18 September 2019

News Flash

गीरच्या अभयारण्यात हिडिंबेची गुंफा

येथील आदीम जमाती हिडिंबाला मातेसमान मानून तिची पूजा करतात.

साप्ताहिक ‘लोकप्रभा’चा ८ जुलैचा अंक वाचला. विलोभनीय मुखपृष्ठ, साजेसे संपादकीय, वैशिष्टय़पूर्ण लेखमाला, प्रासंगिकांची मांदियाळी आदींमुळे हा अंक संग्राह्य़ ठरला आहे.

या अंकातील खलनायकांच्या मंदिरांचा लेख आवडला. २००० ते २००३ मध्ये उना गुजरात येथे कार्यरत असताना गीरच्या जंगलात फिरताना एका गुहेत हिडिंबा मातेचे मंदिर पाहायला मिळाले. येथे भीम आणि हिडिंबाने गांधर्व विवाह केला असून घटोत्कचाच्या उत्पत्तीचे महत्त्वपूर्ण स्थान असल्याचे सांगतात. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील नवापूर (नंदूरबार) जवळ माछुंद्री नदीच्या तटावरील गीरच्या जंगलापर्यंत हिडिंबा आणि घटोत्कच हे भ्रमण करत असे सांगतात. येथील आदीम जमाती हिडिंबाला मातेसमान मानून तिची पूजा करतात. हिडिंबा ही राक्षसी, तर भीमपुत्र घटोत्कच राक्षससदृश भीमकाय पुरुष असल्याचे महाभारतात सांगितले आहे. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळाच्या वास्तव्यातील अनेक स्मृतिस्थाने या गीरच्या अरण्यात आहेत असे सांगितले जाते. मला त्यातील भीमचास, पांडवगुफा, गंगेश्वर, हिंगलाज गुहा, हिडिंबा गुफा इत्यादी स्थाने पाहावयास मिळाले.

याबरोबरच १० जूनचा साप्ताहिक ‘लोकप्रभा’चा अंक अत्यंत आवडला. विलोभनीय मुखपृष्ठ, साजेसे दर्जेदार संपादकीय, खमखमीत व्यंजन, वाचन व संस्कृतीकडे कल इत्यादी बाबींमुळे हा अंक संग्राह्य़ असा ठरला आहे. ‘कमावतीच्या हाती लग्नाच्या गाठी’ ही कव्हर स्टोरी विशेष आवडली. कथाही मनोवेधक आहेत. ‘नीट’ची नीटनेटकी माहिती, राजकारणाचे टोकदारपण, सफरीचा स्वप्नांतिक आनंद, युरोचा बिगूल मनास आनंद देऊन गेल्या.
– संजय बर्वे, यवतमाळ

बिचाऱ्या प्रेक्षकांची सहनशीलता!
‘लोकप्रभा’, १ जुलैच्या अंकात ‘छोटा पडदा’ या सदरात चैताली जोशींनी ‘आणि म्हणे आम्ही हुशार’मध्ये सध्या चाललेल्या सर्वच मराठी मालिकांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘पसंत आहे मुलगी’ला सध्या इतके फाटे फोडले आहेत की दर्शकांचे सोडाच पण निर्देशकसुद्धा भांबावून गेला आहे. त्यात जे दाखवतात ते पचनी पडत नाही. ‘काहे दिया परदेस’मध्ये गौरीचा चेहरा रुसवा का दाखवतात हे एक गूढच आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ अजून काय काय भयावह दाखवणार कळत नाही. ‘नांदा सौख्य भरे’मध्ये कारस्थानंच जास्त दाखवली जातात. एकंदरीत तर्कबुद्धी वापरायची नाही, हे ठरवून या मराठी मालिका बघितल्या म्हणजे मानसिक त्रास होत नाही. हे सगळे बघून असे वाटते की, मालिका भागांची संख्या मर्यादित करायला हवी.

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे खूप कलाकारांना मालिकांमधून कामं मिळाल्याने मोठा रोजगार निर्माण झाला आहे. मात्र त्यातून प्रेक्षकांना जे सहन करावे लागते त्याचा विचार कोणीच करत नाही. या मालिकांपुढे सह्यद्रीसारखी वाहिनी बरी असे म्हणावे लागते.
– भाऊराव हेडाऊ, नागपूर.

‘कार्यकुशलता’ महत्त्वाची
दुष्काळाबाबतची वीस मेच्या अंकातील कव्हरस्टोरी वाचली. जलयुक्त शिवार योजनेत नियोजनाचा अभाव दिसून येतो. आजही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू नये यावरून नियोजन शून्य प्रशासनाची कल्पना येते.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

मार्केट रिसर्चचे महत्त्व किती?
‘मार्केट रिसर्चचे महत्त्व’ हा २२ जुलैच्या अंकातील श्रीकांत शिदोरे यांचा लेख एका वेगळ्या विषयावर प्रकाश टाकणारा होता. सर्वसामान्यांशी निगडीत असणाऱ्या पण सर्वसामान्यांना पुरेशी माहिती नसणाऱ्या या विषयाची लेखकाने अभ्यासू मांडणी केली आहे.
– अजित खलाटे, सातारा

मलाही लिहिते केले… 
दि. २९ जुलैच्या अंकातील कै. वसुंधरा पेंडसे नाईक यांच्याबद्दल ‘विशेष मथितार्थ’मध्ये त्यांच्या सडेतोड व करारी स्वभावाचा पैलू उलगडून दाखविला आहे तो उल्लेखनीय आहे.

