News Flash

इतर देशांशी तुलना कशाला

‘लोकप्रभा’च्या २ डिसेंबरच्या अंकातील ‘कॅशलेस अद्यापही परिघाबाहेरच’ ही कव्हरस्टोरी वाचली.

‘लोकप्रभा’च्या २ डिसेंबरच्या अंकातील ‘कॅशलेस अद्यापही परिघाबाहेरच’ ही कव्हरस्टोरी वाचली. आपला सगळा समाज कॅशलेस करायचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे. त्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप आहे. तत्त्वत: पंतप्रधानांचा मुद्दा योग्यच आहे. सगळे व्यवहार कॅशलेस होतील तेव्हा अर्थातच ते रेकॉर्डवर येतील. त्यांची नोंद होईल. भ्रष्टाचार, आर्थिक शोषण या गोष्टींना आळा बसेल. काळ्या पैशाची निर्मिती रोडावेल, हे सगळं बरोबरच आहे. त्यासाठी कॅशलेस देशांची उदाहरणं देत ‘नमोभक्त’ पंतप्रधानांची बाजू हिरिरीने मांडत आहेत. पण गोष्ट अशी आहे, की स्वीडनसारख्या कॅशलेस देशांची भारताशी तुलनाच कशी होऊ शकते? आपल्या देशाची लोकसंख्या, आकार हे सगळं या विकसित देशांच्या तुलनेत अचाट आहे. आणि दारिद्रय़, अज्ञान, अंधश्रद्धेसारख्या समस्या परिस्थिती बिघडवण्यात अधिकच भर घालत आहेत. त्यामुळे आकाराने जेमतेम आपल्या एखाद्या राज्याएवढय़ा असलेल्या आणि लोकसंख्येच्या पातळीवर आपल्या एखाद्या राज्याच्या निम्म्याही नसलेल्या देशांशी तुलना करणं योग्य नाही.
– गौरव शेलार, अहमदनगर.

नोटाबंदीपेक्षा शिक्षण, आरोग्य महत्त्वाचे प्रश्न
‘पुढची टांच बेनामी मालमत्तेवर’ ही कव्हरस्टोरी वाचली. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काळ्या पैशाच्या प्रश्नावर इलाज म्हणून नोटाबंदीचं इंजेक्शन दिलं. त्यामुळे देशातला काळा पैसा बाहेर येईल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल असं सांगितलं गेलं. पण काळा पैसा हा प्रश्न जेवढा मोठा करून दाखवला जात आहे, तेवढा तो आहे का, हा प्रश्न एकदा विचारून बघायला हवा. म्हणजे तो प्रश्न असेलही मोठा, पण सगळं सोडून त्याच्याच मागे लागावं एवढा तो गंभीर आहे का, या मुद्दय़ाची चर्चा व्हायला हवी. कारण इतर कशाहीपेक्षा  शिक्षण आणि आरोग्य हे दोन प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर काम केलं तर बाकी सगळ्या गोष्टींवर फरक पडतो असं जाणकार सांगतात. पण रचनात्मक काम कधीच चमकदार, लोकांचं तातडीने लक्ष वेधून घेणारं नसतं, ही त्या कामाची आणि राजकारण्यांची मर्यादा म्हणायला हवी.
– विभा मारणे, सातारा.

नोटांचं डिझाइन नाही आवडलं
नोटाबंदी, त्याचा परिणाम, कॅशलेस इकॉनॉमी या सगळ्याबद्दल जी काही चर्चा सुरू आहे, ती ठीक आहे. त्याबद्दलचे ‘लोकप्रभा’त आलेले लेख वाचले. पण मला मात्र दोन हजारच्या तसंच पाचशेच्या नवीन नोटेचं डिझाइन अजिबात आवडलेलं नाही. अनेकांची अशीच प्रतिक्रिया आहे. या तुलनेत आधीच्या पाचशे तसंच हजारच्या नोटा भारदस्त वाटत होत्या. या नोटा अगदीच खेळण्यातल्या वाटतात. त्या हाताळताना आपल्या पैशांचं मूल्य अगदीच कमी झालंय असं वाटत राहतं.
– शीतल कवीश्वर, वर्धा.

