25 September 2020

News Flash

स्त्रिया आणि कायदा

‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’ (१० जून) ही कव्हर स्टोरी वाचली.

‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’  (१० जून) ही  कव्हर स्टोरी वाचली. त्यात कायद्याच्या ‘कलम ४९८ अ’चा उल्लेख आला आहे. त्यावर विस्तृत विवेचन अपेक्षित होते. त्या अनुषंगाने काही मुद्दे मांडत आहे.

पुरुषांवरदेखील अन्याय होतो का या प्रश्नाचे उत्तर बघावयाच्या आधी सुप्रीम कोर्टाचे दोन निवाडे बघू –

अ) मँडोलीन ‘श्री’ नावाचा दक्षिणेतील एक मोठा मँडोलीनवादक आणि संगीतकार. त्याने एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केले. त्यांचे पटले नाही. वाद झाले. तिने वडिलांच्या जीवावर हुंडय़ाची तक्रार करून नवऱ्याला जेलमध्ये टाकीन, हैदराबादला त्याने कार्यक्रम केला तर त्याला ठार मारीन अशा बढाया मारल्या. मँडोलीन ‘श्री’ने घटस्फोटासाठी केस केली, त्याआधी तेरा वर्षे बायको विभक्त होती. नवऱ्याला क्रूरतेने वागवले म्हणून फॅमिली कोर्टाने बायकोविरुद्ध निकाल दिला, तो हायकोर्टाने कायम केला. सुप्रीम कोर्टानेसुद्धा बायको क्रूर होती, नवऱ्याला छळायची असा निष्कर्ष काढला. पण वर एक सिक्सर मारली. मँडोलीनलाच पन्नास लाख रुपयांचा दंड केला, पण त्यास दंड न म्हणता ‘कायमची पोटगी’ असे संबोधले. सप्टेंबर १५, २०१४ रोजी हृदयविकाराने संगीतकार त्याच्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी वारला.  संदर्भ : L/ Sree v/s L/ Srinivas (2013) 2 SCC-114.

नवऱ्यावर एकामागून एक खोटय़ा केसेस करून त्याला छळले, त्याच्या आई-वडिलांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला, ही बायको खुनशी (Vindictive) आहे असा एका दुसऱ्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला- पोटगीच्या लेबलखाली पंधरा लाख रुपयांचा दंड मात्र नवऱ्याला.  संदर्भ : K Srinivas Rao v/s D A Deepa- (2013) (5) SCC-226

२ जुलै २०१४ ला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे. कलम ४९८-ए चा गैरवापर या विषयावर अनीशकुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार या निकालात सुप्रीम कोर्टाने खालील उद्गार काढले,

‘‘द सिंप्लेस्ट वे टू हॅरेस इज टू गेट द हजबंड अ‍ॅण्ड अरेस्टेड अंडर सेक्शन 498  – ए. इन क्वाएट नंबर ऑफ केसेस बेड रिडन गॅ्रण्डफादर्स अ‍ॅण्ड ग्रॅण्ड मदर्स ऑफर हजबंड, देअर सिस्टर्स लिव्हिंग अब्रॉड फॉर डिकेड्स आर अरेस्टेड..  इन 2012 (year) 1,97,762 पर्सन्स वेअर अरेस्टेड अंडर सेक्शन-498 ए, इट इज कन्सिडर्ड अ‍ॅज ए टूल ऑफ हॅरेसमेंट अ‍ॅण्ड अपोझिशन.’ याच निवाडय़ात हुंडा बळी कायद्याचाही याच अर्थाने उल्लेख आहे.

एका सेमिनारमध्ये सुमारे तेवीस-पंचवीस वर्षांची ‘छळ’ झालेली मुलगी ज्या आत्मविश्वासाने  ‘छळाबाबत’ बोलली, तो आत्मविश्वास चक्रावून टाकणारा होता. योग्य ठिकाणी पॉझेस, योग्य ठिकाणी हुंदके. तिचे ऐकून सभागृहात शांत ‘हलकल्लोळ’ झाला.

