‘अपंग नव्हे अभंग’ हा राजेंद्र आणि सुलभा मांजरेकर या पोलिओग्रस्त असलेल्या जोडप्यावरील लेख ( २० फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेला) वाचला. दोघंही पोलिओग्रस्त असूनही त्यांनी लग्नाचा धाडसी निर्णय घेतला हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या दोघांच्या आयुष्याकडे नजर टाकल्यास कदाचित सुदृढ माणसांनादेखील ऊर्जा मिळेल! प्रतिकूल अशा परिस्थितीत आणि आजच्या जगात अशाप्रकारे आनंदी जीवन जगणे महाकठीण आहे. खरोखरच आज त्यांचं सहजीवन त्यांच्या सारख्याच अनेक अपंग व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलवत अपंग नव्हे अभंग सहजीवनाचा संदेश देत आहे.
– रविकांत तावडे, नवी मुंबई.

अंतर्मुख करणारा लेख
‘मग पुरुषांच्या मंदिर प्रवेशाचे काय?’ हा लेख अत्यंत वास्तवदर्शी असून तो सध्याच्या स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाबाबात अंतर्मुख करणारा आहे.
कोल्हापुरातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंबाबाई ही देखील स्त्री-रूप असताना तिथे स्त्रियांना गाभाऱ्यात आजही प्रवेश नाही. हे सारे अनाकलनीय आणि उद्वेग आणणारे आहे. आज स्त्रियांच्या शिक्षणाचा खूप प्रसार झाला असून आजची स्त्री ही शिक्षित आहे. तेव्हा स्त्रियांनी संघटित होऊन या अशा रुढी-परंपरेविरुद्ध बंड करून उठायला हवे. तरच अशा अवमानकारक परंपरा व रुढी बंद होण्याची किमान सुरुवात होईल.
– रवींद्र चपाले, कोल्हापूर<br />आमचेही सोबत जगताना..
‘सोबत जगताना’ हा ‘चतुरंग’मधील सुलभा शेरताटे यांचा लेख खूप आवडला. चतुरंग पुरवणी नेहमीच वाचनीय व संग्रही ठेवावी अशी असते. मी सध्या ६३ वर्षांची असून लेखात सांगितल्याप्रमाणे सहजीवनाचा खरा आनंद आम्ही दोघांनी घेतला व घेत आहोत. मलाही ह्यांनी कंप्युटराईज्ड टाईपसेटिंग शिकवून माझी स्वतंत्र ओळख स्वत:ला व जगाला करवून दिली. ज्या काळात संगणक ही गोष्ट अत्यंत नवीन होती त्या काळापासून (अंदाजे १९८५..) आमचे संपूर्ण घर संगणक साक्षर ह्यांच्यामुळे होते. अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या. जगाच्या मागे राहू दिले नाही. फक्त सांसारिक जबाबदाऱ्यांमध्येच एकत्र न राहाता अनेक इतर गोष्टींमधील आनंदही
एकत्रित अनुभवला. या लेखामुळे त्याचे परत अवलोकन झाले.
– कल्पना धर्माधिकारी, पुणे</p>

गरज आहे इच्छाशक्तीची
मंगला सामंत यांचा ‘मग पुरुषांच्या मंदिर
प्रवेशाचे काय?’ हा लेख प्रत्येकाने वाचून
त्यावर विचार करावा असा आहे. त्यांचे अभिनंदन. लेखाचा शेवट करताना मंगलाताईंचा प्रश्न
सडेतोड आहे.
मंगलाताईंच्या मते भारतात स्त्री विरोधी वातावरण बाहेरील आक्रमणे सुरू झाल्यानंतर तयार झाले. जगाच्या इतिहासात स्त्रीला महत्त्व दिल्याच्या घटना बोटावर मोजाव्या लागतील. ब्रिटनसारख्या देशात काही शतकापूर्वी शेकडो स्त्रियांना चेटकीण ठरवून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. भारतातील उदाहरण द्यायचे तर वादविवादात गार्गी वरचढ होत आहे असे दिसताच याज्ञवल्क्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
भगवद्गीतेतील काही श्लोकांतून स्त्रीविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो.
१) अध्याय १, श्लोक ४१ – पाप वाढल्याने स्त्रिया अधिक दूषित होतात, स्त्रिया बिघडल्या तर वर्णव्यवस्थेचा नाश होतो.
