दर शनिवारी सकाळी सकाळी लगेचच प्रतिक्रिया पाठवायची नाही, असे मी ठरवते खरी, पण ‘चतुरंग’ वाचला की आपोआप त्या लिहिल्या जातात. २२ एप्रिलच्या अंकात सुहास पेठे यांचा ‘आपलं जग’ हा लेख आपल्याच बाबतीत लिहिला आहे असे वाटावे इतका चांगला होता. त्यांचे विचारही पटले. सौख्यात भर पडणं, हा आनंदाचा प्रवास करणं, आपल्याच हाती आहे हे पटलं. अंजली पेंडसे यांचा ‘यश -अपयशाचा खेळ’ यातील विचार तंतोतंत पटण्यासारखे होते. आपण नि:स्वार्थीपणे एखाद्याला मदत करतो त्या वेळी काहीजण त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण त्याकडे आपण लक्ष देऊ नये, पण कुठेतरी मनाला खंत वाटत राहते. धनश्री लेले यांचा ‘बोच’ या लेखातील एका खिळ्यामुळे चांगली चप्पल टाकून देण्याआधी तो खिळा काढता येतो का याचा प्रयत्नही करून बघायला हवा.. हे पटले.
भारती धुरी, मुंबई

माहितीपूर्ण लेख
‘योगदान स्त्री नाटककारांचं!’ हा डॉ. सुवर्णा दिवेकरांचा २२ एप्रिलच्या अंकातील लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय झाला आहे. गेल्या सुमारे शंभर वर्षांत वेगवेगळ्या परिस्थितींत स्त्री नाटककारांनी ‘नाटक’ या प्रांतात दिलेले योगदान महाराष्ट्र आणि नाटय़ रसिक विसरणं शक्य नाही. कमी शब्दात जास्तीतजास्त आशय या लेखातून प्रकट झाला आहे.
सां. रा. वाठारकर, चिंचवड

..इंटरनेट एकमेव मार्ग नाही
डॉ. हरीश शेट्टी यांनी ‘कुणी आहे का, माझ्यासाठी’ या लेखातून माध्यमे, मानवी मन आणि नैराश्य यांचा संबंध उलगडला आहे. भावना व्यक्त करणं हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळेच तो वेगवेगळ्या माध्यमांतून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. इंटरनेटसारख्या माध्यमाशी याच कारणामुळे माणसाने नाते निर्माण केलेले दिसते. भावना का व्यक्त कराव्यात याचे हेतू निश्चितपणे व्यक्तिपरत्वे बदलतात. आपलं सुख, दु:ख, यश, अपयश व्यक्त करून मिळणारा मोकळेपणा सर्वाना हवाहवासा वाटतो. जागतिकीकरणामध्ये सतत स्पर्धात्मक अपडेट राहण्याच्या वृत्तीमुळे दुरावत चाललेलं माणूसपण यामुळे साधण्यास मदत होते. आपल्या संवेदना कुणीतरी समजून घ्याव्यात यासाठीच ही धडपड सुरू असते. एखाद्या संथ लयीप्रमाणे आपलं व्यक्तित्व उलगडण्यासाठी इंटरनेट मदत करतं. या भावनांची आदानप्रदान करणाऱ्या इंटरनेट माध्यमावर टीका करणाऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. प्रत्यक्ष भेटीचा आदर्शवाद मांडताना वास्तवाची जाणीव न स्वीकारणे ठरत नाही. त्यामुळे मानवी मनाची गुंतागुंत सोडविण्याचा इंटरनेट हा एक सुलभ मार्ग आहे. (एकमेव नाही.)
अर्जुन भारद्वाजच्या संदर्भाने नैराश्याचा मृत्यूशी असणारा संबंध आणि त्यांतील माध्यमांची भूमिका हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. नैराश्याची कारणे पाहण्याआधी तो रोग आहे, हे मान्य करावे लागेल. जेव्हा नैराश्य पराकोटीला पोहोचते तेव्हा मृत्यू ओढवतो. आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलेला संदेश हा पारंपरिक असो वा इतर तो कुणावरही टीका करण्याचा नसतो, कुणालाही दोष देण्याचा नसतो तो असतो फक्त जगाची माफी मागण्याचा.
गणेश तारळेकर, कोल्हापूर</strong>

..त्यापलीकडे विचार हवा
८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला आणि आरती कदम यांनी लिहिलेला ‘क्षमेपलीकडचा अर्थ’ हा लेख वाचला. समाजातील वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटनांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडणारा हा लेख आहेच. नक्कीच एका अर्थाने अपराधी व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्यास वाव दिला पाहिजे. तसेच पीडित स्त्रीला या पुरुषसत्ताक समाजात स्त्री म्हणून जगता आले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शालेय जीवनापासून लैंगिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. हे वयच आकर्षणाचे असते. यातूनच यासारखे प्रकार घडतात. काही प्रकरणे नक्कीच या व्यवस्थेला काळिमा फासणारी आहेत. सगळ्याच बाबतीत एल्वा व टॉम यांचा दाखला पुरेसा नाही. त्यापलीकडेही विचार करावा लागेल.
नवनाथ हिराबाई गोपाळ मोरे, जुन्नर

क्षमा हे खूप मोठे अस्त्र
आरती कदम यांनी लिहिलेला ‘क्षमेपलीकडचा अर्थ’ हा लेख वाचला आणि लिहावेसे वाटले. आपल्या लेखामधून एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही मांडला आहे. खरंच स्त्रीने अशा घटनांसाठी स्वत:ला दोष न देता अशा घटनेकडे एल्वाप्रमाणे पाहिले पाहिजे, पण ते सर्वाना आणि आपल्या समाजाला मान्य होईल असे नाही. पुरुषी मानसिकता या घटनेकडे कसे पाहते हा ही महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे पुरुष स्वत:ला बलात्कार या गोष्टीसाठी जबाबदार समजत नाही. हाच खूप मोठा दोष आहे. तुमच्या लेखामुळे एक नवीन विचार मिळाला ..असेही घडू शकते ..क्षमा हे खूप मोठे अस्त्र
आहे आणि ते सर्वानाच वापरता येईल असे नाही. तुमच्या लेखामुळे मला इतरांना क्षमा करण्यास मदत होत आहे.
बालाजी गव्हाणे

कानमंत्र
‘कान सांभाळा’ २५ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला हा धनश्री लेले यांचा लेख अतिशय सुंदर आहे. दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक माणसे भेटतात, बोलतात, त्यांची मते मांडतात किंवा एक प्रकारे लादण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी इतरांची मते ऐकून आपण आपले मन दूषित करतो तर कधी दुसऱ्याला दोष देतो. म्हणून आपण किती व काय ऐकावे हे आपल्या हातात आहे व ते ऐकून आपल्या मनाचा तोल ढळू न देता अगदी तटस्थपणे कार्य करणे महत्त्वाचे असते. तसेच आपण बोलतानाही विचारपूर्वक बोलणे आवश्यक आहे असे या लेखातून आपल्याला समजते. सर्वानीच हा लेख वाचून त्यावर चिंतन, मनन करावे व ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा.
– अक्षयकुमार शिंदे, सांगली.

(विकास कुलकर्णी, अरुणा जोशी, आरती पाटील यांनीही ‘चतुरंग’विषयी आपल्या प्रतिक्रिया थोडक्यात कळवल्या आहेत. )