानुसार अश्लील शब्दांनी भरलेला कागदाचा चिटोरा भाषेच्या घटकातून, विषयातून, पर्यायवाचक शब्दसंपत्ती याद्वारे विद्यार्थ्यांना पटवून तर दिलेच, पण एका विघातक ऊर्जेला विधायक मार्गाने वळवून वहिवाट सोडलेल्या एका मनाला धोपट मार्गावर आणले.. केवढे अफाट काम. असा शिक्षक असावा. अशी कल्पकता असावी. हे सगळं मुळातूनच असावं लागते. सभा, परिषदा, यातून पोपटपंची करणे वेगळे नि प्रत्यक्ष वर्गात, प्रसंगात, कृतीतून संस्कार घडवणे हे वेगळे.

          – यशवंत सुरोशे, मुरबाड