डेंग्यू अथवा इतर साथीच्या रोगांनी संहारक रूप धारण केले की आपल्याकडे त्यावर प्रचंड चर्चा होते. अगदी यत्रतत्र सर्वत्र फक्त हाच विषय असतो. सरकारी व्यवस्थेतील उणिवा, सर्वसामान्यांमधील अनास्था असे विषय चर्चिले जातात. चार दिवस सर्वत्र धावपळ होते आणि पुन्हा सारे काही शांत शांत.. परत पुन्हा जेव्हा ही साथ गंभीर रूप धारण करते तेव्हा परत ते सारे उगाळले जाते. मागील वर्षीदेखील काही प्रमाणात अशीच परिस्थिती होती. थोडक्यात काय तर आपल्याला अशा समस्यांवर ठोस उपाय करायची इच्छाच नाही. आणि ही अनास्था केवळ सरकारी पातळीवरच नाही तर सर्वसामान्यांच्या पातळीवरदेखील तेवढीच दिसून येते. त्यामुळे या सर्व चर्चा वांझोटय़ा ठरतात. त्यापेक्षा कृतीवर अधिक भर हवा. मात्र आपल्या देशात असं काही घडायची शक्यता कमीच असते. एकीकडे स्वच्छ भारताचे नारे लावले जातात, पण दुसरीकडे या अस्वच्छतेमुळे होणारा रोग हा हा म्हणता देश व्यापून टाकतो. एकाने दुसऱ्यावर, दुसऱ्याने तिसऱ्यावर आरोप करायचे यापलीकडे फारसे काही हाती लागत नाही. त्यामुळे हे सगळे पाहिल्यावर ये रे माझ्या मागल्या असे म्हणावे वाटते.
– अनिकेत जाधव, औरंगाबाद.

‘मराठा समाजाला न्याय हवा’

‘मराठा समाजाला नेमकं हवंय तरी काय?’ हे विचारून (२३ सप्टेंबर २०१६) ‘लोकप्रभा’ने लोकांचे मनोगत व्यक्त केले आहे. वास्तविक मराठा (क्रांती) मूक मोर्चातून मराठा समाजाने एकता दाखविली आहे. मूकपणे आपली व्यथा, वेदना व्यक्त केली आहे.

मराठा नेते पैशाने आकाशाएवढे मोठे झाले. मराठा समाज तळागाळाखाली जीवन जगत आहे. म्हणून मराठा मोर्चात नेते मागे उभे आहेत. ज्यांनी समाजाला मागे टाकले, खोल गर्तेत लोटले, त्यांना समोर उभे राहण्यासाठी तोंड नाही. मराठा समाजाने क्रांतीची मशाल हाती घेतली आहे. मराठा समाजाच्या मोर्चाची दखल सरकारने तोंडदेखली घेऊ नये. आरक्षणाचा प्रश्न इमानदारीने सोडवावा. ‘आर्थिक निकषावर सर्वच गरिबांना आरक्षण’ ही मंत्री रामदास आठवलेंची भूमिका अगदी योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती विचारात घ्यावी. निर्णय देशपातळीवर घ्यावा. प्रतिमोर्चे काढू नयेत, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशहिताची आहे.
– आर. के. मुधोळकर, नांदेड.

सर्वच समाजांनी प्रस्थापितांना दूर ठेवावे

मराठा क्रांती मोर्चाने एक स्पष्ट झाले, हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा लढा आहे. मला हे फार महत्त्वाचे वाटते. मराठा समाजावर अन्याय झाला याबद्दल दुमत नाही. पण अन्याय कोणामुळे झाला याबाबतीत मोर्चाच्या सामुदायिक नेतृत्वात दुमत नाही. आणि म्हणूनच त्यांनी प्रस्थापितांना बाहेर ठेवले आहे. खरे तर दलित, ओबीसी समाजाने जागृत होऊन समाजातील प्रस्थापितांना बाजूला ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्व समाजांत या प्रस्थापितांनी आपली घराणेशाही बळकट केली आहे. याचा बीमोड करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्राला पर्यायाने देशाला मिळेल. उत्तर प्रदेशात प्रस्थापित यादव विरुद्ध विस्थापित यादव, तसेच हिंदूंचे तारणहार (?) विरुद्ध विस्थापित हिंदू असे झाले तर सारे प्रस्थापित राजकीय पक्ष आपोआप लयाला जातील व देशामध्ये नवे नेतृत्व उदयाला येईल. नाही तरी गेल्या साठ-सत्तर वर्षांत राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देशाची कशी वाट लावली आहे, ते सर्व जण जाणतातच. आरक्षणाबाबत बोलायचे तर ते आर्थिक निकषावर हवे असे वाटते. ज्या मुलांनी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे फक्त त्यांनाच शिक्षणात आरक्षण मिळावे. नोकरी ही गुणवत्तेवर मिळवावी. आरक्षणावर नको. मग क्रीमी लेयरचा प्रश्न येणार नाही. क्रीमी लेयरसाठी सहा लाखांची मर्यादा हे हास्यास्पद वाटते. ज्यांचे उत्पन्न दोन लाखदेखील नाही त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होते. अर्थात या सूचना मान्य होणे अवघडच नाही तर अशक्यप्राय आहे हे निश्चित.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वेसावे, मुबंई.

