15 August 2020

News Flash

बादरायण संबंध जोडू नका

दि. १५ जुलच्या अंकातील ‘अन्यथा डाळ शिजणे कठीण’ हे पत्र वाचले.

दि. १५ जुलच्या अंकातील ‘अन्यथा डाळ शिजणे कठीण’ हे पत्र वाचले. एक जागरूक गृहिणी म्हणून पत्र लेखिकेला मत मांडण्याचा अधिकार निश्चित आहे परंतु पुढच्या निवडणुकीत भाजपची डाळ शिजणे कठीण, असे मत व्यक्त करणे योग्य वाटले नाही. विद्यमान शासनाला सत्तेवर येऊन दीड वर्ष झाले, अजून साडेतीन वर्षे बाकी आहेत. मतदार नागरिक आता जागरूक झाले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार राजाने आपला सजगपणा दाखवून निष्क्रिय लोकप्रतिनिधींना आणि पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली. मतदाराना विद्यमान सरकारची कामगिरी पसंत न पडल्यास योग्य तो निर्णय घेण्यास मतदार समर्थ आहेत. डाळीच्या विषयावरून भाजपला संधी मिळणार नाही, असे मत मांडणे म्हणजे बादरायण संबंध जोडण्याचा प्रकार झाला. मृणालताई, अहिल्याबाई यांची कामगिरी प्रशंसनीय होतीच परंतु त्याचबरोबर रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, रामभाऊ नाईक, अण्णा जोशी, गोपीनाथ मुंडे, स्वत: मुख्यमंत्री फडणवीस या व इतर अनेक भाजपच्या आमदारांनी विधानसभेत जागरूक लोकप्रतिनिधी कसे असावेत ते दाखवून दिले आहे हे सर्वश्रुत आहे.
– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण (ई-मेलवरून).

आपलाही हातभार हवा…
दि. ३ जूनच्या अंकातील ‘रोजगार हमीचा प्रायव्हेट प्रयत्न’ हा लेख वाचून कौतुक वाटले. कारण सरकार दुष्काळग्रस्तांसाठी काय करते आहे हा धोशा लावत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार महत्त्वाचा असतो. आज विरोधी पक्ष व काही संघटनाप्रमुख फक्त शासनावर तोफा डागीत आहेत. पण हे एक पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून त्यांनी काय केले? प्रत्येक गोष्टीचे फक्त राजकारण करणे एवढे एक उद्दिष्ट आजकालच्या राजकारणात उरले आहे. या सर्व पक्षांना व संघटनांना खरोखर दुष्काळग्रस्तांची कणव आहे तर मग प्रत्येक पक्ष आपल्या निधीतून काही कोटी रुपये का देत नाही? प्रत्येक आमदार-खासदारांना दरवर्षी दोन -दोन कोटी निधी मिळतो. खरे तर या निधीची फक्त खिरापत वाटली जाते. या वर्षी सर्वच आमदार-खासदारांनी हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरला तर काय हरकत आहे? महाराष्ट्रात अनेक श्रीमंत उद्योगपती, सिनेकलाकार, क्रिकेटपटू, नोकरदारवर्ग इतर व्यावसायिक आहेत. त्यांनी प्रत्येकी आपला वाटा उचलला तर कितीतरी मोठा निधी उभा राहील व असे झाले तर सामान्य माणसेही यात सामील होतील व यामुळे दुष्काळाच्या सर्व समस्या सुटणार नाहीत, पण शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल. आत्महत्या टळू शकतील.
– डॉ. अनिल. सोहोनी, दोंडाईचा (धुळे).

उपयुक्त माहिती
अनेक सदरांपैकीच ‘इंटिरियर’ हे सदरही वाचनीय असतं. यात मांडलेले छोटे-मोठे मुद्दे अगदी पटण्यासारखे असतात. सध्या सुरू असलेली रंगांची मालिका अतिशय आकर्षक आहे. मुळातच रंगांविषयी अनेकांना उत्सुकता असते. त्यातही घरसजावट करताना रंगांचा विचार अतिशय गांभीर्याने केला जातो. त्यातच वैशाली आर्चिक त्यांच्या लेखातून रंगांचं महत्त्व, त्यांचे स्वभाव, प्रवृत्ती मांडतात. कोणत्या खोलीला कोणता रंग आणि का द्यावा हे स्पष्ट करतात. रंग-४ या लेखात रंगांच्या मानसशास्त्राबद्दल चांगली माहिती दिली आहे. घरसजावट करतानाच्या टिप्सही लेखांमध्ये दिलेल्या असतात. नवीन घर घेतानाच नव्हे तर जुन्या किंवा सध्या असलेल्या घराच्या सजावटीसाठीही या लेखांमधील माहिती उपयुक्त ठरते.
– संदीप वाघ, नाशिक.

नियंत्रण हवेच
‘नीट फक्त टय़ूूशन उद्योग सुरू राहण्यासाठी’ हा साप्ताहिक ‘लोकप्रभा’ (१० जून) मधील ‘नीट’च्या निमित्ताने आलेला लेख वाचला. ते तसेच असणार असे वाटते, कारण खासगी क्लास म्हणजे पशांची चांदी होय. म्हणूनच खासगी क्लासवर नियंत्रण ठेवणे हे सरकारचेच काम आहे. टय़ूशनचे वाढते पेव नियंत्रित करणे गरजेचे आहे.
– धोंडिरामसिंह राजपूत, वैजापूर, जि औरंगाबाद.

‘लोकप्रभा’चा कार्टून विशेष अंक छान होता. त्यामध्ये अ‍ॅनिमेटर्सच्या संदर्भात लेख होते. पण त्यात अ‍ॅनिमेटरची फक्त नावं नमूद केली आहेत. मला यात करिअर करायचे आहे. त्यामुळे त्यासंबंधी मार्गदर्शन हवे होते. तर त्यांचे संपर्क क्रमांक व पत्तेही दिले असते तर मार्गदर्शनाची दिशा मिळाली असती.
– कस्तुरी नाईक (ई-मेलवरून).

‘लोकप्रभा’मधील मेघना फडके यांचा पाण्याखालील दुनियेचे वर्णन करणारा लेख आवडला.
– भारत हाटे.

नेहा महाजन यांचे सदर आवडले. असेच लिहीत राहा अशी त्यांना विनंती.
– हर्षवर्धन ठकार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2016 1:01 am

Web Title: readers response 116
Next Stories
1 संघटनांनीच शिस्त लावावी
2 माहितीपूर्ण लेख
3 अन्यथा डाळ शिजणे कठीण
Just Now!
X