‘ह्य़ू हेफनरचा स्त्रीवाद’ हा २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. प्रमोद चाफळकर यांनी लिहिलेला लेख वाचला. हेफनरचे साम्राज्य म्हणजे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ या म्हणीचे वेगळेच रूप वाटते. बायकांचे नग्न फोटो बघायला आवडतात असे म्हणून मासिक विकत घ्यायचे तर ग्राहकांच्या परीटघडीच्या नैतिकतेवर शिंतोडे उडतात. त्याला विचारप्रवर्तक लेखांची आणि तथाकथित कलात्मकतेची फोडणी द्यायची म्हणजे त्या नावाखाली मासिक विकत घेऊन आपली नैतिकतेची मूठ झाकलेलीच ठेवायची सोय उपलब्ध करून देता येते. मसाज पार्लर किंवा युनिसेक्ससंबंधी अशाच बातम्या येत असतात. प्रसिद्ध आणि धनाढय़ तारका जर आपली तशी छायाचित्रे प्लेबॉयकरिता देत असतील तर त्याला आर्थिक अडचणीतून आलेली अगतिकता आणि (‘वेट्रेस’ची झाली असेल तशी) पिळवणूकही म्हणता येणार नाही. लैंगिक आकर्षणात काहीही गैर नाही आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि कोणाच्याही आर्थिक अडचणीचा गैरफायदा न घेता त्यांची चित्रे विकण्याचा धंदा मी करतो असे म्हणण्याचे धैर्य हेफनरने दाखवले असते तर निदान त्याचा प्रामाणिकपणा तरी उठून दिसला असता. पण तो तकलादू प्रागतिक विचारांच्या मागे लपत होता असे वाटते.             प्रसाद

 

योग्य काळजी घेणाऱ्या वृद्धाश्रमांची गरज

डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी ‘वृद्धसंख्या वाढ : एक संधी’ या लेखात अगदी माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ अशा अवस्थेत नेमक्या कोणत्या गोष्टी आपणास आवश्यक आहेत याची स्पष्ट जाणीव या लेखामुळे झाली. योग्य काळजी घेणाऱ्या वृद्धाश्रमांची खरोखर आज मोठी गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.   सुनीता पारदीकर

 

दिलासा मिळाला

‘वृद्धसंख्या वाढ : एक संधी’ आणि ‘वृद्धांचे समाजभान’ हा ३० सप्टेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचून माझ्यासारख्या ७७ वर्षीय वृद्ध स्त्रीला मोठा दिलासा मिळाला. घरात ज्येष्ठांच्या अनुभवाला, ज्ञानाला महत्त्व मिळावे, हे वाचून आनंद झाला. सकारात्मक विचारसरणीचे लेख ‘चतुरंग’मध्ये वाचून मानसिक उमेद कायम आहे. याचा अभिमान वाटला.   सिमंतिनी काळे, नाशिक

 

अजंठा लेण्यांचीही माहिती द्यावी

विमला पाटील यांच्या ‘माझे जग’ या सदरात प्रसिद्ध झालेला वेरुळ लेण्यांवरील ‘स्थापत्यकलेतील आश्चर्य’ हा लेख वाचला. हा लेख खूपच माहितीपूर्ण असून मार्गदर्शकही आहे. या लेखाप्रमाणेच अजंठा लेण्यांचीही सविस्तर माहिती दिल्यास दोन्ही लेण्यांचा समान न्याय दिल्यासारखे तर होईलच, शिवाय अजंठा लेण्यांचीही मार्गदर्शक, उपयोगी माहिती सगळ्यांना समजेल.    मयूर सरोदे

 

वृद्धांचा प्रेमाने, आदराने विचार होणेही आवश्यक

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने प्रसिद्ध झालेले डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा ‘वृद्धसंख्या वाढ : एक संधी’ आणि माधुरी ताम्हणे लिखित ‘ज्येष्ठांचे समाजभान’ हे दोन्ही लेख वाचले. ते लेख मनोमन पटले. वृद्धांचे शास्त्र खरेच अभ्यासायला हवे. खरे तर वृद्धत्व काही एका दिवसात येत नाही. तेव्हा येणाऱ्या काळाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करावयास हवे.

‘ज्येष्ठांचे समाजभान’ या लेखात अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आहे त्याचा उपयोग निश्चितच होईल. अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे काही कला अवगत असतात त्याचा उपयोग समाजासाठी होऊ  शकतो. वय हा निव्वळ आकडा आहे हे मनोमन पटले. कारण अनेक शतायुषी स्वावलंबी जीवन जगत आहेत. त्यांचा आदर्श घ्यावयास हवा/ पाहिजे. वृद्धांची वाढती संख्या व त्यांच्या समस्या या अनेकांसाठी संधी होऊ शकतात, हे तितकेच खरे आहे. पण त्या वृद्धांचा प्रेमाने, आदराने विचार होणेही आवश्यक आहे.    क्षमा एरंडे

 

कुतूहल निर्माण केले

विमला पाटील यांनी ‘स्थापत्यकलेतील आश्चर्य’ या लेखात योग्य आणि मार्गदर्शक माहिती दिली आहे. त्यांनी लिहिल्यापेक्षाही त्यांना त्याविषयी अधिक माहिती असल्याचे त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवरून दिसून येते. स्वातंत्र्य मिळेपर्यंत या लेण्यांविषयी कुणाला अधिक माहिती नव्हती आणि १५ वी लेणी ही व्हाइट प्लास्टरने झाकलेली होती, हे दोन्ही मुद्दे आश्चर्यात टाकणारे आहेत. या लेण्यांच्या निर्मितीमागचा हेतू आणि त्याला लागलेला वेळ याविषयीही मला आश्चर्य वाटते. या लेण्यांची निर्मिती करणारे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि संशोधक असणार हे नक्की. या लेखाने लेण्यांविषयी अधिक कुतूहल निर्माण केले.           राजेश वैद्य