स्वत:च्या घरापासून सुरुवात
‘कॅशलेस अद्यापही परिघाबाहेरच’ ही कव्हरस्टोरी वाचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर उलटसुलट टीका होते आहे. टीका करणाऱ्यांनी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की त्यांनी आपली सगळी राजकीय कारकीर्द त्यासाठी पणाला लावली आहे. आता त्यांनी उचललेलं हे पाऊल सामान्य लोकांना महत्त्वाचं वाटतं आहे, म्हणून ठीक आहे. पण सामान्य लोकांची अशी सकारात्मक प्रतिक्रिया आली नसती, तर पुढच्या निवडणुकीत त्याचा कौल मतपेटीतून आला असता. कोणता राजकारणी अशी रिस्क घेईल? काळ्या पैशाविरोधातली मोहीम फक्त भाजप सोडून इतर सगळ्या पक्षातल्या लोकांसाठी आहे असं तर झालेलं नाही ना? आता तर पंतप्रधानांनी पक्षातल्या आमदार, खासदारांना आठ नोव्हेंबरनंतरचे संपत्तीचे तपशील पक्षाध्यक्षांकडे सादर करायचे आदेश दिले आहेत. म्हणजे ते स्वत:च्या घरापासूनच सुरुवात करत आहेत. असं करणं अवघड असतं, हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं.
– शैलेश पालव, ठाणे

उल्लेखनीय लेख
१८ नोव्हेंबरच्या अंकातील दोन लेख उल्लेख करण्यासारखे आहेत. ते म्हणजे अविनाश कोल्हे यांचा ‘अंतर्मुख करणारं नाटकं’ हा लेख आणि डॉ. पद्मजा सामंत यांचा ‘क्यू टू पी टू आर टू पी’ हा लेख. नाटकावरील लेख अतिशय वाचनीय आहे. लेखात माहिती दिलेल्या नाटक आणि नाटककाराविषयी उत्सुकता वाढली. अशा कलाकृतींबद्दल माहिती असायला हवी. लेखाचा प्रवाह इतका रंजक आहे की कुठेही िलक तुटत नाही. असेच वेगवेगळ्या नाटकांसदर्भातील आणखी लेख वाचायला आवडतील. ‘क्यू टू पी टू आर टू पी’ हा लेख महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतो. सहसा अशा विषयांवर चारचौघांत बोलणं म्हणजे अवघडल्यासारखं होत असतं. पण खरं तर अशा गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा व्हायला हवी, याचा प्रत्यय या लेखातून होतो.
– कुणाल खंडागळे, नागपूर.

पराग फाटक यांचे ‘टीव्हीचा पंचनामा’ हे सदर वाचनीय आहे. खुसखुशीतपणा आणि माहितीचा ओघ असा सुंदर मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे.
– मधुरा नेवाळकर, ठाणे

फ्रेम्सच्या रचनेची माहिती उपयुक्त
वैशाली आíचक यांचे लेख नेहमीच उत्तम असतात. घरातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधूनही सजावट कशी करता येईल याची माहिती चांगली असते. २५ नोव्हेंबरच्या अंकातील त्यांचा ‘फ्रेम्स आणि पेंटिग्ज’ हा लेख आवडला. साधारणपणे नवीन घरात इंटिरिअर, रंग आणि अन्य गोष्टींवर भर दिला जातो. पण घरातल्या भिंतींना रंग दिला की झालं, या समजालाच त्या बाजूला ठेवतात. भिंतींनाही रंगाशिवाय अन्य आकर्षक गोष्टींनी सजवता येतं, याची महत्त्वपूर्ण माहिती या लेखामध्ये आहे. घरात खूप जास्त फ्रेम्स नको, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण फ्रेम्स जास्त असल्या तरी त्यांची िभतीवर रचना कशी करावी हेही समजून महत्त्वाचं ठरतं. अनेकांना पेंटिंग्जचीसुद्धा आवड असते. पण असे पेंटिग्ज विकत घेऊन घरात लावणार कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. याचं उत्तर म्हणजे हा लेख आहे. – संपदा सुर्वे, बेलापूर.
जगभराची सफर

‘लोकप्रभा’मध्ये सेलिब्रेटी लेखक हे सदर वाचनीय असतं. आजवर या सदरात ज्या कलाकारांनी लिखाण केलं आहे, ते उत्तमच होतं. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारापेक्षा वेगळा चेहरा यानिमित्ताने दिसतो. आता गीतांजली कुलकर्णी या लेखन करत आहेत. त्यांचे दोन्ही लेख अतिशय सुंदर आहेत. एखादा कलाकार देशभर, जगभर दौरे करतो म्हणजे फक्त नाटकांचे प्रयोग करतो, थोडं फिरतो एवढाच समज होता. पण एखाद्या कलाकाराच्या मनात अशा विविध ठिकाणी प्रयोग केल्याचं समाधान असतं. आनंद असतो, हे त्यांच्या लेखातून दिसून येतं. गीतांजली यांचे दौऱ्यांचे अनुभव या सदरातून वाचायला मिळणार आहेत, याचा आनंद आहे.
– अमृता पिंगळे, पुणे.

