१३ मे रोजी प्रसिद्ध झालेला ‘अनोखं मातृत्व’ हा लेख वाचला आणि आपल्या आजूबाजूला काही तरी सुखद घडतंय याची प्रचीती आली! असं म्हणतात की, ‘नाती ही नावापासून नाही तर भावनेपासून तयार होतात!’ याचा प्रत्यय ‘गौरी- गायत्री’ यांच्या नात्यातून येतो. कसलंही रक्ताचं नातं नसताना ‘भावनिक ओढ’ हिच प्रेमाला-माणुसकीला पाझर फोडते याचे या ‘दोघी’ उत्तम उदाहरण आहेत. आजूबाजूचा वेश्याव्यवसाय आणि तृतीय पंथीयांची गलिच्छ जीवनशैली यांसारख्या चिखलाने बरबटलेल्या वातावरणात ‘कमळ रूपी’ फूल फुलावं तसं या मायलेकींचं नातं उमलताना बघून मनस्वी आनंद झाला. स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांना एका वेश्येच्या मुलीला तृतीयपंथीयाने सांभाळ करून दिलेली ही सनसनीत चपराकच म्हणावी लागेल.

– गिरीश औटी, मानवत जि.परभणी

 

पालकत्वाचे प्रेरणादायी लेख

दत्तक ही एक प्रक्रिया नाही तर आपलेपणाने एखाद्या जीवाला स्वीकारणं म्हणजे आयुष्य दुसऱ्यांदा जगण्याची संधी देणं होय. ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’ या सदरांतर्गत प्रसिद्ध होणारे संगीता बनगीनवार यांचे लेख मी नियमित वाचतो. ‘लोकसत्ता’चे वाचक या लेखांनी फक्त प्रेरितच नव्हे तर अनुकरण करणारे झाले असतील यात काहीच शंका नाही. आम्ही यंदा माझ्या भाऊ-वहिनीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दोन मुली शिक्षणासाठी दत्तक घेणार आहोत आणि त्यापुढील प्रत्येक वाढदिवसाला मुलींची संख्या वाढवणार आहोत.. ‘चतुरंग’ पुरवणीत जे काही मिळतं ते अवर्णनीय आहे. माझ्या मनात आणि समाजकार्यात एक चांगला माणूस आणि समाजसेवक घडवण्यात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे..

– रितेश भाऊसाहेब पोपळघट

 

विचारांना चालना देणारा लेख

अ‍ॅड. जाई वैद्य यांचा ६ मे रोजी प्रसिद्ध झालेला ‘पर्यायी मातृत्वाच्या दिशा आणि दशा’ हा विस्तृत लेख विचारांना चालना देणारा आहे. नवे तंत्रज्ञान विकसित झाले की ते कोणाच्या हाती पडते व ते त्याचा विनियोग कशासाठी करतील, हे सांगणे अवघडच नव्हे तर अशक्यप्राय आहे.  मग अणुबॉम्बचा शोध, सोनोग्राफीचा शोध किंवा इंटरनेटचा शोध, ज्याने जग जवळ आले, पण घरातली माणसं दूर गेली. वायफाय फुकट मिळाले म्हणून त्याचा उपयोग पोर्नो साइट बघण्यास केला जातो, अशी किती तरी उदाहरणं देता येतील.

तसेच लेखात म्हटल्याप्रमाणे आपण कायदे चांगले करतो, पण अंमलबजावणी करताना नेहमी चालढकल होते, तर आपलेच काही स्वार्थी वकील मित्र कायद्यातून पळवाटा शोधून काढतात. ‘मूल जन्माला घालण्याच्या निर्णयात आणि प्रक्रियेत भारतीय स्त्रियांना कुठलाही अधिकार, मत नसते’ या लेखिकेच्या मताशी मी असहमत आहे, कारण बऱ्याच वेळा सासूच आपला एकाधिकार गाजवून, सुनेला या मार्गाचा स्वीकार करायला भाग पाडते. हे खरोखरीच लांच्छनास्पद आहे. शेवटी प्रश्न आहे की, मुलगा उतारवयात आपली देखभाल करील, हे किती खोटे आहे, हे एकदा वृद्धाश्रमात जाऊन पाहा, ज्यांना फक्त मुली आहेत असे आई, वडील फारच क्वचित प्रसंगी वृद्धाश्रमात भेटतील.

– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे