12 December 2017

News Flash

लक्ष्मीबाईंची प्रगती प्रेरणादायी

२५ फेब्रुवारीच्या अंकातील मुक्ता अ. टिळक यांचा ‘अज्ञ लक्ष्मीबाई’ लेख माहितीपूर्ण होता.

मुंबई | Updated: March 11, 2017 1:05 AM

लिंगभेदातील बदलत्या इमोजीस’ ११ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला हा रेणुका कड यांचा लेख अतिशय वेगळा व विचारपूर्वक वाटला.

२५ फेब्रुवारीच्या अंकातील मुक्ता अ. टिळक यांचा ‘अज्ञ लक्ष्मीबाई’ लेख माहितीपूर्ण होता. लक्ष्मीबाई यांना टिळकांनी शिकविले त्यात त्यांनी इतकी प्रगती केली ती खरंच कौतुकास्पद, प्रेरणादायी आहे. ‘सर्वार्थाने जोडीदार’मधील निमा पाटील यांचा ‘जोडीदार मित्र’ हा लेख आवडला. मंदारचा पाठिंबा तसेच सासरच्या लोकांचा भक्कम पाठिंबा त्यामुळेच अंजली इतकी प्रगती करू शकली. ‘मनतरंग’मधील सुहास पेठे यांचा ‘आजचं आज’ हा लेख बोधप्रद वाटला. मला मान्य आहे जुन्या कडवट आठवणी आज काढू नये. पण ज्या कोणी कडवट आठवणी लादल्या त्या व्यक्तींना त्यांच्या चुका कशा कळणार? ज्याला त्या भोगाव्या लागल्या तो मात्र तशा चुका करणार नाही. पूर्वी केलेले कौतुक आज आठवण्यात आनंद असतोच. मुक्ता गुंडी व सागर अत्रे यांच्या ‘मेक्सिकोचा सोडा टॅक्स’ या लेखात दिल्याप्रमाणे मेक्सिकोसारखे नियम भारतात व्हायला खूप वर्षे लागतील. माणसाला वाईट सवयी ताबडतोब लागतात. चांगल्या सवयी लावायला खूप वेळ लागतो. ‘बोधीवृक्ष’मधील सविता नाबर यांचा ‘संधी’ हा लेख वाचला. माकड व शेतकऱ्याचे उदाहरण चांगल्या प्रकारे पटवून दिले. आजचे तरुण नशिबावर व भविष्यावर विश्वास ठेवतात व गप्प बसतात. संधी आपण निर्माण करायची असते हे काही जणांना कळत नाही. सुरेखा दळवी यांचा ‘अनुकूल प्रतिसादाची प्रतीक्षा’ या लेखातील आज सुखलोलुप बनत चाललेला समाज भविष्याचा विचार न करता निसर्ग नुसता ओरबाडतो आहे आणि आपल्या हातातील जगण्याची साधने बाजारात आणून त्यांना क्रय-विक्रयाची वस्तू बनवतो आहे हे बदलायला हवे. त्या लेखातील एक भाकरी पाच जणांत वाटणी कशी करायची यावर अंबी नावाच्या कातकरी स्त्रीने दिलेले उत्तर योग्य होते.

भारती धुरी, मुंबई

 नि:शब्द झाले

२५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘धनश्री लेले’ यांच्या ‘मन आनंद स्वानंद’ या सदरातील ‘अलगद’ हा लेख खूपच भावला. खरोखरच लेख वाचून मी नि:शब्द झाले. भावना शब्दात पकडता येत नाहीत हेच खरे! त्या त्या क्षणी त्यांचा अनुभव घेणंच जास्त आनंददायी व स्वानंदी असतं हे लेखिकेने सहज, सुंदर, सोदाहरण देऊन सांगितले आहे. अत्यंत अप्रतिम लेख.

