दि. २६ ऑगस्टच्या ‘लोकप्रभा’त दीपा कर्माकरच्या यशाबद्दल लिहिताना शोभा डे यांच्यावर बरीच आगपाखड करण्यात आली आहे. मान्य आहे त्यांनी जाहीरपणे असे अशोभनीय विधान करावयास नको होते, पण वर्षांनुवर्षे भाग घेऊनही भारताला ऑलिम्पिकमध्ये फारसे यश मिळत नाही ही करोडो भारतीयांची खंत तर आहेच ना! अगदी या ऑलिम्पिकमध्येसुद्धा दोन पदके व इतर एक-दोन जणांची अंतिम फेरीत जाण्याची कामगिरी हे सोडले तर इतर सगळे निराशाजनकच होते ना? सानिया मिर्झा, नेहवाल, पेस, नारंग, बिंद्रा, राऊत या नामवंत नावांची कामगिरी अतिसामान्य होती. हॉकी संघाने दुबळ्या संघाविरोधात दोन विजय सोडले तर सुमार कामगिरी केली. खेळ म्हटला की जय-पराजय आले मान्य, पण असे किती वर्षे म्हणत राहावयाचे? चीनने १९८० साली ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला, आज ते टॉप थ्रीमध्ये आहेत. इतर क्रीडा संघटना सतत क्रिकेटच्या नावाने खडे फोडतात, पण क्रिकेट आज एवढा लोकप्रिय का आहे, तर आमचा संघ जगात टॉपवर आहे. आमच्या अनेक खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दबदबा आहे. अनेक विक्रम भारतीयांच्या नावे आहेत. क्रीडाप्रकारात सततचे राजकारण, लायकी नसलेले पदाधिकारी, खेळाडूंना योग्य मार्गदर्शन- सुविधा नसणे, ऐन वेळी हॉकीचा कर्णधार बदलला जातो, कुस्तीमध्ये मैदानाबाहेर कोर्टात लढाई चालते, कशी पदके मिळणार? शोभा डे यांच्यावर नुसती शाब्दिक टीका करण्याऐवजी खेळाडूंनी आपल्या मैदानावरील कौशल्याने मात केली असती तर अभिमान वाटला असता.
– डॉ. अनिल सोहोनी, दोंडाईचा, धुळे.

ऑलिम्पिक विशेषांक आवडला
‘लोकप्रभा’चा ५ ऑगस्ट २०१६चा ऑलिम्पिक विशेष अंक वाचला. सा. ‘लोकप्रभा’चा खटाटोप निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात वाद नाही. ऑलिम्पिक म्हणजे क्रीडा रसिकांसाठी एकप्रकारची पर्वणीच असते. हा खेळाचा महाकुंभ असतो. याचे रसग्रहण करत खिलाडू वृत्तीला दुजोरा मिळतो आणि ती सुखावते. त्यातच भर म्हणजे ‘लोकप्रभा’चा हा ऑलिम्पिक विशेष अंक होय. या अंकातील अध्र्या टक्क्याचा ऑलिम्पिक, चक दे, विलोभनीय क्रीडाविष्कार, वाद संपत नाहीत, पूर्वावलोकन सोबत मातृत्व हेच स्त्रीत्व आपले आगळेवेगळे महत्त्व प्रदान करणारे ठरले आहे.

या अंकातील ‘होमरूल लीग आणि स्वराज्य’ हा स्मरणीय असा लेख. टिळकांनी स्वराज्यासाठी अख्खा वऱ्हाड यांत पिंजून काढला आणि पुढे गणेशोत्सव आणि शिवजयंतीला सुरुवात केली. मात्र याकरिता त्यांना नागपुरातून प्रेरणा मिळाली होती. नागपूरचे राजे खंडोजी भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी इ. स. १७५५ साली नागपुरात गणपतीची स्थापना केली होती. बंगालच्या स्वारीहून विजय मिळवून परत येत पावेतो त्यांच्या कुळाच्या गणपतीचे विसर्जन झाले होते. विजयाचा आनंद साजरा करण्यााठी त्यांनी गणपतींची स्थापना केली. हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. या गणपतीची मूर्ती १२ हातांची आणि २१ फुटांची होती. टिळक स्वातंत्र्यासाठी लढा देताना नागपुरास येऊन भोसले परिवारास भेटले आणि खंडोजी महाराजांच्या दूरदृष्टीचा अभ्यास करून टिळकांनी या कुळाचारी गणपतीला सार्वजनिक स्वरूप दिल्याचे  सांगतात.
– संजय बर्वे, नागपूर.

