‘लोकप्रभा’ तीन जूनमधील डॉ. विश्वंभर चौधरी यांची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा सविस्तर आढावा घेणारी कव्हरस्टोरी वाचली.
एकीकडे भाजपने आसामसारखे संवेदनशील राज्य पादाक्रांत केले. दुसरीकडे कमी पशांत भूक भागवणे आणि समाजात अल्पसंख्याकांना प्राधान्य देणे या दोन गोष्टींनी मतदारांत व्यक्तिमाहात्म्य वाढवण्याची आपल्याकडे जी स्पर्धा चालते त्याचं पश्चिम बंगाल हे एक उदाहरण आहे. त्याचंच आणखी एक भरभक्कम उदाहरण म्हणजे तामिळनाडूतील जयललिता यांचा पक्ष.
केरळातही भाजपने तिथे असलेल्या रा. स्व. संघाच्या जाळ्यामुळे आपली मतं वाढविण्याची करामत केली आहे. या साऱ्या गदारोळात राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जाणारा काँग्रेस पक्ष निष्प्रभ ठरू लागला आहे.
अर्थात आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्या पक्षाचा प्रभाव ठरवावा लागेल. कारण उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी आसाममधील विजय भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरावा.
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रादेशिक पक्षांना मिळालेले यश. या सगळ्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचं होऊ घातलेलं पानिपत, भाजपचं पुढे सरकलेलं खंबीर पाऊल अन् प्रादेशिक पक्षांना लाभत चाललेले अच्छे दिन हे या निवडणुकीनं दाखवून दिलंय, असं वाटतं.
– श्रीपाद कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.

चिंतित करणारे वास्तव!
दि. १९ मे रोजी लागलेल्या पाच राज्यांतील निवडणुका निकालांवर भाष्य करणाऱ्या कव्हरस्टोरीमध्ये डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मांडलेले निकालांचे परिणाम, प्रादेशिक पक्षांची राज्याराज्यांतील वाढती पकड, त्यामुळेच राष्ट्रीय पक्षांच्या घसरत्या कामगिरीचे वास्तव हे चित्र चिंतित करणारे आहे हे निश्चित. त्यानुसार पुढच्या राजकारणाच्या बदलाच्या शक्यता लक्षात घ्याव्या लागतील. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय पक्षांनाच प्रथम पसंती देण्याचा कल पूर्वी होता. आताही मतदानाची टक्केवारी राष्ट्रीय पक्षांनाही बऱ्यापैकी पडते, पण जागा वाढताना मात्र दिसत नाही. प्रादेशिक नेत्यांचा भ्रष्टाचार, विकासाच्या नावावर जनता डोळय़ांआड करते, प्रादेशिक नेत्यांना झपाटून प्रसिद्धी देण्यात प्रसारमाध्यमेच पुढे आहेत. वैचारिक संघटन करू शकणाऱ्या पक्षांच्या विधायक कार्याला मुद्रित माध्यमेही स्थान देत नाहीत. त्यामुळे नेते पक्षांपेक्षा प्रबळ होतात. येनकेनप्रकारेण जिंकून येणे हाच अजेंडा प्रादेशिक पक्ष राबवितात. सत्ता राबविताना राष्ट्रीय पक्षांना धारेवर धरणारी जनता, माध्यमे त्यांच्या देशहिताच्या विरोधी धोरणांनाही उजेडात आणत नाही, मग परिणामी दीदी, अम्मा, बाजी प्रबळ होतात.
– अनिल पालये, कुळगांव-बदलापूर.

शिकायला या.. नोकरीसाठी नको..
‘लोकप्रभा’चा करिअर विशेषांक (२७ मे) वाचला. करिअरमधील नवीन पर्यायांची निवड करताना भविष्य कुठे आहे, याचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. कारण शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने परदेशी प्रयाण आणि तेथेच स्थायिक होणे हे आजही अनेकांचे स्वप्न असते. पण माहिती तंत्रज्ञानातील वाढीचा वेग आता आठ-दहा वर्षांपूर्वी होता तसा राहिलेला नाही. त्याच वेळी ‘मेक इन इंडिया’सारख्या धोरणांमुळे देशांतर्गतच अनेक क्षेत्रांतील मागणी वाढू शकते. दुसरीकडे अनेक देश आपापल्या देशांचे व्हिसाविषयक कायदे कडक करत आहेत. अशा व्हिसावर तेथे गेल्यास किती काळ राहता येईल याची मर्यादाही बरीच कमी करण्यात आली आहे. त्याच वेळी तेथील अनेक विश्वविद्यालये मात्र भारतीय विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रमाणात आकर्षति करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परदेशी शिक्षणाच्या आणि नोकरीच्या आकर्षणामुळे म्हणा किंवा तेथे स्थायिक होण्याची एक संधी म्हणून म्हणा, अनेक पालक लाखो रुपये खर्चून, प्रसंगी कर्ज काढून, आपल्या मुलांना कुठली तरी परदेशी पदवी मिळावी अशा प्रयत्नात असतात. या देशांना फक्त भारतीय विद्यार्थ्यांकडून मिळणारा अफाट धंदा हवा आहे, त्यांना नोकरीच्या संधी देण्याचा त्यांचा अजिबात मानस नाही. या बदलत्या परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांनी, पालकांनी, आणि होतकरू उमेदवारांनी ठेवावी.
– विनिता दीक्षित, ठाणे.

