‘लिंगभेद भ्रम अमंगळ’ या सदरातील ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला ‘# मी टू’च्या युद्धात आम्ही कुठे?’ हा अशोक रावकवी यांचा लेख वाचला. समाजात ठायी ठायी भेदभाव आहेत. काळा-गोरा, जातीभेद, देशभेद असे निरनिराळे भेद अनादी काळापासून चालत आलेले आहेत. तुम्ही जरा वेगळे, असा तुम्हाला भेदभावाने वागवले जाते. या मागे वैयक्तिक मतलब किंवा सामूहिक मतलब असतो. खोडसाळपणाही असतो. सर्वात जास्त झळा स्त्रियांना, समिलगींना बसतात हे सत्य आहे. पण इतर लोकांनाही आयुष्यभर भरपूर छळाना तोंड द्यावे लागते. ते कोणाच्या खिजगणतीत नसते. त्याला ‘जीवन संघर्ष’ असे गोंडस नाव दिले जाते. म्हणून म्हणावेसे वाटते, ‘क्षणोक्षणी भेदभावाचा तोल सांभाळावा. भेदभाव जाणार नाहीत, ते कमी करण्याचा प्रयत्न करावा.

– यशवंत भागवत, पुणे

परखड विश्लेषण

‘मुलाचा हव्यास : शोध नव्या मार्गाचा’ हा डॉ. किशोर अतनूरकर यांचा १० नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. मुलाचा हव्यास किती असतो व त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी, ही समाजाची मानसिकता अनेक उदाहरणे देऊन परखडपणे मांडली आहे. वंशाचा दिवा, भरपूर असलेल्या इस्टेटीस वारस व मुलींच्या लग्नासाठी द्यावा लागणारा हुंडा ही महत्त्वाची कारणे आहेत. कोकण सोडून महाराष्ट्र राज्यातील इतर प्रांतात हुंडा दिल्याशिवाय मुलींची लग्ने करणे कठीण आहे.

मराठवाडा व विदर्भातील परिस्थिती खूपच विदारक आहे. स्त्री-भ्रूणहत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याचे एक महत्त्वाचे कारण अनिष्ट हुंडा पद्धत आहे. डॉक्टरांनी सुचवलेले उपाय, मार्ग चांगले आहेत, पण प्रबोधन करणे व ते समाजाच्या पचनी पडणे, एवढे सोपे नाही. लातूर जिल्ह्य़ात गेल्या वर्षी एका तहसीलदार मुलाला ५५ लाख रुपये हुंडा दिला, दुसऱ्या एका डॉक्टर मुलाला ७४ लाख रुपये इतका हुंडा द्यावा लागला. अशी अनेक उदाहरणे आहेत. मराठवाडा हा नेहमीच दुष्काळात असतो. पण संपूर्ण राज्यात मराठवाडय़ातील हुंडय़ाचे दर सर्वात जास्त आहेत. तसेच अनेक मुलींना व मुलींच्या वडिलांना आत्महत्याही कराव्या लागल्याच्या घटना घडल्या आहेत. डॉक्टर किशोर अतनूरकरांनी परखड विश्लेषण करून, समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा किती घातक आहेत, हे निदर्शनास आणून दिले आहे.

– बब्रुवान रामराव कदम, पनवेल</strong>

विचार प्रत्यक्षात येणं हे महत्त्वाचं

डॉ. किशोर अतनूरकर यांचा ‘मुलाचा हव्यास : शोध नव्या मार्गाचा’ हा लेख वाचला. अतिशय सुंदर मांडणी वाटली लेखाची. त्यात त्यांनी मुलगी होण्याचा आंनदोत्सव आपला समाज कधी साजरा करू शकतो यासाठी खूप चांगले उपाय सुचवले आहेत. असे उपाय आपण व आपल्या समाजाने स्वीकारले तर खरच डॉक्टरांना अपेक्षित यश नक्कीच मिळेल. हे उपाय डॉक्टरांनी खूप विचारपूर्वक सुचवलेले दिसतात. त्यांचा विचार प्रत्यक्षात येणं हे महत्त्वाचं आहे