तसेच माजी संपादक प्रदीप वर्मा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘विलक्षण, मनमिळाऊ संपादक’ असा उल्लेख केला आहे त्याचा प्रत्यय मलाही १९८५ ते १९९० च्या दरम्यान आला आहे.

‘लोकप्रभा’त लिहिण्यासाठी मला द्वारकानाथ संझगिरी यांनी प्रेरणा दिली आणि माझा पहिला लेख ‘लोकप्रभा’त प्रसिद्ध झाला तो वसुंधरा पेंडसे नाईक यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळे. पुढे सतत लिहितं करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोजकंच, पण शांतपणे समजावून सांगणं, कमी वेळात जास्त आशयाचं बोलणं आणि वेळेवर अन् लिहिण्यात सातत्य ठेवण्यासाठी लागणारी चिकाटी वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांच्याकडून त्या काळात शिकता आल्या.

वसुंधरा पेंडसे नाईक यांचं ‘शेवटचे पान’ नेहमीच वाचनीय असायचे. ७ जुलै १९८५ च्या शेवटच्या पानात त्या लिहितात, ‘‘पावसाळा दरवर्षी येतो आणि मुंबापुरीला जलमय करून टाकतो.. भारताचेच नव्हे तर जगाच्या आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र असलेल्या या शहराला वाचवायचे असेल तर केंद्र शासनाने त्याच्या समस्यांचा अग्रक्रमाने विचार करून त्यासाठी जरूर ते आर्थिक साहाय्य करायला हवे. अन्यथा सोन्याची ही द्वारका बुडायला फारसा वेळ लागणार नाही.’’

तरीही २००५ साली मुंबईत याच महिन्यात २७ जुलैला ‘महाप्रलय’ आला अन् द्वारका पाण्यात बुडालीच हे सर्व जगाने उघडय़ा डोळ्याने पाहिले. अन् मुंबईने अनुभवले – नव्हे सोसले..

असो- अशा धडाडीच्या संपादकाला माझा मानाचा मुजरा.
– उमेश कुगावकर, ठाणे .

प्रादेशिक पक्ष आवश्यकच!
प्रादेशिक पक्षांच्या उदय व विकासाची कहाणी सांगणारी कव्हरस्टोरी ‘राष्ट्रीय पक्षांच्या विश्वासार्हतेला ग्रहण’ चांगलीच होती. प्रादेशिक पक्ष वाढल्याने केंद्र सरकार दुर्बल होत नाही. प्रादेशिक पक्ष हे दबाव गटाचे काम करतात आणि लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी दबाव गट उपयुक्त कार्य करतात.

अंकातील इतरही लेख चांगले आहेत. वृक्षोपनिषद हा लेख आवडला. वृक्ष लावणे ही कृती हेतुपुरस्सर म्हणून न होता जीवनाचा एक सहज भाग म्हणून झाला तर खूपच परिणामकारक होऊ शकेल. कथा चांगल्याच असतात, परंतु या कथांनी आता मध्यमवर्गीय जाणिवांच्या पुढे जायला हवे. शहरी व मध्यमवर्गीय चौकटीच्या पलीकडेही खूप मोठे विश्व आहे याची जाणीव इतर कथाकारांनी बाळगली पाहिजे.
– चंद्रकांत नंदाने, यवतमाळ.

राष्ट्रीय पक्ष लोकसभेपुरते तरी असावेत
प्रादेशिक पक्षांची चलती म्हणजे राष्ट्रीय पक्षांच्या विश्वासार्हतेला ग्रहण हे ‘लोकप्रभा’चे म्हणणे अगदी योग्य आहे. (लोकप्रभा- दिनांक ३ जून २०१६)

आपल्या देशात राष्ट्रीय पक्षाला चांगले दिवस नाहीत. आज लोकसभेत काँग्रेस दहा टक्केही नाही. याचा अर्थ काँग्रेस नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक संपली आहे. भाजप देशाच्या सत्तेत असला तरी सर्व राज्यांत अस्तित्वात नाही. केवळ नरेंद्र मोदींमुळे भाजपला सन २०१४ ला देशाची सत्ता मिळाली; परंतु पंतप्रधान पदावर दोन वर्षांनंतर मोदी भाषणबाजी करत आहेत. भ्रष्टाचार तिळमात्रही कमी झालेला नाही. उलट महागाईप्रमाणे वाढला आहे. याचाच अर्थ राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येवो किंवा राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर येवो परिस्थिती तीच राहते.
– आर. के मुधोळकर, नांदेड.