आरक्षणाचे राडजकारण

‘मराठा समाजाला नेमकं हवंय तरी काय?’ या कव्हरस्टोरीतून सुहास जोशी यांनी तारीखवार मराठा आंदोलनाचा अहवाल सादर केला आहे. महाराष्ट्रात मराठा (सशक्त) समाज आरक्षणाकरिता इरेला पेटला आहे. तसं तर प्रत्येक प्रांतात आरक्षणाची मागणी चळवळ जोरात चालत आली आहे. जर १९४७ पासून आढावा घेतला तर लक्षात येत आहे की, आरक्षणाचा मूळ उद्देशच या वावटळीत कधीचाच बाजूला पडला आहे.

राजनैतिक पक्ष व्होट बँक साधण्यात मग्न असून प्रत्येकाला आरक्षणाची रेवडी वाटत सुटला आहे. असं भासू लागलंय की, संपूर्ण समाज हा मागासलेला असून प्रत्येकाला आरक्षणाच्या पांगुळगाडय़ाची आवश्यकता आहे की काय? या सर्वात ब्राह्मण वर्गही होरपळून निघतो आहे. त्याचा परिणाम समाजजीवनावर दिसू लागला आहे. साधारण मुलांची लग्ने होईनाशी झाली आहेत. मुली व त्यांचे पालक शेतकऱ्याशी लग्न करायला व लावायला तयार नाहीत.

‘गणपती विशेषांक’ ९ व १६ सप्टेंबर २०१६ वाचनीय व संग्रा आहेत. खूप प्रचार-प्रसार केला गेला की, मातीचे गणपती आणा. घरातच तांब्याच्या पात्रांत किंवा कृत्रिम कुंडात विसर्जित करा. मालिकांतर्फे संदेशही गेला, तो अतिउत्तम होता. वास्तवात मात्र वेगळेच चित्र उद्भवले. नदीजवळ कृत्रिम कुंड बनविले गेले, त्यात अनेकांनी आपले घरचे गणपती विसर्जित केले खरे, पण त्याचे प्रदूषित जल मात्र नदीतच सोडण्यात आले. एकंदरीत ‘लोकप्रभा’ ही शैक्षणिक साप्ताहिक पत्रिका ठरत आहे.
– संध्या बायवार, होशंगाबाद (म.प्र.)

नागपूजन कशाला?

दि. ७ ऑक्टोबरच्या अंकातील ‘भारत नागपूजकांचा देश’ या लेखातून नागपूजनाची प्राचीन परंपरा कळली. पूर्वीच्या काळी जैववैविध्याबद्दल पुरेसे शास्त्रीय ज्ञान नव्हते, पण ते जपायची जाण होती. त्यामुळे काही प्राण्यांना देवत्व दिले असेल तर ठीक आहे. पण आज शास्त्रीय कारणमीमांसा माहीत असताना पूर्वजांच्या गोष्टी किती आणि कशाला कवटाळायच्या? त्यापेक्षा शास्त्रीय जनजागृती कधीही चांगली. ती आपण या वर्षीच्या श्रावणातील अंकात केली होती. त्यामुळे ज्याला शास्त्रीय आधार आहेत, अशा गोष्टींवर उगाच इतिहास चिवडत बसून नये.
– राजेश अहिरे, नाशिक, ई-मेलवरून.

अभ्यासू अंकांची परंपरा

‘लोकप्रभा’चे विशेषांक हे खरोखरच विशेष असतात. केवळ प्रसंग साजरे करणे त्यात दिसत नाही. विशेषत: गणपती, देवी विशेषांक अंक तर एकदम खूपच अभ्यासपूर्ण असतात. दर वर्षी या अंकातून खूप मौलिक अशी माहिती या अंकातून मिळत असते. यावर्षीदेखील आपण हीच परंपरा सुरू ठेवली आहे. आपल्याकडून अशाच कामाची अपेक्षा आहे. ‘लोकप्रभा’च्या टीमला धन्यवाद.
– अजित कुंभार, सांगली, ई-मेलवरून.