२) अध्याय ५, श्लोक १३ – नऊ दरवाज्यांच्या या शरीररूपी घराच्या उल्लेखात स्त्रियांच्या योनीमार्गाचा उल्लेख नाही.
३) अध्याय ९ श्लोक ३२ – स्त्रिया, वैश्य तसेच पापयोनी चांडालादी कोणीही असो ते मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात.
निष्कर्ष असा की, स्त्रीच्या मनावर, शरीरावर सतत अत्याचार होत आले आहेत. हे अत्याचार टाळण्यासाठी कौटुंबिक स्तरापासून सुरुवात करून नंतर शालेय स्तरावर प्रयत्न करून बघितले तर? ‘कॅच देम यंग’ असे म्हणतात. संस्कारक्षम वयातच स्त्री-पुरुष समानतेची मेढ रोवली तर? अर्थात हे काम अतिशय अवघड आहे. स्त्री-पुरुषांमधील पेंडय़ुलम हा समाजस्वास्थासाठी कोणत्याच टोकाला जाणे श्रेयस्कर नाही. तेव्हा वरील प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? त्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची आणि योग्य प्रशिक्षणाची.
– सिंधु जोशी, ठाणे<br />आदिमाय द्रौपदी नाही, स्त्रियांसाठी न्याय मागणारी द्रौपदी
३० जानेवारीला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. डॉ.अरुणा ढेरे यांनी आपल्या द्रौपदीवरच्या लेखाच्या पूर्वार्धात दोन थोर लेखिका दुर्गाबाई भागवत आणि इरावती कर्वे यांनी द्रौपदीबद्दलची मांडलेली निरीक्षणं नोंदवली आहेत.
मग द्रौपदीचा जन्म कसा? तिचं सौंदर्य, द्यूतसभा, पुन्हा द्रौपदीच्या आयुष्यातले प्रसंग, मग लोककथांमधलं द्रौपदीचं स्थान, तिचे उत्सव. द्रौपदी हे आईचं रूप, तिच्या पूर्वजन्माच्या कथा, पार्वती व सीतेचे संदर्भ असा हा लेख वाचताना काही गोष्टी जाणवल्या, कारण गेली तीस र्वष मी महाभारत वाचतेय. द्रौपदी आणि अन्य दहा स्त्रियांपैकी ‘व्यासांच्या लेकी’ हे पुस्तक बाजारात आहेच. तत्पूर्वीच द्रौपदीचं चरित्र मी लिहिलं आहे.
महाभारतात द्रौपदीची २१ भाषणं व्यास नोंदवतात. त्यापलीकडे ती मुकी आहे का असं वाटावं असं खुद्द व्यासच तिचं अस्तित्व जाणवू देत नाहीत, इतकं की तिची पाचही मुलं तिच्या भावासह मारली जातात तेव्हा (युद्धानंतर अश्वत्थाम्यानं मुलांना व भावाला मारलं) तिचा अंश पृथ्वीवर राहत नाही. पांडवांचं राज्य पुढेही चालू राहतं ते कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्या नातवामुळे.
द्रौपदीला द्यूतप्रसंगी तिच्या नवऱ्यानं युधिष्ठिरानं पणाला लावल्यानं तिचे चुलत दीर तिची शारीरिक व मानसिक अवहेलना सर्व दरबारातल्या पुरुषांसमोर करीत होते. नवऱ्यांपैकी एकटा भीम चवताळून हात चोळत होता. तो इतकंही म्हणाला, ‘सहदेवा अग्नी आण. या युधिष्ठिराचे द्यूत खेळणारे हात जाळतो.’ त्याला अर्जुनाने गप्प बसवलं.
पण द्रौपदीनं मूलभूत प्रश्न विचारले, त्याचं उत्तर भीष्मांनाही देता आलं नाही. जेव्हा तिच्या कपडय़ांना हात घातला गेला तेव्हा भीम धृतराष्ट्राच्या पुढय़ात उभा राहून गर्जना करीत म्हणाला, ‘तू हे सगळं तिचं वस्त्रहरण थांबव नाहीतर सर्व कौरवांना आताच ठार करीन.’ तेव्हा धृतराष्ट्रानं ते थांबवलं. ढेरे लिहितात तसं गांधारीच्या सांगण्यावरून वस्त्रहरण थांबलं नाही ते भीमानंच थांबवलं.
