मी ‘चतुरंग’चा नियमित वाचक आहे. पुरवणीतील लेख वाचकांमधील माणूस जागा करतात. मलाही माणूस म्हणून या पुरवणीनं जगायला शिकवलं. माणुसकीने वागायला शिकवलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यंदाही हीच परंपरा पुरवणीत कायम राहील ही सदिच्छा.
-गणेश लोंढे, जालना.

वेदना विसरूनी लढतायेत
‘वेदनेला निर्मितीचे पंख’ हा १६ जानेवारीचा लेख वाचताना मन दोन्ही बाबतीत विचार करत होतं. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना अजूनही एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ले होतात ही बाब सारखी बोचत होती. सोबतच असे हल्ले होऊनही न डगमगता ‘शिरोज कॅफे’तल्या या मुलींनी स्वत:च्या जिद्दीवर व मेहनतीच्या जोरावर व्यंगावर मात करून ताठ मानेने कसं जगावं याचा खराखुरा आदर्श समाजासमोर उभा केलाय. भळभळणाऱ्या जखमा सावरत जीवन किती सुंदर आहे हे सांगत या मुली जगण्याची नवी उमेद देत आहेत.
-संतोष मुसळे, जालना.

भारतीय स्त्री पुढेच
माधुरी ताम्हाणे यांच्या ‘काळ थांबला थांबला..’ या लेखात भारतीय स्त्रीचा आतापर्यंतचा प्रवास छानपैकी अधोरेखित केला आहे. पण मला शीर्षक खटकले. ‘काळ’ कोणासाठी थांबत नाही. जशी परिस्थिती बदलत गेली, महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व महिलांना आणि पुरुषांना उमगले, तसेच पुरुषांच्या मनोवृत्तीत देखील फरक पडू लागला. बऱ्याच अंशी स्त्रीला बरोबरीचा मान मिळू लागला किंवा स्त्रीने तो आपल्या कर्तृवाने मिळवला. तरी देखील भारतीय स्त्रीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. वाटचाल योग्य दिशेने नक्कीच चालू आहे. माझ्या मते भारतीय स्त्री जागतिक स्पर्धेत इतर देशांतील स्त्रियांपेक्षा जास्त पुढे आहे.
-शिल्पा पुरंदरे, मुंबई.
आशा पल्लवित केल्या
जुनी चतुरंग पुरवणी त्यातले स्तंभ विषय, याविषयी एक नाते तयार झाले होते. मात्र नवीन ‘चतुरंग’ने आशा पल्लवित केल्या. १६ जानेवारीच्या अंकात एकापेक्षा एक सुंदर लेख आहेत. टेकचंद सोनवणे यांचा ‘वेदनेला निर्मितीचे पंख’ लेख हृदयस्पर्शी आहे. विष्णू मनोहरांनी मस्त चेंज दिला.
– संगीता देशपांडे

हे उच्चभ्रू वर्गासाठी
‘शिशिरातला वसंत’ हा मृणालिनी चितळे यांचा लेख वाचला. प्रथमवाचनी छान वाटला. घरात चर्चा झाली. तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. एक तर इतकी र्वष संसार करून आता उतार वयात नवरा बायकोत वाद होतात त्याचं खरं कारण दोघांचाही पेशन्स वयामुळे कमी झालेला असतो. पण सहवासाचं म्हणून काही प्रेम असतंच. वयाबरोबर प्रगल्भता ही यायला हवी. एकमेकांना सांभाळून घेता येत नाही? दोघांनी दोन खोल्यात वावरणं उच्चभ्रू वर्गातील लोकांना शक्य आहे. लहान घरात राहणाऱ्यांना कसं जमेल? दोन खोल्यात वावरून दोन पंखे/एसी, दोन दिवे, दोन टीव्ही यांच्यासाठी वीज किती जास्त खर्च होईल? भले काही लोकांची ऐपत असेल ते बिल भरायची, पण त्यांच्या ऐपतीमुळे जास्तीची वीज निर्माण होणार नाही ना? वीज बचत फक्त मध्यमवर्गाने करायची का?
-कल्याणी नामजोशी

याकूब सईदसाहेब यांना,
सविनय नमस्कार

९ जानेवारीच्या, ‘चतुरंग’ पुरवणीतील आपला लेख वाचला. ‘उत्तम’ लेख कसा असावा याचा हा वस्तुपाठच आहे! उस्ताद बिस्मिल्लाह खाँ साहेबांचा नमाज, आशा पारेखांचे नृत्य, कॅमेरा पडला या किश्श्यांनी तर धमालच आणली. स्मिता पाटील यांच्या हृद्य आठवणी वाचून डोळ्यांत पाणी तरळलं. या सर्व कठीण प्रसंगांना लावलेली नर्मविनोदी झालरही अप्रतिम! स्वत:च्याच फजितीचे, तुम्ही केलेले असे रसाळ वर्णन वाचून, मी आणि माझे पती सुनीलजींनी त्याची एकत्र मजा लुटली.
माझ्या जडणघडणीमध्येही ‘दूरदर्शन’चा महत्त्वाचा वाटा आहे म्हणून मला आजही दूरदर्शनबद्दल अत्यंत आपुलकी वाटते. आपलेही इथले अनेक कार्यक्रम आम्ही खूप एन्जॉय केलेत. लेख वाचताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. प्रसन्नचित्त करणाऱ्या या लेखाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
-पद्मजा फेणाणी जोगळेकर