..तर नक्की भेदू शकतील काचेचे छत
७ मे रोजीच्या पुरवणीतील ‘संघर्ष पुढच्या पिढीचा?’ या लेखात कालिंदी भावे यांनी आपल्या लेखात इतर उच्चपदावर पोहोचलेल्यांची मते सादर करून फक्त कुटुंबाचाच विचार करत बसलेल्या स्त्रियांना एक नवीन वाट तयार करून दिली आहे. आजही काही स्त्रिया फक्त आणि फक्त लग्न, कुटुंब, संसार याच गोष्टींचा विचार करतात. काही मुली आजही घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न हा एक पर्याय म्हणून वापरतात तिथून काही तरी नवीन घडेल असा विचार करतात. बहुधा असा प्रकार शिक्षणाचा अभाव किंवा घरच्या वातावरणावरही अवलंबून असतो. लेखात दिलेल्या डॉ. संजिवनी राहणे, अंजली देसाई, शेरील सॅन्डबर्ग, नैनालाल किडवाई, हर्षिणी कन्हेकर, पारुल मेहता आदींची उदाहरणे आणि त्यांची मते सादर करून आपण आजच्या पिढीतील तरुणींना नवीन वाट करून दिली आहे. असे सकारात्मक विचार ऐकून पुढची पिढी जागरूक राहील आणि तरुणी नक्कीचं काचेचं छत भेदू शकतील.
– दीप्ती कांबळे

विविध विषयांची रसाळी दर शनिवारची चतुरंग पुरवणी
आणि त्यातील लेख खूपच वाचनीय असतात. १४ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या पुरवणीतील वासंती वर्तक यांच्या एकला चलो रे सदरातील ‘घडवणं आणि घडणं’ यातील संजीवनी व प्रणती या मायलेकींमधील नात्यातील सुंदर, नि:शंक वीण आमच्यासमोर उलगडली व एका छानशा नात्याची ओळख झाली. नीलिमा किराणे व माधवी गोखलेंचा लेख जागे करून गेला. एकूणच काय ग्रीष्मातील विविध विषयांची रसाळी आम्हा वाचकांना मिळाली.
– संगीता देशपांडे, औरंगाबाद</p>

हेतुपूर्वक मार्गदर्शन गरजेचे
रती भोसेकर यांच्या ‘शिकू आनंदे’ या सदरातील ‘संचयातून छंदात्मकतेकडे’ हा सुंदर
लेख (१४ मे) वाचला. बऱ्याच लहान मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळ्या वस्तू जमविण्याची वृत्ती उपजतच असते. ती त्यांची सहज प्रवृत्ती असते. याकडे दुर्लक्ष तर होतेच, पण बरेचदा मुलांनी जमविलेल्या त्या वस्तूंना केराची टोपलीच दाखविली जाते.मात्र लेखिकेने लहान मुलांच्या वस्तू जमविण्याच्या वृत्तीचा अव्हेर न करता त्याचा उपयोग त्यांना एखादा छंद जोपासायला शिकविण्यासाठी केला तर? मुलांच्या नजरेतून जर जग पाहिलं तर? जरा वेगळं (आणि चांगलंदेखील!) दिसेल. त्या दृष्टीने त्यांनी अभ्यास करून अंमलबजावणी करण्याचे ठरवले. मुलांच्या अंगी उपजत असलेल्या अशा अनेक चांगल्या वृत्तींना हेरून शिक्षकांनी आणि पालकांनीदेखील, त्या जोपासण्यासाठी जर हेतुपूर्वक मार्गदर्शन केले तर त्यांच्या वृत्तींचा विकास अधिक प्रभाविपणे होणे शक्य आहे असे या लेखातून सूचित होते.
– रविकांत श्रीधर तावडे, नवी मुंबई.
‘आईपणाच्या मुक्तीचा..’ सामाजिक विचारही हवा

वंदना कुलकर्णी यांचा ‘मुक्ती ‘आईपणा’च्या ओझ्यातून?’ हा लेख वाचला. आजच्या युगाचा मापदंड असलेल्या आर्थिक निकषांवर तो बेतलेला असल्याने तो काही प्रमाणातच योग्य वाटला. पण या प्रश्नाला फक्त आर्थिक बाजू आहे का? या बाबींचा सामाजिक बाजूने विचार करावयास हवा असे मला वाटते. या लेखाच्या शीर्षकापासूनच तो खटकला. हे प्रतिपादन करताना मी पुरुषी अहंकाराचे, न्यायाचे समर्थन करतो आहे असे वाटेल. पुरुष अन्याय करतात, त्याचा त्रास स्त्रियांना सहन करावा लागतो पण तो सार्वत्रिक नाही. परिस्थितीचे भान येऊन पुरुषही जबाबदारी शेअर करू लागले आहेत. हा सुधारणा वेग धिमा आहे. लेखात वर्णन केलेले प्रसंग सरसकट नसावेत, नसतील पण स्त्रीला वाटणारी खंत मात्र सार्वकालिक आहे.आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांची संपूर्ण जबाबदारी हे आईसाठी आणखीनच जबाबदारीचे झाले आहे. आर्थिक प्रगतीची ही रॅट रेस यामुळे आजचे संकट उभे राहिले आहे. तरी जोपर्यंत स्त्री सर्जनाचे अविभाज्य अंग आहे तोपर्यंत तरी ती या ओझ्यातून मुक्त होणार नाही.
– रामचंद्र महाडिक, सातारा

आई हे निसर्गतत्त्व
‘मुक्ती ‘आईपणा’च्या ओझ्यातून?’ हा वंदना कुलकर्णी यांचा १४ मे रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. माझ्या मते ‘आई’ हे, निसर्गाने घडवलेले तत्त्व आहे. कोणी काय करावे आणि कोणी काय करू नये हे माणसाने कितीही काटेकोरपणे आणि समंजसपणे ठरवले तरीही निसर्गाच्या नियमाविरुद्ध तो वागू शकत नाही. ‘आयुष्य’ म्हणजे कोण कोणासारखा जगला आणि कोण कोणासारखा नाही जगला याची चढाओढ नाही. त्यामुळे प्रत्येक तत्त्व त्याच्या त्याच्या स्वभावानुसार पुढे जात असते. त्याचप्रमाणे आईही निसर्गनियमाप्रमाणेच वागत असते.
– संजय पोहनेकर, चंद्रपूर</p>