यात मला मी स्वत: दोन मुलींचा वडील असल्याने मुलींच्या वडिलांच्या मानसिकतेचा विचार (मुलींना जन्म देण्याच्या बाबतीत) करता आणखी एक मुद्दा असा वाटतो की, पालक मुलींना जन्म देण्याच्या बाबतीत त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत काळजी वाटते. कारण आपली आत्ताची समाज रचना व समाजाची मुलींकडे पाहण्याची वृत्ती. या समाजात माझी मुलगी सुरक्षित राहू शकेल का? हा प्रश्न मुलींचा वडील म्हणून मला अति काळजी पोटी असेल काहींना तो निर्थकही वाटेल पण पडला आहे. या कराणास्तवसुद्धा मुलींना जन्म देण्यासाठी काही पालक विचार करू शकतात. ही काळजी करण्याचं खरं कारण आहे माझ्या जवळच्या परिसरात इयत्ता दुसरीतील मुलीवर बलात्कार होतो, तिचा खून होतो आणि हे सगळं करणारा पुराव्याअभावी मोकाट सुटतो, हेही असेल कदाचित. पण हे आपल्या समाजाचं सध्याचं वास्तव आहे.

– शायरन पाटील (नाव कन्फर्म करणं)

उत्तम कादंबरी आणि चित्रपटही

प्रभा गणोरकर यांनी ३ नोव्हेंबरच्या अंकात ‘स्त्रीत्वाचा रूपबंध’ या सदरात चित्रलेखा या जुन्या ‘क्लासिक’ कादंबरीचा छान परिचय करून दिला आहे. चित्रलेखा या सशक्त, समर्थ आत्मनिर्भर व्यक्तिरेखेवर ही कादंबरी आधारलेली आहे. मी कादंबरी वाचलेली नाही. पण केदार शर्मा या महान दिग्दर्शकाचा ‘चित्रलेखा’ हा सिनेमा खूप वर्षांपूर्वी पाहिला होता. त्यात चित्रलेखाच्या व्यक्तिरेखेबरोबर आणखी एक गोष्ट जाणवत होती ती म्हणजे, ‘जीवनातील विसंगती लेखकाने फार छान दाखविली आहे.. ब्रह्मचाऱ्याला लग्न करावेसे वाटते. प्रेमात आकंठ बुडालेली नर्तकी सर्वकाही त्यागून संन्याशाच्या गुहेत राहू इच्छिते. महान तपस्वी आणि संन्यासी असा कुमारगिरी, ज्याने नर्तकी चित्रलेखाला, तू स्त्री म्हणजे भोग आहेस, असे सुनावले होते, तोच तिच्या प्राप्तीसाठी वेडावू लागतो. चित्रलेखाचा प्रियकर अमात्य बीजगुप्त राजदरबार सोडून संन्यासी होऊ पाहतो. अशा जीवनातल्या अनेक विसंगती फार ताकदीने सादर केल्या गेल्या होत्या त्या चित्रपटात. मीनाकुमारीची चित्रलेखा आणि अशोक कुमारचा कुमारगिरी बघत राहावा. गीतकार साहिर लुधियानवी यांची गीते कथेच्या आशयाला साजेसी होती. ‘संसारसे भागे फिरते हो..’, ‘मन रे तू काहे न धीर धरे’, ‘सखी रे मेरा मन उलझे तन डोले’ यांसारखी अर्थपूर्ण गीते होती.

– डॉ. कैलास कमोद, नाशिक

‘मी टू’च्या वातावरणाला छेद देणारा लेख

‘तिच्या नजरेतून तो’ या सदरातील ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला ‘तू माझा रे सांगातीं’ हा डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचा लेख वाचला. ‘मी टू’सारख्या वादळी वातावरणाला छेद देणारा हा लेख असंच म्हणावसं वाटतं. एवढं वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊनही छत्तीसगडच्या जंगली आदिवासी भागात वैद्यकीय सेवा आणि ‘कोटरू’सारख्या खेडय़ात जाऊन तिथल्या स्त्रियांशी, आदिवासी लोकांशी विश्वासाचं नातं जुळवायचं म्हणजे महाकठीण.

वडिलांची साथ आणि नंतर ‘त्या’ सांगाती अधिकाऱ्याने दिलेला विश्वास, तिथं केलेलं लिखाण, त्या लेखांची प्रसिद्धी, त्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आदिवासी लोकांच्या सेवा आणि त्या अधिकारीचा तिथला संपणारा सेवा कालावधी ..सगळंच कसं अद्भुत! त्या ‘सांगात्या’सारखं बनणार हा विश्वास सावरू देईल सर्वकाही.

– डॉ. किरण भिंगार्डे, कोल्हापूर</strong>

डॉ. कोल्हे खरे श्रीमंत!

