lp06 ‘लोकप्रभा’च्या ११ डिसेंबरच्या अंकातील ‘झूठ बोले’ हा लेख सुंदर व मार्मिक आहे. टीव्ही प्रेक्षकांनी काही घटकेच्या करमणुकीसाठी किती वैचारिक अन्याय सहन करायचा, हा प्रश्न आहे. संवादलेखनावर सेन्सॉर हवे की काय, असे वाटू लागले आहे. ‘होणार सून मी..’च्या निर्मात्यांना त्यानिमित्ताने काही गोष्टी सांगाव्या असे वाटते.
लहानपणी आमची आई सांगायची, ‘सोन्याची सरी आहे म्हणून का त्याने फास लावून घ्यायचा?’ सध्याची ‘होणार सून मी..’ या मालिकेमधील शशिकला हे पात्र पाहताना या म्हणीची सतत आठवण येते. पिंटय़ाच्या आई, शशिकला यांचा अभिनय नक्कीच जबरदस्त आहे. त्यांना टीव्हीवर पाहिलं, की लगेचच संताप येतो. म्हणजेच त्या खलनायिकी भूमिका करण्यात यशस्वी झाल्या असे म्हणावे लागेल; पण त्यांचा अभिनय सोन्याची सरी आहे म्हणून प्रेक्षकांच्या गळ्याला किती आवळायची? या पात्राच्या तोंडी असणारे काही संवाद, नेमके दिवाळीच्या तोंडावरच पाहायला मिळाले, जे अत्यंत हीन पातळीवरचे होते. (अर्थातच हे लेखिकेचे संवादलेखन कौशल्य.)
‘सासूने केलेला सुनेचा छळ’ ही संकल्पना आता वापरून वापरून गुळगुळीत झाली आहे. हल्ली अगदी ग्रामीण भागातील सासवादेखील सुधारल्या आहेत. मध्यमवर्गात तर सासू-सुनेचे नाते मित्रत्वाचे झाले आहे. अशा वेळी अशा पुरातन पद्धतीने मालिकेची आखणी करून हीन दर्जाचे संवाद वापरून मालिका रसातळाला पोहोचवली आहे असे वाटते. शशिकलाबाईंचा अभिनय चांगला असला तरी त्यांना प्रेक्षकांच्या माथी किती मारायचे? जगात असतील नसतील तेवढय़ा सर्व शिव्याशाप त्यांच्या तोंडी घालून प्रेक्षकांचा किती मानसिक छळ करायचा? मला वाटते लेखिका शशिकलाबाईंची सून, सुनीताचा छळ करत नसून चार घटका करमणूक करणाऱ्या प्रेक्षकांची मानसिक छळणूक करीत आहेत. चांगल्या मालिकेचे वाटोळे कसे करावे हे या मालिकेकडून आणि लेखिकेकडून शिकावे. खरे तर यामुळेच आता अशा संवादाला सेन्सॉरशिप असावी की काय, असा प्रश्न पडतो, कारण काही प्रबोधन, करमणूक करण्याऐवजी अशा मालिका जर शिव्याशाप, हीन दर्जाचे बोलणे, वागणूक, कारस्थाने असे दर्शवणारे असतील तर लोकांचा चांगुलपणावरचा विश्वासच उडायला लागेल.
जगात श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या आईच्या नात्यालाही काही मालिकांनी कस्पटासमान करून सोडले आहे, नव्हे आयांना व्हिलन दाखवण्याचा पायंडाच त्यांनी सुरू केला आहे असे म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ- जान्हवीची आई, ‘सौभाग्यवती’मधील लक्ष्मीची आई, ‘नांदा सौख्य भरे’तील नीलची आई. निदान आईच्या पवित्र नात्याल्या तरी या खलनायकी विळख्यातून सोडावे असे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.
सभोवतालचे जग झपाटय़ाने बदलत असताना अशा पुराणकालीन प्रतिमा दाखवणे आता तरी बंद करावे.
कल्पना धर्माधिकारी, पुणे, ई-मेलवरून.