मी शेवटच्या रांगेत होतो. माझे सहप्राध्यापक प्रशांत सावर्डेकर एक ओळ सोडून बसले होते. वर उल्लेख केलेल्या मुलीने भाषण करून आल्यावर आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढले व सावर्डेकरांच्या  पुढील रांगेत बसलेल्या मुलीला दिले. तिने स्वत:च्या गळ्यात घातले. तिचाही परफॉर्मन्स तेवढाच नाटकी. आमच्या लक्षात आले की त्या दोन्ही मुली व्यावसायिक नटय़ा आहेत! प्रोफेसर सावर्डेकर चवताळून म्हणाले – ‘धिस इज चीटिंग – दीज टू गर्ल्स आर अ‍ॅक्ट्रेस. नॉट व्हिक्टिम्स. यू शूड हॅव अनाउन्स्ड इट.’  आम्ही ‘शेम, शेम’च्या घोषणा दिल्या. प्रेक्षक-विद्यार्थी चिडून निघून गेले.

एका हनीमूनची गोष्ट. नवरा-बायको हिल स्टेशनला गेले. दरीकाठी फिरावयाला गेले. एकदिशा मार्ग होता.  डोंगराचा भाग, डावीकडे दरी. झरे वाहत आहेत. पण बायको काही डाव्या बाजूला येईना. परत आल्यावर  नवऱ्याने विचारले ‘तू अशी घाबरत का होतीस? माझ्या हातात हात का दिला नाहीस? खरं सांग.’ ती म्हणाली ‘मी टीव्ही सिरियल्स, सिनेमामध्ये बघितलं होतं की नवरा बायकोला दरीत ढकलून देतो.’ नवरा चिडला. शेवटी बायकोने त्याला शांत केले. हळूहळू बायकोच्या डोक्यातील हे विचार कमी झाले. मग ती इतरांना सांगू लागली ‘ते टीव्हीवरती दाखवतात ते खोटे आहे.’

अजून फाशी नाही – राजीव गांधी खून खटल्यातील नलिनी या महिला आरोपीबद्दल सुप्रीम कोर्टाने निकालपत्रात म्हटले आहे ते असे- मुख्य कटात जरी नलिनीचा सहभाग असला तरी ती स्त्री असल्याने तिची फाशी आम्ही रद्द करीत आहोत. निदान १९५० पासून आजतागायत एकाही स्त्रीला फाशी दिलेली नाही.

लग्नाचे वचन देऊन शरीर संबंध झाला या एवढय़ाच आरोपावरून बलात्कार होऊ शकत नाही. लग्न ठरल्यानंतर पुरुषाच्या लक्षात आले की मुलीमध्ये असे स्वभावदोष आहेत की तिच्याबरोबर संसार अशक्य आहे, आणि म्हणून लग्न रद्द केले तर बलात्कार ठरू शकत नाही. जस्टिस रणजित मोरे व अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने मे ६, २०१५ रोजी एक सविस्तर निर्णय दिलेला आहे. वाचनीय आहे.

कायदे स्त्रियांच्या बाजूचे –

स्त्रियांना रात्री अटक करता येत नाही. सूर्यास्त व सूर्योदयामध्ये कुठल्याही स्त्रीला अटक करता येणार नाही असे Cr Pr Code Sec 46  (4)  मध्ये आहे. मग ती पाकीटमार असो, नक्षलवादी असो, दारू पिऊन मोटार चालविताना पाच लोकांना ठार केलेली असो, दरोडेखोर असो, मुलांना पळवून त्यांना विकणाऱ्या गँगची नायकीण असो अथवा ड्रग्स वाहतूक करणारी असो.

नागरिकांनी काय कृती करावी –

भारतीय राज्यघटनेच्या ‘List Third’ मध्ये लग्न, घटस्फोट, फौजदारी कायदा हे विषय येतात. अर्थात, पार्लमेंटच्या अखत्यारीतपण येतात. आपल्या खासदारांना, आमदारांना भेटून त्यांना उपाय सुचवणे हे आपले कार्य आहे. याबाबत मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांचा अनुभव मला चांगला आहे. पाच वर्षे तुम्ही कोठे होतात? हा प्रश्न चूक आहे. पाच वर्षांत आपण किती खासदारांना-आमदारांना भेटलो हे स्वत:ला विचारले पाहिजे. कारण जो प्रसंग दुसऱ्यावर आला तोच प्रसंग उद्या आपल्यावर येणार आहे याची जाणीव ही सक्रिय नागरिकत्वाची पहिली पायरी आहे!
– अ‍ॅड. श्रीकांत भट, मुंबई.