‘आसमंतात’ आले असते तर..
‘लोकप्रभा’मधील रूपाली पारखे-देिशगकर यांचा गुलमोहरावरील लेख वाचला अन् वेगळ्या चिंतनात मन गेले. आपण भारतीयांनी अटकेपार झेंडा रोवल्याची नोंद आहे. ब्रिटिशांनी जगावर राज्यही केले आणि त्यांच्या अशा गोष्टी जगभर नेल्या की ज्या आजही आम्हाला विस्मयचकीत करत आहेत. प्राचीन भारतीयांनीही असे अनेक बाबतीत केले आहे. निसगाच्यासंदर्भात भारतीयांनी काय चांगले जगभर नेले याची माहिती दिल्यास नक्कीच आवडेल. आणि हो! घरगुती निसर्ग उपचाराचा प्रयोग म्हणून माझ्या दहा वष्रे वयाच्या मुलीच्या केसांना तिच्या आजीने सीताफळाच्या बियांची पूड करून तेलात मिसळून लावली. डोके धुवून काढताना सीताफळाचा अर्क डोळ्यात गेला. डोळ्यांना इजा झाली. कॉर्नियावर जखम झाली. ती बरी व्हायला आठ दिवस लागले. निसर्गातील असे सीताफळांच्या बियांसारखे प्रतापी महापुरुष कोण आणि त्यांचे प्रताप नक्की सांगा. माझी मुलगी म्हणाली ‘लोकप्रभा’तील आसमंतात सीताफळाच्या बियांचा हा प्रताप आला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती..
– संघर्ष सावरकर, अकोला.

पाणी नियोजनाला प्राधान्य हवेच
लोकप्रभा (२० मे) मधील दुष्काळाबाबतची कव्हरस्टोरी वाचली. जलयुक्त शिवार संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे, परंतु याबाबतीत नियोजनाचा अभाव दिसून येतो. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात शासन मोठय़ा प्रमाणात कमी पडत आहे.
शासनाने धरसोडपणा सोडून दूरगामी नियोजन केल्यास भविष्यात पाणीटंचाईची भीषणता कमी होईल एवढे मात्र निश्चित. महाराष्ट्रातील अनेक शहरे गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहेत, परंतु गेल्या ५०-६० वर्षांपासून या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू नये यावरून शासनाच्या नियोजन शून्य प्रशासनाची कल्पना येते.
महाराष्ट्रातील जनतेला पिण्याच्या पाणीटंचाईपासून मुक्त करावयाचे असेल तर शासनाला दीर्घकालीन पाण्याचे नियोजन करण्याशिवाय पर्याय नाही. पावसाचे पाणी अडविणे, साठविणे, जमिनीत जिरविणे यासाठी नागरिकांच्या साहाय्याने हे कार्यक्रम राबविले, तर निश्चितपणे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
– धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर, जि. औरंगाबाद.

वैशिष्टय़पूर्ण मालिका
सध्या ‘झी मराठी’वर ‘पसंत आहे मुलगी’ ही मालिका सुरू आहे. पुनर्वसु हा कर्मठ तर ऊर्मी आधुनिक घरातील. ते प्रेमलग्न करतात अर्थात कोर्टामध्ये. सनातनी व पुरोगामी याच पायावर मालिका उभी आहे, पण वरची इमारत कशी बांधली जाते हे इथे नाटय़पूर्ण रीतीने दाखवले आहे. कर्मठ लोकांत किती आत्मपरीक्षण व विवेक असू शकतो व ऊर्मी हळुवारपणे सारे समजून वागते हे महत्त्वाचे. पण क्लायमॅक्स म्हणजे नंदिनी सर्वासमक्ष खोटा आरोप करते. खोटे बोलणे ही काहींची ‘संरक्षक ढाल’ असते. खरी-खोटी शपथ घेणे हेही चपखल नाटय़.. मार्मिक! वातावरण संवादी ठेवलेय. प्रसंगातील ताणतणाव, आर्तता पाश्र्वसंगीत प्रभावी बनवते. सारांश, प्रबोधनाचा उच्चांकसुद्धा वैविध्यपूर्ण आहे.
वृन्दाश्री दाभोलकर, ईमेलवरून.

