चांगल्या संस्थांचा सातत्याने परिचय
संपदा वागळे यांच्या लिखाणाची मी चाहती आहे. संपदा वागळे यांच्या लेखामुळे चांगलं काम करणाऱ्या संस्था, कुठलाही गाजावाजा न करता एका कोपऱ्यात राहून समाजासाठी एखाद्या व्रतस्थाप्रमाणे काम करणाऱ्या व्यक्ती यांचा परिचय सातत्याने होत राहतो. त्यामुळे चांगलं आजूबाजूला घडतं आहे याचा मनाला दिलासा मिळतो.
‘दृष्टीआडची सृष्टी’ सदरातील मंगला गोडबोले यांचा लेख खूप आवडला. ‘दत्तक घेण्यापूर्वी, काय तुझ्या मनात, आणि आई तुझ्याच ठायी या त्यांच्या पुस्तकांबद्दल माहिती मिळाली आणि वाचण्याची उत्सुकता उत्पन्न झाली. अजूनही मूल दत्तक घेण्याची कल्पना समाजामध्ये मान्य नाही त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरत आहे.चतुरंग पुरवणी म्हणजे ज्ञान, आरोग्य, मनोरंजन याची आम्हा वाचकांना मेजवानीच असते.
– प्रणीता रानडे, ठाणे

विचार बदलणारे लेख
‘मुक्ती ‘आईपणा’च्या ओझ्यातून?’ या लेखातून खूप छान विचार मांडला आहे. मी माझ्या आईपणाच्या प्रवासात या सगळ्याचा तंतोतंत अनुभव घेतला आहे. प्रत्येक वर्किंग वूमनची दुसरी बाजू आपल्या लेखात उलगडून सांगितली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी या अपराधीपणावर छान, साधा उपाय सुद्धा सांगितला आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीने ‘अजून अडवतंय काचेचं छत आणि ..आईपणाच्या ओझ्यातून’ हे दोन्ही लेख जर जास्त खोलात समजून घेतले तर त्या स्त्रीचा आणि तिच्या भोवताली असलेल्या नात्यांचा विचार बदलण्यास वेळ लागणार नाही. आजकाल कोणतीही नोकरी करणारी स्त्री नकळतच सुपर वुमन सिंड्रोमने ग्रासलेल्या दिसतात. त्याऐवजी मनापासून आनंदी होण्यासाठी त्यांनी लेखिकेने सांगितल्यानुसार स्वत्वाची भावना आधी जागी आणि नंतर समृद्ध करायलाच हवी. आपण नेहमी भूतकाळात रमतो किंवा इतरांच्या नजरेतून स्वत:च्या आयुष्याचं मूल्यमापन करत असतो. या गोष्टीपासून दूर राहून जर वर्तनात बदल केला, तर आयुष्य बदलण्यास वेळ लागणार नाही. या लेखाने माझ्यासारख्या अनेक वर्किंग वुमनला नवी दिशा
दिली आहे.
– मीनल कदम, कल्याण</p>

आठवणींचा सुगंध दरवळला
हेमा वेलणकर यांचं ‘कुळथाचं पिठलं’ मला आमच्या कोंकणातल्या अनेक वर्षांपूर्वीच्या घरात घेऊन गेलं! भोवताली वासही दरवळला! घरीच पिकविलेल्या भाताच्या लालसर तांदळाचा गरम भात किंवा ‘आटवाल’ म्हणजे पातळभात, त्यावर कुळथाचं पिठलं आणि वर ‘अच्युत’ म्हणजे तूप. मोठा झाल्यावर माझ्या लक्षात आलं की अन्न शुद्ध अन् शुध -अंच्युत असा हा अपभ्रंश झाला असणार. तूप वाढल्याशिवय घास घ्यायचा नाही. ते वाढलं की अन्नशुद्धी झाली. म्हणून ‘अच्युत’.
शिळ्या भाताच्या ढेकळाबरोबरसुद्धा गरम किंवा गार पिठलं तेवढंच चांगलं लागे. पातळ पिठल्याप्रमाणे त्याचं तव्यावर किंवा कढईत सुकं पिठलंही केलं जाई. पूर्वी प्रवास पायी किंवा बैलगाडीतून केला जाई. तेव्हा वाटेवरील मुक्कामाच्या ठिकाणी जेवण्याची सोय म्हणून भाकऱ्या आणि थोडंसं जास्त परतलेलं कोरडं पिठलं घेत. दोनेक दिवस ते मुळीच खराब होत नसे. आता मुंबईतच काय पण परदेशातही कुळथाचं पीठ मिळतं आणि त्याचं पिठलंही केलं जातं. पण त्याला ती पूर्वीची चव मात्र येत नाही.
– दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला

सर्वाची मदत गरजेची
१४ मे चा ‘मुक्ती ‘आईपणाच्या’ ओझ्यातून?’ हा लेख आजच्या काळातील आईच्या कुतरओढीवर प्रकाश टाकणारा आहे. स्त्री शिकली, तिला अनेक क्षितिजे खुणावू लागली, जे स्वाभाविकच होते. नोकरीधंदा, त्यातील करिअर याबरोबर घरातील जबाबदाऱ्या मात्र कमी झाल्या नाहीत. काही घरांमध्ये तिला पाठिंबा मिळाला, तर काही घरांमध्ये तिच्या वाटेत घरच्यांकडूनच काटे पेरले गेले. मुलांचे संगोपन, पालनपोषण, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपल्याकडच्या पुरुषप्रधान संस्कृतीत कायम स्त्रीवरच दिली गेलेली असल्यामुळे पहिल्यापासून अगदी स्त्रिया नोकरी करायला लागण्याआधीपासूनच मुलांच्या सगळ्या वाईट गोष्टींसाठी आईलाच जबाबदार धरण्यात येत असे. आताची पिढी पूर्वीच्या पिढीपेक्षा जास्त धीट आणि व्यवहारी आहे, आपल्यावर र्निबध घातलेले तिला आवडत नाहीत. नोकरीनिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागत असल्यामुळे मुलांशी भावनिक नाते घट्ट होत नाही. एखादे चुकीचे पाऊल मुलांनी उचलल्यावर आईने त्यासाठी बोलणे मुलांनाही आवडेनासे होते; त्यातूनही त्या स्त्रीला आपण नोकरी करतो ही चूक तर करीत नाही ना? अशी टोचणी लागून राहते. काही मुलांकडून तर ‘तू आमच्यासाठी काय केलंस? तू आपल्या नोकरीत गर्क होतीस.’ असे बोल काही कटू क्षणी ऐकून घ्यावे लागतात; जे त्या स्त्रीला जिवंतपणी मरणयातना देणारे असतात. ज्या वेळी एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते जसे की सासू-सासऱ्यांचे दीर्घ काळाचे आजारपण, मुलांना बघण्यासाठी कुणी नसणे आदी. त्या वेळी स्त्रीने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन घराची जबाबदारी पूर्णवेळ सांभाळणे गृहीत धरले जाते. पण एक व्यक्ती म्हणून तिच्यावर या सर्व अपेक्षांचे किती ओझे होत असेल, याचा विचार कुणीही करीत नाही.
घर आणि नोकरी या दोन्ही आघाडय़ांवर स्त्रियांची होणारी दमछाक नजरेआड केली जाते. स्त्रीला आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग करून नोकरी करणे आणि त्यात उच्च पदावर जाण्याची महत्त्वाकांक्षा असणे गैर नाहीच आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्त्रीला मदत करेल, मदतीचा समंजस विचार करणारी माणसे जेव्हा प्रत्येक घरात दिसतील तेव्हाच, खऱ्या अर्थाने आजच्या स्त्रीची आईपणाच्या ‘ओझ्यातून’ मुक्तता होईल!
– उज्ज्वला सूर्यवंशी, ठाणे</p>