बंडखोरीचे झेंडे फडकत राहू द्यात
‘होय, मी बंडखोरी केली’ या शीर्षकाखालील बंडखोर स्त्रियांची पत्रे वाचली. आपल्याला पाहिजे ते साध्य करण्यासाठी आमच्या माय-भगिनींनी बंडाचा झेंडा उभारून दिलेला लढा कौतुकास्पद आहे, यात शंका नाही. विशेषत पूर्वापार चालत आलेल्या मासिक पाळीविषयीच्या रूढीला धाब्यावर बसवून त्यांनी केलेल्या धार्मिक कृत्यांबद्द्ल तर त्यांना शाबासकी द्यायलाच हवी. सर्वच क्षेत्रे स्त्रियांनी काबीज केली असून सर्वत्र फडकूद्यात बंडाचे झेंडे.
-सुधीर देवरुखकर, नालासोपारा

शीर्षक भावले, पटले
केलेल्या कोणत्याही कामात यश मिळणे म्हणजेच सुख. म्हणूनच दूरदर्शनच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या लेखाचे ‘सुख सुख म्हणजे याहून काय असतं.’ हे शीर्षक भावले. खरेखुरे वाटले. त्यांना त्यावेळच्या परिश्रमांना मिळालेल्या यशाने आमच्यासारख्या असंख्य ‘दूरदर्शन’च्या प्रेक्षकांची मने मोहवून टाकली होती, हे विसरता येणार नाही. याच पुरवणीतील डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘आदिमाय द्रौपदी’ हा लेख उत्कृष्ट लेखनाचा नमुनाच. अरुणाताईंनी लेखात उल्लेखलेले पांडव मंदिर तळेगाव येथे असून १९५४ मध्ये आम्ही दहावीत असताना तेथे सहलीसाठी गेलो होते. त्यावेळी ते मंदिर पाहिल्यावर, तेथील विस्मयकारी यंत्रणा पाहिल्यावर आम्ही सर्वजण चकित झालो होतो. ही आठवण लेखामुळे ताजी झाली.
-वसंत लोंढे, ठाणे</p>

इतिहास’ होऊ नये म्हणून
६ फेब्रुवारीच्या अंकातील अंजली कुलकर्णी यांचा ‘गोवा-मुक्तीसाठी सरसावल्या महाराष्ट्रकन्या’ या मथळ्याखाली एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये अनवधानाने प्रसिद्ध झालेल्या एका घटनेसंदर्भात खुलासा करण्यासाठी हा पत्रप्रपंच!
या लेखात ‘या सत्याग्रहींना अमानुष मारहाण झाली, गोळीबार झाला, त्यात केशव गोरे, हिरवे गुरुजी, रामन त्यागीबाबा, कर्नलसिंग यांच्याबरोबर मंदा याळगी, कमला उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांच्यासह अनेक महिला धारातीर्थी पडल्या’ असा उल्लेख आहे. मात्र त्यातील मंदा याळगी या गोळीबारात ठार झाल्याची फक्त अफवा होती. त्या अद्यापही सुस्थितीत आहेत. मंदा याळगी ही माझी आत्या. तिला आम्ही बेबीआत्या म्हणतो. ती सध्या न्यूजर्सी, अमेरिका येथे असून तिचे वय ८४ वर्षे आहे, तिला सपना आणि सुजाता या दोन विवाहित कन्या असून जावई, नातवंडांसमवेत ती आपले आयुष्य व्यतीत करत आहे. गोवा-मुक्ती आंदोलनातील मिदनापूर बंगालमधील सत्याग्रही राजाराम सिंहा यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला व नंतर काही वर्षांतच बेबीआत्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. लेखामधील वरील उल्लेखाचा ‘इतिहास’ होऊ नये म्हणून हा खुलासा!
-अशोक याळगी, बेळगाव