प्रेमाचे सुंदर प्रयोग

दि. ३ जूनच्या अंकातील डॉ. मीनल कातरणीकर यांचा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा लेख आवडला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे भाषा, जात, धर्म, देश या सर्वाच्या पलीकडे जाऊन माणसामाणसांमध्ये जेव्हा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होईल व सर्व जग प्रेमाच्या धाग्यांनी बांधलं जाईल, तो खरा जागतिक ‘परिवार दिन’ ठरेल. हे मोलाचे विचार या युगात ते मांडलेच पाहिजेत.

तसेच १० जूनच्या अंकातीलही त्यांचा ‘सांस्कृतिक गुंतवणूक’ आणि १७ जूनच्या अंकातील ‘जागतिक सागरी दिन’ हेही लेख मोलाचे वाटले. ‘सांस्कृतिक गुंतवणूक’मध्ये त्यांनी म्हटले आहे, आपला वर्तमान कधीही रिकाम्या अवकाशात आकाराला येत नाही, त्याचा एक धागा भूतकाळाशी जोडलेला असतो व दुसरा भविष्यकाळाचा वेध घेत असतो. यासाठी त्यांनी दाखला दिला आहे तो ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा! असे अलौकिक ग्रंथदेखील ‘भाष्यकाराते वाट पुसत’च जन्माला येतात. असे म्हटले आहे. ते अगदी सार्थ आहे.

१७ जूनच्या ‘जागतिक सागरी दिना’च्या निमित्ताने मीनलताईंनी जे मांडले आहे तेही महत्त्वाचे आहे. त्या म्हणतात, ‘समुद्रमंथनातून अमृत मिळाले’ याचा शब्दश: अर्थ घेण्यापेक्षा दुर्धर रोगावरील औषध असा अर्थ घेऊन सागरी वैद्यकशास्त्राचा विकास करण्याएवढी वैज्ञानिक प्रगल्भता आपण का अंगी बाणवू शकत नाही? हे त्यांचे विचार त्यांनी फारच सुंदर शब्दांत मांडले आहेत. ते हृदयाला भिडणारे असून मोलाचे वाटले. खरंच मला तर सागराचे ‘विशालत्व’ व ‘धीरगंभीरता’ खूप काही देऊन जाते असे नेहमीच वाटत आले आहे. तीच विशालता आणि गांभीर्य आपल्या लेखनालासुद्धा ओघवती देते असे मला वाटते.

तसेच १० जूनच्या अंकातील वैशाली चिटणीस यांचा ‘पुन्हा राजा लीअर’ हा लेखही आवडला. शेक्सपिअरच्या ४००व्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ नाटय़ संस्थेद्वारा पुन्हा या नाटकाचे प्रयोग तसेच ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी अनुवादित केलेल्या शेक्सपिअरच्या ‘राजा लीअर’ नाटकाचा आढावा या सर्वामुळे आपण पुन्हा रंगभूमीकडे खेचलो जातो. पुन्हा रंगभूमीविषयीचेही आपले प्रेम व्यक्त होऊन मनोमन या दिग्गजांच्या प्रतिभेला आणि त्यातील व्यक्तिमत्त्वांना आपण सलाम केल्याशिवाय राहत नाही.

तसेच याच १० जूनच्या अंकातील ‘दखल’ (पुस्तकांची) या संदर्भात दिलेली सर्व पुस्तके वाचनीय, माहितीप्रद, बोधप्रद आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची दखल घेणारी वाटली.

गेल्या काही अंकात वास्तुशास्त्रासंदर्भातील काही लेख येत असतात. आपल्या भरभराटीसाठी, यशप्राप्तीसाठी वास्तूचा दरवाजा कोणत्या दिशेस असावा, वास्तू दोष कसा नष्ट करावा यावर बरेच सल्ला मार्गदर्शन असते. अशी लेखमाला वाचून या देशात अजून किती अंधश्रद्धा आहेत, त्या कुठवर पोहचल्या आहेत हे जाणवते.
– नलिनी दर्शने, पुणे.

