15 August 2020

News Flash

गोरक्षण तळमळ की नुसतीच चळवळ

शिवाजी महाराजांनाही ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशी उपाधी होती.

‘गो-पालकांच्या राज्यात गाईंचा हंबरडा’ ही सुहास जोशी यांची कव्हरस्टोरी वाचली गोरक्षण संकल्पना व प्रत्यक्षात गाईंची असलेली स्थिती, तसेच गोरक्षणासाठी गाईंच्या यातना कमी करून ही चळवळ योग्य मार्गावर नेण्यासाठी केलेले आवाहन या दृष्टीने लेख समर्पक वाटला. गोशाळा समिती आहे, पण त्याची बऱ्याच गोपालक ‘संस्थानिकां’ना माहिती नाही हे धक्कादायक आहे.

खरे म्हणजे गोरक्षण ही धार्मिक चळवळ आहे की आर्थिक चळवळ याविषयी नि:संदिग्धता आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रस्तुत महाराष्ट्रीय ज्ञानकोशात ज्ञानकोशकार डॉ. केतकरांच्या लिखाणात याचा उल्लेख वाचनात आला. गाईसंबंधात पूज्यबुद्धी आणि तिचे देवत्व हिंदू संस्कृतीत प्रस्थापित झाले होते. शिवाजी महाराजांनाही ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशी उपाधी होती. मुस्लिमांच्या राज्यात गोहत्येला बंदी उठवली गेली. ब्रिटिशांच्या राज्यात मात्र गोरक्षण चळवळीला वेग आला तो आर्थिक चळवळ म्हणून. म्हणजे गोरक्षण फंड करणारे किंवा त्या नावाखाली तयार झालेले ‘फंड(णी)खोर’ किंवा भाकड जनावरांत गणल्या गेलेल्या गाईंना ज्यांच्या ताब्यात दिल्या गेल्या ते कसाई यांनाच श्रीमंत करणाऱ्या योजनांचेच पेव फुटल्यासारखे झाले. या संदर्भात डिसेंबर १९२४ मध्ये बेळगावात भारतीय गोरक्षण परिषदही भरली होती.

हा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे गोरक्षण ही धार्मिक चळवळ म्हणून चालवणे हे राजकीयदृष्टय़ा फलदायी नाही आणि आर्थिक चळवळ म्हणून ती महत्त्वाची करणे हे प्रांतिक सरकारांना ती सहानुभूतीपूर्वक, पद्धतशीरपणे गोधन (संपत्ती) म्हणून वाढवणे शक्य होते तरी जवळजवळ सर्वच प्रांतिक सरकारांनी औदासीन्य दाखवले. या पाश्र्वभूमीवर आज सरकारने जी काही गोरक्षणाची चळवळ आरंभिली आहे त्यामागे प्राणीप्रेम आहे की धार्मिक महत्त्व की आर्थिक चळवळ हे स्पष्ट व्हावे लागेल. सध्या एका विचित्र कात्रीत गोरक्षण सापडले आहे असे वाटते. आर्थिक चळवळ म्हटले तरी त्यात अवैधरीत्या कत्तलखान्याकडे घेऊन जाण्यासाठी विक्री करणाऱ्यांचा भरणा अधिक असेल तर गोरक्षणाच्या चांगल्या उद्देशाला गालबोट लागल्यासारखेच आहे. गोहत्या प्रतिबंध केल्यावर रस्त्यावर मोकाट सोडल्या जाणाऱ्या भाकड गाई, त्यांच्यासाठी अनुदानाअभावी अपुरी पडणारी गोशाळांची व्यवस्था, यामुळे गोरक्षणाची खरोखर तळमळ आहे की केवळ आर्थिक चळवळ, हा प्रश्न मात्र तसाच राहण्याची शक्यता जास्त वाटते.
– श्रीपाद कुलकर्णी, पुणे.

यश-अपयशाचे सुंदर विश्लेषण
मी ‘लोकप्रभा’तील नेहा महाजन यांचे सदर नियमितपणे वाचतो. यश आणि अपयशावर त्यांनी फार सुंदर लेख लिहिला होता. त्या लेखाने मलाही माझ्या बालपणावर तसंच वैयक्तिक अनुभवावर लिहायला उद्युक्त केलं.  आपल्या चांगल्या काळात तसंच पडत्या काळात टिकून राहण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, हे मला नेहा महाजन यांच्या यशापयशासंदर्भातील लेखातून समजलं. एखाद्याच्या क्षमता मोजण्यासाठी त्याने मिळवलेलं यश हे साधन ठरू शकत नाही, ही गोष्ट खरीच आहे. उलट हातात काहीही नसताना आपण तो विशिष्ट क्षण कसा सुंदर करतो, त्यावरून आपण किती यशस्वीपणे जगतो हे ठरवता येतं. पण तसं होत नाही. आपल्या यश-अपयशावर लेबलं लावत लोक आपल्याला जोखत बसतात, हे त्या म्हणतात, ते एकदम बरोबर आहे.
– स्वप्निल नलावडे, इंदापूर, ई-मेलवरून.

मी नेहा महाजन यांचं सदर नियमित वाचतो. यशापयशाच्या मोजमापासंदर्भातला त्यांचा लेख खरोखरच सुंदर होता. त्यातून नेहा महाजन त्यांच्या वयापेक्षा जास्त परिपक्व आहेत, हेच जाणवत राहतं. त्यांनी असंच लिहीत रहावं. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
– विवेक चिटणीस, ई-मेलवरून. 

संवेदनशीलता महत्त्वाची
तसा माझा चित्रपटांशी फारच कमी संबंध येतो. पण ‘कॉफी आणि बरंच काही’ हा सिनेमा माझ्या ताईमुळे बघावा लागला आणि जाणवलं की नेहा महाजन हा उद्याचा आश्वासक चेहरा आहे. वाचन-लिखाणातून आलेली त्यांची संवेदनशीलता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. या संवेदनशीलतेपुढे बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. त्यांनी आयुष्यात वास्तवाशी फारकत घेऊ नये असं वाटतं. माझं म्हणणं समजण्यासाठी त्या पुरेशा सूज्ञ आहेत.
– अनिल झेंडे, ई-मेलवरून.

नेहा महाजन यांचं सदर वाचलं.  त्या किती सुंदर लिहितात. कुणी इतकं सुंदर, इतकं नितळ कसं लिहू शकतं. कुणी इतकं जाणिवेने कसं लिहू शकतं. एखाद्याचं कौतुक करण्यासाठी शब्दांनाही मर्यादा आहेत.
– प्रशांत कदम, ई-मेलवरून.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2016 1:01 am

Web Title: readers response 121
Next Stories
1 संदिग्ध लोकशाही, संदिग्ध स्वातंत्र्य
2 कोपेश्वर मंदिराकडे लक्ष द्या
3 वेतन आयोग हवाच कशाला?
Just Now!
X