हल्ली काही पौराणिक विषय घेऊन विशेषांक प्रसिद्ध करून वाचकांना आपण विसरत असलेल्या संस्कृतीची पुन्हा आठवण करून देण्याचा स्तुत्य उपक्रम ‘लोकप्रभा’ने हाती घेतल्याचे दिसते. तसेच हल्ली जे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत तेसुद्धा चर्चेत आणत आहात तेही स्वागतार्ह आहे. १० जून २०१६ च्या अंकात ‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’ हा लेख लिहून घटस्फोटासारखा आजचा ज्वलंत प्रश्न हाती घेतला आहे. त्याच संदर्भात मी एक कविता लिहीली आहे. पती-पत्नीने घटस्फोटाआधी खालील कवितेचा सखोल गंभीरपणे एकदा विचार करावा व मगच निर्णय घ्यावा.

मैं रुठा, तुम भी रुठ गए

फिर मनाएगा कौन?

आज दरार है, कल खाई होगी

उसे फिर भरेगा कौन?

मैं चुप, तुम भी चुप

इस चुप्पी को फिर तोडेगा कौन?

बात छोटी सी लगा लोगे दिल से,

तो रिश्ता फिर निभाएगा कौन?

दुखी मैं भी और तुम भी बिछडकर,

सोचो हाथ फिर बढाएगा कौन?

न मैं राजी, न तुम राजी,

फिर माफ करने का बडप्पन दिखाएगा कौन?

डूब जाएगा यादों में दिल कभी,

तो फिर धैर्य बंधायेगा कौन?

एक अहम् मेरे, एक तेरे भीतर भी,

इस अहम् को फिर हराएगा कौन?

जिंदगी किसको मिली है सदा के लिए?

फिर इन लम्हों में अकेला रह जाएगा कौन?

मूंद ली दोनों में से गर किसी दिन एक ने आँखें..

तो कल इस बात पर फिर पछताएगा कौन?
– डॉ. नितीन राजन कोचर

कमावती स्त्री
‘लोकप्रभा’च्या १० जूनच्या अंकातील ‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’ ही कव्हर स्टोरी वाचली. त्यातील खूप शिकलेल्या, भरपूर पगार घेणाऱ्या, करिअर करणाऱ्या आजच्या मुली विवाहानंतर किती वेगवेगळय़ा कारणांनी घटस्फोट घेतात हे समजले. तसे चित्र आता समाजात दिसत आहेच. बहुधा एकुलती एक मुलगी असेल तर ती जास्तच लाडात वाढते. हवे ते हवे तेव्हा मिळत राहिल्याने नाही हा शब्द तिला माहीत नसतो. तडजोड म्हणजे काय हे तिच्या गावीही नसते. मग विवाहानंतर पूर्ण वेगळय़ा वातावरणात ती जाते. आंतरजातीय विवाह असेल तर नंतर संस्कार- रीतिरिवाज सर्वच तिला जाचक वाटते.

काही मुली माहेरी मदत करतात. आईवडिलांना गरज असेल तर मदत जरूर करावी. पण सासरी पैसे न देण्याचा हेकेखोरपणा का करावा? या मुली लग्न करून दुसऱ्या कुटुंबाला भार होतात. मानसिक त्रास देत लग्नच का करतात? अनेक घरांत सध्या याच प्रकारचे थोडय़ाफार फरकाने हेच प्रश्न आहेत, समस्या आहेत.

एका अर्थाने ‘स्त्री शिकली प्रगती झाली’ म्हणजे नक्की काय? समानता हवी ती फक्त बाहेर.
– शुभंकर विचारे, कांदिवली

आपली लायकीच नाही
‘लोकप्रभा कॅम्पेन’मधील राजगड आणि एकवीरा देवीच्या डोंगरातील प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्याबद्दल आपण मांडलेलं चित्र विदारक आहे. खरे तर सह्य़ाद्रीच्या डोंगररांगेत अनेक पर्यटनस्थळे, गड किल्ले वसले आहेत. अनेक देवदेवतादेखील याच ठिकाणी आहेत. हा एक नैसर्गिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. पण हे सारं संचित सांभाळण्याची आपली अजिबात लायकी नाही, हेच आपण वारंवार सिद्ध करत आलो आहोत. आपल्या लेखांमुळे त्यावर चांगलाच प्रकाश टाकला जातोय. असे लेख प्रसिद्ध झाल्यावर बऱ्याच वेळा स्थानिक राजकीय लोक काही प्रमाणात दखल घेतात, सरकारी यंत्रणा तात्पुरत्या का होईना हालचाल करतात. पण दीर्घकालीन ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने फारशी हालचाल होत नाही. अशी पावलं उचलली जात नाहीत तोपर्यंत हे डोंगर कायमस्वरूपी प्लास्टिकमुक्त होणं अवघड आहे. दुसरा मुद्दा आहे तो लोकांच्या मानसिकतेचा. त्यात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. असो, आपल्या कॅम्पेनमधून जास्तीत ठिकाणांना प्रसिद्धी द्यावी, किमान लोकांना कळेल तरी आपण नेमकं कोठे चुकतोय ते.
– अजित पाटील, औरंगाबाद.