लेखमाला नव्हे जाहिरात

वास्तुशास्त्रासंदर्भात ज्या लेखमालेवर वाचकांनी आक्षेप घेतला आहे, तो ‘लोकप्रभा’च्या लेखमालेतील लेख नव्हे तर ती जाहिरात असून तसा स्पष्ट उल्लेख त्या सर्व पानांवर केला जातो.        – कार्यकारी संपादक

गुंतवणूक विशेषांकातील मिलिंद अंध्रुटकर यांचा चार्टवरील लेख आवडला. शेअर बाजारातील किचकट अशा चार्टचा अभ्यास आणि ट्रेडींग कस करावं या विषयावरील विस्तृत आणि माहितीपूर्ण विवेचन आवडले. अंधुट्रकरांनी या विषयावर खरे तर पुस्तक लिहिणे अपेक्षित आहे.
– मिलिंद मोघे, ई-मेलवरून.

१ जुलैच्या अंकातील अभिजीत भूमकर यांचं ‘पोस्टर गर्ल’ या कथेबद्दल हार्दिक अभिनंदन. एका जळजळीत विषयावर त्यांनी अतिशय सकारात्मक कथा लिहिली आहे. समाजाच्या षंढपणावर नुसती टीका न करता त्यांनी त्या मुलीच्या माध्यमातून सुचवलेला उपाय मला जास्त महत्त्वाचा वाटला. कोवळ्या कळ्यांना जपणं, त्यांना संरक्षण देणं याचबरोबर त्यांना निर्भय बनवणं ही सुद्धा समाजाची जबाबदारी आहे, हे अंजन त्यांनी घातलं आहे.
– वैशाली पंडित, ई-मेलवरून.

१७ जूनच्या अंकातील आचार्य वसंत गोडबोले यांचा ‘क्षितिज’ हा नवीन विचारसरणीचा व वेगळ्या धर्तीवर आधारित लेख अतिशय आवडला. मी आपला नियमित वाचक असून, असे लेख करण्याबाबत आपल्या टीमला शुभेच्छा!

– व्ही. पी. महाशब्दे, नवी मुंबई

१७ जूनच्या अंकातील ‘माझे आजोळ’ आणि ‘लाल मातीवरचा ढिसाळ खेळ’ हे दोन्ही लेख आवडले. प्रमोद साने यांच्या लेखामुळे प्रत्येकाला हमखास आपल्या आजोळची आठवण झालीच पाहिजे. याच अंकातील ओवी थोरात यांचा जंगलवाचन या सदरातील लेख जंगलाचा जिवंत अनुभव देणारा आहे. लेखिकेनं अनुभवलेलं अनोखं जंगल शब्दांमध्ये पुरेपूर उतरले आहे. हे केवळ जंगल भटकणं नाही, तर त्याचबरोबर तिने केलेल्या उपक्रमाची डायरीच वाचावं असा अनुभव होता.
– अजित कांबळे, पुणे.

व्यवस्थेचं अपयश
२० मे च्या अंकातील पाण्याच्या नियोजनातील उणिवा मांडणारा लेख अभ्यासपूर्ण होता. सरकार अनेक योजना सुरू करते, पण अंतिमत: त्या एक तर पूर्ण होत नाहीत किंवा योग्य पद्धतीने राबवल्या जात नाहीत. त्यातूनच अशी संकट निर्माण होतात. नैसर्गिक संकट टाळणं अवघड असते. पण व्यवस्था जर सक्षम नसेल तर मानवनिर्मित संकटांचा सामान अधिक प्रमाणात करावा लागतो. अर्थातच आपल्या व्यवस्थेचं हे अपयश म्हणावं लागेल.
– सुनील शिर्के, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:01 am

Web Title: readers response 112
Next Stories
1 गांभीर्याने विचार करावा
2 निवडणूक निकालांचा नेमका अर्थ
3 नियोजनाची ऐशीतैशी
Just Now!
X