डॉ. शशांक सामक यांचा ‘आता तरी बोलायला हवंच’ हा लेख वाचला अन् छातीत धस्सच झाले! त्याचबरोबर समाजताील पौगंडावस्थेतील मुलांसह सारीच तरुणाई – डोळ्यासमोर आली. इंटरनेटमध्ये गुरफटलेल्या या मुलांचे भवितव्य काय, असा प्रश्न मनात आला अन् याला जबाबदार कोण, याचे उत्तर शोधताना जाणवले की तमाम पालकवर्ग मुलांच्या समवेत सुसंवाद साधत नसल्याने तसेच सतत त्यांच्या सान्निध्यात राहात नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे.

आजकालच्या मुलांना आकर्षण असते ते मोबाइलचे! पौगंडावस्था प्राप्त झाल्यावर हाच मोबाइल मुलांवर पूर्ण अधिराज्य गाजवतो, त्यातूनच पोनरेग्राफीसारख्या घाणेरडय़ा गोष्टींचे त्याला वेड लागते. साऱ्या विश्वात असेच काही भरलेले आहे, असेच काही सारीकडे असते अशी त्याची धारणा होते. विहिरीतल्या बेडकाप्रमाणे सारे विश्व त्याला दिसू लागते अन् यातून जन्माला येते ती विकृती! हीच विकृती त्याला पूर्ण गिळंकृत करते व नको त्या गोष्टी त्याच्याकडून घडतात..

समाजातील प्रत्येकानेच मुलांचे पालक होण्याबरोबरच त्यांचे चांगले मित्र होणे आवश्यक आहे. चांगले संस्कार, समुपदेशन याच्या माध्यमातून त्याचे बौद्धिक घेणे आवश्यक आहे जेणेकरून आदर्श माता-पित्याकडून आदर्श मुले घडविणे साऱ्यांनाच शक्य होईल!

– उर्षां वर्तक, वसई

जबाबदारी सगळ्यांचीच

‘आता तरी बोलायला हवंच’ हा १५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. शशांक सामंत याचा लेख वाचला. माहिती तंत्रज्ञान व संगणकाच्या युगात याद्वारे उपलब्ध होणाऱ्या विविध माध्यमाचा वापर नियंत्रणमुक्त आहे. अशी वस्तुस्थिती असताना

डॉ. सामंत यांनी अभ्यासपूर्ण लेखातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची कुटुंबव्यवस्था, आई-वडिलांना करावी लागणारी १०-१२ तासांची नोकरी त्यामुळे घरात एकटी-दुकटी असणाऱ्या पिढीला अशी अनुकूलता अगदी सहा प्राप्त झालेली आहे. स्मार्ट फोन, इंटरनेट, फेसबुक, यूटय़ूब इत्यादी पर्यायामुळे या पिढीला अमर्याद स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ‘पोनरेग्राफी’! लहान मुलांचे वय हे काहीही न समजता अनुकरण करण्याचे असते. त्याचाच परिणाम ‘‘पोर्नहब’चा वापर होय. एकदा मोबाइल हातात आला की ‘जगच’ हातात येते. या लेखातील ‘पोर्नहब’ची आकडेवारी हेच सिद्ध करते. अज्ञान पिढीला हे सर्व नवीन व कोठेही माहिती सहज उपलब्ध होत नाही याची जाणीव नसते. तसेच आपण काही चुकीचे/ गैर करतो आहोत हे सांगणारे कोणीही नाही. दोष कुणाचा? याचे उत्तर शोधण्याऐवजी या पिढीला लैंगिक शिक्षण मिळण्यासाठी सरस व उत्तम पर्याय मिळाला तरच ‘स्त्री-पुरुष संबंधा’वरील मुक्त  विद्यापीठ संपविता येईल. नाहीतर ‘समाजस्वास्थ्य’ बिघडवून टाकणारी प्रवृत्ती जोमात वाढत राहील व त्याचे गंभीर व दूरगामी परिणाम होतील. हे होऊ न देण्याची जबाबदारी समाजातील सर्व स्तरांवरील घटकांवरच आहे.

– नारायण खरे, पुणे</strong>

जगा आणि जगू द्या..

चित्रा पालेकरांचं लिखाण मी आवर्जून वाचतो. आपली मुलगी शाल्मलीबद्दल त्यांनी खूप सविस्तर लिहिलं आहे. एका मराठी मासिकातही चित्राजींनी याबद्दल लिहिलं होतं. अशा विषयाबद्दल सविस्तर आणि निर्भिडपणे लिहिण्याबद्दल त्यांचं अभिनंदन! पांढऱ्या रंगामध्ये सर्व रंग असतात असं म्हणतात तसंच काहीसं मनुष्य स्वभावाबद्दलही म्हणता येईल. काही अपवाद वगळता अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या शरीराच्या विरुद्धची भूमिका करायची गरज वाटायची. पुरुषांनी स्त्रीपात्र रंगवणं तसं म्हणलं तर सोपं असतं. ते बदल पटदिशी स्वीकारले जातात. विख्यात रंगभूषाकार प्रभाकर भावे बापूराव मानेंना सजवत होते. एक उत्सुकता म्हणून भावेंनी बापूरावांना विचारले, ‘‘या स्त्री पार्टी भूमिकेबद्दल विचारू?’’

‘‘विचारा की!’’

‘‘ही साडी, हा मेकअप, त्रास होत नाही त्याचा? त्या वेळची मानसिक अवस्था.. काय होत असेल?’’

त्यावर बापूराव म्हणाले, ‘‘प्रभाकर, मी तुला उद्या याचं उत्तर देऊ?’’

दुसरे दिवशी बापूराव रंगभूषेला बसण्याआधी प्रभाकर भावेंना म्हणाले, ‘‘माझं मनगट पकडा.’’

भावेंनी बापूरावांचं मनगट पकडलं, ते मनगट पुरुषांचं होतं. त्यानंतर मेकअप झाला, बापूराव स्त्रीवेशात सजले, मग बापूराव, भावेंना म्हणाले, ‘‘प्रभाकर, आता मनगट पकडा.’’ त्याप्रमाणे त्यांनी मनगट पकडल्यावर भावे आश्चर्यचकित झाले. ते मनगट एका स्त्रीचं होतं! नि:संशय! बापूराव म्हणाले, ‘‘प्रभाकर, ‘त्या’ भूमिकेत शिरताना आमचे हार्मोन्स बदलत असतील कदाचित.’’

१२ ते १४ वर्षांच्या वयापासून शरीरामध्ये या उलाढाली चालू होतात. त्या एखाद्या शास्त्राच्या पलीकडील असतात. इतकी जवळची आई असते पण तिच्याही लक्षात मुलामुलींचे मनोव्यापार येत नाहीत. शरीरव्यापार तर लांबची गोष्ट!

त्यात व्हिक्टोरियन कालखंडामुळे आपण भारतीयांनी खुलेपणा स्वीकारला, पण समजूतदारपणा सोडूनच दिला आहे. ते बाकीचे देश बघा. ‘दुसऱ्याला त्रास न होईल असं स्वत: जगा दुसऱ्यालाही त्याच्या पद्धतीनं जगू द्या!’ हा सर्वत्र नियम, कायदाच! आपल्याकडेही अशांसाठी एक व्यासपीठ उभं केलं पाहिजे. चर्चा, उपाय, पद्धती, कायदे याबद्दल ‘अशाबद्दल’ व्यासपीठ हवंय हो.

– रवि कुलकर्णी, पुणे