‘कटय़ार’मध्ये ग्रामोफोनवर रेकॉर्डिग, एक संभ्रम!
lp05विवक्षित काळातील सिनेमांचे म्हणजेच ‘पीरियड फिल्म’चे आव्हान पेलणे किती कठीण असते व त्यासाठी किती सूक्ष्म निरीक्षण शक्ती हवी असते याची प्रचिती ‘पीरियड फिल्मचा पिंगा आणि अस्मिता भुंगा’ या कव्हर स्टोरीवरून (सुहास जोशी, ४ डिसेंबर २०१५) आली. यानिमित्ताने ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील एक प्रसंग समोर आला. या चित्रपटात सुरुवातीला दरबारात भानुशास्त्री (शंकर महादेवन) यांच्या गायन पेशकारीवेळी काही सेकंदांसाठी इंग्रज अधिकारी व नंतर आसनांमागे कण्र्याच्या ग्रामोफोनवर रेकॉर्ड सुरू असल्याचे चित्रित केले आहे. हा चित्रपट आजच्या युवापिढीत नाटय़संगीताची आवड रुजावी म्हणून हा चित्रपट काढला असे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आजच्या युवापिढीला या ग्रामोफोनवर फिरणारी तबकडी पाहून संभ्रम पडावा की, पाश्र्वग्रामोफोन रेकॉर्डवादनावर हावभाव करत गायन सुरू आहे. वास्तविक कथेनुसार इंग्रजांनी भानुशास्त्री यांचे गायन ध्वनिमुद्रित केले होते. आता त्या काळी ध्वनिमुद्रण सामग्री नेमकी कशी होती त्याचा अंदाज बांधणे संभ्रमाचे असले तरी कण्र्याच्या ग्रामोफोनद्वारे नक्कीच नव्हते (पेटीच्या आकारातील सामग्रीत या स्पूलवरून त्या स्पूलवर ध्वनिफीत फिरत होणारे ध्वनिमुद्रण हा एक जुना प्रकार कोणत्या काळापासून होता हे एक संशोधन! ). त्यामुळे नाटकात जसा गायनाचे ध्वनिमुद्रण केल्याचा उल्लेखप्रसंग आहे, तसा चित्रपटातील याप्रसंगी कण्र्याचा ग्रामोफोन न दाखवता ध्वनिमुद्रण उल्लेख केला असता तरी संभ्रमाचा प्रश्नच उद्भवला नसता. मात्र पुढे चित्रपटातील कथानकात या ग्रामोफोनवरील रेकॉर्ड वाजवत केलेल्या रियाजादी प्रसंगात या ग्रामोफोनचा यथायोग्य वापर दाखवला आहे व ते पीरियड फिल्ममध्ये समयोचित, चपखल बसणारे आहे.
किरण चौधरी, ई-मेलवरून .

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

मस्तानीविषयी वेगळी माहिती मिळाली
lp07दि. ४ डिसेंबरच्या अंकातील ‘निमित्त मस्तानी’ हा रवि आमलेंचा लेख आवडला. अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी इतिहासाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हे सांगितले आहे. मस्तानीविषयीची वेगळी माहिती त्यांनी लेखातून मांडली. ती प्रणामी पंथाची होती ही नवी माहिती निदर्शनास आली. या पंथाविषयी अजून माहिती ‘लोकप्रभा’ने द्यावी ही विनंती. रवि आमले यांचे लेख दरवेळीस वेगळे, वाचनीय आणि बौद्धिक खाद्य पुरवणारे असतात, यात शंका नाहीच. ‘लोकप्रभा’तील त्यांच्या ‘टाचणी आणि टोचणी’ या सदरातून ते दिसून आलेच. या सदराचे भविष्यात पुस्तक निघावे, जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. त्यांच्या अशाच अभ्यासपूर्ण नि समतोल लिखाणासाठी शुभेच्छा.
मंगेश निमकर, कळवा, ई-मेलवरून

