15 August 2020

News Flash

सेल्फीचा सुवर्णमध्य हवा

सेल्फीचा अतिरेक हा चिंतेचा विषय असला तरी लेखातील तरुणांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हव्यात.

युवकांना कोणताही ट्रेण्ड फॉलो करणे आवडते हा सार्वत्रिक अनुभव आहे. २ सप्टेंबरच्या अंकातील कव्हर स्टोरी देण्याएवढा उलटसुलट चर्चा चाललेला म्हणूनच दखल घेण्याजोगा हा विषय आहे, हे निश्चितच. मात्र अतिरेक टाळला, पुरेशी सावधानता बाळगली, तारतम्य ठेवले तर आयुष्यातील काही अवर्णनीय क्षण स्मरणात राहणारी ही पद्धत, आनंद देणारी आहे याबाबत दुमत होणार नाही. धोकादायक पर्यटनस्थळी वा ट्रेकिंगला गेल्यावर कडय़ावरून सेल्फी घेणे टाळले पाहिजे. सेल्फीचा अतिरेक हा चिंतेचा विषय असला तरी लेखातील तरुणांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्यायला हव्यात.

२६ ऑगस्टच्या ऑलिम्पिक विशेषांकातील मिलिंद ढमढेरे यांनी घेतलेला आढावा वाचला. सुविधांची वानवा, क्रीडा संघटनांतील सुंदोपसुंदी, खेळ, खेळाडूकडे दुर्लक्ष करून पदाधिकाऱ्यांचीच चढाओढ रीओला जाणाऱ्या पथकासमवेत होती, ही खटकणारी बाब. हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स यांनी सपशेल निराशा केली, एकाग्रता इच्छाशक्ती प्रबळ दाखविली असती तर वेगळे चित्र दिसले असते. आता टोकियोच्या तयारीला लागावे, दडपण झुगारून साक्षी, सिंधूची प्रेरणा घेत खेळावे, दीपा, ललिता यांनी निराश न होता नव्या उमेदीने लक्ष्य ठेवावे मगच स्वप्न साकार होऊ शकेल.

अनिल पालये, बदलापूर.

वाचनीय अंक

दि. १९ ऑगस्ट २०१६ चा ‘स्वातंत्र्यदिन विशेष’ चा लोकप्रभाचा अंक अक्षरश: फक्त वाचनीयच नव्हे तर जपून संग्रहात ठेवावा असा आहे. खासकरून डॉ. शशांक सामकांचा लेख ‘प्रश्न लैंगिक स्वातंत्र्याचा!’ सर्वोत्तम म्हणावा असा आहे. यासोबतच अरुंधती जोशी यांचा ‘एक सुलक्षणी स्वप्न’ हा लेख उत्तम आहे. हे दोन्ही लेख साऱ्या भारतीय भाषांतून अनुवादित करून इंटरनेटच्या माध्यमातून समस्त युवा पिढीला उपलब्ध करून द्यायला हवा. स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय हे युवा पिढीला जाणवून देणे अगत्याचे आहे. याशिवाय इतर लेखही स्तरानुकूल माहितीपूर्ण आहेत. संपूर्ण संपादकीय टीमचे अभिनंदन तसेच सर्वाना शुभेच्छा!

महादेव बासुतकर, सिकंदराबाद, तेलंगणा.

दुटप्पीपणाचा कळस २६ ऑगस्टच्या अंकातील

‘गो-पालकांच्या राज्यात गाईचा हंबरडा’ या कव्हरस्टोरीत महत्त्वाचा मुद्दा निसटलाय. हाडे व कातडी निर्यात करणारा भारत एक आघाडीचा देश आहे. तो जिलेटीन व कमावलेले कातडे आयात करतो. इंग्रजी अंमलावेळची कच्चा माल निर्यात करून पक्का माल आयात करण्याची परिस्थिती आजही आहे.

पंतप्रधान व मुख्यमंत्री मते दिलेल्या जनतेच्या डोळ्यांवर स्वत:च्या हातानेच झापडं लावताहेत. चिनी चॅनलवर अलीकडेच कमावलेल्या चामडय़ापासून कपडे शिवताना दाखवत होते. भारतात विविध वनस्पतींच्या रसापासून चामडे कमवण्याची कला लुप्त होत चालली आहे. आता विविध रसायनांच्या साहाय्याने सिल्की-मऊसर होणारे चामडे कमावता येते. ती कला शिकवण्याऐवजी कमावलेले चामडे परदेशातून आयात करतात. दुसरीकडे भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त असल्याबद्दल नक्राश्रू ढाळतात. चामडे सोलणाऱ्यांवर हल्ले होताहेत. चाणक्यनीती लिहिलेल्या भारतात सरकार मात्र उलट कृती करतंय.  शंभरावर माणसे जमवणाऱ्यांवरची, पोलीस परवानगीच्या सक्तीची, उच्चरवात ‘भारत माता की जय’ म्हणण्याबद्दलची चर्चा सभागृहात चालते. हा सगळा दुटप्पीपणा देशाला कुठे घेऊन जाणार आहे?

झी युवा या  चॅनलने कार्यक्रम एकांगी असणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. मी डिस्कव्हरीवर ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ पाहतो.  एनएचके वर्ल्ड जपानी चॅनलने तेथील रेल्वे म्युझियम दाखवले. कॉलेज फेस्टिव्हल्स, नाटय़-संगीत, आंतरराष्ट्रीय स्पर्धातील युवा खेळाडू यांचे कार्यक्रम व्हावेत.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर दोन वेळा मुक्काम केलेल्या नाओको यामाझाकी गेली दोन वर्षे त्यांचे अनुभव एनएचके वर्ल्ड या चॅनलने टीव्हीवरील सायन्स व्ह्य़ू या कार्यक्रमात शेअर करतात. तशी भारतीय विज्ञान विश्वाची सफर घडवावी. असेच इतर प्रासंगिक विषयसुद्धा हाताळावेत.

अभयकुमार कानेटकर, बोरीवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2016 12:20 am

Web Title: lokprabha readers response
Next Stories
1 गोरक्षण तळमळ की नुसतीच चळवळ
2 संदिग्ध लोकशाही, संदिग्ध स्वातंत्र्य
3 कोपेश्वर मंदिराकडे लक्ष द्या
Just Now!
X