– प्रज्ञा घोडके, चिंचवड, पुणे

 नैराश्यावरील उपाय उपयुक्त

‘असू दे जगणे साचार’ या ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात अंजली पेंडसे यांनी उदाहरणासहित समाजातील नैराश्याच्या कारणांची उकल/कारणमीमांसा केली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून (मानसिक तोल ढळलेल्या) मनोरुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. यात बाल ते वृद्ध या सर्व वयोगटातील मनोरुग्णांचा अभ्यास केल्यावर केवळ एकमेकांबद्दलचे गैरसमज, अवास्तव अपेक्षा, स्वत:ची करून घेतलेली ठाम मतेच कारणीभूत ठरलेली आहेत हे निरीक्षणावरून लक्षात येते. लेखिकेने यावर उपाय म्हणून दिवसभरात ५ मिनिटांचे दीर्घ श्वसन करावे शिवाय दिवसातील काही क्षण एकमेकांबरोबर घालवावे असे सांगितले आहे ते योग्यच आहे, तो एक खात्रीशीर उपाय होऊ  शकतो. पुरवणीतील सर्वच लेख वाचनीय आहेत.

धनश्री लेले यांचा ‘सहज भाव’ खरेच भाव खाऊन गेलाय.  आभा भागवतांचा लहान मुलांविषयीचा अभ्यास थक्क करून सोडतो.

‘भोजनकुतूहलम’मध्ये खरेच लेखिकेने दिलेली ग्रंथाची नुसती झलकच आपल्याला पूर्ण ग्रंथाची अनुभूती देऊन जाते त्यांचे विशेष आभार. ‘उथळ पाण्याला’मध्ये लेखिकेला आलेले अनुभव आपण समाजात बघत असतो, पण त्यांनी आईला सहभागी करून घेऊन बदल घडविण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्या अनुभवावरून मला खात्री आहे की, वाचक नक्की प्रेरणा घेतील. समाज हळूहळू नक्की बदलेल अशी आशा करावयास हरकत नाही/नसावी.

 क्षमा एरंडे, पुणे

 पालकांचा संकोच चुकीचा

‘असू दे जगणे साचार’ हा अंजली पेंडसे यांनी अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. कोणतीही गोष्ट न पटण्यासारखी नाही. पण मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या मुलाला समजा अशी काही समस्या असेल तर पालक ते मोकळेपणाने सांगायला घाबरतात. कारण हल्ली समुपदेशन हा परवलीचा शब्द झाला आहे असं दिसतं. शाळेत तर वेगळा समुपदेशन विभाग असतो. शाळेतील मुलं समुपदेशनासाठी जाणाऱ्या मुलाला ‘कौन्सेलिंगचा मुलगा’ आहे असे चिडवतात. त्यामुळे ज्या मुलांना खरंच समुपदेशनाची गरज असते ती ते स्वत:हून स्वीकारत नाहीत, त्यांच्यात एक न्यूनगंड असतो की जर मी समुपदेशकाकडे गेलो तर लोक, मित्र मला काय म्हणतील? पालक भावनिक होऊन आपल्या मुलाकडे बघत असतात, पण डॉक्टर पण तेवढाच भावनिक आहे का, की एक व्यवसायिक म्हणूनच केसकडे बघतो आहे, हे पालकांना समजत नसते. त्यामुळे समुपदेशक कसा असेल यावर बरंच अवलंबून असतं. त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी ही एक निरोगी सकारात्मक आयुष्य जगेल ही आशा ठेवून ते मानसोपचारतज्ज्ञाकडे जातात. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे पालकांसाठी देवदूतच असतात.

-स्वप्ना प्रभुदेसाई

आजही उपयुक्त असे पुस्तक

डॉ. मोहसिना मुकादम आणि डॉ. सुषमा पौडवाल यांचा ‘भोजनकुतूहलम्’ वरील लेख खरोखरीच कुतूहल निर्माण करून गेला. सतराव्या शतकातील रघुनाथ सुरी ऊर्फ रघुनाथ गणेश नवहस्ते या पुरुषाने खाद्यपदार्थविषयक विस्तृत हस्तलिखित लिहावे, म्हणजे मोठा खजिनाच म्हणावा लागेल. या विषयावरील पुढील लेख वाचावयास फारच उत्सुक आहोत. आजकाल झटपट बनणारे पदार्थ प्रकृतीला बऱ्याच वेळी हानीकारक असतात. आज सकस आहाराची नितांत आवश्यकता आहे, ती हा ग्रंथ पुरी करेल अशी आशा वाटते. दोन्ही लेखिकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

शिल्पा पुरंदरे, मुंबई

First Published on March 11, 2017 1:05 am

Web Title: readers reaction on chaturang article 2