संग्राह्य़ आणि अभ्यासपूर्ण अंक
lp08‘लोकप्रभाचा’ यंदाचा दिवाळी अंक खूपच माहितीपूर्ण होता. तंत्रज्ञान, कला, मनोरंजन, सामाजिक बदल अशा अनेक विषयांना आपण न्याय दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे लग्नासंदर्भातील सर्वेक्षणाचा विशेष उल्लेख करावा लागेल. इतके विस्तृत सर्वेक्षण प्रथमच पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यातून थेट नव्या पिढीचा सहभाग दिसून आला. त्यामुळे आजच्या पिढीची नेमकी जडणघडण, बदललेली विचारसरणी त्यातून जाणवते. अर्थात अनेक विषयांवरील या पिढीची मतं ही पूर्णत: परिपक्व आहेत असे म्हणता येणार नाही.
भक्ती कांबळे, अमरावती.

अहिराणीचे मोहक सौंदर्य
दि. २७ नोव्हेंबरच्या अंकातील प्रा. डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी लिहिलेला ‘अहिराणी लोकसाहित्यातील सौंदर्यस्थळे’ हा लेख खूपच आवडला. अहिराणी भाषेत मुळातच असणारा गोडवा या लेखामुळे चांगलाच खुलून आला आहे. खान्देशातील प्रत्येक सणाशी निगडित असणारी अहिराणी बोलीतील अनेक गीते लेखकाने अतिशय समर्पकपणे उलगडून दाखवली आहेत. त्याचबरोबर या गीतांना पूरक अशी रेखाचित्रे आणि एकूणच लेखाची मांडणी अत्यंत बोलकी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे खान्देशाबाहेरील वाचकालादेखील या भाषेची मोहिनी पडावी अशा पद्धतीने लेखकाने ही सर्व सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली आहेत.
अनिकेत जाधव, कोल्हापूर.

गोधनीचे संरक्षण-संवर्धन व्हावे
‘शैलाश्रयातील गोधनी’ या स्वप्ना जोशी यांच्या लेखामुळे एका आगळ्यावेगळ्या परंपरेची माहिती मिळाली. कालौघात आपल्याकडे अनेक कला लुप्त होत आहेत. हल्ली अनेक कलांचे दस्ताऐवजीकरणदेखील होत आहे. एक परंपरा म्हणून अनेक जमाती आपल्या परीने अशा कलांचे जतन करताना दिसतात, पण त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न तुलनेने कमीच होतात. या प्राचीन कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
अंजली काळे, कुर्डुवाडी.   

नऊवारीची ऐशीतैशी
lp09दि. ४ डिसेंबरच्या अंकातील ‘नऊवारीलाच वेळोवेळी ठेंगा’ ही चैताली जोशी यांचा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण होता. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या निमित्ताने एकूणच आजवरच्या सर्वच चित्रपटांतील नऊवारी साडी या पेहरावाचा आढावा घेतलात, त्यामुळे एकंदरीतच बॉलीवूडमध्ये काही काही गोष्टींना कशी एक ठरावीक ट्रीटमेंट दिली जाते हे प्रकर्षांने जाणवले. मुळातच आपल्याकडे चित्रपट म्हणजे केवळ करमणुकीचे माध्यम म्हणायचे आणि प्रेक्षकांना आवडते, असे म्हणत स्वत:ला हवे ते दाखवायचे अशीच पद्धत आहे. त्यातच क्रिएटिव्ह लिबर्टी नावाचे गोंडस प्रकरण या सर्व गोंधळात भरच घालणारे आहे. लेखातील सर्व उदाहरणे वाचल्यानंतर बॉलीवूडला नऊवारी साडीच्या बाबतीत अभ्यासाचे वावडेच आहे की काय असे वाटू लागते. अर्थात आपल्या लेखातील तरुणाईच्या प्रतिक्रिया वाचून लोकांची मानसिकतादेखील बदलत चालली आहे असे दिसून आले.
प्रमोद कलबुर्गी, सोलापूर.