पाण्यासाठी अपारंपरिक उपाय
‘दुष्काळ पाण्याचा आणि नियोजनाचा’ (६ मे) ही कव्हरस्टोरी  वाचली. त्याबाबत मी उपाय सुचवू इच्छितो. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व  अन्य महापालिका क्षेत्रांत दररोज कोटय़वधी लिटर पाणी पुरवले जाते. पिण्यासाठी पाणी कमी लागते. इतर उपयोगासाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, मैला वाहून नेण्यासाठी बागांसाठी, गाडय़ा धुण्यासाठी वगैरे उपयोगासाठी आपण एकूण पाणीपुरवठय़ाच्या ८०/८५ टक्के पाणी वापरतो. हे सर्व सांडपाणी दररोज समुद्रात, खाडीत-नदीत सोडतो. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीयोग्य होऊ शकेल.

सासवडजवळच्या एका शेतकऱ्याने हे सांडपाणी विकत घेऊन, त्यावर योग्य प्रक्रिया करून ३५ एकरमध्ये डाळिंब व इतर फळझाडे लावली आहेत. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. या महापालिकांचे सांडपाणी आपल्याला रेल्वे टँकरने दुष्काळी भागात नेऊन शेतकऱ्यांना दिलासा देता येईल. शेतीखेरीज मत्स्यसंवर्धन तलावासाठी व जमिनीत पाणी मुरवण्यासाठी हे पाणी वापरता येईल. पाणी जमिनीत मुरवण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होईल.

दुष्काळी भागात पाऊस कमी व प्रचंड तापमान ही सौरऊर्जेसाठी आदर्श स्थिती आहे. सौरऊर्जेचे रूपांतर वीजनिर्मितीत करता येते. स्थानिक लोकांना र्टनकी पद्धतीवर हे तंत्रज्ञान ‘मेढा’ ही सरकारी संस्था देऊ शकेल.
– अनंत घाणेकर, कल्याण.

दोघांनीही शहाणं होण्याची गरज आहे
‘राष्ट्रीय पक्षांच्या विश्वासार्हतेला ग्रहण’ ही कव्हर स्टोरी उत्तम विश्लेषणात्मक लेखनाचा नमुना आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका निकालांच्या पाश्र्वभूमीवर देशातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा त्यातून मिळतोच, पण भविष्यात काय वाढून ठेवलंय हेदेखील जाणवते. अर्थात राजकारणाचे फासे कधी आणि कसे पालटतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आज जरी प्रादेशिक पक्षांची चलती दिसत असली तरी पुढील एक-दोन वर्षांत काहीही घडू शकतं. या निकालांनी त्यांनी हवेत जायची गरज नाही. राष्ट्रीय पक्षांनी विशेषत: भाजपाने आता स्वत:ची पाठ थोपटवून घेणं बंद करणंच शहाणपणाचं ठरेल. ‘गिरे तो भी टांग उपर’ या पद्धतीने कायम ते आपल्या कामाचा डंका पिटत असतात. त्याऐवजी थोडे आत्मपरीक्षण केलं तर अनेक गोष्टी साध्य होतील. ममता आणि जयललिता यांना योग्य पर्याय नसण्याची अपरिहार्यता यातून ठळकपणे अधोरेखित झाली आहे. एखाद्या व्यक्ती अथवा पक्षाचं पुरेसं मूल्यमापन न होणं हेदेखील धोकादायक असतं. त्यामुळे हुरळून जाऊन टिमकी वाजवणं बंद करणं शहाणपणाचं आहे.
– राजेश लिमये, पुणे

ऊसाने आणलेला दुष्काळ
‘वाचक प्रतिसाद’ सदरातील शशी वालावलकर यांची ‘दाहक दुष्काळ’ ही कविता खूप आवडली.

येरे येरे पावसा ही जुनी कविता आता किती मुलांना माहीत आहे?