गडकिल्ल्यांची अनोखी ओळख

अनेक ठिकाणी गडकिल्ल्यांवर शक्यतो ललित प्रवास लेखन दिसून येते, पण आपण गडकिल्ल्यांवरील हनुमान, देवी आणि गणपती हे दोन अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केले हे खूपच चांगले झाले. या दोन्ही लेखांमुळे गडकिल्ल्यांची वेगळी ओळख झाली. असे लेख वारंवार प्रकाशित करावेत.
– अमित लोकरे, मुंबई, ई-मेलवरून.

नकाराला महत्त्व कितपत

‘पिंक’ चित्रपटामुळे स्त्रीच्या नकाराचं महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आले. आपणदेखील तिच्या नकाराचं महत्त्व मांडले. पण एकंदरीतच समाजातील सध्याची बदलती परिस्थिती पाहिल्यावर नकार स्वातंत्र्य नेमके मिळत का? आणि ते मिळत नसेल तर स्त्रीची मानसिकता काय आहे. यावर चर्चा होणं गरजेचे आहे.
– परिणीता जोशी, नागपूर.

शास्त्रीजींचे स्मरण आवडले

बहुतांश वेळा २ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करण्याचे प्रमाण अधिक असते. पण लालबहादूर शास्त्रींवर फारसं लेखन माध्यमांमध्ये आढळत नाही. ‘लोकप्रभा’ने या वर्षी २ ऑक्टोबरचं औचित्य पकडून शास्त्रीजींवर लेख प्रकाशित केला हे उत्तम झाले. असेच प्रसंगानुरूप लेख आणखीही प्रकाशित करावेत.
– सुरेंद्र पाटील, पुणे, ई-मेलवरून.

वाचनीय, मननीय अंक

‘लोकप्रभा’चा प्रत्येक अंक अप्रतिमच असतो यात शंकाच नाही. ‘लोकप्रभा’चं वैशिष्टय़ हे की, वाचकाला बोलतं करणं, लिहितं करणं, त्यांचा सहभाग वाढवणं, हे महत्त्वपूर्ण कार्य तो करतो. २३ सप्टेंबर १६ चा अंकही याला अपवाद नाही. स्वाती शहाणेंचा ‘घरटे’ हा लेख अत्यंत सुंदर म्हणावा असाच आहे. तसं पाहायला गेलं तर ‘समकालीन’ ते ‘ट्रॅव्हलॉग’पर्यंत संपूर्ण अंकच वाचनीय, मननीयच असतो. क्षितिज पटवर्धन यांचा ‘पोलीस नावाची शोकांतिका’ वास्तवाचं भान करून देणारा निश्चितच आहे. प्रशांत दांडेकर, डॉ. मीनल कातरणीकर यांचे लेखही वाखाण्याजोगेच असतात व फारच उपयोगी तर असतातच. दिगंबर गाडगीळांनी ‘शरीरगंधाचा’ छान परिचय व अनुप्रयोग सुचवला आहे. सर्वच लेखकांना व ‘लोकप्रभा’च्या संपूर्ण टीमला हृदयपूर्वक अनेक शुभेच्छा.
– प्रा. महादेव बासुतकर, सिकंदराबाद.

रुचकर-शॉपिंग आवडला

‘रुचकर-शॉपिंग’ विशेषांक अगदी नेमक्या वेळी प्रकाशित झाला आहे. एकाच वेळी इतके सारे खाद्यपदार्थ आणि शॉपिंगच्या भरपूर टिप्स, खूपच छान. मार्गदर्शन तर झालेच पण त्याचबरोबर विंडो शॉपिंगदेखील झालं.
– अचला देशपांडे, ठाणे.

दि. ७ ऑक्टोबरच्या अंकातील ‘एका आडाण्यावरून’ ही सुमन फडके यांची कथा खूपच भावली. अशा कथा हल्ली फारशा वाचायला मिळत नाहीत.
– ललिता कुलकर्णी, कोल्हापूर.

‘भरली गणपतीची सभा’ आणि ‘बाप्पाच्या मनातले’ हे दोन्ही लेख सर्वसामान्य नागरिकांना गणेशोत्सवाबद्दल काय वाटते हे नेमकेपणाने सांगणारे होते. अगदी मार्मिक पद्धतीने आणि काहीशा व्यंगात्मकपणे हे मांडल्याबद्दल धन्यवाद.
– सुरुचि भोसले, कोल्हापूर.

टीव्ही विश्वातील अध्यात्मावरील पराग फाटक यांचा पंचनामा आवडला.
– अजय गाडगीळ, ठाणे.