‘लोकसहभागाचा अनुभव’ हा ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला डॉ. रवींद्र कोल्हे यांचा लेख वाचला. समाजाची नि:स्वार्थ सेवा करणे किती अवघड असते हे फक्त त्यांनाच महिती. एम.डी. झालेला डॉक्टर शहरामधल्या सुखसोयी आणि वारेमाप मिळणारा पैसा सोडून, मेळघाटसारख्या दुर्गम भागात आपल्या जीवनाचे वाळवंट करणारे डॉ. कोल्हे हे खरे वैद्य म्हणावे लागतील. पण, शहरांतले श्रीमंत आयुष्य जगण्यापेक्षा सर्वामध्ये राहून, त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न आपलेसे करतं, त्यावर आपण घेतलेल्या शिक्षणाचा खरा उपयोग त्यांना देत आणि त्यांच्याकडूनही जीवनाची मूल्यं शिकत एक वेगळंच समाधान मिळतं त्यांना! कारण त्यांचं काम हे प्रसिद्धीसाठी नव्हतं ते आत्मिक समाधानासाठी होतं. त्यासाठी प्रथम मनाची श्रीमंती मोठी असायला हवीय. मनाची श्रीमंती चोरणारे चोर खूपच कमी असतात. त्यांची खूपच गरज वाटते. कारण श्रीमंतीतही रुसलेपणाचे आयुष्य वाटय़ाला आलेलेसुद्धा कमी नाहीत. पण आपण रुसलेले असतानाही हिरमुसलेल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर पाहायला मिळाला आणि त्या आनंदामागच्या गोष्टी किती छोटय़ा छोटय़ा असतात, हे जर समजलं तर हे रुसणं हसण्यात बदलायला उशीर लागणार नाही.

– करणकुमार पोले, पुणे

परिस्थिती किती बिकट आहे

‘बालपणच नाही तर बाल दिन कसला?’ हा डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचा ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचताना परिस्थिती किती बिकट आहे हे समजले आणि नव्या पिढीपुढील प्रश्नांची जाणीव मन खिन्न करून गेली. एकंदरीत मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. पालकांना बोलण्यास वेळ नाही. दूषित वातावरणात शुद्ध अन्नपाणी नाही, दप्तराच्या ओझ्याखाली खेळण्यास वेळ नाही, शहरी धावपळीत शांती नाही, साथीच्या रोगराईत आरोग्याची खात्री नाही. कार्टून नेटवर्क पाहताना, मोबाइलवर गेम खेळताना, बोलण्यास कोणी नाही आणि बालदिनी कौतुक होताना बालपणच शिल्लक नाही. या व्यथा ऐकण्यास कोणी नाही. तरीही प्रश्नांची चर्चा होते. आश्वासने दिली जातात, पण मुलांनाही आश्वासने खोटी असतात हे माहीत झाले आहे.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

चांगल्या विषयाला स्पर्श

उत्पल व.बा. यांनी १० नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या ‘पुरुषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरुष’ या लेखात एका चांगल्या विषयाला स्पर्श केला आहे.  केवळ पुरुषांच्या दृष्टिकोनातून नको, तर माणूस म्हणून विचार हवा. यात धर्माची चिकित्सा तेवढीच आवश्यक आहे. स्त्रियांच्या बाबतीत कुठला पुरुष कुठे, कसा वागेल (क्वचित स्त्रीदेखील) हे सांगता येत नाही. म्हणजे एखादा पुरुष, स्त्रीच्या बाबतीत असं वागूच शकत

नाही, असं प्रमाणपत्र देण्याची घाई कोणी करू नये. लेखात विकास बहल ‘क्विन’सारखा चित्रपट करतो म्हणून.. आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण का करायचा? काल एखादी व्यक्ती चांगली वा वाईट वागली म्हणून आज ती तशीच वागायला हवी, असा अट्टहास कशासाठी? बहलने ठामपणे सांगावं ना, मी तसा वागलो होतो, सॉरी किंवा मला गरज होती किंवा माझा पाय घसरला. माणूस म्हटलं की, लैंगिक भावना असतीलच.

आपल्या डोक्यावर धर्माचा जो पगडा किंवा देवाविषयी असलेली मानसिक गुलामी नष्ट झाली तरच व्यक्ती स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य, याचा विचार करून एक सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतील.

– संजय खोब्रागडे, नागपूर</strong>