द्विराष्ट्रवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता
साप्ताहिक ‘लोकप्रभा’च्या १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकात सुहास जोशी यांचा ‘समाजमाध्यमवीरांची इयत्ता कोणती?’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात जम्मू-काश्मीर प्रश्नी समाजमाध्यमवीरांना काहीच माहीत नसते, तरी ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात, असा लेखकाचा आरोप आहे; परंतु लेखकाला ‘हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान झिंदाबाद’ या भारतविरोधी नाऱ्याबद्दल मात्र काहीच आक्षेप नाही, असे वाटते. जम्मू-काश्मीरप्रश्नी अनेकांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. मीसुद्धा कधीच जम्मू-काश्मीरला गेलो नाही, तरीसुद्धा माझा जम्मू-काश्मीरप्रश्नी स्वत:चा दृष्टिकोन आहे. या विषयावर समाजमाध्यमात मी माझे मत वेळोवेळी मांडतो आहे. माझ्या मते जम्मू-काश्मीरचा प्रश्न विकास, कश्मिरीयतचा नाही, तो प्रश्न द्विराष्ट्रवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षताचा आहे.
– झेनझो कुरिटा, सोलापूर.

‘जिओ इस्रो’ हा २३ सप्टेंबरच्या अंकातील मथितार्थ माहितीपूर्ण आहे. प्रसारमाध्यमं ही बहुतांशवेळा विज्ञान विषयक लेखांपासून दूरच असते. गणपती मिरवणूकांना प्रसिद्धी देणे वैज्ञानिक सफलेतेपेक्षा सोपे असते. वैज्ञानिक विषयांसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ‘लोकप्रभा’ हे विषय उत्तमप्रकारे  हाताळते.
– भाग्यश्री चाळके, मुंबई.

गणपतीसंदर्भातील डॉ. मीनल कातरणीकर यांचा ‘वंदन विघ्नहर्त्यांला’ हा त्यांच्या ‘प्रेमाचे प्रयोग’ या सदरातील माहितीपूर्ण लेख अतिशय आवडला.
-संकेत पाटोळे, इमेलवरून.

असे कार्यक्रम हवेतच का?
वर्षां राऊ त यांचा ‘स्वातंत्र्य प्रेक्षकांचे’ हा लेख खूप आवडला. पण मला एका मुद्दय़ावर मत मांडायचे आहे. प्रौढांसाठीच्या कार्यक्रमाची वेळ अकरानंतर असावी, असे त्यांचे मत आहे. यावर माझं मत असं की-  रात्री फक्त प्रौढांचे कार्यक्रम पाहणाऱ्यांकडून हिंसा घडणार नाही असे आपण म्हणू शकतो का? काही घरांतून रात्री अकरानंतर लहान मुले चोरून असे कार्यक्रम पाहणार नाहीत हे कशावरून? हल्ली मुलांना कोणते कार्यक्रम कुठे असतात, कधी असतात याची सविस्तर माहिती असते. यातून मला असे सुचवायचे आहे की असे हिंसात्मक, भावना चाळवणारे, मनाला संभ्रम उत्पन्न करणारे कार्यक्रम दाखवलेच पाहिजेत का? त्यातून खरंच प्रेक्षक लोकांचा फायदा होतोय का? का आणि कुणाचा होतोय हे तपासायचे कुणी?
-वैभव बारटक्के, इमेलवरून.