आपलाही हातभार हवा…
दि. ३ जूनच्या अंकातील ‘रोजगार हमीचा प्रायव्हेट प्रयत्न’ हा लेख वाचून कौतुक वाटले. कारण सरकार दुष्काळग्रस्तांसाठी काय करते आहे हा धोशा लावत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार महत्त्वाचा असतो. आज विरोधी पक्ष व काही संघटनाप्रमुख फक्त शासनावर तोफा डागीत आहेत. पण हे एक पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून त्यांनी काय केले? प्रत्येक गोष्टीचे फक्त राजकारण करणे एवढे एक उद्दिष्ट आजकालच्या राजकारणात उरले आहे. या सर्व पक्षांना व संघटनांना खरोखर दुष्काळग्रस्तांची कणव आहे तर मग प्रत्येक पक्ष आपल्या निधीतून काही कोटी रुपये का देत नाही? प्रत्येक आमदार-खासदारांना दरवर्षी दोन९-दोन कोटी निधी मिळतो. खरे तर या निधीची फक्त खिरापत वाटली जाते. या वर्षी सर्वच आमदार-खासदारांनी हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरला तर काय हरकत आहे? महाराष्ट्रात अनेक श्रीमंत उद्योगपती, सिनेकलाकार, क्रिकेटपटू, नोकरदारवर्ग इतर व्यावसायिक आहेत. त्यांनी प्रत्येकी आपला वाटा उचलला तर कितीतरी मोठा निधी उभा राहील व असे झाले तर सामान्य माणसेही यात सामील होतील व यामुळे दुष्काळाच्या सर्व समस्या सुटणार नाहीत, पण शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल. आत्महत्या टळू शकतील.
– डॉ. अनिल. सोहोनी, दोंडाईचा (धुळे).

विशेषांक माहितीपूर्ण
‘लोकप्रभा’ जे विविध विशेषांक काढते ते माहितीपूर्ण असतात. श्रद्धा-अंधश्रद्धा-बुद्धिवाद-विज्ञानवाद, असे सर्व आयाम या अंकाला असतातच. हनुमान विशेषांकही तसाच होता. पंकज भोसले यांच्या रुईची पाने गोळा करणाऱ्यांवरील लेखातून वेगळाच व्यवसाय आणि वेगळंच जग पाहायला मिळालं.
– वसंतराव धोंडे, ठाणे.

कसलं मनोरंजन कोण जाणे?
‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत ना तर मनोरंजन आहे ना उपदेश. ललिताबाई अशी आई आहे जी फक्त पैशाला महत्त्व देते व आपल्याच मुलाचा संसार उद्ध्वस्त करू पाहते. इंद्रनील विदेशात शिकून आलेला, पण त्यालासुद्धा कळत नाही की आपले आई-वडील सुनांचे, मोठय़ा जावेचे दागिने विकतात, तसेच घरही विकून टाकते. लहान सून स्वानंदी शिकलेली व अति समजूतदार आहे. तरी ती सासूच्या म्हणण्यानुसार सगळं करत जाते. माहेरी आल्यावर ‘माझ्या सासूसारखी आई सर्वाना मिळावी’ असं सांगते हे पचत नाही. या मालिकेबद्दल जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे. नाव ‘नांदा सौख्य भरे’ पण तिथे काहीच सुखाचं नाही. वच्छी आजारी नवऱ्याकडे लक्ष न देता जगाच्या उठाठेवी करते. अशा मालिकेतून कसलं मनोरंजन होतं कोण जाणे! ‘लोकप्रभा’ १ जुलै २०१६ च्या अंकातील रवींद्र मालुंजकर यांचा ‘आई माझा कल्पतरू’ हा संकलित लेख आवडला.
– जी. ए. बापट, बडोदा.

मी लोकप्रभाचा नियमित वाचक आहे. राजश्री खरे यांचा ‘खिडकी’ हा लेख वाचण्यात आला. मीही सध्या मुलीकडे, अमेरिकेत मुक्कामाला आहे.

लेखात लिहिलेले सर्व अनुभव मी इथे घेतले. त्यांचं चित्रीकरणही केलं, पण खरे यांनी चपखल शब्दात केलेलं वर्णन अप्रतिम आहे.
– मोहन शुक्ल.

विश्व सापांचे या पुस्तकावर सुहास जोशी यांनी लिहिलेला लेख आवडला. साप, त्यांचे जीवनमान, सापांबद्दल काय माहीत असावे, काय माहीत नसावे अशी सगळी माहिती दिल्यामुळे ते पुस्तक किती माहितीपूर्ण असेल याची कल्पना आली. लेखकाचे आभार.
– प्रसाद चिटणीस, ई-मेलवरून.

First Published on August 5, 2016 1:01 am

Web Title: readers response 117