आशीर्वाद की धमकी
नांदा सौख्यभरे! हा आशीर्वाद आहे की धमकी, असा प्रश्न, ही मालिका पाहताना पदोपदी पडतो. बरे आशीर्वाद म्हणावा तर कोणासाठी, ताटाखालचे मांजर झालेल्या नाकर्त्यां नवऱ्यासाठी, तालावर नाचणाऱ्या, मुठीत असलेल्या मुलासाठी, आदर्श बायको आणि सुनेचा रोल उत्तम रीतीने मुकाटपणे निभावत असलेल्या मोठय़ा सुनेसाठी की नव्यानेच घरात आणलेल्या स्वानंदी आणि लाडक्या नीलसाठी? कोणाहीसाठी असला तरी सौख्यभरे कसे नांदता, बघतेच! ही गíभत धमकी आहेच. मराठी मालिका आणि त्यांची नावं याचं नात हे असंच आहे कधीच न उमगणार!
या मालिकेतील प्रमुख कर्तृत्ववान (? ) पात्र, ललिता. तिच्या प्रत्येक कट -कारस्थानाला ‘तोंडी’ लावण्यासाठी स्वानंदीची बहीण, त्यांना तोडीस तोड उत्तर देणारी वत्सला मावशी, उद्देश चांगला तरीही मार्ग कुटीलच! या मालिकेत एकही सत्कृत्य नायकाची आई स्वप्नातदेखील पाहत नाही. हे शक्य आहे का? विविध मालिकांत, खाष्ट सासू, उद्धट, कामचुकार सुना पहिल्या, त्यामागे नात्यातील तेढ, अधिकारावरील अतिक्रमण अशी सयुक्तिक कारणे तरी असतात, पण इथे तर फक्त संपत असलेली जहागीरदारी !
ही वत्सला मावशी पाच-पाच लाखांचे चेक आणते कोठून? का तिचीही दुष्कृत्ये अजून बाहेर यायची आहेत? देशपांडेची मुलगी जहागीरदारांकडे नांदते आहे म्हणून त्यांचा हात दगडाखाली. त्यांचा एक जावई अगदीच शामळू! दुसरा, नील ‘आईचं बाळ’ त्याला घरात काय रामायण चालू आहे त्याची यित्कचितही कल्पना नाही!
सगळेच कसे कौतुकास्पद आहे नाही?
अनिल ओढेकर, नासिक.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. मी शेतकरी आहे. ‘लोकप्रभा’चा २० मेचा अंक वाचला. या अंकात शेती उपक्रम व मार्गदर्शक लेख पावसाचे नियोजन, तहानलेल्या महाराष्ट्राचे वास्तव्य, बळीराजाचा दैवदुर्विलास हे लेख शेती उपयुक्त असून शेतकरीवर्गास मार्गदर्शक आहे. यापासून शेतकऱ्यांनी योग्य धडा घ्यावा. शेतकऱ्यांचे दुर्दैव असे की, शासन तिजोरीत आणि पाणी उपलब्धीसाठी करोडो खर्च पडतात. पण हा पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता भ्रष्टाचारातच जातो. ८० टक्के शेती कोरडवाहू आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्येस प्रवृत्त होतो हे दुर्दैव म्हणावं लागेल. आपण लोकप्रभामधून अशा विषयांवर लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या अंकातील सर्वच लेख उपयुक्त असतात.
माधवराव पाटील, पिंपळगाव हरेश्वर (जि. जळगाव)

वृक्षांची सलगी करावी
‘वृक्षोपनिषद’ हा ३ जूनच्या अंकातील आचार्य वसंत गोडबोले यांचा लेख माहितीपूर्ण होता. जीवसृष्टी व मानवाच्या उन्नतीकरता वृक्षांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची प्रचीती या लेखातून आली. लेख खूप आवडला. वृक्षाचे बहुविध उपयोग आपण रोजच्या रोज करीत असतो पण आपल्याला त्याची किंमत नसते. वृक्ष आपल्याकडून कशाचीही अपेक्षा करीत नाहीत आणि भेदभावदेखील करीत नाहीत. त्यांच्या या सेवेचे महत्त्व साधुसंतांनी व ऋषीमुनींनी जाणले होते. यावर काव्यरचनादेखील केली होती. पण आपण संघर्ष करीत आहोत.
द. ह. दांडेकर, नाशिक.

नकाशा हवा होता
साईप्रसाद बेलसरे यांचा ‘हरिश्चंद्राची परिक्रमा’ हा उत्तम लेख वाचला आणि एकापेक्षा एक सुंदर फोटो पाहिले. ही परिक्रमा खूपच अवघड आहे आहे हे फोटो पाहून जाणवले. त्यांचे आणि त्यांच्या मित्रांचे मनापासून अभिनंदन. एकाच सूचना- आम्हा वाचकांच्या दृष्टीने करावीशी वाटते ती ही की, एक छोटासा नकाशा जोडला असता तर परिक्रमेचा भूगोलही समजला असता. त्यांचे त्यांच्या धाडसी वृत्तीबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन
सुरेश देवळालकर, हैदराबाद.