‘लग्नमंडपातून.. गेटकेनकडे..’ हा लेख वाचला. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण केलेले शेती व्यवसायाची सद्य:स्थिती व समाजाच्या मानसिकतेचे विश्लेषण विचार करायला लावणारे व अभिनंदनीय आहे. शीतल घायाळ या मुलीने केलेल्या आत्महत्येमुळे या प्रश्नाचे गांभीर्य पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आले.

हुंडय़ाची पद्धत संपूर्ण देशात व राज्यात असली तरी मराठवाडय़ात या प्रथेचा अतिरेक झालेला आहे. तथाकथित सुशिक्षित व चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्यांनी व श्रीमंतांनी त्यात भर टाकली आहे. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी लग्नात हुंडा व प्रचंड खर्च करण्याची चढाओढ आहे, किंबहुना हुंडा देण्या घेण्याच्या ऐपतीवरच मुलगी पाहण्याची सुरुवात होते. या बाबीचे अनुकरण मध्यम व गरीब लोक ऐपत नसताना करण्याचा प्रयत्न करतात. श्रीमंतांनीच पुढाकार घेऊन ही प्रथा बंद करावी. ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ ही चळवळ झाली पाहिजे.

ही प्रथा बंद करण्यासाठी मानसिकता बदलण्याची लोकचळवळ उभारणे, ग्रामीण भागात लोकजागृती करणे हे उपाय आहेत. तरुणांनी मनावर घेतल्यास ही चळवळ यशस्वी होऊ शकते. कोकणात  हुंडय़ाची प्रथा, परंपरा नाही. लग्नाचा खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यावा, अशी प्रथा आहे. (हे मराठवाडय़ातल्या लोकांना सांगितले तरी पटत नाही.) म्हणून इकडे मुलींच्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नसाव्यात.

– ब. रा. कदम, पनवेल

 

मदत करायला आवडेल

२९ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेले काजल बोरस्ते आणि युवराज पाटील यांचे लेख वाचनीय आहेत. दोघांनी केलेला त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास त्यांच्या लेखांमधून दिसून येतो. गेटकेन ही पद्धत खरोखरच खूप चांगली आहे. साठ- सत्तरच्या दशकात मुलगी आणि नारळ एवढीच अपेक्षा आहे, असं सांगून लग्न केलं जायचं, ती पद्धतही खूप चांगली होती. अनेक ठिकाणी लग्नाचा खर्च करण्याची ‘छुपी’ सूचना वधूच्या पालकांना केली जाते. अमेरिकेत गेली ४८ वर्षे राहात असल्याने तिथे येणाऱ्या आताच्या अनेक मुलांचे निरीक्षण करता येते किंवा आले, मात्र त्यातील कित्येकांची लग्नं ही हुंडा किंवा लग्नाचा खर्च न मागताच झालेली असल्याचे आढळले. (अमेरिकेत जाणारा किंवा काम करणारा मुलगा म्हटलं की अशा लग्नाळू मुलांचा ‘भाव’ जरा जास्तच वधारतो.) ही आशादायक स्थिती आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. तुमच्या कार्यासाठी माझी काही मदत होणार असेल तर करायला नक्कीच आवडेल.

– शशी परुळेकर,  लॉस एंजलिस, अमेरिका

 

फिरत्या चाकावरती..

मुंबईची जीवनवाहिनी, रेल्वे लोकल ट्रेन म्हणजे अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. थोडा विसावा देणारी, थांबून विचार करायला लावणारी, अनेक नाती जोडणारी.. तर कधी करकचून भांडायलाही लावणारी.. प्रत्येकाच्या अनेक आठवणी तिच्याशी जोडलेल्या असतात. गर्दीत चढताना होणारी तारांबळ, तिच्यातले धक्के, वाद आणि बरंच काही.. हळूहळू याला सरावलो की जाणवते ती या प्रवासातली एक अनोखी गंमत. मग ‘ती’च्यासाठी वेळा पाळणं, सीट पकडणं. एकत्र अनेक ‘सेलिब्रेशन्स’ करणं हे करता करता अनोळखी चेहेरे कधी आपलेसे होऊन जातात ते कळतही नाही. त्यातून मग अनेक सुखंदु:खं, आनंद, हळवे क्षण वाटले जातात. तुमच्याही असतीलच ना अशाच काही आठवणी? मुंबईत धावलेल्या ‘पहिल्या महिला लोकल ट्रेन’ला २५ वर्षे पूर्ण झालीत. त्या निमित्ताने लोकल ट्रेनने प्रवास केलेल्या मैत्रिणींनो, आपले असेच काही हळवे, विलक्षण, मर्मबंधातील ठेव असलेले अनुभव आम्हाला जरूर पाठवा. तुम्हा मैत्रिणींचा एकत्रित फोटो असेल तर उत्तमच. अनुभव मात्र ट्रेनमधील प्रवासाशी निगडितच हवेत. ३०० शब्दांच्या या निवडक अनुभवांना ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : ‘फिरत्या चाकावरती’साठी, चतुरंग, लोकसत्ता, प्लॉट नंबर ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई – ४००७१०

ईमेल आयडी – chaturangnew@gmail.com