द्रौपदीची अभिलाषा सर्व थरातल्या पुरुषांना वाटत होती, असं ढेरे लिहितात. हो, प्रथम तिचे सख्खे दीर, त्यात कृष्णसुद्धा आणि कौरवही मग कीचक, नणंदेचा नवरा जयद्रथ, वनातले राक्षस वगैरे तिच्या सौंदर्याने मोहित होत. आजही घरात सुंदर मुलगी आली तर सासरचे पुरुष चळतात. हे दूरचित्रवाहिन्यांवर सत्य घटनांवर सुरू असलेल्या ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान क्षंडिया’ या मालिकेत दाखवत असतात. आजही द्रौपदीचा विषय निघाला की सुशिक्षित समाजातला पुरुषही तिच्याबद्दल, तिला पाच नवरे असल्याबद्दल अत्यंत गलिच्छ विधानं करतात.
मुळात युधिष्ठिराला तिच्याशी लग्न करायचं होतं मात्र तिला जिंकली अर्जुनानं. पण कुंती? तिला जसे पाच नवरे सांभाळावे लागले (पंडु, युधिष्ठिर, भीम, अर्जुन यांचे वेगवेगळे पिता आणि पहिला सूर्य कर्णाचा पिता) तसं तिनं द्रौपदीला पाचांच्या हवाली केलं. पण तत्पूर्वी द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न आणि तिचे वडील द्रुपद या गोष्टीला (पाचांशी लग्न करायला) तयार नव्हते. त्यांना तो अनाचार वाटत होता. पण व्यास नेमके तेव्हा अवतरले. (वस्त्रहरणाच्या वेळी आले नाहीत.) आणि त्यांनी द्रौपदीच्या पूर्वजन्माच्या कथा सांगून (ज्या ढेरे यांनीही दिल्या आहेत) पाचांशी तिचा विवाह करवला. पुढे द्यूतप्रसंगी कुंती, गांधारी या तिच्या सासवाही वस्त्रहरण थांबवायला आल्या नाहीत. पुढे द्रौपदीच्या लक्षात आलं ते पाच विवाह होताना माझं मत न विचारता शोभेची वस्तू द्यावी तसं एकेकाला देऊन टाकलं. आणि हे भोग नशिबी आले. त्यानंतर मात्र तिनं ठणठणीतपणे बोलायला, न्याय मागायला सुरुवात केली; असे अनेक प्रसंग आहेत. इथे ते सांगता येणार नाहीत. महाभारतातली प्रत्येक व्यक्तिरेखा कधी ना कधी कपटाचा आश्रय घेते. फक्त द्रौपदी अशी होती तिचं वागणं कुठल्याही प्रसंगी निष्कपट होतं.
ती अत्यंत बुद्धिवान होती. शिकलेली होती. कृष्णाचे स्त्रीरूप म्हणजे द्रौपदी. दोघांमध्ये विलक्षण साम्य, रूप, रंग, गुण, बुद्धी इत्यादी. कृष्ण गोकुळात असेपर्यंत संगीतात रमे (बासरी). राजकारणी झाल्यावर तो बदलला. पण द्रौपदी, तिचं बोलणं नादावणारं, त्याची भूल भल्या भल्यांना पडत होती. (व्यास म्हणत वीणेवर गंधाराची सुंदर मूच्र्छना लागावी असा तिचा आवाज) तिनं युद्धापर्यंत पांडवांचा राज्यकारभार चोख पाहिला. मुलं गेल्यावर ती मिटून गेली. तिचा एकही शब्द व्यासांनी नोंदवला नाही.
द्रौपदीचं चरित्र खूप मोठं आहे इथे फक्त काही उल्लेख ढेरे यांच्या लेखामुळे दिले. ज्या ज्या वेळी द्रौपदीच्या स्वाभिमानावर, स्त्रीत्वावर हल्ला झाला तेव्हा तेव्हा तिनं निर्भयपणे न्याय मागितला. तेव्हापासून आजपर्यंत या देशातली स्त्री न्याय मागत फिरते आहे. तेव्हा द्रौपदी आदिमाय नाही तर न्याय मागणारी झुंझार स्त्री आहे. तिनं आजही न्यायाचा प्रश्न धगधगता ठेवला आहे.
– मधुवंती सप्रे

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?