‘त्यांच्या हाती इंटरनेटचे शस्त्र’ हा प्राची साटम यांनी लिहिलेला लेख वाचला. ग्रामीण भागातल्या स्त्रियांना अशा पद्धतीने इंटरनेटशी जोडणं हा चांगला उपक्रम आहे. पण स्वयंसेवी संस्थांचे हे असे उपक्रम फंडिंग आलं की सुरू होतात आणि फंडिंग संपलं की संपतात. मग त्या लाभार्थीचा, प्रकल्पांचा एकमेकांशी काहीही संबंध राहात नाही. त्यामुळे असल्या प्रकल्पांना प्रसिद्धी देणं माध्यमांनी थांबवलं पाहिजे.
– संगीता कुलकर्णी, विरार.

प्राची साटम यांचा ‘आयुष्यवजा एक वर्ष’ हा लेख चांगला होता. आयुष्याच्या या वळणावरचे सुंदर चित्र त्यांनी रेखाटले आहे. हे वयच असे असते की त्या वेळी असे सारे विचार डोकावतात. पण त्याचबरोबर त्यांनी हे स्वप्निल चित्रण वास्तवावर आणून सोडले आहे हे लेखाच्या शीर्षकावरून कळते.
– करुणा पारकर, ई-मेलवरून.

अमित सामंत यांच्या किल्ल्यांवरच्या लिखाणातून त्या त्या काळातली बरीच आणि वेगळी माहिती मिळते. किल्ले बघताना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
– सुगंधा वाघमारे, भोर.

सुंदर संयोग
पराग फाटक यांचा ‘क्रीडा’ या सदरातील ‘पुन्हा सिंधुपर्व’ हा लेख वाचला. पुलैला गोपीचंदसारखा प्रशिक्षक मिळणं आणि त्याच्या शिष्येलासुद्धा खेळाची तेवढीच ओढ असणं हा सुंदर संयोग बॅडमिंटनमध्ये पुन्हा आला आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. याआधी सायनाच्या रूपात तो होताच. चांगले प्रशिक्षक, चांगले खेळाडू आपल्याकडे आहेतच, गरज आहे ती योग्य व्यक्ती, योग्य वेळी योग्य ठिकाणी एकमेकांना भेटण्याची असंच आता वाटतं. आपल्या कामाला संस्थात्मक दर्जा दिल्यानेच गोपीचंद हे यश साध्य करू शकले आहेत. इतर खेळातल्या प्रशिक्षकांनी यातून काय तो बोध घ्यावा.
– संजय मदने, नागपूर

मूलभूत सुविधांचा विचार व्हावा
२ डिसेंबरच्या अंकातील ‘कॅशलेस अद्यापही परिघाबाहेरच’ ही कव्हरस्टोरी सध्याच्या संपूर्ण परिस्थितीवरील महत्त्वपूर्ण भाष्य करणारी ठरते. भ्रष्टाचार, काळा पसा हे सगळं थांबवण्यासाठी सरकारने उचलेलं नोटाबंदीचं पाऊल सकारात्मक आहे, हे मान्य आहे. पण कॅशलेसच्या दिशेने जाणारं त्यांचं पुढचं पाऊल मात्र काहीसं विचार करायला लावणारं आहे. त्याचा हेतू चांगला असला तरी त्याच्या मुळाशी जायला हवं. ग्रामीण भागात आजही सगळीकडे इंटरनेट पोहोचलंय, सगळ्यांना ते वापरता येतं हे गृहीत धरणं चुकीचं आहे. कॅशलेसच्या उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची अनेक ठिकाणी वानवाच आहे, या कव्हरस्टोरीतील विधानाशी सहमत आहे.
– अरिवद शेंबेकर, गोरेगाव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:01 am

Web Title: readers response 131
Next Stories
1 हिंमतच होता कामा नये
2 पुढच्याची ठेच पाहायची तरी…
3 प्रदूषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही
Just Now!
X