याच अंकामधील चंद्रकांत लेले, भोपाळ यांचे ‘दुष्काळाची तमा नाही’ हे पत्र अत्यंत मार्मिक आहे. पोटतिडकीने ते लिहिले आहे.  माझा भाचा धारवाड विद्यापीठात शेतकी पदवीत पहिला आलेला. तो नेहमी म्हणायचा ऊस हा शेतकऱ्याचा शत्रू आहे. तो  मोठे बागायतदार सोडल्यास उर्वरित शेतकऱ्याला शेवटी दरिद्री केल्याशिवाय राहणार नाही. आज सांगली जिल्ह्यतील उसाखालची जमीन इतकी चिब्बड झाली आहे की तिथे मत्स्यशेती करणे सुरू झाले आहे.

सोलापूरसारख्या बारमाही वर्षांनुवर्षे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये बत्तीस साखर कारखाने उभे राहतात. याचा अर्थ काय? साखर सम्राटांची माया राजकारणातून हद्दपार झाली पाहिजे. ‘ऊसशेती बंद करायला हवी,’ हे पत्रातील सांगणे अगदी खरे आहे.
– अरविंद किणीकर, ठाणे.

कार्टूनचा विरंगुळा
‘लोकप्रभा’चा कार्टून विशेषांक हा उपक्रम एकदम धम्माल होता. कार्टूनचं विश्व हे लहान मुलांचं असलं तरी मोठय़ांनादेखील आनंद देणारं असतं. ‘लोकप्रभा’ हा विषय ज्या पद्धतीने हाताळला ते पाहून आनंद झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत असा अंक वाचून मज्जा आली. लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. बहुरंगी अंक संग्रही ठेवावा असाच होता. असेच अनोखे अंक प्रसिद्ध करावेत.
– सागर पट्टेकरी, कोल्हापूर.

युथफुल लेख वाढवावे
‘लोकप्रभा’च्या अंकांतील लेख वाचनीय असतात. सर्व वयोगटांना आवश्यक अशा लेखांचा संग्रह साप्ताहिकात नेहमी असतो. पण, एक खंत नमूद करतो. युथफुल हा विभाग वर्षांच्या सुरुवातीला नियमितपणे अंकामध्ये येत होता. त्यातील लेखही चांगले असायचे. परंतु आता हा विभाग दिसून येत नाही. तरुणांसाठी आवश्यक असणाऱ्या लेखांची संख्या कमी झालेली जाणवते. ती वाढवावी ही विनंती. तरुण पिढी यानिमित्ताने वाचनाकडे वळेल.
– सुरज टिपरे, मुंबई.

असं चॅनल हवंच
‘लोकप्रभा’ १० जूनच्या अंकातील पराग फाटक यांचा ‘इनसिंक सुरावट’ हा लेख वाचला. आवडला. आजच्या आधुनिक संगीतासमोर चोवीस तास शास्त्रीय संगीताची परंपरा दाखवणारं चॅनल असणं, हे खरंतर आव्हानच. टीव्हीवर चोवीस तास आधुनिक आणि आजची बॉलीवूड मसाला असलेली गाणी दाखवणारी अनेक चॅनल्स आहेत. पण, त्यात देशातील विविध ठिकाणचं शास्त्रीय संगीत ऐकवणारं इनसिंक नावाचं चॅनल खरंच आनंद देणारं आहे. या चॅनलवर केवळ शास्त्रीय संगीताची मैफल नसून जुन्या हिंदी चित्रपटातील गाणीही इथे दाखवली जातात, हे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे इतर मालिका-रिअ‍ॅलिटी शोच्या चॅनल्समध्ये एखादं असं शांत, मधुर संगीत ऐकवणारं चॅनल हवंच!
– वैभव सावंत, नाशिक.

भविष्यवेधी करिअर विशेषांक
‘लोकप्रभा’चा करिअर विशेषांक नेहमीप्रमाणेच उत्तम होता. नेहमीच्या सरधोपट व्यावसायिक संधींपेक्षा नव्याने आपण अनेक विषयांवर प्रकाश टाकला. करिअर निवडण्यामध्ये मानसिकतेचा मोठा भाग असतो. पण आपण त्यापेक्षा भौतिक घटकांकडेच अधिक लक्ष देत असतो. त्यातून मग चार लोक जे स्वीकारतात, तेच आपण स्वीकारतो. आणि नंतर मग पश्चात्ताप होत राहतो. आपण यंदाच्या अंकात मानसिक विश्लेषण केलेत हे उत्तम झाले. खरे तर आपण करिअरचे दोन अंक करायला हवेत. एका अंकात केवळ मानसिक विश्लेषणात्मक लेख आणि दुसऱ्या अंकात विविध संधी.
– गौरी भोसले, कोल्हापूर.